5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi

जय महाराष्ट्र मंडळी! मंडळी आजची नवी पिढी खरंच खूप प्रगत आहे. आजच्या पिढीकडे हवी ती माहिती लगेच मिळवण्यासाठी गुगल, युट्युब आणि बरीच साधने आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांशी घट्ट नाती जुळलेली हि पिढी आहे.

आता जी काही प्रगती, चैनीची संसाधने नव्या पिढीला मिळत आहेत त्यांवरून हि पिढी खरंच खूप भाग्यवान म्हणावी लागेल. किंवा अगोदरच्या पिढीच्या श्रमांना खरंच यश आले असेही आपण म्हणू शकतो. नवी, प्रगत पिढी जरी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे तरीसुद्धा काही बाबतीत जुनीच पिढी सरस ठरते. 

आपल्या जुन्या पिढीकडे संसाधने जरी अल्प होती तरी त्यातून त्यांनी विपुल प्रमाणात आनंददायी अनुभवांची निर्मिती केली. आट्यापाट्या , हुतूतू, पोहणे यांसारख्या खेळांची, फळबागातील ताज्या फळांची जी मजा या जुन्या पिढीने घेतली तशी मजा नव्या पिढीच्या वाट्याला येणे शक्य नाही. 

जुन्या पिढीकडे असणाऱ्या वैशिष्ट्यामधे एक महत्वाचे म्हणजे या पिढीकडे त्यांना छान छान गोष्टी सांगायला, बोधकथा (moral stories ) सांगायला आज्जी – आज्जोबा होते. मात्र येणाऱ्या पिढीचे आजी आजोबा तर इंस्टाग्राम आणि फेसबुकला चिकटून बसले आहेत. 

त्यामुळे नव्या पिढीला हि सोय मिळणार कि नाही हा एक प्रश्नच आहे. आणि म्हणूनच आज आम्ही 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi हि पोस्ट घेऊन आलो आहोत. आज 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi या पोस्ट मध्ये आपण आजीने सांगितलेल्या काही बोधकथांची ( Moral  Stories in  Marathi )उजळणी  करणार आहोत. 

 

 

5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi

 

 

सिंह आणि गाढव

 

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.( सगळ्या गोष्टी जुन्याच आहेत. त्यामुळे साऱ्याच कथा खूप खूप वर्षांपूर्वीच्याच असतील.) एक फार घनदाट जंगल होते. त्या जंगलात हरीण, वाघ, सिंह, ससा, कोल्हा, यांसारखे सारेच जंगली प्राणी गुण्या गोविंदाने राहत होते. त्या जंगलाचा राजा होता एक सिंह.

सिंहाने आपली राज्यव्यवस्था मात्र खूप चोख सांभाळली होती. अगदी सारीच प्रजा एकदम खुश होती. कुठे कुणाला काही कमी तर नाहीना हे पाहण्यासाठी सिंह नेहमी संपूर्ण जंगल फिरत असे. सगळ्यांची विचारपूस करीत असे. 

एक दिवस असाच आपल्या राज्यात फेरी मारत असतांना त्याची नजर जंगलाला लागून असणाऱ्या क्षेत्रात गेली. तेथे नुकतीच मानवी वस्ती निर्माण झाली होती. आपल्या राज्याला, आपल्या प्रजेला या वास्तिवल्या प्राण्यांपासून काही धोका तर नाहीना याचा अंदाज लावण्यासाठी सिंहाने वस्तीच्या जवळ जाण्याचे ठरवले. 

सिंह नदीच्या काठा- काठाने वस्ती जवळ पोचला. वस्तीच्या अगदी सुरुवातीलाच एका परिटाचे घर होते. त्या परिटाकडे काही गाढवे आणि कोंबडे होते. त्याच्या गाढवांमध्ये जित्या नावाचे गाढव फारच विचित्र होते. आपण गाढव आहोत हेच त्याला मान्य नव्हते. आपण आपल्या बाकीच्या भावांपेक्षा वेगळे आहोत असेच त्याला नेहमी वाटायचे. 

सिंह लपून छपून वस्तीचे परीक्षण करीत असतांना जित्याची नजर त्याच्यावर गेली. त्याला वाटले की हा आपल्या वस्तीला नुकसान पोचवण्यासाठी आला आहे. याला चांगला धडा शिकवायला हवा. जित्या लहानाचा मोठा परिटाकडेच झाल्याने त्याला सिंह काय चीज असतो हे ठाऊकही नव्हते. 

मात्र तो त्याच्या स्वतःच्या विचारांच्या धुंदीतच सिंहावर हल्ला करायला तयार झाला. त्यावेळी सिंह मात्र शांतपणे वस्तीतील लोकांना दुरूनच न्याहाळत होता. जित्या आपल्यावर हल्ला करतोय याची सिंहाला भणकपण नव्हती. 

इकडे जित्याने हल्ला करण्यासाठी पवित्रा घेतला आणि तो हल्ला करणार त्याचवेळी कोंबडे जोराने ओरडले. सिंहाने या आधी कोंबड्याचे ओरडणे ऐकले नव्हते. त्यामुळे तो फार घाबरला. त्याने कुठलाही विचार न करता तिथून पळ काढला. 

ते पाहून गाढवाला मात्र स्फुरण चढले. त्याला वाटले कि हा प्राणी आपल्याला घाबरून पाळतो आहे. म्हणून मग त्याने सिंहाचा पाठलाग करायला सुरुवात केली. इकडे सिंहही मागे वळून न पाहता आपल्या मागे तो कुणीतरी वेगळा प्राणी आहे या विचाराने पुढेच पळत होता. 

 हा पाठलाग बराच वेळ सुरु राहिला. शेवटी सिंहाला वाटले की आपल्या प्रजेने जर आपल्याला असे पळून येतांना पाहिले तर यानंतर कुणीच आपला मान ठेवणार नाही. अपमानित जीवनापेक्षा सन्मानाचे मरण बरे. असा विचार करून सिंह त्या न पाहिलेल्या प्राण्याचा सामना करण्यासाठी वळला. 

आणि समोर गाढवाला पाहून चक्रावून गेला. आतापर्यंत एक गाढव आपला पाठलाग करीत होते आणि आपण मुर्खासारखे पळत होतो याबद्दल सिंहाला स्वतःची लाजही वाटली आणि स्वतःवरच हसूसुद्धा आले. आता सिंहाची भीती पार निघून गेली होती. मात्र जित्या तर गाढवच होता. 

जित्या आपल्या उत्सहात सिंहावर तुटून पडला आणि स्वतःचा जीव गमावून बसला. नंतर काही दिवसांनी पुन्हा सिंहाने त्या वस्तीजवळ जाऊन पडताळणी केली. आणि तो आवाज कोंबड्यासारख्या लहान प्राण्याचा आहे. त्याच्यापासून आपल्या प्रजेला पुढे काही त्रास होणार नाही हे समजून घेऊन आपल्या प्रजेसोबत आनंदात राहू लागला. 

तात्पर्य – मंडळी त्या कथेतील सिंह म्हणजे आपण. आणि जित्या म्हणजे आपली संकटे. जीवनात बरेचदा आपल्या प्रश्नांचे, समस्यांचे योग्य आकलन न झाल्याने, आपल्याला त्या खूप मोठ्या वाटू लागतात.

कधी अचानक ओरडणाऱ्या कोंबड्याप्रमाणे संकटे अचानक येतात तर आपणही सिंहाप्रमाणे भांबावून जाऊन त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण थोडं स्थिर होऊन या संकटांचे व्यवस्थित निरीक्षण केले. त्यांना हिम्मतीने समोर गेलो तर ही संकटे कोंबड्या, गध्यासारखी कमकुवत वाटतात.

तेव्हा समस्या कुठलीही असुद्या तिच्यापासून दूर पळण्यापेक्षा तिच्या मागे हात धुवून पळा. आणि त्या समस्येला असा फटका द्या कि तिने स्वतः देवाकडे प्रार्थना करावी आणि म्हणावं ” याच्या मार्गात पुन्हा नको पाठवू देवा..लै बेक्कार तुडवतो हा !”  

 

 

 

अति तेथे माती 

 

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचे एक गाव होते. गावातील सर्व लोक खूप सुखी होते. ते आपापल्या उद्योगांत मन लावून काम करायचे. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळायचे. आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव गाव होते ज्याने दुष्काळ कधी पाहिला नव्हता. 

रामपूर मध्ये इतर सर्व शेतकरी आणि कामकाऱ्यांसोबतच एक भिकारी सुद्धा राहायचा. गावातील लोक इतके संपन्न आणि द्यावं होते की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यालासुद्धा कधीही उपाशी राहायची वेळ येत नव्हती. 

हा भिकारी इतर कुठलेच काम करीत नसे. दिवसभर भिक्षा मागून आणणे आणि आराम करणे हेच त्याचे काम. एखाद्या दिवशी जर जास्त भिक्षा मिळाली तर हा दुसऱ्या दिवसाला परत  भिक्षा मागायला फिरत नसे. 

तसे या भिकाऱ्याचे दिवसही चांगलेच जात होते. गावातील लोक दयाळू असल्याने ते अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला येत होते. तरीसुद्धा हा भिकारी दररोज देवाकडे प्रार्थना करायचा. देवाला म्हणायचा ” देवा तू सगळ्यांना पाहिजे ते देतोस. मीच कोणती अशी चूक केली? तू मला धनधान्याने संपन्न का नाही बनवत? “

देवाकडे तक्रार करणे हा भिकाऱ्याचा नित्यनेमाचा कार्यक्रम होता. त्याच्या तक्रार करण्याला भिकार स्वतःची भक्ती म्हणायचा. त्याला वाटायचे कि आपण दररोज  देवाची  आठवण काढतो तरी देव आपल्याला काही देत नाही. आणि हे इतर लोक दिवसभरातून क्वचितच त्याचे  करतात तरी यांना हि संपन्नता?

त्याच्या अश्या वागण्याचा आणि तक्रारींचा एक दिवस देवालाही राग आला. याला थोडी अक्कल आली पाहिजे म्हणून देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने धनधान्याची, संपन्नतेची देवता लक्षमी मातेला त्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. 

एक दिवस आपल्या नित्यनेमाप्रमाणे भिकारी भिक्षां मागून झाल्यानंतर दुपारच्यावेळेला एका झाडाखाली बसला होता. आणि सवयीप्रमाणे त्याने देवाकडे गाऱ्हाणे करणे सुरु केले. तेवढ्यात तेथे देवी लक्ष्मी प्रकटली. ती भिकाऱ्याला म्हणाली की ” मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे. म्हणून तुला मी हव्या तेवढ्या सोन्याच्या मोहरा देणार आहे.” 

 ते ऐकून भिकारी खूप आनंदित झाला. पुढे देवी म्हणाली की ” मात्र एक अट आहे. तू घरी पोहोचण्याआधी या मोहरांतील एकही मोहर जर जमिनीवर पडली तर त्यावेळी साऱ्याच मोहोरांचे मातीत रूपांतर होईल.”

 मोहरांबद्दल ऐकून भिकारी त्या मोहरा मिळाळ्यानंतर आपले जगणे कसे बदलून जाईल याचाच विचार करीत बसला. तो त्याच्या स्वप्नात इतका रंगून गेला कि त्याचे त्या अटींकडे तेवढे लक्षच राहिले नाही. त्याने लगेच मोहरा जमा करण्यासाठी आपली झोळी समोर केली. 

लक्ष्मी मातेने त्याच्या झोळीत सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली. झोळीत मोहोर पडत होती. भिकाऱ्याचा आनंद वाढत होता. थोड्या मोहरा टाकून झाल्या कि देवी त्याला विचारायची “एवढ्या मोहरांनी तू समाधानी आहेस का?’ त्यावर तो ” मला आणखी मोहरा हव्यात .” असे म्हणून आणखी मागायचा. 

हा क्रम असाच सुरु राहिला. एक वेळ अशी आली की  आता मोहोरांचा भार त्याला पेलवत नव्हता. तरी तो संतुष्ट नव्हता. त्याचा लोभ उच्चकोटीला पोहचला होता. आणि त्या लोभाच्या भरात तो देवीने सांगितलेली अट तर विसरालाच पण सोबत हेही विसरला कि त्याची झोळी पार जुनी झाली आहे. जी केव्हाही फाटू शकते. 

थोड्या वेळाने  झालेही तेच. भिकाऱ्याची जीर्ण झालेली झोळी एके ठिकाणी फाटली. काही मोहरा जमिनीवर पडल्या. देवीच्या अटीप्रमाणे त्यांची माती झाली. सोबतच झोळीतील साऱ्याच मोहरांची माती झाली. आणि भिकारी त्यावर काही बोलेल तोच देवीने त्याला “तथास्तु” म्हणून आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाली. 

आता भिकाऱ्याजवळ फाटलेली झोळी आणि त्या मोहरांची माती याशिवाय काहीच नव्हते. आपल्या लोभी वृत्तीला नावबोटे ठेवत मोठ्या जड अंतःकरणाने तो घरी परतला. मात्र त्याला एक नवा साक्षात्कार झाला. त्याला त्याचा चुकीचा दृष्टिकोन लक्षात आला. आता तो लोकांच्या फक्त संपन्नतेकडे न बघता त्यांची मेहनत सुद्धा पाहू लागला. 

त्यातच त्याला कळले कि सुखी होण्यासाठी मेहनत आणि समाधानाला पर्याय नाही. कमी मेहनतीत मिळालेलं धन फक्त लोभ वाढवत. म्हणून मग त्याने लोकांची छोटी मोठी कामे करणे सुरु केले. आणि भिक्षा मागून जगणे बंद केले. त्याच्यातील परिवर्तन पाहून गावातील लोकही आनंदी होते. 

तात्पर्य – मंडळी यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाहीच. देवही त्याच्याच मदतीला येतो जो स्वतःची मदत करतो. आणि कुठल्याही गोष्टीत अतिरेक हा विनाशाचे कारण बनतो. गोष्ट चांगली का असेना मात्र अति झाली की ती मानवासाठी विषासमानच असते. 

 

 

मंडळी आतापर्यंत आपण 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi या पोस्टमध्ये सिंह आणि गाढव तसेच अति तिथे माती या दोन कथा पाहिल्यात. जीवनात येणाऱ्या संकटाना, भीतीला कसे समोर जावे हे पहिली कथा शिकवते. तर श्रमाचे महत्व अति तिथे माती या कथेतून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. 

मंडळी आता आपण 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi या पोस्ट मध्ये शक्ती पेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ ठरते त्याबाबतची छान अशी ससा आणि सिंहाची कथा पाहणार आहोत. 

Also Read

रॉबिन शर्मा यांची पुस्तके

मराठीतील प्रेरणादायी पुस्तके 

 

 

 

ससा आणि सिंह 

 

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक भले मोठे जंगल होते. त्या जंगलात सर्व प्रकारचे प्राणी मोठ्या गुण्या गोविंदाने राहत होते. ते एकमेकांच्या मदतीला लगेच धावून जात. त्यांच्यात आपुलकीचे नाते इतके घट्ट झाले होते की  प्रसंगी ते एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होत. 

जंगलामध्ये राजू नावाचा ससा होता. हा इतर सशांसारखा भित्रा नव्हता. शिकारी असो कि इतर कुठला क्रूर प्राणी असो त्यांची सूचना हा पळतच जंगलभर देऊन यायचा आणि सर्वांना आधीच सावध करायचा. त्याला स्वतःचे असे कुटुंब नव्हते. त्याचे आईवडील एका शिकाऱ्याच्या तावडीत सापडले होते. 

राजू जंगलातील साऱ्यांनाच आपले मानायचा. कुणाचे काहीही काम असो,तो आपल्या परीने त्यांची होईल तेवढी मदत करायचा. जंगलात कुठला नवा कार्यक्रम घ्यायचा असेल, कुणाच्या घरी लग्न असेल तर हा अश्या कामामध्ये सर्वात पुढे  असायचा.

जंगलात सगळे काही अगदी आलबेल सुरु होते. सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र नशिबाला त्यांचा हा आनंद पाठवल्या गेला नाही. एके दिवशी खूप दूरच्या जंगलातून एक हिंस्र सिंह त्यांच्या जंगलात आला. आल्याबरोबर त्याने आपल्या गर्जनेने संपूर्ण जंगल दणाणून टाकले.

नंतर सिंहाने जंगलातील सर्वांची सभा बोलावली. या कार्यात त्याला धूर्त कोल्ह्याने मदत केली. (कोल्हा हा समाजातील त्या लोकांचा प्रतिनिधी आहे जे फायदा पाहून गट बदलतात.) कोल्हा प्रत्येक प्राण्याविषयी सिंहाचे कान भरत होता.

सभा भरल्या बरोबर सिंहाने आपल्या अटी सांगितल्या. या  अटींमध्ये सर्वात महत्वाची अट होती की  सिंहाला त्याच्या गुहेमध्ये रोज एक शिकार आणून द्यावी. अन्यथा तो सगळ्यांनाच त्रास देईल. सिंहाशी दोन हात करण्याची हिम्मत कुणातच नव्हती. त्यामुळे शेवटी सर्वांनी निमूटपणे अट मान्य केली. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच जंगलवासीयांची सभा भरली. सिंहासाठी भोजन म्हणून कोण जाणार यावर चर्चा होऊ लागली. कुणी म्हणाले म्हातारे आज ना उद्या मारतीलाच. तेव्हा अगोदर म्हाताऱ्यांना शिकार म्हणून पाठवूया. त्यावर काहींनी आक्षेप घेतला की  आईवडिलांना असे आपण मृत्यूच्या दारात ढकलू शकत नाही. 

काही लोकांनी युक्ती काढली की आपण हे जंगल सोडून दुसरीकडे जाऊ. पण तेथेही सिंह येऊ शकत होता. तर पळून जाणे हा तर मार्ग नव्हताच. वेळ निघून जात होती. इकडे यांचा निर्णय लागत नव्हता. राजुला साऱ्यांचे काळवंडलेले चेहरे बघवत नव्हते. 

 शेवटी राजू सगळ्यांना उद्देशून म्हणाला की आजचा प्रश्न मी सोडवतो. उद्या काय करायचे ते तुम्ही ठरवा. राजू निर्णयावरही बऱ्याच जणांनी आपत्ती दर्शवली. तोसुद्धा त्यांना त्यांच्या लेकरांसारखाच प्रिय होता. आपल्याला जाऊ द्यायला कुणी तयार नसल्याचे पाहून राजुला फार आनंद झाला. 

त्याला  वाटले की आपण धन्य झालो. त्याने कसेबसे सर्वांना समजावले. त्याच्या जाण्याने सर्वांना एक दिवसाचा अवधी विचार करायला मिळणार होता. सर्वांनी मोठ्या जाड अंतःकरणाने राजुला निरोप दिला. एवढ्या गोड मुलाशी पुन्हा भेट होणार नाही याचे सर्वांनाच दुःख होते. 

वाटेने चालत असतांना आपण आजचा प्रश्न तर सोडवलाय. पण उद्या या साऱ्यांचे काय होईल? उद्या कुणाचा नंबर लागेल? याबाबत विचार राजुच्या डोक्यामध्ये नाचत होते. चालतानाअचानक वाटेत त्याला एक विहीर दिसली.आणि त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. 

राजू लगेच सिंहाकडे  गेलाच नाही. तो इकडे तिकडे खूप फिरला, खेळाला आणि एकदम सायंकाळी सिंहाकडे गेला. सिंहाने इतका भयंकर उशीर करण्याचे कारण विचारले तेव्हा राजू त्याला म्हणाला की 

” महाराज मी इकडे येण्यासाठी खूप आधीच निघालो होतो. पण वाटेत एका दुसऱ्या सिंहाने मला अडवले. तो मला खाणारच होता पण मी त्याला सांगितले की मी या जंगलाच्या राजची शिकार आहे.तर त्यावर तो मोठं मोठ्याने हसायला लागला.हा का हसतोय ते मला कळत नव्हतं. 

मी त्याला हसायचं कारण विचारलं तर लगेच एकदंम रागाने मला म्हणाला की “मी असतांना दुसरा कुणी  राजा कसा काय? या जंगलाचा राजा एकच.मी! ज्याला वाटत की आपण राजा आहो त्याने आधी मला हरवावं आणि नंतरच स्वतःला राजा म्हणवून घ्यावं.”

हे ऐकून सिंहाला   खूप राग आला. तो राजुला म्हणाला की  त्या सिंहाकडे घेऊन चल. आधी त्याला हरवतो आणि नंतरच राजा म्हणून तुला खाईन. राजू त्या सिंहाला विहिरीपाशी घेऊन गेला. सिंहाने कुठलाही विचार न करता लगेच विहरीत उडी घेतली. 

आतमध्ये त्याला दुसरा कुठलाच सिंह दिसला नाही. आत होते फक्त पाणी आणि दाट अंधार. काही दिवस त्या विहिरीतच उपाशी राहून शेवटी सिंहाने प्राण गमावले. राजू मात्र त्याच्या कुटुंबामध्ये परत आला. सर्वांनी त्याच्या चातुर्याचे खूप कौतुक केले. 

तात्पर्य –  मंडळी समस्या, संकटे  जीवनाचा भागच आहेत. त्यांच्यापासून पळण्यात मजा नाही. पण शत्रू जेव्हा खूपच शक्तिशाली असतो तेव्हा शक्तीने नव्हे तर युक्तीने त्याचा सामना करायला हवा. कारण नेहमी शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठच असते.   

 

 

 

अस्वलाची शेपटी गेली कुठे?  

 

ही गोष्ट आहे अगदी सुरुवातीच्या काळातली. ब्रह्मदेवाने नुकतेच सृष्टीला बनवले होते. हळू हळू पुथ्वीवर त्याने एक एक सजीवाची निर्मिती केली. वाघ, ससा, कासव, हरीण, बकरी, घोडा, गाढव, असे सगळेच प्राणी ब्रह्मदेवाने तयार केले. त्यांच्यासाठी अण्णा आणि पाण्याची व्यवस्था केली. 

मात्र आज जसे आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात तसे ते तेव्हा नव्हतेच. ब्रह्मदेवाने कोणत्याच प्राण्याला शेपटी दिली नव्हती. सुरुवातीला तर कोणत्याच प्राण्याला काही त्रास झाला नाही. पण मग हळू हळू सर्वांना शेपटीसारखा अवयव नसण्याचे तोटे जाणवू लागले. 

सगळ्यांना काहींना काही कारणासाठी शेपटी आवश्यक वाटायला लागली. काही प्राण्यांना माश्यांपासून संरक्षण म्हणून शेपटी हवी होत. तर खारू सारख्या प्राण्यांना आपण अधिक सुंदर दिसावे म्हणून शेपटी हवी होती. आपले झाडावरचे जीवन  अधिक सुरक्षित होण्यासाठी माकडांना शेपटी हवी होती. 

शेपटीची गरज तर सर्वांनाच होती म्हणून मग सर्वांनी एक दिवस मिळून ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा साऱ्यांनी आपापले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. ब्रह्मदेवाने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एक दिवस ठरवून सर्वाना शेपट्या देण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. 

ब्रह्मदेवाचा निर्णय ऐकून सगळे अतिशय खुश झाले. आपले सगळे कष्ट संपतील, या घोंघावणाऱ्या माश्यांपासून सुटका मिळेल या भावनेने सगळ्यांची मने उल्हसित झाली. तो दिवस त्यांनी एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. आता त्यांना प्रतीक्षा होती ती ब्रह्मदेवाने ठरवून दिलेल्या दिवसाची.

शेवटी तो दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच सर्वांनी छान तयारी केली आणि ब्रह्मदेवाने ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहचले. ब्रह्मदेवाने आधीच एक मोठा वाडा सर्वांसाठी तयार करून ठेवला होता. त्या वाड्याला चारही बाजूंनी आरसे होते. आणि मधोमध वेगवेगळ्या शेपट्या ठेवल्या होत्या. 

त्यादिवशी एकीकडे सगळे त्या महालात जाऊन आपल्याला शोभेल ती शेपटी घेऊन येत होते. तर दुसरीकडे अस्वल मात्र चांगलेच घोरत पडले होते. त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण अस्वल काही उठत नव्हते. पाच मिनिट थांब, दहा मिनिट थांब असे करत अस्वल पुन्हा लोळण घेत होते. 

असे करता करता दुअप्र झाली. दुपारी नव्याने भेटलेली झुबकेदार शेपटी मिरवत जेव्हा घोडा अस्वलापाशी आला तेव्हा त्याच्या शेपटीला पाहून अस्वलाची झोपच उडाली. त्याने लगेच तयारी केली. मोठ्या उत्साहाने तो महालात पोहचला. पण तेथे त्याचा पूर्ण हिरमोद्ध झाला. 

आत गेला तर तेथे एकही शेपटी नव्हती. तो लगेच ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने त्याला एवढा उशीर का झाला त्याबद्दल विचारले. त्याच्याकडून पूर्ण सत्य जाणून घेऊन ब्रह्मदेवाने त्याला बिना शेपटीने राहणे हेच त्याचे भाग्य असल्याचे सांगितले.आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले. 

तेव्हापासून अस्वल बिना शेपटीने जगत आहे. 

तात्पर्य- आळस हा माणसाचा शत्रू आहे. कधीही आळस करू नये. 

 

 

 

विहिरीतील पाणी कुणाचे? 

 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचे गाव होते. त्या गावात महादेव नावाचा शेतकरी राहत होता. तो फार मेहनती होता. त्याच्या शेताच्या बाजूलाच सुखदेवचे शेत होते. सुखदेव आळशी होता.तो महादेवच्या शेतातील पीक पाहून नेहमी जाळायचा. 

महादेव निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचा. सुखदेवच्या शेतात विहीर होती. मात्र विहीर असूनही सुखदेव मेहनत घेत नसल्याने त्याला कमी उत्पन्न व्हायचे. परिणामी सुखदेवने त्याच्या क्षेत्रांपैकी काही भाग विकायचा निर्णय घेतला. जो भाग सुखदेव विकनार होता त्यात विहीर येत होती. 

महादेवाला तर विहीर हवीच होती. म्हणून मग त्याने सुखदेवकडून जमिनीसोबत विहीर विकत घेतली. आता आपण आणखी चांगल्यारीत्या पीक घेऊ शकू या आनंदात महादेव होता. त्या आनंदात त्याला झोपच लागली नव्हतं. केव्हा शेतात जातो आणि काम सुरु करतो असे त्याला वाटत होते. 

दुसऱ्या दिवशी तो सकाळीच उठून शेतात गेला. विहिरीपाशी पोचला तर तेथे पाहतॊ काय? सुखदेवने विहिरीवर झाकण लावून त्याला कुलूप लावलेलं आहे. आणि तो बाजूलाच उभा आहे. त्याला असे करण्याचे कारण विचारले तर म्हणाला की ” मी तुला विहीर विकली आहे. विहिरींमधील पाणी नाही.” 

त्याचे बोलणे ऐकून महादेवाला समजून आले की  याच्या मनात लबाडी आहे. आणि उगाच त्रास देण्यासाठी हा असले काम करतोय. महादेवने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी महादेव त्यांचा तंटा पंचायतीमध्ये घेऊन गेला. 

पंचायतीमध्ये पंचांनी दोन्ही बाजूचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. त्यांना कळत होते कि सुखदेव लबाडी करतोय. त्याचे वागणे  योग्य नाही.पण त्याच्या मुद्द्याला तोडणेसुद्धा शक्य नव्हते. कारण कागदोपपात्री फक्त विहिरीचा उल्लेख होता. विहिरीतील पाण्याचा नव्हता. 

सर्वांना तर वाटायला लागले होते कि आता महादेव वर अन्याय होणार आहे. आणि तो सर्वांना मान्यही करावा लागणार आहे. पण ऐनवेळी एका म्हाताऱ्या पंचाला तोडगा सुचला. पंच सुखदेवला म्हणाला की  ” तू तर विहीर विकली आहेस. तेव्हा तुला तिच्यात तुझे पाणी ठेवण्याचा काही हक्क नाही. “

“एकतर तुझे पाणी घेऊन जा किंवा महादेवचा त्या पाण्यावरचा हक्क मान्य कर. आणि पुन्हा त्या विहिरीकडे फिरू नकोस. ” सुखदेवला कळून चुकले होते कि आपण आपल्याच फासामध्ये चांगलेच फसलो आहोत. तेव्हा त्याने आपला हट्ट सोडला आणि महादेवची क्षमा मागून तेथून निघून गेला. 

तात्पर्य- बरेचदा आपण दुसऱ्यासाठी तयार केलेला फास आपल्याच गळ्याभोवती आवळला जातो. मात्र दुसऱ्यासाठी केलेली मदत आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने परत येते. 

 

 

 

समारोप 

मंडळी 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi या पोस्ट मध्ये आपण सुंदर अश्या ५ बोधकथा        (Moral  Stories in marathi ) पाहिल्यात. या बोधकथा तुम्हाला कश्या वाटल्या? ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. 

कथा म्हटलं की  सांगणाऱ्याची थोडीबहुत मिसळ त्यात आलीच. मीसुद्धा या कथांमध्ये थोडी मिसळ केलीच आहे. ( कथेच्या मूळ कथानकाला जास्त न फिरवता मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ) जर कुणाला या बदलांबद्दल कुठे काही हरकत असेल तर तीसुद्धा कळवावी. 

सोबतच 5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi ही पोस्ट अधिक चांगली बनवण्यासाठी तुमच्याकडून काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा. आम्ही त्या नक्कीच अमलात आणू. 

 

1 thought on “5 सर्वोत्तम मराठी बोधकथा । 5 Best Moral Stories in Marathi”

Leave a Comment