5 सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi

जय महाराष्ट्र मंडळी. मंडळी माणूस आणि गोष्टी यांचं एक अतूट नातं आहे. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत कथांचा उगम केव्हा झाला? याबाबत आपल्याकडे ठोस अशी माहिती नसली तरीही या कथा, गूढ-गोष्टी मानवी जीवनावर काय परिणाम करतात याबद्दल आपण साऱ्यांनाच माहिती आहे. 

या गोष्टी, कथा आपल्याला असं देतात तरी काय? निखळ मनोरंजन, कल्पनाशक्तीला चालना देण्यासोबतच जीवनात पावलो-पावली उपयोगी पडेल असे ज्ञान चिरकाल स्मरणात राहील याची सोय या कथा करून ठेवतात. एखादी गोष्ट कथेच्या माध्यमातून समजावून सांगितली की ती सहजगत्या लक्षात राहते.

कथांचे आणि मानवी मेंदूचे हे गूढ नाते  लक्षात घेऊनच आपल्या आधीच्या पिढीतील ज्ञानी लोकांनी त्यांचे मूल्यविषयक उपदेश कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवलेत. पुराणे, पंचतंत्र, तेनालीरामच्या कथा अश्या अनेक प्रकारच्या बोधकथांद्वारे त्यांनी येणाऱ्या पिढ्यांचे बोद्धिक प्रबोधनाची सोय करून ठेवली.

आज आपण अश्याच काही कथा पाहणार आहोत. आजच्या ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्टद्वारे आम्ही तुमच्यासाठी काही खास बोधकथा घेऊन आलो आहोत. या कथा तुम्हाला जीवनात नक्कीच उपयोगी ठरतील.

 

 

५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi

 

मंडळी आजच्या ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये अकबर-बिरबल यांच्या कथा पाहण्याआधी या कथांचे मुख्य पात्र असणारे अकबर आणि बिरबल यांची माहिती घेणे अगत्याचे ठरते. तर आधी थोडक्यात जाणून घेऊयात अकबर-बिरबल यांच्याबद्दल.

 

 

 

अकबर आणि बिरबल कोण होते ?

 

भारताच्या इतिहासात थोडं डोकावून पहिल्यास आपल्याला समजून येईल की अकबर हा एक मुघल सम्राट होता. इब्राहिम लोदिचा पराभव करून बाबरने भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. हुमायून नंतर त्याचा मुलगा अकबर हा तिसरा मुघल सम्राट बनला.

आता राजा म्हटलं की त्याचं मंत्रिमंडळ आलंच. अकबराचेही एक मंत्रिमंडळ होते. या मंत्रिमंडळाला नवरत्न असे संबोधले जाई. या नवरत्नांमध्ये  विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. अबुल फाझल, फैझी सारखे साहित्यिक, तानसेन सारखा गायक, राजा तोडरमल सारखा व्यवस्थापन तज्ञ अशी सारीच अगदी श्रेष्ठ, हुन्नरबाज व्यक्तिमत्वे या नवरत्नांमध्ये होती.

सम्राट अकबराच्या या नवरत्नांपैकी एक म्हणजे बिरबल. बिरबल त्याच्या चातुर्यासाठी आणि प्रसंगावधानासाठी प्रसिद्ध होता. बिरबलाचे मुळ नाव पंडित महेश दास होते. तो एक भट ब्रह्मन् होता. फक्त चातुर्यच नव्हे तर न्यायी स्वभाव, दूरदृष्टी, कला व संगीतात रुची असे अनेक पैलू बिरबलाच्या व्यक्तिमत्वाला होते.

बिरबल सम्राट अकबराच्या सैन्याचे नेतृत्वही करीत असे. १५६० च्या दशकात अकबराच्या साम्राज्यात वायव्य सरहद्दीकडे उठाव झाला. तिथल्या स्थानिक जमातींनी अकबराचे अधिपत्य झुगारून दिले होते. हा उठाव शमवण्यासाठी बिरबलाच्या नेतृत्वात सैन्य गेले. तिथे झालेल्या एका चकमकी दरम्यान बिरबलाचा मृत्यू झाला.

 

 

 

अकबर बिरबल कथा -इतिहास आणि कल्पना । Akbar Birbal Stories- History and Imagination

 

अकबर बिरबल कथांमध्ये सत्य किती आणि कल्पना किती असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असल्यास आपल्याला या प्रकारच्या लोककथा अस्तित्वात का आल्या असाव्यात हे जाणणेसुद्धा महत्वाचे आहे. लोककथांचा मूळ उद्देश्य लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे हा असतो.

लोककथांमध्ये तात्कालिक सामाजिक बाबींवर जास्त भर असतो. शिवाय त्याकाळात ती कथा रचली जात आहे त्याकाळातील व्यक्ती, ठिकाणे यांचे संदर्भ कथेला जोडल्यास ती अधिक विश्वसनीय होऊन त्या कथेच्या परिणामकारकतेत आपोआप वृद्धी होते. त्यामुळे त्या काळातील लोकांनी अकबर बिरबल यांच्या नावांचा वापर केला असणे साहजिकच आहे.

कथा रचण्यासाठी अकबर बिरबल यांच्या नावांचा वापर करण्यामागे आणखी एक कारणअसू शकते. या कथा तयार करणाऱ्या बुद्धिजीवींना आपली बाजू भक्कम दाखवायची असल्याने त्यांनी धन आणि सत्तेचा निर्देशक म्हणून अकबराला दाखवले. तर बुद्धिमत्तेचा प्रतिनिधी म्हुणुन बिरबलाला.

मुळात अकबर बिरबल कथांची संख्या इतकी अधिक आहे की  कोणीही साधारण बुद्धिमत्तेचा माणूस निश्चितपणे सांगू शकेल की  यात बऱ्याच कथा निव्वळ काल्पनिक आहेत. त्यांचा इतिहासाशी नावांखेरीज इतर कुठलाही संबंध नाही. या कथांच्या सत्यतेबाबत पुरावे नाहीत.पण त्यापैकी काही अश्याही आहेत ज्या खरोखरच घडल्या असू शकतात.

कथा खऱ्या कि खोट्या हे तेवढं महत्वाचं नाही. मुळात या कथा आपल्याला काय शिकवतात? या कथांमधून आपण कोणते मूल्य आत्मसात करतो ? हे अधिक महत्वाचे आहे. तेव्हा मंडळी अधिक वेळ न गमावता आपल्या आजच्या 5 सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये आपण पाहुयात अकबर बिरबल कथा.

 

कथा 

 

 जे होतं ते भल्यासाठीच होतं

 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.(गोष्टीची सुरुवात अशीच करायची असते बरं का!  तशी आपल्या पूर्वजांची शिकवन आहे. म्हणून मी सुद्धा सुरुवात तशीच करणार !) सम्राट अकबराचा दरबार भरला होता. त्याचे सगळे मंत्रिमंडळ, नवरत्न, आणि काही विशेष उपस्थित लोक विविध विषयांवर चर्चा करीत होते.

मोठं मोठ्या विषयांवर चर्चा झाल्या. सर्वात शेवटी एका मंत्र्याने चर्चेचा विषय बिरबलाच्या स्वभावाकडे वळवला. तो मंत्री म्हणाला  “बिरबल नेहमी हसत राहतो. चिंतेची लकेर त्याच्या माथ्यावर उठलेली आम्ही कधीच पाहिली नाही. त्याच्या मुखावर नेहमीच प्रसन्नता नांदत असते. त्याचे रहस्य बिरबलाने आम्हालाही सांगावे.”

या एका मंत्र्याच्या मागणीला नंतर इतर सर्वांनी उचलून धरले.मुळात त्याबाबतचे सत्य जाणून घेण्याची इच्छा तर खुद्द सम्राट अकबराचीसुद्धा होती. त्या इच्छेला आज मूर्त स्वरूप मिळाले होते. मंत्र्यांच्या द्वारे ती प्रकट झाली होती. बिरबलाने हळूच राजाची संमती मागितली.

अकबराने संमती देताच बिरबल जागेवरच उभा राहिला आणि सगळ्यांकडे स्मितहास्य करीत म्हणाला “माझ्या आनंदी आणि हसतमुख राहण्यात काही कुठले रहस्य नाही. माझ्या आनंदाचे कारण अगदी सोपे आहे. माझा एका उक्तीवर ठाम विश्वास आहे. ती म्हणजे – जे काही होतं ते भल्यासाठीच होतं.”

एवढे बोलून बिरबल आपल्या आसनावर बसला. काहींना बिरबलाच्या उक्तीचा अर्थ कळाला होता. ते लोक आनंदी होते. मात्र काही जण संभ्रमात होते. त्यांना मुळात या उक्तीवर विश्वास ठेऊन चालणेच योग्य वाटत नव्हते. आणि त्यांच्यामध्ये खुद्द अकबरसुद्धा होता. अकबराने बऱ्याच वेळा बिरबलाच्या मुखातून ‘जे होत ते भल्यासाठीच’ चा मंत्र ऐकला होता.

अकबराने बिरबलाला थोडं स्पष्ट करायला लावले. बिरबलाने त्याच्या आशावादी दृष्टिकोनाबाबत बराच वेळ भाषण केले पण अकबराचे समाधान झाले नाही. शेवटी त्यादिवसाची सभा वेळेमुळे थांबवण्यात आली. बिरबल आपले स्पष्टीकरण देऊन थकला होता. पण अकबरला समजाऊ शकत नव्हता.

मुळात अकबराचे मन हि गोष्ट,हा आशावाद मानायला तयारच नव्हते. एखादी गोष्ट मिळाली नाही तर दुखी व्हायचे नाही. आनंदी राहायचे. जे होतं ते भल्यासाठीच म्हणत पुढे जायचे. यात बिरबलाला कुठलेच शहाणपण दिसत नव्हते. शेवटी व्यवस्थित वेळ आल्यावर स्पष्ट करून सांगीन अशी हमी देत बिरबलाने ती वेळ काढली.

काही दिवसांनी महाराज अकबर आणि बिरबल दोन-चार सैनिक घेऊन शिकारीला जंगलात गेले. हिरव्यागार दाट वनामध्ये शिकारीचा शोध असतांना ते एके ठिकाणावर अकबराचा घोडा उधळला. परिणामी अकबर धाडकन खाली पडला व त्याच्या हाताला चांगली मोठी भेग पडली.

बिरबलासह साऱ्याच सैनिकांनी अकबराला परतण्याचा सल्ला दिला. पण अकबर त्याच्या अहंकारात मग्न होता. एका राजाने रिकाम्या हातांनी जंगलातून परतणे त्याच्या मनाला मान्य नव्हते होत. शेवटी सर्वांनी थोडी विश्रांती घेऊन शिकारीच्या शोधात जंगलाच्या आणखी आत जाण्याचे ठरवले.

ते तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या एका ओढ्याच्या काठावर असणाऱ्या झाडाखाली जाऊन बसले. तिथले रम्य दृश्य पाहून बिरबल म्हणाला “बघा महाराज, जे झाले ते भल्यासाठीच झाले. आपण घोड्यावरुन पडला नसतात तर आज आपण या रम्य दृश्याला मुकलो असतो.”

बिरबलाचे बोलणे ऐकून अकबराला अतिशय संताप आला. त्याला वाटले की आपल्याला एवढी दुखापत झाली असतांना हा ‘जे झाले ते भल्यासाठीच’ म्हणतोय. इथे मला एवढी मोठी जखम झालीय. साऱ्या सकाळपासुन वणवण फिरतोय पण शिकार मिळाली नाही. आणि हा ‘जे झाले ते भल्यासाठीच म्हणतोय!’

रागाने लाल झालेल्या अकबराने लगेच सैनिकांना आदेश दिला की बिरबलाला बंदी बनवून परत घेऊन जावे आणि सूर्यास्तानंतर फाशी द्यावी. अकबराने इतर सैनिकांनाही बिरबलसोबत परत पाठवले आणि स्वतः शिकारीच्या शोधात जंगलात आणखी आत गेला. तो समोर समोरच जात राहिला.

बराच वेळ शोध घेतल्यावर अकबराने शेवटी हार मानली. आणि तो परतन्यासाठी निघाला पण त्याला कुठेच रस्ता दिसत नव्हता.अकबराने रस्ता शोधण्याची बरीच धडपड केली पण त्याला रस्ता काही सापडत नव्हता. शेवटी त्याला कळून चुकले की  आपण या जंगलात हरवलो आहोत.

अकबरावरची संकटे इथेच थांबणारी नव्हती. थोड्याच वेळात त्याला जंगलात राहणाऱ्या आदिवासी समुदायाच्या काही लोकांनी पकडून नेले. तिथे आदिवासींनी आपसात बरीच चर्चा केली. नंतर एकमताने ठरवण्यात आले की बंदी बनवलेल्या या माणसाचा म्हणजेच अकबराचा बळी द्यायचा.

अकबराला जसे समजले की  हे लोक त्याचा बळी देणार आहेत त्या क्षणी त्याला देवाच्या अगोदर बिरबलाची आठवण आली. त्याला विश्वास होता कि बिरबलाने या परिस्थितीतून आपल्याला नक्कीच सुखरूप बाहेर काढले असते. त्याला बिरबलाच्या उपकारांची आठवण झाली. रागाच्या भरात आपण बिरबलसोबत केलेल्या अन्यायाची आठवण होऊन अकबराचे मन पश्चातापाने व्याकुळ झाले.

थोड्याच वेळात बळी देण्याची सगळी तयारी झाली. बळीची पूजा करण्यासाठी आदिवासींचा एक ज्येष्ठ व्यक्ती समोर आला. तो अकबराची पूजा करत असतांना त्याच्या लक्षात आले की अकबराला जखम झालेली आहे. त्या समुदायाच्या प्रथेनुसार जखमी बळी पावन नव्हता.परिणामी आदिवासींनी अकबराला मोकळे केले आणि  जंगलाबाहेर आणून सोडले.

आता मात्र अकबराला बिरबलाचे म्हणणे पटले होते. त्याच्या लक्षात आले होते की बिरबल म्हणाला ते योग्यच होते. कारण ज्या जखमेमुळे अकबराने बिरबलाला फाशीची शिक्षा द्यायला सांगितली त्याच जखमेमुळे आज अकबराचे प्राण वाचले होते. सोबतच मार्ग भटकलेल्या अकबराला आदिवासींनी जंगलाच्या बाहेर आणून सोडले होते.

सूर्यास्ताला थोडाच वेळ शिल्लक राहिला होता. तेव्हा बिरबलाला फाशी देण्याच्या आधी पोहचण्यासाठी अकबराने आपला घोडा धूम पळवला. काहीही झाले तरी बिरबलाला तो गमावू शकत नव्हता. इकडे बिरबलाच्या फाशीची सगळी तयारी झाली होती. फासापासून  थोड्याच अंतरावर बिरबल निश्चिन्त बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. सगळी शांतता होती.

आता बिरबलाला फाशी देणारच की तेवढ्यात अकबर तेथे पोहचला. त्याने लगेच घोड्यावरून उडी घेतली आणि फाशी थांबवायला लावत धावतच जाऊन बिरबलाच्या पायांना बिलगला. अकबर आपल्या चुकीने खूप दुखी झाला. त्याने बिरबलाशी केलेल्या अन्यायाबाबत त्याला स्वतःची लाज वाटायला लागली. तो बिरबलाला आलिंगन देऊन रडायला लागला.

अकबराला रडतांना पाहून बिरबल पुन्हा म्हणाला ” जाऊद्या हो महाराज. काय एवढं मनावर घेता? जे होतं ते भल्यासाठीच!” हे ऐकून मात्र आता अकबराचा पारा चढला. जे काही घडलं होतं  ते अकबराची भलेही चांगलं होतं ; पण बिरबलाच्या तर जीवावर संकट आलं होतं. तेही विनाकारण. कुठलाही अपराध नसतांना. तरीसुद्धा तो असं कास काय म्हणू शकतो ?

तेव्हा न राहवून अकबराने रागातच बिरबलाला विचारले ” बिरबल या साऱ्यात तुझी कुठलीही चूक नसतांना आज तुझा जीव गेला असता. तरीसुद्धा तू म्हणतोय की ‘ जे होतं ते भल्यासाठीच’. या साऱ्यात तुझं काय भलं झालं?” बिरबलाला अकबराच्या मनातला गोंधळ समजला. प्रसन्न असं हास्य करीत बिरबलाने अकबराला उत्तर दिले.

बिरबल म्हणाला ” महाराज आजच्या साऱ्या घटनांमध्ये जे हि घडलं ते भल्यासाठीच. आज जर तुम्ही माझ्यावर रागावून मला फाशीची शिक्षा देण्यासाठी परत पाठवले नसते तर तुमच्यासोबत मीसुद्धा त्या आदिवासींच्या तावडीत सापडलो असतो. तुम्हाला जखम असल्या कारणाने त्यांनी तुमचा बळी दिला नाही.

तुम्ही तर बचावलेच असतात. पण माझे काय झाले असते याचा थोडा विचार करा. बळीच्या आगेवर मला भाजताना तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले असते. तुम्ही मला फाशी देण्यासाठी परत पाठवले म्हणूनच आज मी तुमच्यासमोर जिवंत उभा आहे.आणि म्हणूनच म्हणतोय की ‘ जेही घडतं ते भल्यासाठीच.’

शेवटी अकबराला बिरबलाचे  म्हणणे पटले. त्याच क्षणापासून त्यानेही ठरवले की परिस्थिती कितीही वाईट असली तरी शांत आणि सकारात्मक राहायचे. ‘ जे होते ते भल्यासाठीच ‘ या उक्तीला सदैव ध्यानात ठेऊन आचरण करायचे.

 

तर मंडळी नुकतीच आपण ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये ‘ जे होतं ते भल्यासाठीच’ ही कथा पाहिलीत. जीवनात कितीही मोठे संकट आले. परिस्थिती कितीही गंभीर झाली. तरीही माणसाला शांत आणि सकारात्मक राहायचा उपदेश करणारी ही कथा आहे. आता आपण ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये दुसऱ्या कथेकडे वळूया.

 

 

 

बिरबलाची खिचडी

 

अकबर थोडा स्वच्छंदी प्रकारचा राजा होता. आपल्या राज्यात मनोरंजनासाठी तो वेवेगळ्या स्पर्धा घेत असे. या स्पर्धांमध्ये मुख्यत्वे अश्या गोष्टींचा समावेश असायचा ज्या स्वतः अकबराला सहज शक्य नसायच्या. मग त्याच गोष्टीची स्पर्धा घेऊन आपल्या राज्यात कुणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ तर नाहीना? याची खातरजमा तो करायचा.

एकदा असेच झाले. हिवाळ्याचे दिवस होते.. एके दिवशी रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर अकबर बाहेर शतपाउली करत होता. फिरत फिरत तो त्याच्या राजमहालासमोरच्या तळ्यापाशी आला.त्याने तेथेच तळ्यात पाय टाकून बसण्याचा विचार केला. तो तळ्यात पाय टाकून बसलाही.

पण जास्त वेळ पाण्यात पाय ठेऊ शकला नाही. पाणी अतिशय थंड होते. झाले! अकबराच्या डोक्यात नवी स्पर्धा आली. लगेच त्याने दवंडी पिटवली की  “जो कोणी रात्रभर राजमहालासमोरच्या तळ्यात उभा राहील, त्याला पाच हजार सोन्याच्या मोहोरा इनाम म्हणून दिल्या जाईल. ते करत असतांना अट अशी की तळ्यात उभे राहणाऱ्या व्यक्तीने उष्णतेसाठी कुठलीही मदत घेऊ नये.”

दवंडी ऐकताच राजमहालासमोर लोकांची झुंबड उडाली. सरोवराच्या सभोवताली प्रेक्षकांची गर्दी झाली. ही  पैज कोण जिंकणार ते पाहण्याची सर्वांना उत्सुकता होती. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. कुणी एक तास, कुणी दोन तास तर कुणी सहा तासापर्यंत त्या गार पाण्यात उभे राहिले. पण रात्र काढणे कुणालाच जमले नाही.

पहिल्या रात्रीला कुणीच शर्यत पूर्ण करू न शकल्याने लोकांत दुःख होते. मात्र अकबर फार खुश होता. त्याला मजा वाटत होती. दुसऱ्या रात्रीलाही बरेच जणांनी प्रयत्न केला. पण कुणालाच पूर्ण रात्र त्या थंड पाण्यात उभे राहणे शक्य झाले नाही. तिसऱ्या रात्रीही तेच घडले. आता ही शर्यत कुणीच जिंकू शकत नाही अशी अकबराची समजूत झाली होती.

शेवटी चौथ्या रात्रीला एक कोळी तिथे आला. ठरल्या वेळी तो पाण्यात उभा राहिला. त्याने देवाला हात जोडले आणि देवाचे नामस्मरण  करत तो पूर्ण रात्रभर उभा राहिला. त्या कोळ्याने शर्यत जिंकली होती. मात्र अकबराला या गोष्टीवर विश्वास बसतच नव्हता. अकबराने कोळ्याला त्याला हे कसे काय शक्य झाले हे विचारले.

तेव्हा कोळी म्हणाला की ” महाराज आपल्या महालात जळणाऱ्या दिव्याकडे बघत मी त्या दिव्याची ऊर्जा मला मिळत आहे अशी कल्पना करीत होतो आणि देवाचे नाव घेत होतो.या व्यतिरिक्त मी काहीही केलेले नाही. पाण्यात राहण्याची तर आम्हा कोळ्यांना सवयच आहे महाराज.”

कोळ्याने दिलेले उत्तर अकबराला पटले नाही. त्याने त्याचा भलताच अर्थ काढला. त्याला वाटले कि कोळ्याने दिव्याच्या उष्णतेच्या साहाय्याने शर्यत जिंकली. म्हणजे कोळ्याने आपली फसवणूक केली आहे. त्यामुळे या कोळ्याला आता  शिक्षा करायलाच हवी. अकबराने त्या कोळ्याला मृत्यूची शिक्षा सुनावली.

कोळ्याला आता कळून चुकले होते की आपण स्पर्धा राजाचा अहंकार दुखावला गेला आहे. परिणामी अकबर चिडून आपल्याला हि शिक्षा देतोय. अकबराला आता जर त्याची चूक दाखवून द्यायला गेलो तर तो आणखीच चिडेल. अश्या प्रसंगी आपल्याला फक्त बिरबलच वाचवू शकतो. हे कोळ्याला माहित होते.

इकडे कोळ्याचे कुटुंबीय बिरबलाकडे पोहोचले. त्यांनी सर्व हकीकत त्याला सांगितली. बिरबलाने त्यांना एक युक्ती दिली. मग ती त्यांनी कोळ्यापर्यंत पोहचवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या कोळ्याला फाशी देण्यासाठी नेण्यात आले. तेव्हा त्याने अकबराला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करणेबाबत विनंती केली.

अकबराने त्याला शेवटची इच्छा विचारली असता तो म्हणाला की ” महाराज माझा मृत्यू आपल्या राज्यातील सर्वात शहाण्या माणसाच्या समोर व्हावा. म्हणजेच अकबराच्या समोर व्हावा. जेणेकरून पुढच्या जन्मात मी त्याच्या प्रमाणे हुशार होईल.” कोळ्याची शेवटची इच्छा ऐकून अकबराला हसू आले. त्याने लगेच बिरबलाला बोलावणे धाडले.

एक दूत बिरबलाकडे पोहचला. बिरबल तयारीतच होता. त्याने लगेच उत्तर दिले की “महाराजांना सांगा बिरबल आज विशेष खिचडी बनवतोय. खिचडी झाली कि पोहचतोच म्हणावं.” दूत आता बिरबलाच्या संदेश घेऊन अकबराकडे पोहचला. अकबर विशेष खिचडीचे ऐकून विचारात पडला. अशी कुठल्या प्रकारची विशेष खिचडी बनवत असेल हा बिरबल? त्याला माहित होते बिरबल काहींना काही उपद्व्याप नेहमीच करत राहतो. तेव्हा नक्कीच काही भलतं बनवत असेल म्हणून त्याने तो विचार बाजूला सारला.

तीन चार तास झाले तरी बिरबल आला नाही. बिरबलाची वाट पाहून सगळे वैतागले होते. मद्येच दोनदा दुतही ब्रबलाकडे जाऊन आला. पण बिरबलाची तेच उत्तर ऐकून परत आला होता. त्याची खिचडी अजूनही शिजायचीच होती. शेवटी एकीकडे वैताग आणि एकीकडे बिरबलाची विशेष खिचडी बघायची उत्सुकता अशी द्विधा मनस्थिती घेऊन राजा अकबर खुद्द बिरबलाकडे पोहचला.

तिथे पोहचल्यावर समोरचे दृश्य पाहून अकबराला आपले हसू आवरणे अशक्यच झाले. समोर एका झाडाच्या फांदीला माणूसभर उंच अंतरावर एक मडके लटकवलेले होते. त्यात तांदूळ शिजायला ठेवले होते. आणि त्या मडक्याच्या खाली छोटीशी शेकोटी केलेली होती. तिथून थोड्याच अंतरावर बिरबल एकटक त्या मडक्याकडे पाहत होता.

अकबर लगेच बिरबलाकडे गेला आणि त्याला हसतच म्हणाला ” बिरबल अश्याने खिचडी कशी काय शिजेल? हि खिचडी शिजणे शक्य नाही.” त्यावर बिरबल म्हणाला ” शिजणार. नक्कीच शिजणार. मला विश्वास आहे. खिचडी नक्कीच शिजणार.”बराच काळ हे असेच सुरु राहिले. अकबर बिरबलाला खिचडीचा नाद सोडून सोबत चल म्हणत होता. तर बिरबल त्याला ‘थोडा वेळ थांबा. आता शिजेलच खिचडी. मग मस्त जेवण करू आणि जाऊ.’ असे म्हणून थांबवून ठेवत होता.

शेवट बिरबलाच्या मूर्खपणा असह्य होऊन अकबर रागानेच त्याला म्हणाला ” बिरबल काय हा मूर्खपणा लावला आहेस? खरेच एवढ्या दुरून तुझ्या खिचडिला उष्णता तरी मिळेल का? मग ती शिजण्याच्या तर प्रस्नच येत नाही.” ते ऐकून लगेच बिरबल म्हणाला ” मी पण तुम्हाला तेच तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय महाराज. महालातल्या दिव्याची उष्णता खरेच कोळ्यापर्यंत पोहचेल का?”

आता अकबराला आपली चूक लक्षात आली. त्याला कळले की नकळत आपण कोळ्यासोबत किती भयंकर अन्याय करणार होतो.  तेव्हा अकबराने लगेच कोळ्याला मुक्त करण्याचा आदेश दिला. आणि अगदी वेळेवर आपल्या हातून मोठी चूक होण्यापासून वाचवल्याबद्दल बिरबलाचेही आभार मानले.

तर मंडळी या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? जीवनात इतरांविषयी निर्णय घेतांना केवळ आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार निर्णय जर घेतला तर तो पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता जास्त असते. बरेचदा आपण इतरांना कमी लेखतो. मलाच नाही जमले तर याला काय जमणार? अशी भूमिका घेतो. अश्यावेळी प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येकाची कुवत, शक्ती वेगळी असते हे आपण ध्यानात ठेवून, सारासार विचार करून कुठलाही निर्णय घ्यायला हवा.

 

 

Also Read

 

 

 

बिरबलाची जागा

 

महाराज अकबर आणि बिरबल यांचे मैत्रीचे नाते संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध होते. अकबर सभांमध्येही बिरबलाला जरा जास्तच मन मरातब देत असे. ते पाहून त्याच्या मंत्रिमंडळातील बरेच जणांना बिरबलाचा राग यायचा. बऱ्याच मंडळींना आपणही बिरबलाप्रमाणेच हुशार आहोत असे वाटायचे. त्यांना आपलाही मान व्हायला हवा अशी इच्छा असायची.

मंत्रिमंडळातील जुन्या मंडळींनासुद्धा ईर्ष्या होती ;पण ते कधीच बोलून दाखवत नसत. आता मात्र सभेमध्ये काही नवे सदस्य आले होते. ते सगळे तरुण होते. तरुणाईचं सळसळत रक्त त्यांना असं मूक बसू देणार नव्हतं. शेवटी एक दिवस सभा बिरबलाची वाट पाहत असतांना एका तरुण सदस्याने, गोपाळने सभेच्या या कृतीवर हरकत घेतली.

त्याने बिरबलाला दिल्या जाणाऱ्या अवाजवी महत्वावर बोट ठेवले. त्याचा बिरबळावरचा द्वेष इतका अधिक होता कि याने सरळ राजाला ‘तो बिरबल आणि इतर सदस्यांमध्ये भेदभाव करतो’ असे सरळ बोलून दाखवले. अकबर गोपालच्या या वागण्यासाठी त्याला कठोर शिक्षा करू शकला असता पण तो योग्य उपाय नव्हता.

कारण गोपाळाला शिक्षा केली असता अकबर बिरबलासाठी पक्षपात करतो हे सिद्ध झाले असते. आणि सभेचा निर्भीडपणे मत व्यक्त करण्याचा नियम कुचकामी ठरला असता. म्हणून मग अकबराने गोपाळला बिरबलाच्या पद्धतीने समज देण्याचे निश्चित केले. अकबर अगदी शांतपणे म्हणाला

“गोपाळ,तू जे काही म्हणतोय ते खरे की खोटे हे आपण अकबर आल्यानंतर ठरवू. पण तत्पूर्वी तू माझे एक काम कर. बाहेर मला वाजंत्र्यांचा आवाज येतोय. ती वरात कुणाकडची आहे ते पाहून ये.” एवढंसं काम! गोपाळ धावतच निघाला आणि थोड्या वेळात परतला. त्याने सांगितले की  ” वरात कुलकर्ण्यांकडली आहे.”

त्यावर अकबराने त्याला विचारले ” नवऱ्या मुलाचे नाव काय आहे?”

गोपाळने हि माहिती घेतलीच नव्हती. तो परत धावत गेला आणि धापा टाकत परत आला. येताच दम आवरत त्याने सांगितले कि नवरदेवाचे नाव देवानंद आहे.

त्यावर अकबराने पुन्हा प्रश्न केला ” वधूचे नाव काय आहे?”

गोपाल पुन्हा धावतच निघाला. त्याच्या मनात पूर्णवेळ बिरबलाची बरोबरी करण्याचे विचार होते. त्यासाठी कितीही मेहनत करायला तो तयार होता. म्हणूनच तर तो अश्या कितीही फेऱ्या मारायला आज मागे-पुढे पाहणार नव्हता. विचारातच तो परत आला. वधूचे नाव ऐकल्यावर पुन्हा अकबराने पुन्हा प्रश्न केला “मुलाचे मामेकुळ काय आहे?

गोपाळ पुन्हा वरातीकड़े गेला. असे बरेच वेळा झाले. गोपाळ आता पुरता दमून गेला होता. तेवढ्यातच दरबारात बिरबल आला. राजाला अभिवादन करून बिरबल त्याच्या जागेवर बसणार तोच अकबराने बिरबलाला प्रश्न केला “बिरबल ती दूरवर वाजंत्री ऐकू येत आहेत. त्या वारातीबद्दल काही ठाऊक आहे का?

बिरबल लगेच उत्तराला.” हो महाराज. कुलकर्ण्यांकडचं वऱ्हाड आहे. वर देवानंद हा आंबेगावच्या प्रमुखांचा, रामरावांचा मुलगा आहे..”बिरबलाने अकबराच्या आज्ञेची वाट न पाहता सगळीच माहिती दिली. काही गोष्टी ज्यासाठी गोपाळ ने एवढी मेहनत घेतली होती त्या, आणि काही ज्या त्याच्या डोक्यातही आल्या नसत्या त्याही गोष्टी बिरबलाने सांगितल्या.

बिरबलाचे बोलणे संपेपर्यंत गोपालच्या लक्षात आले होते की  बिरबल त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा का आहे. आपला सांगकामेपना आणि बिरबलाची चौकस वृत्ती यातील आणि असे अनेक भेद आपल्याला बिरबलापेक्षा बुद्धीच्या क्षेत्रात कनिष्ठ बनवतात हे त्याला कळून चुकले.

शेवटी गोपाळने अकबराची, बिरबलाची आणि संपूर्ण सभेची क्षमा मागितली. त्यादिवसानंतर तो बिरबलाच्या पक्का शिष्य झाला. त्याने बिरबलाचे बरेच गुण  हळू हळू आत्मसात करायला सुरुवात केली. ईर्ष्या करण्यापेक्षा बिरबलाकडून शिकण्यात आपला जास्त फायदा आहे हे त्याला आता कळून चुकले होते.

मंडळी आपल्या आयुष्यातही असे बरेच प्रसंग येतात, जेव्हा ईर्ष्या आपल्याला आंधळं बनवते. आपल्याला आपले दोष दिसत नाही. आपला अहंकार आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधतो परिणामी इतरांत असणारे चांगले गुणही आपल्याला दिसत नाहीत. तेव्हा आपण नेहमी इतर लोकांमधील चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करायला हवा.

 

मंडळी ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये आता आपण बिरबलाच्या चातुर्याची प्रचिती देणारी एक कथा पाहणार आहोत.कठीण परिस्थितीतही आपल्या चातुर्याने आपण योग्य निर्णयापर्यंत कसे पोहचू शकतो हे दर्शविणारी ही कथा आहे.

 

 

 

चोर कोण ?

 

राजा अकबरच्या दरबारात त्याची प्रजा गाऱ्हाणी घेऊन येत असे. अकबर आपल्या खास मंत्र्यांच्या साहाय्याने त्यांचा न्यायनिवाडा करीत असे. साधारण प्रकरणे तर इतर मंत्री हाताळत. परंतु जेव्हा दोषी-निर्दोष ठरवणे कठीण जाई तेव्हा सारेच बिरबलाला बोलवायचे.

एकदा असेच गंभीर प्रकरण अकबरच्या दरबारात आले.जगतशेठ नावाचा  एक श्रीमंत व्यापारी होता. त्याचा सोन्याचा व्यापार होता. त्याच्या दुकानात चोरी झाली. त्याने स्वतः बराच तपास केला. शेवटी तो निष्कर्षापर्यंत पोहचला की चोरी घरातीलच कोण्या नौकाराने केली आहे.

त्याच्याकडे चार नौकर होते. चारही तसे अगदी विश्वासू. पण धनाचा लोभ माणसाला काहीही करायला लावू शकतो. जगतसेठने स्वतः त्यांची बराच वेळ चौकशी केली पण कोणीच मान्य करायला तयार नव्हते. जगतसेठला मात्र पक्का विश्वास होता की चोर त्यांच्यापैकीच कुणी आहे.

शेवटी प्रकरण राजाच्या सभेपुढे ठेवण्यात आले. सभेतही सर्वांनी आपापल्या परीने चोराला समोर आणण्यासाठी प्रयत्न केले. कुणी चोरी केलेल्या धनातील अर्धे धन स्वतःपाशी ठेवण्याची अनुमती मिळण्याचं आश्वासन दिलं , तर कुणी प्रामाणिकपणे समोर आल्यास शिक्षा न करण्याची शाश्वती.

पण चोर काही समोर यायला तयार नव्हता. शेवटी बिरबलाला बोलावणे पाठवले गेले. बिरबलाला प्रकरण आधीच कळून चुकले होते. तेव्हा बिरबल सभेत येतांना आपल्यासोबत चार काठ्या घेऊन आला. त्या चारही काठ्या सारख्या लांबीच्या होत्या. सभेत पोहचून बिरबलाने संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेतले.

नंतर त्याने त्या चार काठ्या चार नौकारांच्या हाती दिल्या. बिरबल त्या चारही नौकारांना म्हणाला ” या चारही काठ्या जादूच्या आहेत. यांच्यावर साधू महाराजांची कृपा आहे. या काठ्यांची विशेषता म्हणजे जर कुणी चोरी केली असेल तर त्या व्यक्तिजवळची काठी एक इंचाने वाढेल.ज्याने चोरी केली नसेल त्याच्या काठीची लांबी तेवढीच राहील.”

तेवढे बोलून बिरबलाने त्या चारही नौकारांना दुसऱ्या दिवशी काठ्यांसह परत येण्याचे सांगून सभेतून मुक्त केले. दुसऱ्या दिवशी ते चारही नौकर आपापल्या काठ्यांसह हजर राहिले. बिरबल चोराला शोधण्यासाठी काय शक्कल लढवतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

बिरबलाने सगळ्यांच्या काठ्यांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यात त्याला एका नौकराजवळची काठी एक इंचाने लहान आढळली. त्याने तोच चोर असल्याचे घोषित केले. सर्वांना आश्चर्य झाले. बिरबल तर म्हणाला होता की  जो चोर असेल त्याची काठी एक इंचाने वाढेल.मग  बिरबलाने ज्याच्या काठीची लांबी कमी झाली त्याला कसे काय चोर घोषित केले?

तेव्हा बिरबलाने स्पष्ट केले की त्या काठ्यांमध्ये कुठलीच जादू नव्हती. त्या काठ्यांची उंची पण वाढणार नव्हती. मात्र बिरबलाने ती एक मानसिक खेळी केली होती. ज्याने चोरी केली नाही तो बिनधास्त राहणार होता. मात्र चोर नक्कीच त्या काठीची लांबी न वाढण्यासाठी प्रयत्न करणार होता.

आणि झालेही तसेच. ज्याने चोरी केली होती त्या नौकाराने भीतीच्या पोटी आधीच काठी एक इंच कापून ठेवली होती. त्याला वाटले की उदयाला जेव्हा काठीची लांबी वाढेल तेव्हा ती पूर्ववत होऊन जाईल. पण त्या काठ्यांमध्ये कुठलीच जादू नसल्याने ती काठी तेवढीच राहिली. आणि चोर पकडल्या गेला.

 

 

 

संपूर्ण ज्ञानाचे सार

 

बादशहा अकबराला भन्नाट प्रश्न विचारून आपल्या दरबार्यांना भंडावून सोडण्याची सवयच होती. त्याच्या प्रश्नांना सगळे दरबारी दचकूनच असत. असेच एक दिवस अकबराने दरबाऱ्यांना प्रश्न केला की त्याला असे वाक्य सांगा की जे वाचल्यावर आनंदी व्यक्ती दुखी होईल आणि दुखातला व्यक्ती आनंदी.

अकबराने दरबारातील सर्वांना एकत्र येऊन त्याविषयी चर्चा करून उत्तर शोधण्याचीही अनुमती दिली होती.मात्र आत होती की जर उत्तर दोन दिवसात मिळाले नाही तर सगळ्यांना आपापले पद सोडावे लागेल. सगळे दरबारी आता मोठं मोठे ग्रंथ धुंडाळण्यात मग्न झाले होते.पदावरून दूर होणे म्हणजे त्या साऱ्यांचा संसार रस्त्यावर येणेच होते.

दरबारातील प्रत्येकाने आपापल्या परीने अकबराच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण कुणाच्याच उत्तराने अकबराचे समाधान झाले नाही. दरबारातील मंत्री मोठं मोठे ग्रन्थ धुंडाळून थकून गेले;पण त्यांना उत्तर मिळाले नाही. शेवटी सर्वांना बिरबलाची आठवण झाली.

तेव्हा सगळ्यांनी बिरबलाकडे धाव घेतली. त्याला महाराजांचा प्रश्न सांगितला. बिरबलाने त्या साऱ्यांना धीर दिला आणि दुसऱ्या दिवशी तो स्वतः उत्तरासह दरबारात हजर राहणार असल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बिरबल दरबारात पोहचला. अकबराने सर्वांवर नजर फिरवत आपला प्रश्न पुन्हा विचारला. त्याने उत्तराबाबत सगळ्यांकडे चौकशी केली. साऱ्यांनीच त्यांच्या वतीने बिरबल उत्तर देणार असल्याचे सांगितले. आता महाराज उत्सुकतेने बिरबलाकडे पाहत होते.

बिरबलाने शेवटी आपल्या खिशातून एक चिट्ठी काढली. आणि ती अकबराकडे नेऊन दिली. अकबराणे ती चिट्ठी उघडली.त्यातील वाक्य वाचून अकबर इतका आनंदित झाला की त्याने आपले सिंहासन सोडून बिरबलाला मिठी मारली. ते पाहून दरबारातील सर्व मंत्र्यांनीसुद्धा जल्लोष केला.

सर्वांनाच त्या चिट्ठीमध्ये बिरबलाने असे कुठले वाक्य लिहिले होते ते जाणून घेण्याची उत्सुकता होती. तेव्हा महाराज अकबराने खुद्द ती चिट्ठी सर्वांसमोर फिरवायला लावली. त्या चिट्ठीवर लिहिले होते -“हि वेळसुद्धा निघून  जाईल.”

 

मंडळी ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये आपण आताच शेवटची कथा पहिली. हि कथा आपल्याला काय सांगते? माणसाच्या जीवनात सुख-दुःख आळीपाळीने ये-जा करतच राहतात. कुठलीच परिस्थिती ही  कायम नसते.

आज आपल्या समोर संकटे आहेत म्हणून खचून जायचे नसते.कारण कधीतरी ती परिस्थीती बदलणारच असते. तसेच आज आपली स्थिती चांगली असेल तर तिचा उगाच गर्व करनेसुद्धा योग्य नाही. कारण चांगली स्थितीसुद्धा केव्हा ना केव्हा बदलणारच.

 

 

 

समारोप

 

मंडळी आज आपण ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये अकबर बिरबलाच्या ५ सुंदर अश्या बोधकथा  पाहिल्यात.या कथांद्वारे आपण आज जीवनात उपयोगी पडतील असे महत्वाचे धडे शिकलॊत.

मंडळी आजची ही  पोस्ट तुम्हाला कशी वाटली? ५ सर्वोत्तम अकबर-बिरबल कथा । 5 Best Akbar Birbal Stories in Marathi या पोस्ट मध्ये कुठली कथा तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तसेच तुम्हाला या पोस्टमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

आम्ही तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोस्टमध्ये नक्कीच सुधारणा करू. शिवाय माय मराठीच्या व्याकरणाच्या जाणकारांनी ज्या काही  चुका झाल्या असतील त्या निदर्शनास आणून द्याव्या. सदर पोस्ट अधिक माहितीपूर्ण आणि वाचनीय बनवण्यासाठी आपले सहकार्य गरजेचे आहे.

Leave a Comment