शक्तीचे 48 नियम । 48 Laws Of Power In Marathi

जय महाराष्ट्र मंडळी! वाचन करणे आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल भेटेल त्याला सांगत सुटणे हा माझा छंदच आहे. मंडळी आज मी आपल्यासोबत सध्याच वाचत असलेल्या एका पुस्तकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. सध्या हे पुस्तक फारच चर्चेत आहे. बऱ्याच ठिकाणी त्याच्याविषयी ऐकल्यावर मीसुद्धा ते वाचण्याचा निर्णय घेतला.

त्या पुस्तकाचे नाव आहे 48 Laws Of Power म्हणजेच सत्तेचे 48 नियम. 48 Laws Of Power हे रॉबर्ट ग्रीन यांच्याद्वारे लिखित प्रसिद्ध असे पुस्तक आहे. विक्रीचे उच्चांक मोडत या पुस्तकाने रॉबर्ट ग्रीन यांना बेस्टसेलर लेखकांच्या यादीत नेऊन बसवले आहे.

सत्ता. शक्ती. अशी वस्तू जिची हाव सर्वांनाच असते.( कदाचित तुम्हाला नसेल. किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला तशी हाव नाही असे तुम्हाला वाटत असेल. पण तुमचा हा भ्रम या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच दूर होऊन जाईल.) हि सत्ता कशी संपादन करायची आणि कशी टिकवायची याविषयी 48 Laws Of Power मध्ये सखोल चिंतन केलेले आहे.

सत्ता मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवत कुणाच्याही सत्तेत दास न होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच हे पुस्तक फार उपयुक्त ठरते. चला तर मंडळी शक्तीचे 48 नियम । 48 Laws Of Power In Marathi या पोस्ट मध्ये आज जाणून घेऊयात सत्तेचे /शक्तीचे ४८ नियम.

टीप : जीवनात आदर्शवाद घेऊन चालणाऱ्या बऱ्याच जणांना या पुस्तकातील बरेचशे नियम आणि निष्कर्ष खटकतील. तेव्हा, जे  स्वतःच आणि इतरांचं खरं सत्तालोलुप स्वरूप पाहायला तयार असतील त्यांनीच या पुस्तकाला हात लावायला हवा.

 

लेखकाविषयी थोडे 

 

रॉबर्ट ग्रीन हे अमेरिकन लेखक आहेत. आजपर्यंत त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले. त्यापैकी सहा पुस्तके न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बेस्टसेलर ठरली आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये The Art  Of Seduction, The  Laws Of Human Nature, 48 laws of power, Mastery, 33 Strategies of War, the 50th law यांचा समावेश होतो.

मानव आणि मानवाचे मानसशास्त्र हा रॉबर्ट ग्रीन यांच्या अभ्यासाचा आवडता विषय आहे. मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्या अभ्यासाच्या आधारे वरील पुस्तकान्चे लेखन केले आहे. त्यांनी सांगितलेले नियम हे इतर महान लोकांच्या जीवनाच्या बारीक निरीक्षणातून आलेले आहेत.

आपल्या पुस्तकांतील नियमनविषयी बोलतांना रॉबर्ट म्हणतात की ” मी पुस्तकांत सांगितलेले खुपच कमी नियम वापरतो. कारण मला वाटते जो ते सगळे नियम वापरेल तो खूपच नीच प्रकारचा माणूस असेल ज्याच्या आजूबाजूला राहणे पण त्रासदायक ठरेल. “

( आपल्याला तर लेखकाच्या मतानुसार नीच बनायचं नाहीआहे. तरी नेमके नीच, सत्तालोलुप व्यक्तिमत्व कसे ओळखायचे यासाठी तरी हे पुस्तक आपण वाचायलाच पाहिजे. )

 

 

 

शक्तीचे 48 नियम । 48 Laws Of Power In Marathi

 

 

प्रस्तावना 

 

48 Laws Of Power या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला ह्या जगातील सर्वात मह्त्वाच्या खेळाची ओळख करून देतो. हा खेळ आहे सत्तेचा. सत्ता किंवा शक्ती म्हणा हि सर्वांनाच हवी असणारी गोष्ट. सर्वांकडून आपल्याला हवे असेल ते करवुन घेणे, लोकांवर आपला एक प्रकारचा अंमल असणे कुणाला आवडणार नाही?

सत्तेसाठी संघर्ष सारेच करत असतात. मात्र हा संघर्ष जर इतरांना कळाला तर आपण सत्तालोलुप दिसू म्हणून प्रत्येकजण एक विशिष्ट प्रकारचा मुखवटा धारण करून हा खेळ खेळत असतो.आपल्यापैकी प्रत्येकानेच हा खेळ खेळलेला आहे.

अगदी लहान मुळापासून ते शंभर वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सारेच कळत – नकळत सत्तेच्या, प्रभुत्व संपादनाच्या नियमांचा वापर करत असतो. आपल्याला संन्यासी वाटणारे लोकही कश्याप्रकारे या नियमांचा वापर करून त्यांच्या भोवतीच्या लोकांना आपल्या प्रभुत्वाखाली ठेवतात हे आपल्याला कळून येईलच.

सत्तेचा हा खेळ नेमका चालतो कसा? हे समजावून सांगतांना लेखक जुन्या काळातील राजांच्या दरबाराचे उदाहरण देतो. राजाच्या दरबारात अनेक मंत्री असायचे. त्यांच्यामध्ये राजाला प्रिय असण्यासाठी, राजाच्या तसेच प्रजेच्या नजरेत महत्व मिळवण्यासाठी नेहमी स्पर्धा असायची.

एकीकडे ते लोक मिळून मिसळून सल्लामसत करीत. राजदरबाराची प्रतिष्ठा सांभाळून व्यवहार करीत तर दुसरीकडे इतरांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी कट कारस्थाने, गुप्त खलबते करीत. म्हणजेच एकाच वेळेला ते एका नैतिक माणसाचे आणि एका कुटील बुद्धिवादी माणसाचे पात्र सांभाळत असत.

आज राजाच्या त्या दरबारची जागा या जगाच्या रंगमंचाने घेतली आहे. तेव्हा एक कुशल दरबारी होऊनच जगणे शक्य आहे. नाहीतर दुसरा कुणी आपल्याला तुडवून पुढे निघून जाईल. तेव्हा चला तर मग 48 Laws Of Power या पोस्ट मध्ये पाहूयात शक्तीचे ४८ नियम!

 

 

 

Never outshine Your Master । गुरूंसमोर शहाणं बनायचं नाही  

आपल्याला आपल्या सभोवतालच्या माणसांना जिंकायचं असेल, त्यांच्या मनावर राज्य करायचं असेल, तर मानवी स्वभावाची काही वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यावी लागतील. या पुस्तकातील  प्रत्येक नियम आपल्याला कुठल्या ना कुठल्या मानवी वैशिष्ट्यबाबत शिकवणार आहे.

मानव अगदी सुरुवातीपासूनच त्याच्या अहंकाराचा गुलाम राहिलेला आहे. या जगातल्या बहुतेक सर्वच गोष्टी, मग त्या चांगल्या असोत की  वाईट असोत, मानवी अहंकारातूनच तयार झालेल्या आहेत. मानव आपला हा अहंकार, हे गर्व जपण्यासाठी कोणत्याही मार्गाला जाऊ शकतो हे सत्य आहे.

या सत्यावरच आधारित हा पहिला नियम आहे. येथे गुरु (master) म्हणजे फक्त आपल्याला शिकवणाराच असा त्याचा अर्थ नव्हे. येथे गुरु म्हणजे ते सर्व लोक ज्यांच्यावर आपलं अस्तित्व अवलंबून असते. ज्यांच्याशी शत्रुत्व अथवा कटुता आपल्याला भारी पडू शकते त्या सर्वांचा समावेश या संज्ञेमध्ये करता येईल.

लेखक रॉबर्ट ग्रीन सांगतात की अश्या व्यक्तींच्या अहंकाराला कधीच दुखावू नका. तो जेवढा अहंकाराच्या जगात असेल तेवढा तुमचा फायदा होत राहील. या नियमाचा पुरावा म्हणनू लेखक निकोलस फूकेचं उदाहरण देतात. निकोलस हा चौदाव्या लुईचा अर्थमंत्री होता.

निकोलस राजदरबारात प्रभावी होता. त्याला इतर सारेजण दबकून राहत असत. शिवाय विलासी जगणे, मेजवान्यांवर पैसे उधळणे इत्यादीमुळे तो बराच प्रसिद्ध होता. म्हणून जेव्हा राजाचा प्रधानमंत्री मरण पावला तेव्हा निकोलसच नवा प्रधान बनेल असे सर्वांना वाटत होते.

मात्र राजाच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. त्याची कुणकुण निकोलस ला लागली. त्याला वाटले आपण राजाच्या मनातील आपले स्थान गमावत आहोत. तेव्हा राजाला खुश करण्यासाठी काहीतरी करायचे त्याने ठरवले. राजा चौदावा लुईला मेजवान्या (पार्टी) करणे आवडते हे त्याला ठाऊक होते.

म्हणून निकोलसने एका अतिशय भव्य मेजवानीचे आयोजन केले. त्यात राजाला  बोलावले. त्याला वाटले खुश होऊन राजा लगेच त्याला प्रधानमंत्री जाहीर करेल; पण झाले उलटेच. राज्याच्या तिजोरीतील पैश्यात घोळ करून इतक्या मोठ्याल्या मेजवान्या देण्याच्या आरोपात त्याला कैद करण्यात आले.

असे का झाले असावे? तर राजा चौदावा लुईला त्या मेजवानीला पाहून आनंद व्हायचा तर दुःख झाले होते. कारण तशी मेजवानी तो खुद्द राजा असूनसुद्धा आजपर्यंत आयोजित करू शकला नव्हता. त्याच्या मनातील ईर्ष्येमुळे शेवटी त्याने निकोलस ला कैद करण्याचा आदेश दिला.

आपणही बरेचदा असेच वागत असतो. आपल्या गुरूला, मालकाला खुश करण्याच्या नादात त्याचा अहंकार कधी दुखावल्या जातो हे आपल्याला कळतही नाही. त्याचे विपरीत परिणाम मात्र आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापासून दूर घेऊन जाते. तेव्हा जेवढा आपल्या गुरूचा अहंकार उंचावर राहील तेवढी लवकर आपल्याला सिद्धी प्राप्त होईल.

 

 

आणखी वाचा

 

 

 

मित्रांपासून सावध राहा.शत्रूंकडून  शिका । Beware From Friends. Learn From Enemies .

 

“धोखे की खास बात यही होती है, देनेवाला अक्सर कोई अपनाही होता है !” माणसाला विस्वासघातातुन जेवढं नुकसान होत नसेल, त्यापेक्षा जास्त आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला,ज्याला आपलं मानलं त्यानेच विस्वासघात केला म्हुणुन होणारा त्रास खूप जास्त असतो.

हा त्रास, हा मनस्ताप सहन करण्याची आपल्यावर वेळच येऊ नये यासाठी लेखकाने आपल्याला येथे या नियमाद्वारे मार्गदर्शन केले आहे. उदाहरणादाखल लेखक रॉबर्ट ग्रीन आपल्याला बायझंटाईन साम्राज्याचा तरुण सम्राट मायकल आणि त्याचा जिवलग मित्र बॅसिलस ची कथा सांगतात.

ही कथा म्हणजे उच्च प्रतीच्या विश्वासघाताने मुर्तिमंत उदाहरण. सम्राट मायकल आपल्या मित्राला दरबारात स्थान देतो. त्याला आपला वयक्तिक सल्लागार नेमतो. पाहिजे ते पद, पाहिजे तेवढा पैसा देतो. मात्र शेवटी हा बॅसिलस सम्राट मायकल विरुद्ध कट करून त्याला ठार करून स्वतः सम्राट बनतो.

इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असतो असे म्हणतात. आपण जर इतिहासाचे थोडे बारीक निरीक्षण केले तर आपल्याला अशी बरीच उदाहरणे सापडतील. वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, चंद्रशेखर आझाद यांसारखे क्रांतिकारी इंग्रजांच्या तावडीत का सापडले? आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळेच ना?

स्वतः चा फायदा पाहणे.आमिषाला बळी पडणे. ही तर सामान्य माणसाची प्रवृत्तीच आहे. अश्यावेळी आपल्या सोबतचा व्यक्ती दुसऱ्या बाजूला जाणार नाही असा विश्वास ठेवणेच मुळात मूर्खपणाचे ठरते. हुशारांनी मुळात कुणावरच इतका विश्वास ठेऊ नये. हा, फक्त विश्वास नसल्याचे दाखवू नये.

आपला त्या व्यक्तीवर विश्वास नसला तरी त्याला ते जाणवता कामा नये. त्याला नेहमी हेच वाटायला हवे की हा आपल्यावर किती विश्वास ठेवतो!

तसेच आपल्या शत्रूंवर उपकार करून जर त्यांना मित्र बनवण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडायला नको. कारण असा उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला शत्रू जेवढा विश्वसनीय मित्र बनतो त्याप्रमाणे तर आपल्या बालपणापासूनचा मित्रही विश्वसनीय ठरू शकत नाही.

सोप्या भाषेत सांगायचे तर या नियमात एकच गोष्ट सांगितली आहे- “अपनो से बचो , गैरोसे निपट लेंगे ।”

 

 

 

झाकली मूठ सव्वा लाखाची  । Never Reveal Your Intentions

 

ज्यावेळी आपण कुणाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा कधीच त्याला आपला मुख्य हेतू कळू देता कामा नये. लोकांना एकदा का आपला हेतू कळाला की ते आपले कुठल्याही प्रकारचे अधिपत्य झुगारून देण्याचाच विचार करतात. या जगात लोकांना मूर्ख बनलेलं चालतं पण मूर्ख दिसलेलं चालत नाही.

आपले मत पटवून देण्यासाठी लेखक एका तरुण उमरावाचे उदाहरण देतो. त्याला एका स्त्री चे प्रेम मिळवायचे असते. तो त्यासाठी एका अतिशय अनुभवी म्हातारीची मदत घेतो. ती म्हातारी त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे विविध सूत्र सांगते. तो आधी त्या म्हातारीच्याच मनाप्रमाणे करतो.

ज्या तरुणीला पटवायचे असते, तिच्याशी तो आधी मैत्री करतो. पण तिला त्याच्या प्रेमाबद्दल मागमूसही लागू देत नाही. तिच्यासमोर सुंदर स्त्रियांसोबत फिरतो. आणि म्हातारी सांगते त्याचप्रमाणे वागून तो जवळ जवळ यशस्वी झालेलाच असतो तेव्हा एक दिवस मात्र तो म्हातारीच्या आदेश शिवाय आपले प्रेम त्या तरुणीपाशी प्रकट करतो.

त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या कृती या एकाच उद्देश्याने प्रेरित असल्याचे तिला समजून येते. तिला त्याच्या संपूर्ण मोहपाशाचे आकलन होते. परिणामी ती त्याच्यापासून दूर जाते.

दुसरे उदाहरण आहे जर्मनीच्या चॅन्सलर बिस्मार्कचे. तो सुरुवातीपासून युद्धाच्या बाजूने बोलायचा. मात्र १८५० मध्ये ज्यावेळी खरेच आस्ट्रिया विरुद्ध  युद्धाला सुरुवात होत होती तेव्हा त्याने शांतीचा पुरस्कार केला. त्याच्या शांतीवादी विचारांनी प्रभावित होऊन राजाने त्याला मंत्री केले.

मात्र बिस्मार्क योग्य वेळेची वाट पाहत होता. खरे पाहता १८५० ला जर्मनी युद्धाला सज्जच नव्हती. अपुऱ्या साधनांपायी पराजय स्वीकार करावा लागला असता. बिस्मार्क ला हे ठाऊक होते. म्हणून त्याने योग्य वेळेची वाट पाहिली. शांतीचा दूत बनून राहिला. आणि योग्य संधी पाहून युद्ध सुरु केले.

तेव्हा आपला उद्देश्य कुठलाही असो, त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वभावाचा मुखवटा धारण करून राहायला हवे. त्यामुळे आपल्या शत्रूंना कधीच आपली चाल समजत नाही. परिणामी आपल्या कार्यात कमी अडथळे येऊन काम लवकर होते. त्या कामासाठी जास्त ऊर्जा खर्च होत नाही.

आपला मुख्य हेतू लपवून ठेवण्यासाठी आपण धुराच्या ढगांचा वापर करू शकतो. तो पुढीलप्रमाणे.

धुराचे ढगांचा वापर करा. । Use Smoke Screen To Disguise Your Actions  

सहसा सैनिकांना युद्ध भूमीवर लपण्यासाठी धुराचे ढग सहाय्यक ठरत असतात. येथे आपल्याला युद्धभूमीवरील अर्थ न घेता त्या संकल्पनेला आपल्या कार्यात वापरायचे आहे. एखाद्याला फसवतांना ( फसवण्याबाबतच आहे हे पुस्तक पूर्ण!) अशी कृती करणे जी तुमच्या मूळ कृतीपासून इतरांचे लक्ष दूर नेते तिला स्मोक स्क्रीन म्हणतात.

याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हणाल तर इमरान ह्राष्मी, परेश रावल आणि के के मेनन यांच्या प्रमुख भूमिका असणारा चित्रपट ‘नटवरलाल’. त्या चित्रपटात नायक (इमरान) आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खलनायकास (के के मेनन ला ) फसवण्यासाचे ठरवतो.

या कामात त्याला मदत करतो परेश रावल. ते सुरुवातीला के के मेनन ला एक अस्तित्वात नसलेला क्रिकेट संघ विकण्याचा प्लॅन बनवतात. पण शेवटी तो पूर्ण प्लॅन अपयशी होतो. के के ला कळून चुकते की हे लोकं आपल्याला मूर्ख बनवत आहेत. मात्र तोपर्यंत त्याच्या हातातून भल्या मोठ्या रकमेचा चेक निघून जातो.

चेक बाबत के के ला बँकेतून कॉल येतो. तो बँकेत पोहचतो. त्या अधिकाऱ्याच्या सँगण्यावरून तिथेच त्याच्या खात्याचे पासवर्ड बदलून घेतो. त्याच क्षणी तो खऱ्या प्रकारे फसल्या जातो. कारण क्रिकेट संघ विकणे हा मूळ प्लॅन नसून तो फक्त धुराचा ढग असतो. मुळात के के च्या बँकेच्या सगळ्या डिटेल्स मिळवणे आणि त्याद्वारे सगळे पैसे काढून घेणे हा त्यांचा प्लॅन असतो.

एकदा इमरान चा ‘नटवरलाल’ हा सिनेमा बघून घ्या. हा नियम नेमकं काय म्हणतो ते खूप चांगल्या प्रकारे कळून येईल.

 

 

 

 गरजेपेक्षा कमी बोला.।  Always  Say  Less  Than  Necessity 

 

शिंपले आपले मुख पौर्णिमेला उघडतात. तेव्हा खेकडा एखादा खडा त्याच्या मुखात टाकतो. त्यामुळे ते शिंपले त्याचे तोंड बंद करू शकत नाही व शेवटी खेकड्याचे भोजन बनते. असेच जो गरजेपेक्षा जास्त तोंड उघडतो त्याच्यासोबत होते. ऐकणाऱ्याचाच फायदा तो करून देतो. —— लिओनार्दो दा विन्ची

असे मानल्या जाते की जो स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेऊ शकतो तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला आणि लोकांना सहजच नियंत्रित करू शकतो. 48 Laws Of Power  या पुस्तकात रॉबर्ट ग्रीन यांनी कमी बोलण्यामुळे होणारे फायदे सांगितले आहेत.

ज्यावेळी आपण लोकांना शब्दांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण आपल्या शब्दांचे मूल्य कमी करीत असतो. दोन व्यक्तीमधील भाषिक व्यवहारातही अर्थशास्त्रातील पुरवठा आणि मागणीचे नियम लागू पडतात. पुरवठा वाढला आणि मागणी कमी असली की मूल्य कमी होते.

आज प्रत्येकालाच काही सांगायचे असते. ऐकण्यासाठी खूप कमी लोक तयार असतात. म्हणून शब्दांची मागणी कमी असते. तेव्हा आपण जास्त बोललो की आपल्या शब्दांचे आणि पर्यायाने आपले मूल्य कमी होते. सोबतच जेवढे जास्त बोलू तेवढा आपल्यातील अज्ञान, मूर्खपणा समोर येण्याची शक्यता असते.

म्हणून लेखक कमी बोलण्याचा सल्ला देतात. लेखक रॉबर्ट ग्रीन म्हणतात की  आपण जेवढे कमी आणि संदिग्ध बोलू तेवढे आपले मूल्य अबाधित राहील. ज्या लोकांचे व्यवहार लोकांना सहजपणे कळून येतात, ज्यांना ते चांगल्यारीत्या ओळखतात असे त्यांना वाटते, ते त्यांची किंमत कमी करतात.

 

 

 

प्रतिष्ठा म्हणजे सर्वकाही. प्राणाप्रमाणे प्रतिष्ठा जपा. 

 

48 Laws Of Power या पुस्तकात लेखक रॉबर्ट ग्रीन यांनी प्रतिष्ठेला अतिशय महत्व दिले आहे. त्यांच्या मताप्रमाणे आपली समाजात असलेली प्रतिष्ठाच बहुतेक वेळा आपल्याला विजय मिळवून देते.

आपली सत्ता ही  समाजाच्या सभोवताली फिरते. आले मित्र, शत्रू, सगळे हे या समाजाचाच भाग असल्याने आपला समाज आपल्याविषयी काय विचार करतो हे आपल्यासाठी फार महत्वाचे असते.मात्र खरा खेळाडू स्वतःच्या मताप्रमाणे समाजाला त्याच्याविषयी विचार करायला लावतो.

लेखक सांगतात की आपण आपली प्रतिष्ठा सांभाळायला हवीच आणि सोबतच आपल्या प्रतिस्पर्ध्याची प्रतिष्ठा जर मातीमोल करण्याची संधी मिळाली तर ती वाया घालवता कामा नये. मुळात आपण नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेतला पोकळपणा शोधला पाहिजे.

एकदा का शत्रूच्या प्रतिष्ठेतील पोकळी सापडली कि ती समाजाच्या नजरेत आणून द्यावी. त्यानंतर आपल्याला काहीही करायची गरज उरत नाही. बाकी सगळे ही समाजव्यवस्थाच व्यवस्थीत सांभाळते. प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी उपयुक्त अश्या अनेक क्लृप्त्या लेखकाने पुस्तकात दिल्या आहेत. उदाहरणार्थ –

  • प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आघात करणे.
  • ज्यावेळी आपली प्रतिष्ठा उच्च असेल तेव्हा इतरांना त्यांची जागा दाखवुन देत चला.
  • उपरोध,टीका आणि विनोद यांच्या व्यवस्थित मिश्रणाने प्रतिस्पर्ध्याचे महत्व कसे कमी करता येईल त्याकडे लक्ष असुद्या.

 

 

 

 

सदैव लक्ष वेधून घ्या. नेहमी केंद्रस्थानी राहा. 

 

जगात दिसण्यावरूनच प्रत्येक गोष्टीची किंमत केली जाते. उपयोगावरून नाही. अन्यथा उपयोगाच्या दृष्टीने बघितले असता लोखंडाला सुवर्णपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले असते. पण तसे होत नाही. जग देखाव्याला भुलते.

आमचे शिक्षक नेहमी म्हणायचे ” चिंध्या पांघरून सोने विकायला गेलो तर गिऱ्हाईक भेटता भेटेना, अन सोने पांघरून चिंध्या विकायला गेलो तर गिऱ्हाईक तुटता तुटेना.” यातलाच हा प्रकार आहे. जग आपण कसे आहोत यापेक्षा आपण कसे दिसतो यावरून आपली किंमत करते.

म्हणून लेखक रॉबर्ट ग्रीन म्हणतात की कुठल्याही किंमतीवर सर्वांचे लक्ष वेधून घ्या. नेहमी प्रकाशझोतात राहा. जी वस्तू दसत नाही तिच्या अस्तित्वावरच हे जग प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.म्हणून  कधीच गर्दीचा भाग बानू नका. सदैव वेगळे रहा. ‘हमेशा स्टाईल मे रहनेका !’

 

 

 

 

श्रेय हिसकायला शिका. 

 

आपण जर आपल्या आजूबाजूच्या दोन चार प्रसिद्ध राजकारण्यांचे व्यवहार थोडे निरखून पाहिले तर आपल्या सहजच लहस्त येईल कि हे सारेच लोक श्रेय स्वतःकडे ओढण्यासाठी एकदम तत्पर असतात. काम करणारे राहतात बाजूला आणि हे लोक स्वतःचीच प्रौढी मिरवताना दिसतात.

आपल्यालाही ते सहज करता यायला हवं. सत्तेच्या खेळात दुसऱ्याच्या मनाचा विचार करून भावनिक होणे म्हणजे कमकुवत मनाचे लक्षण समजल्या जाते. इथे लोकांनी आपल्यासाठी कार्य करावे आणि श्रेय मात्र आपले असावे हाच उद्देश्य असतो.

समाजासाठी महत्वाच्या वत्याही गोष्टीत आपला खारुताईचा वाटाही किती महत्वाचा होता आणि त्या कामात आपले श्रेय कसे दाखविता येईल याकडे बारकाईने लक्ष असायला हवे.

 

 

 

 

समारोप  

 

मंडळी आज शक्तीचे 48 नियम । 48 Laws Of Power In Marathi या पोस्ट च्या माध्यमातून आपण लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 Laws Of Power या पुस्तकाची ओझरती ओळख करून घेतली.

रॉबर्ट ग्रीन यांच्या मूळ पुस्तकात एकूण ४८ नियम दिलेले आहेत. त्यापैकी प्रारंभीच्या काही नियमांबद्दलच आपण आजच्या पोस्ट मध्ये माहिती घेतली. वेळेचा अभाव तर आहेच शिवाय एवढ्या मोठ्या पुस्तकाचा सारांश देण्याच्या प्रयत्नात बरच काही सुटून जाण्याचा धोकाही संभवतो.

म्हणून सर्वांनी एकदातरी 48 Laws Of Power नक्कीच वाचा. आणि पुस्तक वाचल्यानंतरचा तुमचा अनुभव कंमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. सोबतच आजची पोस्ट तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आम्ही सुधारणावादी आहोत तेव्हा पोस्टमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्कीच कळवा.

धन्यवाद !

 

Leave a Comment