संत कबीर यांचे दोहे ।Sant Kabir Dohe in Marathi

संत कबीर यांचे दोहे | Sant kabir Dohe in Marathi    

 

 मित्रांनो, सुमारे पाचशे वर्षांपूर्वी, ज्यावेळी धर्माचे स्वरूप अतिशय विटाळलेले  होते. ज्यावेळी धर्मांवर विविध कर्मकांडांचा पगडा घट्ट बसलेला होता. आणि या कर्मकांडांच्या विरोधात ब्र काढने पण ज्या काळात खूप कठीण होते.

अश्या  काळात एक महात्मा आपल्या परखड बुद्धिवादाची शस्त्रे  घेऊन, या धर्मांतील कर्मकांडांच्या विरोधात उभा राहिला. त्याने देवाचा, भक्तीचा खरा अर्थ अतिशय सोप्या भाषेत जनसामान्यांना समजावून दिला. आणि भक्तीच्या क्षेत्रात नव्या युगाला सुरुवात केली. तो महात्मा म्हणजे संत कबीर होय. 

मित्रांनो आजची संत कबीर यांचे दोहे | Sant  kabir  Dohe  in  Marathi  हि पोस्ट आपण  संत कबीर यांच्या विचारांना अर्पण करीत आहोत. संत कबीर यांचे दोहे|Sant  kabir  Dohe  in  Marathi हे गेल्या पाचशे वर्षांपासून बुद्धिवाद्यांच्या संघर्षात मदत करीत आहेत.

विशेष म्हणजे संत कबीर यांचे दोहे|Sant  kabir  Dohe  in  Marathi आजही समाजातील परिस्थितीला तंतोतंत लागू पडतात. आपण संत कबीर यांचे दोहे बघण्या अगोदर थोडक्यात त्यांच्या जीवनाचा सारांश पाहुयात

 

 

 

संत कबीर यांचे जीवन 

 

 

 

जन्म 

 

 संत कबीर यांचा जन्म १३९८ मध्ये  उत्तरप्रदेशातील वाराणसी या शहरात झाला.  त्यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी  संत कबीर यांच्या जन्माला धरून विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

त्यापैकी एका आख्यायिकेनुसार एक विधवा स्त्री स्वामी रामानंद यांच्या कडे दर्शनाला गेली असतांना  स्वामी रामानंद यांच्या मुखातून तिला ‘पुत्रवती भव’ असा आशीर्वाद निघाला आणि त्यामुळे तिला जी पुत्रप्राप्ती झाली तो पुत्र म्हणजे संत कबीर होय. 

समाजाच्या भीतीने त्या स्त्रीने तिच्या बाळाला लहरतारा तलावाच्या काठाने एका मोठ्या कमळाच्या फुलावर ठेऊन दिले.  काही काळाने त्या ठिकाणी निरू आणि निमा हे मुस्लिम विणकर दाम्पत्य आले असता त्यांना ते बाळ दिसले. निरू आणि निमाला संतती प्राप्ती झाली नव्हती।

बाळासाठी प्रत्येक उपाय करून बसले होते पण फळ मिळत नव्हते. अश्या स्थितीत त्यांना हे त्यक्त बाळ कमळाच्या फुलावर दिसले असता त्यांनी थोडा विचार करून नंतर आपणच या बाळाचे माता-पिता होण्याचा निर्णय घेतला. 

वरील कथेत किती सत्य आहे याबद्दल सगळेच संशोधक साशंक आहेत. मात्र एवढे निश्चित सांगता येईल कि निरू आणि निमा हे संत कबीर यांचे जन्मदाते नव्हते आणि त्यांच्या मूळ मात्या पित्यांनी, जन्मदात्यांनी त्यांना त्यागले होते. 

 

 

 

 

 

बालपण 

 

 संत कबीरांचे बालपण त्यांच्या घरच्या परिस्थितीनुसार बऱ्यापैकी सुखकर होते. कबीरांच्या वडिलांचा व्यवसाय त्यावेळी व्यवस्थित चालू होता. त्यांना संत कबीर यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण तात्कालिक शाळेमध्ये कबीराचे मन रमत नव्हते. तेव्हा त्यांनी घरीच एका मौलवीला कबीरांचे शिक्षक म्हणून नियुक्त केले.

पण कबीरांनी या महाशयांकडून शिकण्यास स्पष्ट नकार दिला कारण ते हिंदूंविषयी चुकीच्या समजुती त्यांना सांगत होते. त्यामुळे संत  कबीर अशिक्षित राहिले. पण त्यांचे विचार, त्यांचे ज्ञान जे भविष्यात जगाच्या समोर आले ते सगळ्या औपचारिक शिक्षणाच्या पलीकडचे आहे. 

संत कबीर यांना जीवनभरच एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. बालपणी तर हि समस्या खूप गंभीर होती. मुस्लिम लोक हा ‘काफिर’ आहे याच्यासोबत खेडू  नको म्हणून  त्यांच्या लेकरांना संत कबिरांपासून दूर ठेवत.

दुसरीकडे मुस्लिम दाम्पत्यांकडून पालनपोषण होत असल्याने हिंदूसुद्धा त्यांना जवळ करीत नसत. आणि त्याचमुळे खेडण्या बागडण्याच्या वयातच कबीरांना मनन चिंतन करायचे सवय लागली. शिवाय बालपणापासूनच कबीर लोकांना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. 

 

 

 

गुरु प्राप्ती 

 

रामानंद स्वामी यांना कबीरांचे गुरु मानल्या जाते. त्यांच्या गुरु-शिष्याच्या नात्याबद्दलही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याकाळी रामानंद हे वाराणसीतील श्रेष्ठ गुरूंपैकी एक होते.

त्यावेळी वदंता होती कि स्वामी रामानंद हे स्वतः हिंदू असल्याने केवळ हिंदूंनाच शिष्य बनवतात. मात्र कबीरांचे मन हे मनात नव्हते. त्यांना वाटायचे एवढा ज्ञानी मनुष्य असल्या धर्माच्या नावाखाली भेदभाव करणार नाही.

म्हणून एक दिवस दीक्षा घेण्यासाठी संत कबीर स्वामी रामानंदांच्या आश्रमात पोचले. मात्र तिथे गेल्यावर त्यांची रामानंद स्वामींसोबत भेट होणे तर दूर त्यांना आश्रमात प्रवेशही मिळाला नाही. शिवाय स्वामी फक्त हिंदूंनाच दीक्षा  देतात असे जेव्हा खुद्द त्यांच्या एका पट्टशिष्याकडून समजले तेव्हा कबीरांचा उत्साह पार ओसरला. 

 मात्र कबीर हार मानणाऱ्यांतील नव्हते. त्यांनी स्वामींना एकट्यात गाठायचं ठरवलं. त्यावेळी स्वामी दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी नदीत स्नान करायला जात असत.

रामानंदांना भेटण्याच्या हिशेबाने कबीर आदल्या रात्रीपासूनच नदी तीरावर बरोबर रामानंदांच्या मार्गावर जाऊन बसले. वाट पाहता -पाहता त्यांना तिथे डुलकी आली आणि ते झोपी गेले.

इकडे सकाळच्या संधीप्रकाशात रामानंद स्नानासाठी निघाले. नदीच्या तीरावर आले असता तेथे त्यांना अंधारात काही न दिसल्याने त्यांचा पाय कबीरांच्या अंगाला लागला. आणि त्यांनी खाली व्यवस्थित पहिले तर तेथे कबीर होते.

पाय लागल्याबरोबर रामानंदांचा तोंडातून शब्द आले ‘राम राम’ झाले. कबीरांनी हेच नामस्मरण आपला गुरुमंत्र समजून धारण केले. आणि  मनोमन स्वामी रामानंद यांना आपले गुरु मानून ते तेथून परत आले.  

 

 

 

मृत्यू 

 

 संत कबीर यांच्या मृत्यूविषयीही सगळीकडे मतभेद आढळतात. काही संशोधकांच्या अनुसार संत कबीर  ७८ वर्षे जगले तर काहींच्या अनुसार ते ८२ वर्षे जगले. मात्र एक निश्चित आहे कि त्यांचे निर्वाण मगहर या गावी झाले.

त्या काळाच्या मान्यते नुसार काशीत मृत्यू झाल्यास स्वर्ग मिळायचा आणि काशीच्या जर दाक्षिणेकडे मृत्यू आलं तर नरकात जावे लागेलं असे संगितले जायचे. संत कबीर यांनी हि अंधश्रद्धा धुडकावण्यासाठीच त्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांचे निवास स्थान वाराणसीवरून मगहर  या गावी हलविले.

म्हणजे शेवटी जाता-जाता  पण एका अंधश्रेद्धेवर घणाघाती प्रहार करूनच कबीरांनी जगाचा निरोप घेतला. 

 

               मित्रांनो  हा झाला कबीरांचा जीवन परिचय. चला तर आता पाहूया संत कबीर यांचे दोहे

 

 

संत कबीर यांचे दोहे-गुरुमहिमा 

 

आपल्या  भारतीय संस्कृती मध्ये गुरूला अनन्य साधारण महत्व आहे. हेच महत्व संत कबीरांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले. गुरुविषयीचे त्यांचे बरेच दोहे हे ‘गुरुग्रंथ साहिब ‘ मध्ये सुद्धा संकलित करण्यात आलेले आहेत. चला तर बघूया कबीरांच्या नजरेतून गुरु काय आहे ते…… 

 

१) गुरु गुरु मे  भेद है, गुरु गुरु मे भाव 

     सोई  गुरु नीत बंदिये , शब्द बतावे दाव 

 

 

 या दोह्यांमध्ये संत कबीर आपल्याला खरा गुरु कसा ओळखावा याबद्दल मार्गर्दर्शन करतात. संत कबीर म्हणतात कि जगात अनेक गुरु आढळतात. आणि त्या सर्वांमध्ये फरक आहे. अश्यावेळी खरे गुरु कोणते हे कसे ओळखायचे ? तर जे गुरु शब्दांमागचे खरे ज्ञान देतात.

फक्त पुस्तकी पोपटपंची न शिकवता आपल्याला  त्या शब्दांमध्ये लपलेले अनुभवात्मक ज्ञान देतात तेच खरे गुरु होत. आणि अश्याच गुरूच्या चरणी आपण निष्ठा वाहायला हवी. 

 

 

२)गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिले न मोष 

    गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मीटै  न दोष 

 

 

संत कबीर म्हणतात कि गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती सम्भव आहे. जोपर्यंत मनुष्याला गुरुची कृपा गुरुज्ञानाच्या स्वरूपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो अज्ञानरूपी अंधकारात भटकत, मायारूवती सांसारिक बंधनामध्ये अडकून पडतो. मोक्षरूपी मार्ग दाखवणारे गुरु आहेत.

गुरूंशिवाय सत्य आणि असत्य याचा उलगडा होत नाही. दोष नष्ट होत नाहीत. योग्य काय आणि अयोग्य काय यातील फरक समजत नाही. त्यामुळे आपण गुरूंना शरण जायला हवे कारण तेच आपल्याला मोक्षासाठी खरा मार्ग दाखवतात. 

 

 

 

३) गुरु सो ज्ञान जु लिजिए , सीस दिजिये दान    

     बहुतक भोंदू बही गये, राखी जीव अभिमान 

 

 

 संत कबीर म्हणतात कि खऱ्या गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून ज्ञानदीक्षा घ्या. आणि दक्षिणेच्या स्वरूपात आपले मस्तक(शिश ) त्यांच्या चरणावर अर्पण करा. अर्थात आपले तनमन संपूर्ण श्रद्धेने समर्पित करा.

‘गुरुज्ञानाच्या तुलनेत आपले या प्रकारचे समर्पण कवडीमोलाचे आहे.’  हे सत्य आहे. मात्र या सत्यावर अविश्वास दाखवून कित्येक अभिमानी लोक जगाच्या मायारूपी प्रवाहामध्ये वाहून गेले. त्यांचा उद्धार होऊ शकला नाही. 

 

 

४) गुरु बिन माला  फेरते, गुरु बिन देते दान 

     गुरु बिन सब निष्फल  गया, पूछो वेद  पुरान 

 

 

 गुरूंच्या ज्ञानाशिवाय जप करणे, पूजापाठ करणे आणि दान देणे हे सर्व व्यर्थ आहे याचा  दाखला वेद – पुराने सुद्धा देतात.  गुरूंकडून ज्ञान प्राप्त केल्याशिवाय दान देखील ते फळ देत नाही जे द्यायला हवे.  कारण गुरू आपल्याला दानाची आंतरिक अवस्था सांगतात जेणेकरून दानही योग्यप्रकारे घडेल.

प्रस्तुत दोह्यामध्ये संत कबीर म्हणतात की गुरूच्या ज्ञानाशिवाय जप करणे , माला फेरणे म्हणजेच तप  करणे पूजापाठ आणि दान देणे हे सर्व व्यर्थ आहे.  त्यांचा काहीही अर्थ नाही. 

 

 

५) जिन  गुरु  जैसा  जानिया , तिनको तैसा लाभ 

     ओसे प्यास न भागसी , जब लगी धसै  न आस 

 

 

 प्रस्तुत दोह्यांमध्ये संत कबीर सांगतात की  ज्याला जसा गुरु मिळाला , जितकी गुरुची ओळख पटली  तितकाच ज्ञानरूपी लाभ त्याला होतो. म्हणजे जेवढं जास्त आपण गुरूंना ओळखू तेवढाच जास्त आपण त्यांच्या उपदेशाचा सार्थक अर्थ लावू शकतो.

ज्याप्रमाणे दव प्रश्न केल्याने तहान कधीही भागत नाही, त्याच प्रमाणे सद्गुरूंची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय संपूर्ण ज्ञानप्राप्ती होत नाही. 

 

 

६)गुरु नारायण रूप है, गुरु ज्ञान को घाट 

    सतगुरु बचन प्रताप सो, मन के मते उचाट 

 

 

खर पाहता गुरु हे साक्षात परमेश्वराचे रूप आहे. खरे गुरु सांसारिक विषयांतून मुक्त करणाऱ्या ज्ञानसरोवराच्या घाटाप्रमाणे असतात. सद्गुरूच्या वचनांमुळे आपल्या मनातील विविध विकार नष्ट होतात.

सद्गुरूची वचने  आपल्या मनातील सगळे संदेह, क्लेष  नष्ट करून आपल्या मनाला शांत करतात. 

 

 

७)सबी कुछ गुरु के पास है, पाईये  अपने  भाग 

     सेवक मन सौप्या रहे, रहे  चरण मे  लाग 

 

 

  जिथे ज्ञान नाही तिथे सगळे काही असूनही काहीच नसते. केवळ खऱ्या गुरूंकडेच ज्ञानरूपइ धन आणि चेतनेची सर्वश्रेष्ठ दौलत असते.परंतु ते धन प्राप्त करण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे.

मात्र त्यासाठी  आपल्याला गुरु चरणांवर मनाचा त्याग करून म्हणजेच अहंकाराचा त्याग करून सेवा करावी लागते. तेव्हाच कुठे ज्ञानरूपी धनाची प्राप्ती होते. 

 

 

८)जैसी प्रीती कुटुंब कि , तैसी गुरु सो होय 

    कही कबीर ता दास का , पाला न पकडै  कोय 

 

 

संत कबीर म्हणतात कि आपल्या कुटुंबावर जसे आपण प्रेम करतो तसेच आपल्या गुरूवर देखील करा. म्हणजेच जसे आपण अगदी निःस्वार्थ भावनेने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो, त्याचप्रमाणे आपण गुरूंनी दिलेले कार्यही अगदी वेळेत पूर्ण करायला हवे.

यामुळेच सत्य प्राप्तीच्या मार्गातील सगळे अडथळे नष्ट होतील. अशा सेवकाला मायारूपी बंधनामध्ये कुणीही अडकवून ठेऊ शकत नाही. जो गुरूंच्या आज्ञेनुसार सेवेचा आनंद घेतो त्याला मोक्षप्राप्ती घडतेच यात कोणताही संदेह नाही. 

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

९) गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पाय 

     बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय 

 

 

 संत कबीर या दोह्यात गुरूंचे महत्व अधोरेखित करतांना म्हणतात कि जर समजा कधी जीवनात असा काही प्रसंग आला कि ज्यावेळी तुमच्या समोर तुमचे गुरु आणि गोविंद म्हणजे देव असे दोघेही उभे असले तर अश्यावेळी कोणाचे ऐकाल ?

कोणाच्या पायावर मस्तक  टेकवाल ? या प्रश्नच उत्तरही संत कबीर स्वतःच देतात. ते म्हणतात कि आपले गुरूच आपले तारणहार आहेत असे खुद्द परमेश्वरानेच ( कृष्णाने) म्हटले असतांना त्यांच्याच चरणांवर नतमस्तक होणे उचित राहील.

 

 

१०)सब धरती कागज करू, लेखणी करू वनराय  

    सात समुद्र कि मसी करू, गुरुगुन लिखा न  जाय

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 या दोह्यात कबीर सांगत आहेत कि गुरुचे महत्व किती आहे? तर अपरंपार आहे. गुरू महात्म्याला अंत नाही. संपूर्ण धातील जरी कागद बनवले, आणि जगातल्या सगळ्या जंगलांपासून जरी आपण लेखण्या तयार केल्या आणि सातही समुद्राचे पाण्यापासून जरुरी शाई तयार केली तरीसुद्धा गुरुचे गन लिहता येणार नाहीत. हे साहित्य सुद्धा अपुरे पडेल इतकं माहात्म्य गुरूच आहे.

 

 

संत कबीर यांचे दोहे- अहंकार निर्मूलन 

 

मित्रांनो, माणसाच्या जीवनातील सहा शत्रू शास्त्राने सांगितले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा अहंकार होय. एखाद्याने आपले इंद्रियांवर विजय जरी मिळविला आणि जर त्याला आपण तसे करू शकलो याचाच गर्व झाला. तर त्याचा तो इंद्रिय संयम काही कामाचा नाही.

आपण भक्ती करतोय आणि आपल्या भक्तीचाच जर गर्व निर्माण झाला तर तो त्या भक्तीने मिळणारे सगळे लाभांपासून आपल्याला दूर करेल. तसेच दैनंदिन जीवनात जर आपण चांगले आहेत आणि चांगले विचार जोपसता तर उत्तमच आहे.

पण जर याच विचारांमुळे तुमच्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्यांना तुम्ही पाण्यात पाहत असाल तर येथे अहंकाराचा उगम आहे हे निश्चित समजावे.

मानवी स्वभावाच्या या दुर्गुणांवर संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून घणाघाती प्रहार केले आहेत. त्यापैकी काही दोहे आपण पुढे पाहणार आहोत.

 

 

१) कबीरा गर्व ना किजिये, कबहु न हसिये कोय

    अजयब नाव समुद्र मे , का जाने  का होय  

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

  संत कबीर म्हणतात कि मानवाने कधीही गर्व करू नये. आपल्याला जे लाभले आहे त्याचा कणभर सुद्धा अहंकार ठेऊ नये. इतरांच्या विपन्नावस्थेकडे बघून हसू नये.

एखाद्याकडे असणाऱ्या उणिवेकडे  बघून त्या व्यक्तीचा अपमान करू नये. कारण आपण देखील त्याच नावेचे प्रवासी आहोत ज्यात इतर लोकदेखील बसले आहेत. इतर लोक बुडणार असतील तर आपणसुद्धा बुडणार आहोत.

मात्र आपल्याला हे दिसत नाही. अहंकार आणि अज्ञान यामुळे आपण सत्यापासून दूर जातो. या जीवन नौकेचे पुढे काय होईल हे कुणालाच ठाऊक नाही. त्यामुळे नकली अहंकारात फसून इतरांचे दोष मोजत राहू नये. 

 

 

२)मान बडाई  ना करे,  बडा न बोले बोल 

     हिरा मुख से ना कहें , लाख हमारा मोल 

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

 तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करू नका. मोठी माणसे कधीही मोठं-मोठ्या गोष्टी करीत नाहीत तर ते मोठ्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठीच्या आवश्यक कृती करण्यावर भर देतात.

एक सदैव लक्षात असायला हवे कि हिरा कितीही सुंदर आणि किमती असला तरी तो स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती कधीच करत नाही. स्वतःची किंमत कधीच तो स्वतः सांगत नाही. तर वास्तवात सर्व जग त्याची कदर करीत असते.

तुमच्यात जर खरेच महानता असेल तर आपोआपच लोकांना समजेल. आणि खर तर जर सर्वांना  तुमची किंमत काळात नसेल तरी व्यतीत होऊ नका. कारण खऱ्या हिऱ्याची पारख खूप कमी जणांना असते. अज्ञानी तर बाह्यस्वरूपावरून कोणत्याही वस्तूला  हिरा मनू शकतात. 

 

 

३) राजपाट  धन पायके, क्यो करता अभिमान 

     पडोसी कि जो दशा  भई, सो अपनी जान 

 

 

  राज्य, सत्ता , सिंहासन , संपत्ती या गोष्टी मिळवून तू वृथा अभिमान  का बाळगतोस ? आज तुझ्या शेजाऱ्याचा मृत्यू झाला यांच्याकडे तुझे लक्ष आहे ना? शेवटी जातांना त्याला काय सोबत नेता आलं? काहीच नाही ना! मग तीच तुझी सुद्धा स्थिती होणार आहे.

आज तुझ्या शेजारच्याचा नंबर होता उद्या किंवा परवा तुझा असेल. आणि तू सुद्धा रिकाम्या हातानेच जाणार आहेस. तेव्हा या गोष्टींचा वृथा अभिमान तुला कशाला आहे? 

 

 

४) कब अभिमान न किजिये ,  काहा  कबीर समझाये

    जा सर अहं सु सिंचरे ,  पडे  चौरासी जाय 

 

 

 कधीही अभिमान बाळगू नका  असे कबीर तुम्हाला समजावत आहे. कारण ज्याच्या डोक्यामध्ये (विचारांमध्ये) अहंकार वसलेला आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष जन्मातही मोक्ष प्राप्त  करू शकत नाही.

अहंकारी माणूस मी जे करतो, तेच योग्य असे मानतो. यासाठीच तोच बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या नादात नेहमी दुःखच पदरात पाडून घेतो. 

 

 

 

५) उंचे पाणी ना टिके , नीचे हि ठहराय              

    नीच तो सौ भर पिये , उंचा  प्यासा रह जाय 

 

 

 ज्याप्रमाणे पाणी पर्वतांवर, डोंगरावर कोसळते मात्र तेही ते थांबत नाही. पाणी अश्या उंचावरच्या ठिकाणावर थांबत नाही हा पाण्याचा मूळ स्वभाव आहे. गुणधर्म आहे. त्याच प्रमाणे ज्ञान, ईश्वरकृपा यांचा सुद्धा गुणधर्म आहे कि ते  स्वतःला उच्च मानून अहंकारात राहणाऱ्या लोकांजवळ कधीही थांबत नाही.

खरा ज्ञानी अहंकारयुक्त राहूच शकत नाही. तर विनम्रता हेच खऱ्या ज्ञानाचे द्योतक आहे. ज्ञानी मनुष्य हा खोल जागेप्रमाणे असतो. खाली राहणारा. विनम्र. म्हणूनच त्याच्यापाशी ज्ञानरूपी पाणी साचतेही आणि निरंतर वाढतही जाते. 

 

 

  ६)बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड  खजूर 

      पंथी को छाया नाही, फल लगे अति दूर 

 

 

खजुराचे झाड खूप उंचच उंच वाढते.  या झाडाने पुरेशी सावली तयार होत नाही. सोबतच याला लागणारे फळ हे खूप दूर असते त्यामुळे ते सहजासहजी कोणाला मिळत नाही. गरजू माणसाला तर नक्कीच नाही.

कबीर म्हणतात कि मानसाने खजुराच्या झाडाप्रमाणे नसावे. आपण खूप मोठे झालात, अमाप संपत्ती मिळवली. मान – मरातब, सत्ता मिळवली. पण जर या सगळ्यांचा वापर आपण इतरांच्या भल्यासाठी करत नसाल, गरजूंच्या मदतीसाठी करत नसाल तर तुमचे ज्ञान, पद  आणि मोठेपणा सगळं काही व्यर्थ आहे. 

 

 

७)कबीर घास न निंदिये , जो पाऊ  तली  होय 

   उडी पडे  जब आँख  मे , बरी थुहेली होय 

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

पायाखाली असलेल्या गवताचाही अनादर करू नये असे कबीर सांगतात. गवताची एक छोटीशी काडी जरी डोळ्यात गेली तरी माणसाला खूप त्रास होतो. त्याला दिसेनासे होते.

याचा आपण असाही अर्थ घेऊ शकतो कि एक छोटी काडी पण पर्वताला झाकून टाकू शकते. ढग, सूर्य  यांना लपवू शकते . तसेच मनाचा एखादा क्षुल्लक विकारही तुम्हाला ईश्वरापासून दूर करू शकतो.

म्हणूनच कुणालाही लहान समजू नये. प्रत्येक जण आपापल्या योग्य जागी पोचला तर त्याचे महत्व सिद्ध होते. काडी बाहेर तर पर्वतासमोर क्षुल्लक आहे. तीच काडी डोळ्यात फसू द्या. तुम्हाला पर्वत दिसणार नाही आणि त्याचे  मोठेपणही दिसणार नाही. 

 

 

८) मैं  मैं  मेरी जीनी करे , मेरी मूल  बिनास 

    मेरी पग का पैशडा , मेरी गल कि फास 

 

 

   येथे संत कबीर म्हणतात कि हे मानसा तू ‘मी -मी’ , ‘माझे -माझे’ असे बोलून अहंकाराचे प्रदर्शन का करतोस. हा अहंकारच आनंदाच्या विनाशाचे मूळ कारण आहे.

हा अहंकार तर पायात पडलेल्या बेड्या आणि गळ्याला लागलेल्या फासासामन आहे.हा तुला नेहमीच स्वतःच्या गुलामीत ठेवेल. तुझा कधीही अध्यात्मिक उत्कर्ष होऊ देणार नाही. 

 

 

९) मैं  मैं बडी बलाई हैं , सकै  तो निकासी भाजि 

   कब लग राखू हैं सखी, री पलेटी  आगि 

 

 

 अहंकार हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. जो मनुष्याला दुःखाच्या खाईत लोटतो. मात्र अहंकार संपूर्ण गुरूंच्या ज्ञानाद्वारे दूर केला जाऊ शकतो. यासाठीच लवकरात लवकर त्याचा त्याग करायला हवा. अन्यथा तो तुमच्या विनाशाचे कारण बनेल.

ज्याप्रमाणे कापसात लपेटलेला अग्नीची काही काळ शांत राहतो; परंतु त्याच अग्नीचे ज्वाळेत  रूपांतर होऊन ती सर्व काही जाळून भस्मसात करते. अगदी त्याचप्रमाणे अहंकार देखील अधिक काळ आपला विषारी प्रभाव रोखू शकत नाही. 

 

 

१०) अपानपौ  न सराहिये, और न काहीये रंक 

       ना जानो किस बिरख तली, कुडा होई करंक 

 

 

   स्वतःची खोटी स्तुती करून अहंकार करणे आणि इतरांना तुच्छ समजणे  या दोन्ही गोष्टी खोट्या अभिमानाची  चिन्हे आहेत. हे  शरीर नाशवंत आणि तुच्छ आहे. हे शरीर हाडांचा ढीग बनून कोणत्या उकिरड्यावर टाकले जाईल हे अज्ञान आणि माया यांमध्ये गुरफटलेल्या माणसाला माहीतच नाही. 

 

 

संत कबीर यांचे दोहे – खरा धर्म, अंधश्रद्धेवर प्रहार

 

                         संत कबीर यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तात्कालिक समाजातील ज्या अनिष्ठ चालीरीती होत्या, विविध कर्मकांडे होते त्या साऱ्यांवर कठोर टीका केली. कोणत्याही धर्माचे खरे स्वरूप काय आहे?

माणसाचा खरा धर्म कोणता? खरी भक्ती कशी असावी हे सांगतांना कबीरांनी समाजातील रूढी परंपरांना कडाडून विरोध केला. त्यांनी त्यांच्या बुद्धिवादाने आपली मते लोकांना पटवून दिली. संत कबीरांचे हे परखड विचार त्यांच्या पुढील दोहत्यांच्या माध्यमातून समजजून घेवुयात. 

 

 

१)केसो काही बिगाडीया , जो मुन्डे  सौ बार 

     मन को काहें  न मुन्डीये ,जामै  विषम विकार 

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

 कबीरांनी हा दोहा काशीतील पंडितांना उद्देशून रचला आहे. त्यावेळी काशीतील पंडित नित्य नेमाने डोक्याचे मुंडन करून घ्यायचे . तेव्हा कबीर त्यांना म्हणतात कि ‘ या केसांनी तुमचे काय बिघडवले आहे त्यांना का कापता? कापायाचे असेल तर तुमच्या मनातील विकारांना काप. आपल्या मनाचे मुंडन करा ज्यात शेकडो विकार राहतात. 

 

 

२)  साई सेती साच चली, औरा सूं  सुध  भाई 

    भावे लांबे केस कटी, भावें  घुरडी मुंडाई 

 

 

 संत कबीर म्हणतात कि तुम्ही लांब केस ठेवा किंवा मुंडन करा; पण तुम्ही जर प्रामाणिक राहून इतरांबरोबर प्रेमभावनेने वागलात तर सदैव ईश्वराच्या जवळ राहाल .तुम्ही कितीही मुंडन केले , किंवा कितीही केस वाढवले पण जर तुमच्या मनात इतरांसाठी करुणा , दया, प्रेम नसेल तर तुमच्या या साऱ्या कर्मकांडाना  काही अर्थ नाही.

 

 

३) माला  पहऱ्या कुछ नहीं , भगती न आई हाथी  

    मोठो मूछ मुंडाई  करी, चल्या जगात कै साथी  

 

 

                              जर तुमच्या अंतरंगात खरी भक्तिभावाना जागृत झाली नाही तर माळ  घालणे व्यर्थ आहे. डोक्यावरचे केस आणि मिश्या छाटून संन्याशाचा वेष धारण करूनही  भक्तीच्या अभावात मनुष्य जगाबरोबर चालत राहतो. 

 

 

४)साई आगे साच है, साई साच सुहाय 

    चाहे बोले केस राख, चाहे घोट मुंडाय 

 

 

 परमेश्वराच्या समोर सगळं घडतंय. त्याला सगळं सत्य ठाऊक आहे. आणि सत्यच त्याला प्रियही आहे. तुम्ही बाह्य अवडंबर करून जगाला भ्रमित करू शकता पण ईश्वराला नाही. त्यामुळे तुम्ही केस ठेवा किंवा मुंडन करा त्याला काही फरक पडत नाही. तुमची भावना जर शुद्ध नसेल तर तो तुम्हाला कसा  काय जवळ करणार?

 

 

५)   कंकड  पत्थर जोड कर, मस्जिद लेवी चुनाय 

       ता चढ मुल्ला बाग दे , क्या बहरा  भया खुदाय 

 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

   

या दोह्यांमध्ये संत कबीर यांनी मुस्लिमांमधील विना कामाच्या चालीरीतींना लक्ष्य केलं आहे.  संत कबीर म्हणतात की तुम्ही दगड धोंडे एकत्र करून त्यापासून सुंदर अशी मस्जिद तर बनवली. हे छान काम केलत. मात्र त्या मस्जिद वर चढून रोजच मौलवी बाग देतात त्याचा अर्थ काय? काय खुदा(देव) बहिरा आहे?त्याला काय ऐकायला  येत नाही. अरे माणसाच्या मनात बसणारा तो. त्याला कशाला मोठ्यानं ओरडून काही सांगायची गरज आहे?

 

 

६)पाथर पूजे हरी मिले , तो मै  पुजू पहार 

  ता तैं तो चाकी भली, पीस खाय संसार 

 

  जर दगडाची  आराधना केल्याने हरी मिळत असेल तर मी पहाडाची पूजा करेन. आणि त्या दगडाचा तरी काही उपयोग नाही. त्यापेक्षा तर चक्की (जाते) बरे आहे. निदान त्यातून मिळणाऱ्या पिठावर सारा संसार तरी जगतोय. 

 

 

७)माला  फेऱत जग भया, फिरा न मन का फेर 

   कर का मणका  डार दे, मन का मणका  फेर 

 

 

  माळेचा कितीही जाप केला तरी जर तुमच्या मनात विकार असतील तर त्या जाताच काही फायदा नाही. मग तुम्ही थोड्या वेळासाठी जाप करा कि दिवसभर माळ  जपत राहा. मात्र तर तुम्हाला परमेश्वराची कृपा अनुभवायची असेल तर हातातील माळेचा मनका सोडून तुम्हाला मनाच्या माळेचा मनका फेऱ्यात जाप करावा लागेल. मनावर नियंत्रण मिळवावे लागेल. 

 

 

८)कस्तुरी कुंडल बसे,  मृग ढुंढे  बन माही 

  ऐसे घट -घट  राम है , दुनिया देखे नाही 

 

 

  कस्तुरीचा हरणाची जशी अवस्था असते तशीच मानवाची आहे. ज्या प्रकारे कस्तुरीमृग कस्तुरी त्याच्या कुंडलातच असतांना तिला शोधत संपूर्ण वनभर भटकत राहतो अगदी त्याच प्रकारे माणूस सुद्धा प्रत्येक जिवात प्रभू आहे याचे ज्ञान नसल्याने  जन्मभर देवाच्या शोधात भटकत राहतो. 

 

 

९)कथा कीर्तन कुल विषे, भाव सागर कि नाव 

     पाहत कबीर या जगत  नाहीं और उपाय 

 

 

हा संसाररूपी भवसागर तरुन  जाण्यासाठी कथा -कीर्तन आणि भक्तीच्या नावेची गरज आहे. हा भवसागर तारण्यासाठी भक्तीशिवाय अन्य कोणतेही साधन नाही.

 

 

१०)तन को जोगी सब करे, मनको बिरला कोय 

     सहजे सब विधी पाईये, जो मन जोगी होय 

Sant-Kabir-yanche-Dohe 
संत कबीर यांचे दोहे

 

कित्येक लोक संन्याश्याप्रमाणे बाह्यात्कारी वेशभूषा धारण करतात. त्यामुळे कर्म करण्यापासून त्यांचा बचाव होतो. परंतु आपल्या मनाला ते खरा जोगी, सन्यस्त बनवू शकत नाहीत. मनाने विरक्त बनणारा जगातल्या सगळ्या पद्धतींना सहजपणे स्वीकारतो. 

 

 

 समारोप      

 

 मंडळी, आजच्या  संत कबीर यांचे दोहे|Sant  kabir  Dohe  in  Marathi या पोस्टच्या  माध्यमातून आपण महात्मा संत कबीर यांचे काही महत्वाच्या विषयांवरचे दोहे आणि त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेतले.

तुम्हाला संत कबीर यांचे दोहे|Sant  kabir  Dohe  in  Marathi हि पोस्ट कशी वाटली? या पोस्टमधील कुठली माहिती तुमच्यासठी नवी होती? हे आम्हाला कंमेंट मध्ये कळवा. तसेच संत कबीर यांचे दोहे | Sant  kabir  Dohe  in  Marathi या पोस्टमध्ये काही सुधारणा सुचवायचे असतील तर  आम्हाला कळवा. आणि हो माहिती आवडल्यास सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका.  

3 thoughts on “संत कबीर यांचे दोहे ।Sant Kabir Dohe in Marathi”

  1. खूप सुंदर मला खूप चं वाटले हे सगळे दोहे वाचून

    Reply
  2. अतिशय सुंदर ! मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळाली. धन्यवाद…

    Reply
  3. खरंच आज संत कबीर काय होते हे लक्षात आले. खूप छान वाचून आनंद झाला

    Reply

Leave a Comment