जय महाराष्ट्र मंडळी! आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर बऱ्याच महापुरुषांनी जन्म घेतला. आपल्या जगण्यातून त्यांनी सर्वांना मानव म्हणून कसे जगावे हे शिकविले. आज आपल्या तथाकथित नेत्यांनी या सर्व महापुरुषांना जातींच्या तुरुंगांत कैद करून ठेवले आहे.
त्या साऱ्यांची सुटका करायची असेल तर त्यांना समजून घेणे, त्यांचे विचार वाचणे फार महत्वाचे ठरते. या महापुरुषांचे अग्रणी महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आज आपण महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ या पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत. जोतिबाचे विचार समजून घेण्यासाठी आपण आज त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर चर्चा करणार आहोत.
महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या हयातीत बरेच लिखाण केले. दांडपट्टा, तलवारबाजी, कुश्ती इत्यादींचे शिक्षण असूनसुद्धा त्यांनी लेखणीचा शस्त्राप्रमाणे वापर केला. त्यांच्या लेखणीला तलवारीपेक्षा धार होती. त्यांचे लिखाण स्पष्ट, निर्भीड आणि तिखट होते. त्यामुळे प्रस्थापितांना ते पचनी पडत नसे.
मंडळी आज महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ या पोस्ट मध्ये आपण महात्मा फुले यांच्या काही महत्वाच्या ग्रंथांबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित लेख आम्ही लवकरच घेऊन येणार आहोतच. चला तर मंडळी वेळेचा अपव्यय न करता पाहूया जोतिबांनी आपल्या ग्रंथांत काय लिहून ठेवले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ
ब्राह्मणांचे कसब
ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ पद्य स्वरूपाचा आहे. १८६९ ला मुंबईत इंदुप्रकाश या छापखान्यात छापून या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ब्राह्मणांचे कसब या ग्रंथात एकूण ९ काव्यरचना आहेत. या साऱ्याच रचना ब्राह्मण भट-बुवाद्वारे सामान्य जणांचे कसे शोषण केले जाते त्याचे यथोचीत वर्णन करतात.
सामान्य जणांची ब्राह्मणांच्या दास्यत्वातून सुटका करण्याच्या उद्देशाने जोतिबांनी लेखन प्रपंच आरंभिला होता. म्हणूनच त्यांनी आपला ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ महाराष्ट्रातील बहुजनांना म्हणजेच कुणबी, माळी, मांग, महार याना अर्पण केला आहे.
ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाचा उद्देश्य स्पष्ट करतांना ग्रंथाच्या प्रस्तावनेत जोतिबा म्हणतात की हा ग्रंथ म्हणजे शूद्रांना भटजीबुवांचे माहात्म्य लक्षात आणून देऊन त्यांची त्यापासून सुटका व्हावी यासाठी एक अल्पसा प्रयत्न आहे.
सोबतच इंग्रज सरकारने प्रजेतील या अतिउपयोगी वर्गास विद्या शिकवावी व तिच्या योगे शूद्रातिशूद्रांचे डोळे उघडून त्यांस भटांच्या दास्यत्वातून मुक्त करावे अशी इच्छा महात्मा जोतिबा फुले या प्रस्तावनेत व्यक्त करतात.
पुस्तकाच्या सुरुवातीला जोतिबांनी काव्य स्वरूपात ब्राह्मणांनी हा देश कसा काबीज केला आणि आपला समाज आजच्या या दयनीय स्थितीला कसा पोहचला हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
जोतिबांनी पुराणे, दंथकथा आणि चालीरीती, दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या म्हणी,वाक्प्रचार इत्यादींच्या आधारे मूळनिवासींचा इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आज उपलब्ध पुराव्यांनुसार जोतिबांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी जुळत नसल्या तरीही त्यांनी केलेले इतिहासलेखन कौतुकास्पद आहे.
जोतिबांच्या मते आर्यांच्या आक्रमणापूर्वी भारतातील सत्ता एकूण दहा भागांत विभागली गेली होती. प्रत्येक खंडावर एक प्रमुख होता. हे प्रमुख नेमलेले असत. या प्रमुखांची नेमणूक कोण करीत असे याबाबत जोतिबांनी काही सांगितले नाही. पण जर त्यांची नेमणूक लोकांद्वारे होत असेल तर लोकशाही अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रत्येक खंडावरच्या प्रमुखाला खंडोबा म्हणत.नऊ खंडांवर नऊ खंडोबा झाले. त्यांच्यावर प्रमुख म्हणून काशीच्या प्रमुखाला ‘काळ बैहिरी’ अशी उपाधी देऊन नेमले असावे. हा काळ बैहिरी म्हणजेच पुढे अपभ्रंश होऊन ‘काळ भैरव ‘ झाला असावा, असे जोतिबाचे मत दिसते.
काळबैहिरी च्या हाताखाली महासुभा (जो पुढे जाऊन ‘म्हसोबा’ म्हणून प्रसिद्ध झाला. ) हा एकप्रकारे सेनापती म्हणून काम करायचा. काळ बैहिरीच्या नेतृत्वात सगळे एकीने व गुण्या गोविंदाने राहत असत. मात्र पुढे ऐषोआरामी जीवन वाढले.परिणामी समाजात कर्तृत्वशून्यता वाढली.
समाजाच्या या परिस्थितीचा फायदा आर्यांनी(ब्राह्मणांनी) घेतला. त्यांनी कट कारस्थाने करून ‘ब्रह्मा’ला प्रमुख म्हणून नेमून सत्ता हस्तगत केली.इथल्या जनतेला मार देऊन,जेर करून दास बनवले.उरलेल्यांनी झुंज चालू ठेवली. परिणामी परशुरामाने हा प्रदेश ‘नि: क्षत्रिय’ म्हणजेच नि:-क्षेत्रीय केला.
(क्षत्रिय=क्षेत्रीय = म्हणजे क्षेत्रात आधीपासून वास्तव्य करणारे.) असा काहीसा ‘क्षत्रिय ‘ शब्दाचा उगम महात्मा जोतिबा फुलेंनी सांगितला आहे.तसेच ब्राह्मणांचा ‘महाशत्रू’ म्हणजेच ‘महा अरि ‘ जो पुढे अपभ्रंश होऊन ‘महारी’ व पुढे ‘महार’ झाला. या प्रकारची महार शब्दाची व्युत्पत्ती जोतिबा फुलेंनी सांगितली आहे.
सारांशरूपात बोलायचे झाल्यास एकेकाळी राज्य करणारे लोक आळस आणि ऐषोआरामात गुंतल्यामुळे कसे कपटी कारस्थानांना बळी पडले ते पहिल्याच काव्यात महात्मा फुलेंनी मांडले आहे.
ब्राह्मणांचे कसब या ग्रंथातील इतर रचनासुद्धा ‘विविध प्रसंगी समाजातील लिकांना हे ब्रह्मन् पंतोजी कसे लुटतात ?’ या विषयाला धरूनच आहेत.यात पोथी, जन्म, मरण, वास्तुशांती, लग्न, इत्यादी प्रसंगी सामान्यांची होणारी लुटबूर यथोचित वर्णन करण्यात आली आहे.
गुलामगिरी
गुलामगिरी हा ग्रंथ १८७३ ला प्रकाशित करण्यात आला. पुण्यातील ‘पुन्हा सिटी प्रेस’ च्या छापखान्यात या ग्रंथाची छपाई करण्यात आली.हजारो वर्षे भारतीय समाजात मूळ धरून वसलेल्या गुलामगिरीच्या उगम आणि प्रसाराची शहानिशा करून तिचे मुळासकट उच्चाटन करण्यासाठी सरकारला उपाय सुचविणे हाच या ग्रंथाचा मूळ उद्देश्य होता.
महात्मा फुलेंनी त्यांचा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ USA च्या भल्या लोकांना जे गुलामगिरीविरुद्धच्या लढ्यात गुलामांच्या बाजूने उभे राहिले त्यांना अर्पण केला आहे.त्यांच्याकडून आपल्या लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि शूद्रांना ब्राह्मणांच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांची अपेक्षा होती.
गुलामगिरी या ग्रंथाची रचना प्रश्नोत्तर स्वरूपाची आहे. धोंडीराज महात्मा फुले यांना प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरे जोतिबा देतात. या प्रश्नोत्तर रुपी चर्चेतून ग्रंथ समोर जात राहतो.
या ग्रंथात अमेरिकेतील गुलामगिरीचा मुद्दा हाताशी धरत महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या समाजातील गुलामगिरीला लक्ष्य केले आहे.यात काही प्रसंगी येशू ख्रिस्ताचे गुणगान आढळते. एके ठिकाणी जोतिबा येशूला ‘दुसरा बळीराजा’ म्हणून उपमा देतात.
या पुस्तकात शूद्र आणि शूद्रातिशूद्र ब्राह्मणांच्या गुलामगिरीत कसे फसले याचे यथोचित स्पष्टीकरण देण्याचा जोतिबांनी प्रयत्न केला आहे.लोककला,चालीरीती,पुराणे,भाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार, अपभ्रंश, ब्रिटिश लेखकांद्वारे आलेला प्राचीन इतिहास इत्यादी बाबींचा आधार त्यांनी घेतला.
ज्योतीबांच्या मते भारतीय समाजात ब्राह्मण विरुद्ध सामान्य (शूद्रातिशूद्र) असा वर्गसंघर्ष आधीपासूनच सुरु आहे.या पुस्तकात त्यांनी आधीपासूनच हा वर्गसंघर्ष कसा अस्तित्वात होता आणि अजूनही भारतीय समाजात कसा कायम आहे याबद्दल सखोल चिंतन केलेले आहे.
ज्योतीबांच्या मते ब्राह्मणांचा मूळ प्रदेश इराण आहे.त्यांच्या आधीच्या टोळ्या जलमार्गाने माशांप्रमाणे लहान लहान नावांमधून भारतात आल्या.( म्हणून मत्स्यावतार). पुढच्या टोळ्या थोड्या अवाढव्य जहाजांच्या साहाय्याने आल्या. त्या कासवाप्रमाणे धीम्या गतीने चालत. म्हणून कूर्मावतार.(कूर्म=कासव).
बाहेरून आलेल्या ब्राह्मणांच्या टोळ्या आणि आधीपासून या क्षेत्रात राहणारे क्षेत्रीय( क्षत्रिय) यांच्यात बरेच संघर्ष झाले.त्यापैकी बामन-बळी, परशुराम व इतर क्षेत्रीय हे संघर्ष जोतिबांनी महत्वाचे मानले.
संघर्षाअंती त्यांनी मुख्य लढाऊ जातींना गुलाम केले.त्याच्यापासून उपजीविकेची सगळी साधने हिसकावून घेऊन त्यांना शूद्रातिशूद्र (जोतिबांच्या मते मांग,महार इत्यादी ) बनविले.त्यांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे ब्राह्मणांचे जे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी या जमातींचा तिरस्कार करणे सुरु केले. याच तिरस्काराचे रूपांतर पुढे अस्पृश्यतेत झाले.
त्या काळापासून सामान्यजनांना ब्राह्मणांनी कसे पिळले ? त्यांचे महत्व कायम राहावे म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांचे थोतांड मांडून ते ग्रंथ देवाने केले म्हणत आपला अधिकार कसा दृढ केला ? या साऱ्याचे तार्किक स्पष्टीकरण आपल्याला या ग्रंथात मिळते.
जोतिबांच्या काळात देखील इंग्रज सरकारच्या विविध खात्यांत महत्वाच्या जागा बळकावून हा वर्ग सामान्यांची कशी पिळवणूक करत होता हे जोतिबांनी सरकारच्या लक्षात आणून दिले.
जोतिबा सारासार विचार करून चालणारे होते. त्यांनी निव्वळ तक्रारी नाही केल्या.आधी समस्या सरकारच्या नजरेसमोर आणली. समस्येचे अस्तित्व सिद्ध केले. त्यानंतर त्या समस्येवर कायमचे उपायही ‘गुलामगिरी’ या ग्रंथाद्वारे सरकारला सुचविले.
वर वर पाहता या ग्रंथातील जोतिबांची भाषा ब्राह्मण वर्गासाठी कटू व इंग्रजांना झुकते माप देणारी वाटते. त्यांनी इंग्रज सरकार साठी वापरलेली विशेषणे पाहता आपल्याला तास भ्रमही होऊ शकतो.पण त्याद्वारे जोतिबांनी गोड शब्दांत सरकारची कानउघाडणी केल्याचे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपोआपच मुखातून ‘क्या बात!’ म्हणून कौतुकास्पद उद्गार बाहेर पडतील.
आणखी वाचा
शेतकऱ्याचा असूड
शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ १८८१ ला प्रकाशित करण्यात आला. महात्मा फुलेंनी हा ग्रंथ इंग्रज सरकारातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिला. तसेच व्हाइसरॉय डफरीन ला समर्पित केला आहे.
या ग्रंथाचा उद्देश स्पष्ट करतांना जोतिबांनी ग्रंथाच्या शीर्षकामध्येच ‘हे लहानसे पुस्तक जोतीराव गोविंदराव फुले यांनी शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता केले आहे.’ असे नमूद केले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा मुख्य उद्देश सहजच लक्षात येतो.
या उद्देश्यामध्ये उल्लेखित शेतकऱ्यांचा बचाव म्हणजे एका विशिष्ट वर्गाकडून होणाऱ्या शोषणापासून रक्षण करणे असा नाही. पुस्तकात ब्राह्मण वर्गाबरोबरच तत्कालीन सरकारच्या नीतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या ग्रंथाविषयी विशेष म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना महात्मा फुलेंनी हा ग्रंथ पूर्ण वाचून दाखवला होता. सयाजीराव गायकवाड महाराजांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाकरिता आर्थिक मदतही केली होती.
शेतकऱ्याचा असूड मध्ये एकूण पाच प्रकाराने आहेत. पहिल्या प्रकरणात ब्रह्मन् वर्गाला लक्ष्य केले आहे.सर्व सरकारी खात्यांत ब्राह्मण वर्गाचे प्राबल्य असल्याने ते गरीब शेतकऱ्यास कसे नाडतात आणि त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना शिक्षण देण्यास कसा असमर्थ ठरतो याचे वर्णन या प्रकरणात येते.
दुसऱ्या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचे दोष दाखविले आहेत. सोप्या शब्दांत सरकारची कानउघाडणी केली आहे. सरकारी अधिकारी ऐषोआरामात गुंग असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या खऱ्या स्थितीचे जाणीव नाही हे जोतिबा फुले या प्रकरणात उघड करतात.
विलासी जीवनात मग्न असलेल्या अधिकाऱ्यांमुळे मूळ कारभार ब्राह्मण अधिकाऱ्यांकडे जातो. मग ते शेतकऱ्यांची कशी अतोनात लूट करतात हे सुद्धा या प्रकरणात स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या प्रकरणात आर्य ब्राह्मणाचे इराणातून भारतात आगमन, मूलनिवासी आणि आर्य ब्राह्मण संघर्ष, त्या संघर्षानंतरची सामाजिक वाटचाल ते इंग्रज सरकारच्या अधीन शेतकऱ्यांची स्थिती या साऱ्याचे वर्णन येते. याच प्रकरणात जोतिबांनी अधिकाऱ्यांच्या गलेगठ्ठ पगारांसाठी शेतकऱ्यांवर कराचा बोजा वाढवून त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या सरकारच्या नीतीचा निषेध केला आहे.
चौथे प्रकरण भारतातील तत्कालीन शेतकरी आणि शेतीची स्थिती याबद्दल माहिती देते. पाचव्या प्रकरणात महात्मा फुलेंनी शूद्र शेतकऱ्यांच्या वतीने ब्राह्मणांना काही सूचना केल्या आहेत. सोबतच शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने तसेच खुद्द शेतकऱ्यांनी काय उपाय करायला हवेत ते सुद्धा सुचवले आहेत.
सत्सार १ व २
सत्सार ही पुस्तक मालिका होती. यापैकी पहिला अंक पंडिता रमाबाई यांच्या बचावासाठी होता. पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने तत्कालीन हिंदू नेत्यांपैकी काहींनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. तेव्हा ब्राह्मणवादी टीकाकारांचा प्रतिकार करण्याच्या उद्देश्याने महात्मा फुलेंनी पहिला अंक लिहिला होता.
एखाद्या चव्हाट्यावर चार चौघांत एखाद्या विषयाला धरून चर्चा रंगावी अशी काहीशी पुस्तकाची रचना आहे.शूद्रांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ब्राह्मणाच्या नाकी नऊ येतांना दाखविले आले.चर्चा पंडिता रमाबाईंच्या धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यावर सुरु होऊन ब्रह्मन् धर्मातील फोलपणा निदर्शनास आणून दिला आहे.
इंग्रज सरकारच्या राजवटीत स्त्रियांना लिहिता वाचता येऊ लागले. इथल्या पुरुषमंडळींनी धर्माच्या नावाखाली स्त्रीजातीवर जो अन्याय केला तो सर्वांसमोर आणणे हा सत्सार च्या अंक २चा उद्देश होय. स्त्री वर्गाला ज्ञानाची दारे बंद करून. त्यांना धर्मभोळे बनवून, पुरुषप्रधान संस्कृतीने जी ठकबाजी चालवली ती या ग्रंथात उघड करण्याचा प्रयत्न जोतिबा करतात.
इशारा
कुणातरी समाजसुधारकाने ( नाव पुस्तकात दिलेले नाही,) “गेल्या तीस वर्षांत शेतकऱ्यांची स्थिती सुधारली आहे.”असे म्हणून इंग्रज राजवटीची प्रशंसा केली.त्यावर आक्षेप घेत जोतिबांनी मुद्द्याला वर्गसंघर्षाचे रूप देत त्या व्यक्तीवर टीका केली आहे.
जोतिबांच्या मते “इंग्रज राजवटीच्या या तीस वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली .” असे फिरवून सत्य न बोलता ‘धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांकडून होणारे शोषण कमी झाले .’ हे उघड सत्य जसेच्या तसे स्वीकारून लोकांसोमोर मांडायला हवे.
आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी जोतिबा पुढे ब्राह्मणी राजवट, मुस्लिम राजवट आणि ब्रिटिश राजवट या तीनही सत्ताकाळांची तुलना करतात. तिन्ही राजवटींत शेतकरी आणि सामान्य जनतेची स्थिती मुख्य निकष बनवून ब्रिटिश राजवट शूद्र शेतकऱ्यांच्या हिताची आहे हे सिद्ध करतात.
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
सदर ग्रंथ महात्मा जोतिबा फुले यांच्या मरणोत्तर १८९१ मध्ये प्रकाशित करण्यात आला.ब्राह्मणी वर्चस्वाचा पायाच धर्म असून असा कृत्रिम,भेदभाव धर्म आणि त्याचे धर्मग्रंथ यांपासून दूर जाणे हाच एकमेव पर्याय जोतिबांना परिस्थितीनुसार योग्य वाटत होता.
अनेक ईश्वरवादी ब्राह्मणी धर्माला पर्याय म्हणून जोतिबांना मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारता आला असता पण त्यांनी तसे केले नाही.मानवतेवर आधारित, समानतेवर आधारित एका नव्या धर्माची या पुस्तकाच्या मार्फत त्यांनी मुहूर्तमेढ रोवली.
जोतिबांच्या इतर पुस्तकांप्रमाणे या पुस्तकाची रचनासुद्धा प्रश्न उत्तर स्वरूपातील आहे. चि .यशवंत आणि इतर मंडळींच्या प्रश्नांना जोतिबांची उत्तरे अश्या स्वरूपात हे पुस्तक पुढे जात राहते.
जोतिबांनी देवाचे अस्तित्व नाकारले नाही. सर्व प्राणिमात्र आणि सृष्टीच्या संचालकास त्यांनी निर्मिक म्हणून संबोधले. कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडांना जोतिबांनी विरोध केला आहे.त्यांच्या मते निर्मिक आपल्या कुठल्याही कर्मकांडाने खुश होत नाही की त्याला स्मरण न केल्यास रुष्ट होत नाही.
तृतीय रत्न
१८५५ साली महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ नावाचे नाटक लिहिले.त्यात ब्राह्मणांनी देवाच्या नावाने जे समाज पसरविले होते आणि अंधश्रद्धा निर्माण केल्या होत्या त्या सर्व त्यांनी उजेडात आणल्या.
त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की, एक ब्रह्मन् भिक्षुक एका खेड्यात फिरत असता एका शेतकऱ्याच्या गरोदर पत्नीला पाहतो.तो तिला सांगतो की तुझ्या भावी मुलाचा जन्म तुझ्या पाटील घटक ठरणार आहे.हे भविष्यकथन ऐकून ती भेदरून जाते.
तो ब्राह्मण भिक्षुक तीला सांगतो कि, हे संकट दूर व्हावे म्हणून मी तुझ्या कुटुंबाच्या नावाने देवाची प्रार्थना करतो. असे म्हणून तो तिचे सांत्वन करतो.त्याची सूचना ती मान्य करते.शेतकऱ्याच्या घरी ही प्रार्थना आणि ब्रह्मन् भोजन चालले असतांना एक ख्रिस्ती धर्मोपदेशक योगायोगाने तेथे येतो.
वादविवादास प्रारंभ होतो. त्यात भिक्षुकांची लबाडी उघडकीस येते.जोतिबांनी त्या चर्चेपासून शेवटी असा निष्कर्ष काढला की , मूर्तिपूजेपेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ होय.जोतीरावांनी शेवटी तो शेतकरी आणि त्याची पत्नी यांना आपण खास काढलेल्या प्रौढांच्या रात्रशाळेत शिकावायास जाण्याचा उपदेश केला.
समारोप
तर मंडळी आज आपण महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ या पोस्ट च्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या काही निवडक ग्रंथांचा परिचय करून घेतला.या ग्रंथांद्वारे आपण महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार कळून येतात. सोबतच एक इतिहासलेखक, भाषातज्ज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ असे अनेक पैलू असणारे जोतिबाचे व्यक्तिमत्वही कळून येते.
आजची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट बाबत आपला अभिप्राय आम्हाला कॉमेंट मध्ये लिहून नक्की कळवा. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित पोस्ट आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. तरी त्याव्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या महापुरुषाविषयी वाचायला आवडेल तेही कळवा. आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद!
आणखी वाचा