कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता | Kusumagraj Poems Marathi

कवी कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता   

 

मित्रांनो, आज आपण कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता या पोस्टच्या माध्यमातून कवी कुसुमाग्रज यांच्या काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत.

कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यसृष्टीमध्ये आपल्या लेखनशैलीने स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे. मराठी साहित्याची पताका जगभर पसरवणाऱ्या मराठमोळ्या शिलेदारांमध्ये कुसुमाग्रजांचे नाव आदराने घेतले जाते. 

बऱ्याच आधुनिक साहित्यिकांच्या गुरुस्थानी नांदणारे कवी कुसुमाग्रज मराठी साहित्य सृष्टीतील श्रीकृष्ण समजले जातात.

मराठी साहित्याला नवी दिशा, नवे वळण देण्याचे कार्य  जर कोणी केले असेल तर ते म्हणजे दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांनी. आज आपण कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण कुसुमाग्रजांविषयी जाणून  घेऊयात. 

 

कुसुमाग्रज यांच्या विषयी थोडक्यात माहिती. 

 

 कवी कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर उर्फ वि. वा. शिरवाडकर.  कवी कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुण्यामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मात्र नाशिक व मुंबई  येथून झाले.

१९३० साली शालेय शिक्षण घेत असतांनाच त्यांनी आपली पहिली कविता ‘रत्नाकर’ या मासिकात प्रसिद्ध केली होती.  १९३० साली सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांच्या पर्वाला सुरुवात  या लढ्यापासूनच झाली असे  म्हटले जाते. 

बी.ए झाल्यानंतर १९३४-१९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते. त्यानंतर मात्र ते नाशिक मध्ये स्थायिक झाले. नाशिक मध्ये आल्यानंतर त्यांनी १९४९ पर्यंत पुणे, मुंबई, नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून काम केले. त्यांनी विविध पाठ्यपुस्तके सुद्धा संपादित केलेली आहेत.

वि. वा. शिरवाडकर यांनी “ कुसुमाग्रज” हे  टोपण नाव का धारण केले? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आणि त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकतासुद्धा बऱ्याच मराठी मनांमध्ये असते. तर वि.वा. शिरवाडकरांच्या संपूर्ण भावंडांमध्ये एकच बहीण होती. तिचे नाव होते  “कुसुम”. आणि वि. वा. शिरवाडकर हे कुसुम पेक्षा वयाने मोठे होते. म्हणून त्यांनी त्यांचे टोपण नाव त्यांच्या बहिणीच्या सन्मानार्थ वाहिले आहे.  ‘कुसुमाग्रज’  म्हणजे कुसुमचा अग्रज. म्हणजेच कुसूमपेक्षा मोठा असा त्याचा अर्थ होतो. 

 एक कवी म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या कुसुमाग्रजांनी साहित्याच्या सर्वच आखाड्यांत आपले कसब खूप बजावले आहे. त्यांनी कथा, कादंबरी, नाटके, समीक्षा , भाषांतर अश्या जवळ जवळ सर्वच प्रकारांत साहित्यनिर्मिती केली आहे. 

  कुसुमाग्रज यांचे कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. यांपैकी ‘विशाखा’ तर मराठी काव्यजगातील मुकुटमनीच मनाला जातो. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाणे  आपली स्वतःची वेगळी अशी काव्यशैली निर्मिली आहे. 

शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो.

शिवाय,  दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत,  त्यांच्या “नटसम्राट” या नाटकाने तर मराठी मनावर गेल्या दशकांमध्ये राज्य केलं आहे. आणि अजूनही ते चालूच आहे. 

 निव्वळ एक साहित्यिक म्हणूनच नव्हे तर एक सोज्वळ सुरेख व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा कुसुमाग्रज सगळ्यांना परिचित आहेत. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून दलित चळवळीला दिलेला पाठिंबा असो, समाजसुधारणांना घेतलेला पुढाकार असो, कि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग असो. सगळ्याच प्रसंगी त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. 

 पुरे जाहले चंद्र तारे.. आता भिल्लांसारखं प्रेम करा रे.. म्हणून नव्या पिढीला प्रेमाच्या खोलीमध्ये शिरायला आव्हान करणारे कुसुमाग्रज खरंच निराळेच असामी. केशवसुतांच्या क्रांतिकारी कवितांचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि ते करत असतांना या काव्यस्फूर्तीला उत्तुंग उंची प्राप्त करून देणाऱ्या या महाकवीने  १९९९ ला त्यांच्या राहत्या घरी जगाचा  निरोप घेतला. 

 

कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता 

 

 

अखेर कमाई

 

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो

फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले ,

मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,

मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले ,

मी तर फ़क्त

चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला

आणि ते म्हणाले ,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

 

कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता या पोस्ट मध्ये आपण अगदी सुरुवातीला बघत आहोत कुसुमाग्रज यांची  ‘ अखेर कमाई ‘ हि कविता. या कवितेमध्ये स्वातंत्रोत्तर काळात  वेगवेगळे महापुरुषांची त्यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या लोकांनी काय वाट लावली? त्यांच्या अपेक्षा काय होत्या आणि आज स्थिती काय आहे? या विषयावर अतिशय मार्मिकपणे बोट ठेवले आहे.

 या कवितेमध्ये  कुसुमाग्रजांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना बोलके केले आहे. आज त्यांना कश्याप्रकारे आपण फक्त स्वार्थापुरतं वापरत आहोत याचा या कवितेत प्रत्यय येतो. महापुरुषांचे पुतळे हे मध्यरात्र उलटल्यावर एक चौकामध्ये गोळा होतात. आणि प्रत्येकजण मग आपापलं दुःख व्यक्त करू लागतो. 

 ज्योतिबा म्हणतात मी फक्त माळ्यांचा झालो आता. शिवाजी महाराज म्हणतात कि मी फक्त मराठ्यांचा झालो. टिळक म्हणतात  कि मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा तर बाबासाहेब म्हणतात मी राहिलो फक्त दलितांचा. 

मात्र या साऱ्यांचं ऐकून आपला गहिवर आवरत गांधीजी म्हणतात कि तुमच्या पाठीशी एक एक जमत तरी आहे. मजख्या पाठीशी तर फक्त सरकारी दफ्तरांतील भिंतीच आहेत. 

 या कवितेत आपली आजची खरी परिस्थिती तंतोतंत पकडलेली आहे. एकीकडे  प्रत्येक जमातीने आपला नेता ठरवून घेतला असता संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाट असणारा महापुरुष अजून आपल्या पिढीला कळला  नाही हि तर आपली शोकान्तिकाच म्हणावी.  

 

 

 

पृथ्वीचे प्रेमगीत

 

युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती भास्करा वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे

न ती आग अंगात आता उरे

विझोनी आता यौवनाच्या मशाली

ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

अविश्रांत राहील अन् जागती

न जाणे न येणे कुठे चालले मी

कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात

वेचूनिया दिव्य तेजःकण

मला मोहवाया बघे हा सुधांशू

तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे

ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

पिसाटापरी केस पिंजारुनी हा

करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी

पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

करी प्रीतीची याचना लाजुनी

लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून

येतो कधी आठवाने वर

शहारून येते कधी अंग तूझ्या

स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुलिःकण

अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण 

 वैज्ञानिक आधारांवर  आपल्या काव्याला साकारण्याची हि अजब कला कुसुमाग्रजांकडेच होती. सगळ्यांना माहित आहे कि पृथ्वी सूर्याभोवतीची फिरते. त्या वातावनात विविध धूलिकण, धूमकेतू , गुरुत्वाकर्षण अश्या कितीतरी गोष्टीचे अस्तित्व असते. मात्र या साऱ्यांना आपापल्या काव्यदृष्टीत तंतोतंत टिपले आहे ते या ‘ पृथ्वीचे प्रेमगीत ‘ या कवितेच्या माध्यमातून.  

 

 

 

 

वेडात मराठे वीर दौडले सात

 

 वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता

रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता

अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता

भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दील”

माघारी वळणे नाही मराठी शील

विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ

छातीवर तुटली पटबंधाची गाठ

डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ

म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ

जरी काल विसरलो जरा मराठी जात

हा असा धावतो आज अरि-शिबिरात

तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले

सरदार सहा, सरसावूनी उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना

छावणीत शिरले थेट भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा

अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ 

 

स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा मराठे सरदारांनी १६७४ साली गाजवलेल्या  शौर्याच्या प्रसंगावर आधारित हे काव्य मराठी मनाला खडबडून जागे करणारे आहे. 

 शिवरायांची बहलोलखानाला फत्ते करण्याची आज्ञा असतांना लढाईत हरल्यानंतर जेव्हा बहलोलखान प्रतापरावांना शरण आला तेव्हा प्रतापरावांनी त्याला अभयदान दिले. इतकेच नव्हे तर लढाईत खाल्लेली शिकस्त पाहून तो परत आता स्वराज्याला त्रास देणार नाही अशी प्रतापरावांना अपेक्षा होती. 

मात्र शिवरायांना त्यांचे असे वागणे पटले नाही. शिवरायांना ठाऊक होते कि बहलोल पुन्हा स्वराज्यावर चालूं येईलच. म्हणून ते प्रंपरावांच्यावर रागावले. 

आणि झाले सुद्धा तसेच. बहलोल पुन्हा स्वराज्यावर चालून येण्याची तयारी करत होताच. त्याने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीत विघ्ने करणे चालू केले.

तेव्हा शिवराय प्रतापरावांना म्हणाले कि बहलोल पुरता फत्ते करणे अन्यथा तोंड दाखवू नका. हे शब्द प्रतापरावांना फार जिव्हारी लागले. त्यांनी लगेच बहलोल कुठे आहे त्याची माहिती घेतली आणि सेन्याची वाट न पाहता फक्त सहा शिलेदारांनीशी  ते पंधरा हजारांच्या सैन्यावर चालून गेले. त्याच प्रसंगाचे हे वर्णन आहे. 

 

 

क्रांतीचा जयजयकार

 

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत

पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?

सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश

पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश

तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान

कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान

संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान

बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान

मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?

अहो हे कसले कारागार?

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे

एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार

होता पायतळी अंगार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत

अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत

सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात

बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात

तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार

तयांना वेड परि अनिवार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात

तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात

चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार

देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर

देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार

आई वेड्यांना आधार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

सरणावरती आज अमुची पेटता प्रेते

उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार

आई, खळखळा तुटणार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास

नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास

रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर

पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर

शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार

मरणा, सुखेनैव संहार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

 

 

 स्वातंत्र्यदेवीची विनवणी

 

पन्नाशीची  उमर गाठली अभिवादन मज करू नका ।

मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।

काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।

अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।

एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।

करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।

मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।

कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।

करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।

इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।

भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

 

 

 कोलम्बसाचे गर्वगीत 

 

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा ?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

“अनंत अमुची ध्येया  सक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

 

 

 बर्फाचे तट पेटुनी उठले 

 

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते

                       रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते  I I धृ I I 

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

 

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमालय  राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

 

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

 

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

 

 

गाभारा 

 

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिऱ्यांची  झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते पायाशी..

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर

त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

 

निरोप

 

गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसावे?

एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

“जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे”

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

 

 कणा  

 

“ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

 

 

समारोप 

 

मित्रांनो , तुम्हाला कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता ही  पोस्ट कशी वाटली? या १० कवितांपैकी कुठली कविता तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तसेच तुम्हाला आणखी कोणत्या कवीच्या कविता वाचायला आवडतील याविषयी आम्हाला कंमेंट करून नक्कीच कळवा.

तसेच कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता या पोस्ट  मध्ये काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा कंमेंट मध्ये सांगा.. आम्ही त्या लगेच अंमलात आणू. धन्यवाद!

25 thoughts on “कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता | Kusumagraj Poems Marathi”

    • खूप खूप छान.. धन्यवाद हा ठेवा नव्या पिढीला पोहचवल्याबद्दल.

      Reply
    • कवितांच्या गावी जाऊन आल्याचा खूपच सुंदर अनुभव…कविता सगळ्याच अप्रतिम..पण तरीही गाभारा मनाला खूप भावली..
      केशवसुतांच्या कविता ऐकायला आवडतील.

      Reply
    • कणा..
      अखेर कमाई..
      मला आवडलेल्या कविता
      कुसुमाग्रज मला शाळेत असल्यापासून आवडते कवी..

      Reply
  1. अप्रतिम, संग्रह, खूप खूप आभार, आपला

    Reply
  2. ह्या १०कवितांमधली ‘कणा’ ही माझी अतिशय आवडती कविता.जगण्याची जिद्द त्यातून दिसते.प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यातून जाणवते.

    Reply
    • ,हो माझी ही आवडती आहे. मी १० वी १९९८ ला होती. मी आज पर्यंत विसरलो नाही.

      Reply
      • त्यावेळेस फक्त मार्क मिळाले परंतू आता ही कविता खुप काही देऊन जाते.

        Reply
    • अतिशय सुंदर व अर्थभरित कविता. गाभारा ही कवितातर खूपच आवडली. आपलेखूपखूप आभार.

      Reply
  3. कॅालेज मध्ये असताना कुसुमाग्रजांना भेटलो.व्यक्तिमत्व इतकं सुंदर, ऋषितुल्य की “तेथे
    कर माझे जुळती.”शाळा कॅालेजच्या वयात, त्यांच्या
    कवितांनी भारून गेलो होतो. अजुनही ५० वर्षानंतर
    तो भक्तिभाव कायम आहे. देहूचा वाणी….ह्या कवितेत
    ते म्हणतात…देहूचा वाणी
    मी पाहिला होता एकदा
    त्याच्याच… पाणनिळ्या
    शब्दांच्या नितळ सरोवरात..
    किती भाग्यवान आम्ही !🙏

    Reply
  4. संकलन चांगले आहे ,
    मात्र कुसुमाग्रज म्हणजे कुसुम च्या अग्र ( आधी – पुढे ) जन्माला आलेला ,
    म्हणजे च कुसुम चा मोठा भाऊ , धाकटा नव्हे !

    Reply
      • खूप छान संकलन !
        काही कवितांचा सरळ अर्थ, त्यांची पार्श्वभूमी स्पष्ट केली हे खूप छान 👌

        Reply
  5. ‘कणा’ ही कविता अप्रतिम आणि प्रत्येक शब्द हा भावनेला हात घालणारा आहे म्हणून फार आवडली.

    Reply
  6. अदभुत प्रतिभा जागृत झालेले कवी कुसुमग्रज यांची कणा ही कविता मला मनापासून आवडली

    Reply
  7. सगळ्या कविता खूप छान आहेत

    Reply
    • आपल्या सर्वच कविता खूपच छान आहेत.कणा ही कविता जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी आहे.कठिण परिस्थितीत खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागणे महत्वाचे हा बोध या कवितेतून मिळतो.म्हणू न “कणा” ही कविता जास्त आवडते.

      Reply
  8. वेडात मराठे वीर दौडले सात –
    वा ! सुंदर कविता . स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा मराठे सरदार यांची छ. शिवाजी राजे यांचेवर असलेली निष्ठा आणि शौर्य पाहून आज आपण कुठे आहोत हा विचारत मनाला भेडसावतो आहे

    Reply
  9. या कविता कधी वाचनात आल्या नव्हत्या. यातील फक्त एक वेडात मराठे वीर दौडले सात हिच ओळखीची आहे. सर्वात पहिली ‘अखेर कमाई’ हि कविता तर मार्मिक आहे.
    एक विनंती, सर्व कवितेंच्या शेवटी संक्षिप्त स्वरुपात रसग्रहण दिल्यास या कवितेतील भावार्थ समजण्यास मदत होईल.
    कुसुमाग्रजांना नम्र अभिवादन

    Reply
  10. खरंच सर्व कविता खूप छान आहेत पण कणा ही कविता खूप काही सांगून जाते..

    Reply

Leave a Comment