नैराश्य दूर कसे करावे ? नैराश्याचे प्रकार आणि उपाय.

मित्रांनो, तुम्हालापण नैराश्य म्हणजे काय? नैराश्य का येते ? आपण किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त  आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? नैराश्य येण्यापासून कसे वाचायचे ? जर नैराश्य आलेच तर त्यावर कुठले उपाय करायचे ? यांसारखे बरेचसे प्रश्न पडत असतील. आपल्या या सगळ्या प्रश्नांना आम्ही नैराश्य दूर कसे करावे ? या पोस्ट द्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

 मित्रांनो, नैराश्य (depression ) हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नैराश्य हा एक सर्वसामान्य मानसिक आजार आहे.

जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३.८% लोकसंख्या नैराश्याने ग्रासलेली आहे. जागतिक स्तरावर एकूण प्रौढ व्यक्तींपैकी ५% प्रौढ व्यक्ती या नैराश्याने ग्रासलेल्या आहेत.तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण ५.७% आहे 

 नैराश्याबाबत पुरुष  आणि स्त्रियांची तुलना केली असता स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त दिसून येते. जागतिक स्तरावर एकूण पुरुष लोकसंख्येच्या १.९% पुरुष नैराश्याने ग्रस्त असतांना त्याच ठिकाणी स्त्रियांच्या एकूण संख्येपैकी ३.२% स्त्रिया या समस्येचा सामना करीत आहेत.   

जगातील देशांचा विचार केला असता नैराश्याने ग्रस्त लोकांच्या संख्येनुसार आपला भारत हा प्रथम क्रमांकाचा देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एकूण  भारतात एकूण लोकसंखेच्या ६.५%  लोक कुठल्या ना कुठल्या घटक मानसिक आजाराने ग्रस्त असून आपल्या देशात एक लाख लोकसंख्येमागे सरासरी १०.९ आत्महत्या होतात.

 

 

 

नैराश्य दूर कसे करावे ?

 

मित्रांनो नैराश्य दूर कसे करावे हे जाणून घ्या अगोदर आपल्याला नैराश्याबद्दल काही महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे.तेव्हा आपण आराधी नैराश्य म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? याबद्दल माहिती घेऊया.

 

 

 

नैराश्य म्हणजे काय?

 

 नैराश्य हि अशी मानसिक स्थिती आहे ज्यात व्यक्ती संपूर्णतः नाकारात्मकतेनं भरून जातो आणि त्याच्या मनाची हि नकारात्मक स्थिती त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा बनू लागते. हि सततची नकारात्मक भावना बरेचदा जीवनाविषयी घृणा तयार करते आणि जीवनाप्रती असणारी आसक्ती नष्ट करते. याची परिणती बहुतेक प्रसंगांमध्ये आत्महत्येत होते.  

 तसे पाहता नैराश्य एक साधारण सर्वसामान्य मानसिक आजार आहे. वेळीच उपचार केल्यास तो बराही होतो. पण जर उपचारांमध्ये दिरंगाई झाली तर प्रसंगी जीव जाण्याचीही  शक्यता आहे. 

 

 

नैराश्याची कारणे 

 नैराश्य येण्यामागे विविध कारणे असू शकतात. सहसा यांमध्ये त्या सर्व बाबींचा समावेश होतो ज्या मानवी मनावर नकारात्मक परिणाम करतात. दैनंदिन जीवनातील नैराश्याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींना आपण पुढीलप्रमाणे वर्गीकृत करू शकतो. 

 

 

१)कौटुंबिक तणाव :- 

 कुटुंब हे सर्व प्रश्नांना सोडविणारी शाळा आहे. आपल्या कुटुंबातून मिळणारे प्रेम हेच आपल्याला बाह्य जगातील गुंतागुंतीच्या प्रश्नांना, व्यवहारांना तोंड देतांना शक्ती देत असते.

पण जर कुटुंबातच तणाव असतील तर व्यक्ती असहाय होऊन जाते. १०-३० वर्षांच्या व्यक्तींमध्ये  कौटुंबिक तणाव  हे नैराश्याचे प्रमुख कारण आहे.

आई -वडिलांची सतत भांडणे होत असतील तर बहुतेक वेळा अश्या घरातील मूल हे नैराश्याला बळी पडू शकते.त्याच्या शैक्षणिक क्षमता, समाजात मिसळण्याची प्रवृत्ती यांवर विपरीत परिणाम पडतो.

मुलाच्याच नव्हे तर जोडीदारांच्याही व्यावसायिक जीवनावर घरातील तणावाचा परिणाम पडतोच. 

 

 

२) न्यूनगंड  :-

आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही.  आपल्यामध्ये अमुक अमुक कमतरता आहे. याप्रकारच्या विचारांनी स्वतःला सतत कमी लेखण्याची जी प्रवृत्ती असते तिला न्यूनगंड म्हणतात. हाच न्यूनगंड स्वतःविषयी क्षुद्र भावना निर्माण करतो आणि व्यक्तीला त्याच्या जीवनाची निरर्थकता दर्शवतो.

स्वतःला सतत कमी लेखने हे कळत नकळत आपल्या मनावर परिणाम करते आणि मग आपले मन आपल्या शरीराद्वारे त्याला अनुरूप असे परिणाम घडवून आणते. मग ज्या गोष्टी आपण सहज करू शकतों त्यासुद्धा कठीण वाटायला लागतात आणि हा न्यूनगंड आणखी बळावत जातो. 

 

 

३) अपेक्षाभंग:- 

खर पाहता सगळ्या दुःखाचं कारणच ह्या अपेक्षा आहेत. आपण एखाद्याकडून फार अपेक्षा धरून बसतो आणि मग त्याची पूर्तता न झाल्यास दुःखी  होऊन बसतो.

प्रेमातील होणारा अपेक्षाभंग हे आजच्या तरुण पिढीतील नैराश्य आणि व्यसनाधीनता यांचं प्रमुख कारण आहे. कित्येक शोकांतिका या प्रेमातील अपेक्षाभंगातूनच निर्माण झालेल्या आहेत. 

 

 

४) अपयश:- 

अपयश हि यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. परंतु किती जण हे अपयश पचवायला तयार असतात. आज स्पर्धा एवढी भयंकर आहे कि एकदा अपयश आलं की  आपण फार मागे राहिल्याची भावना आपल्याला आतून पोखरून टाकते.

त्यात सतत तुलनात्मक दृष्टीने बघणारे जग आपल्याला खिजवून सोडते. अशावेळी मन स्थिर ठेऊन अपयशाचा सामना करणे थोडे अवघडच असते आणि येथेच आपण नैराश्याला बाली पडू शकतो. 

 

 

५)  मृत्यू  :-

 प्रिय व्यक्ती दुरावल्याने होणारे दुःख हेही बरेचदा नैराश्याचे कारण असते. मात्र जवळची व्यक्ती गेल्याने त्याच्यापाशी जाण्याचे(आत्महत्येचे) विचार हे त्या व्यक्तीच्या प्रेमामुळे येतात तर नैराश्यात येणारे विचार हे स्वतःचे जगणे निरर्थक वाटल्याने निर्माण झालेले असतात. 

 

Also  Read 

 

 

 

नैराश्याची  लक्षणे 

 

  मंडळी नैराश्य कसे दूर करावे? हे जाणून घ्यायचे असल्यास आपल्याला आधी ते ओळखणे शिकावे लागेल. आजाराची ओळख झाल्याशिवाय कुठला उपचार करायचा हे तरी कसे ठरवणार? म्हनेऊन आपण आधी नैराश्याची लक्षणे काय आहेत ते बघुयात. 

 नैराश्य हा एक मानसिक आजार असला तरीही त्याचे पडसाद दैनंदिन जीवनातील कृतींवर पडतात. व्यक्तीच्या  रोजच्या व्यवहारांच्या सध्या सरळ निरीक्षणातून आपण या आजाराचे निदान करू शकतो. नैराश्याची लक्षणे ठाऊक असल्यास आपण याच्या सुरुवातीच्याच पायऱ्यांवर योग्य ते उपचार करून स्वतःला व आपल्या प्रियजनांना गंभीर परिस्थितीपासून वाचवू शकतो. नैराश्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. 

 

 

 

१)  सततची उदासी किंवा  सतत चिंता करीत राहणे. 

जर नैराश्याने मनावर ताबा मिळवणे सुरु केले असेल तर व्यक्ती उदासी आणि चिंतेच्या अधीन होते. यावेळी व्यक्ती थोडी विचारांत मग्न असते. हाती असलेल्या कामामध्ये लक्ष नसते. आपण जरी अश्या व्यक्तीसोबत बोलत असलो तरी त्यावेळीसुद्धा  ते  तुम्हाला ओझरता प्रतिसाद देतील मात्र त्या बोलण्यावर त्यांचं लक्ष राहणार नाही. मध्येच आपण काही विचारल्यास ते गोंधळून जातात.

आपण काय बोललो याबद्दल त्यांचं लक्ष नसल्याचे लपवण्यासाठी ते खोट आणि बळजबरीच हसण्याचा प्रयत्न करतील. अश्या बारीकसारीक गोष्टींवरून आपण ठरवू शकतो कि व्यक्ती चिंतेत आहे.

 यांच्या चिंतेची विविध क्षेत्रे  असू शकतात . या क्षेत्रांची उदाहरणे पुढीलप्रमाणे 

 • नातेसंबंधांची चिंता 
 • जीवनात पुढे आपले कसे होईल याची चिंता 
 • भूतकाळातील अपयशाच्या करणमीमांसेतून उत्पन्न होणारी चिंता. 
 • वयक्तिक चुकांमधून निर्माण होणारी अपराधिक भावना. 

मात्र येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हेच लक्षण आपल्याला स्वमग्न आणि स्वप्नाळू (दिवसा  स्वप्न पाहणारे ) लोकांमध्येही दिसेल पण त्यांच्या विचारचक्राचे  कारण हे सकारात्मकही असू  शकते. मात्र नैराश्याच्या पायरीवर असणाऱ्या व्यक्तीच्या हावभावात एक प्रकारचे गांभीर्य जाणवते. 

 

२)चिडचिडेपणा 

मनासारखं काही घडून न आल्यास चिडचिड होणे, राग येणे हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. गेली हजारो वर्ष आपण आपल्या या नैसर्गिक स्वभावासोबत जगात आलेलो आहोत. पण राग येण्यासाठी  कारणही तसच असावं लागतं . काही ठोस कारणासाठी अपरिहार्यतेतून येणारा  राग हा तात्कालिक असतो. लगेच शांत होतो. आणि महत्वाचं म्हणजे याची आवृत्ती पुन्हा पुन्हा होत नाही. 

नैराश्याच्या विळख्यात  अडकणाऱ्या व्यक्तीबाबत मात्र हे थोडे वेगळे घडते. या व्यक्तीला लहान सहन गोष्टींचा राग यायला लागतो. दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या आणि या अगोदर ज्या गोष्टींना या व्यक्तींनी कधी तेवढे महत्व दिले नसेल अश्याही गोष्टींसाठी हे व्यक्ती चिडतात. त्यांच्या चिडचिडीतून भांडणे होतात आणि मग भांडणातून पून्हा चिंतेला कारण तयार होतात. आणि हे  दुष्टचक्र असेच फिरत राहते. 

 

 

३)अनियमित झोप   

नैराश्याच्या विविध लक्षणांत झोपेच्या बाबतीत आढळणारा अनियमितपणा हे एक प्रमुख लक्षण आहे. नैराश्याने ग्रस्त व्यक्ती सुरुवातीपासूनच या समस्येला समोर जातात. नैराश्याने ग्रस्त व्यक्तीला रात्री उशिरापर्यंत सहसा झोप लागत नाही. डोक्यामध्ये सतत विचारचक्र सुरु असल्याने झोपेच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होतो.

काही व्यक्तींच्याबाबत तर झोपेचा कालावधी अतिशय कमी झालेला असतो. तर काही प्रकरणांमध्ये जास्त झोप लागणे हे सुद्धा लक्षण आढळले आहे. साधारणतः माणसाला ६-८ तासाची झोप आवश्यक असते. या वेळेव्यतिरिक्त जर झोपेच्या वेळेमध्ये अनियमितपणा आढळत असेल, तर थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते. 

 

 

४) नीरसता / निष्क्रियता 

 जर व्यक्ती नैराश्याला सामोरे जात असेल तर त्या व्यक्ती मध्ये नीरसता हे प्रमुखत्वे आढळणारे लक्षण आहे. अशा वेळेला व्यक्तीचे कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही. उत्साहाची कमी जाणवते.

ज्या गोष्टी त्या व्यक्तीच्या अतिशय आवडीच्या आहेत अश्याही गोष्टींमध्ये असल्या परिस्थितीत माणसाचे मन रमत नाही. म्हणजे पूर्वी दोन-दोन तास व्यर्थ बडबड करणारा व्यक्ती तुम्हाला अबोल झालेला दिसेल किंवा एखादा दिवस-दिवस  क्रिकेट खेळणारा तुम्हाला खेळणे टाळतांना दिसू शकतो किंवा  कुठलीही गोष्ट करतांना ऊर्जेची कमी हे सुद्धा निष्क्रियतेचे, निरासपणाचेच उदाहरण आहे. 

 

 

५) इतर लक्षणे 

 वरील प्रमुख लक्षणांव्यतिरिक्त बरीचशी लक्षणे आहेत जी आपल्याला नैराश्याने ग्रस्त व्यक्तीत पाहायला मिळतात. या लक्षणांची यादी पुढील प्रमाणे  

 • भुकेबाबत अनियमितता . म्हणजेच खूप कमी भूक लागणे किंवा सतत काहीतरी खावेसे सुद्धा वाटू शकते. 
 • जीवनाविषयी निरर्थकतेची भावना. एकटेपणाची भावना. कुणीच आपल्याला समजून घेऊ शकत नाही याप्रकारचे विचार. 
 • कामात लक्ष न लागणे. लक्षात न राहणे . लवकर निर्णय न घेता येणे. 
 • आत्महत्येचे विचार येणे किंवा प्रयत्न करणे. 
 • विनाकारण रडू येणे. 
 • शारीरिक त्रास होणे. अश्यावेळी त्रास होतात पण शारीरिक व्याधीचे मूळ गवसत नाही. यावेळी असली व्याधी हि मानसिक अस्थिरतेचा परिणाम असते. डोके दुखणे, अंग दुखणे या पासून तर कुठलाही मोठा आजारही या प्रकारात समाविष्ट होऊ शकतो. 

 

 

नैराश्य-दूर-कसे-करावे-?
नैराश्य दूर कसे करावे ?

 

 

नैराश्याचे प्रकार 

वर नमूद केलेली नैराश्याची लक्षणे विचारात घेता मानसशास्त्राच्या अभ्यासात नैराश्याचे त्याच्या लक्षणांच्या गांभीर्यानुरूप विविध प्रकारांत विभाजन करण्यात आलेले आहे. नैराश्य दूर कसे करावे? नैराश्यावर उपाय काय करावे? हे बघण्या अगोदर आपण नैराश्याच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती घेऊयात.. 

 

 

१) मुख्य नैराश्य (Major Depression)

मुख्य नैराश्य हा नैराश्याच्या सर्वांत गंभीर प्रकार आहे. कमीत कमी दोन हप्ते जर वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी काही व अधिक लक्षणे व्यक्तीमध्ये आढळून आली तर अशी व्यक्ती मुख्य नैराश्याची शिकार आहे असे मानले जाते. 

पौगंडावस्था आणि तरुण वय हे या प्रकारच्या नैराश्याचे प्रमुख क्षेत्र मानावे लागेल. कारण याच वयोगटातील सार्वधिक व्यक्ती या समस्येला जास्त समोर जातांना दिसतात.

या प्रकारात नैराश्याची लक्षणे टप्प्या टप्प्यानेही जाणवू शकतात आणि काही महिन्यांपासून  काही वर्षांपर्यंत टिकून राहू शकतात.या प्रकारच्या नैराश्याचा जर प्रभावीपणे उपचार झाला नाही तर प्रसंगी व्यक्तीच्या जिवीतासही धोका तयार होऊ शकतो. 

 

 

) डिस्टिमिया    

तीव्रतेच्या द्रुष्टीने विचार केला असता डिस्टिमिया हा मुख्य नैराश्यापेक्षा कमी तीव्र आहे. यामध्ये व्यक्तीला मुख्य नैराश्याप्रमाणेच लक्षणे जाणवतात मात्र त्यांची पातळी कमी असते तसेच हि लक्षणे कमी कालावधीसाठी जाणवतात. 

याचे अनिवार्य लक्षण म्हणजे रुग्णाला संपूर्ण दिवसभर लक्षणे न जाणवता दिवसातील बहुतेक वेळ लक्षणे दिसून येतात. म्हणजे प्रत्येक दिवशी काही तासाचा कालावधी हा या लक्षणांनी व्यापलेला असतो. आणि असे किमान दोन वर्ष चालते.

यामध्ये कठोर उदासपणा अनुभवायला येत नाही पण सामान्यपणे जीवनात कुठलाच उद्देश्य नसल्याची, प्रेरणा नसल्याची भावना असते . रुग्णाला कुठल्याही गोष्टीचा काहीही  फरक पडत नसल्याचेसुद्धा बरेचदा दिसून येते. 

 

 

 

३) द्विध्रुवीय  नैराश्य   

यालाच ‘ मॅनिक डिप्रेशन ‘  असेही म्हणतात.  यात व्यक्तीची मानसिक स्थिती हि उच्चं  ऊर्जा स्थिती आणि उच्च नैराश्य स्थिती या दोहोंमध्ये आंदोलित होत राहते. ज्यावेळी व्यक्ती ऊर्जेच्या खालच्या पातळीवर असतो त्यावेळी व्यक्तीला मुख्य नैराश्याची सगळी लक्षणे जाणवतात. 

औषधोपचाराने आपण व्यक्तीचे मूड स्विंग बदलू शकतो. आपण उच्च ऊर्जा स्थितीत असा कि नीच ऊर्जा स्थितीत असा आपले डॉक्टर अश्यावेळी आपल्याला मन नियंत्रक औषध सुचवू शकतात. जसे कि लिथियम.

या प्रकारामध्ये पारंपरिक अँटी-डिप्रेसंट औषध प्राथमिक स्वरूपात दिल्या जात नाही. कारण या प्रकारामध्ये कोणते औषध द्विध्रुवीय नैराश्यात उपयुक्त ठरतील याबाबत संशोधकांच्या अजून एकमत झालेले नाही.

 

 

 

४)मौसमी नैराश्य      

 मौसमी नैराश्य एखाद्या विशिष्ट ऋतूशी निगडित असते. सहसा हे हिवाळ्यात जास्त आढळते. हिवाळ्यात जसजसा दिवस कमी होत जातो तसतसा आपल्याला मिळणारा सुर्यप्रकाश कमी होत जातो आणि आळसाची भावना बळावते.

सहसा याप्रकारचे नैराश्य ऋतू बदलाबरोबर निघून जाते . शिवाय प्रकाशीय उपचार आणि काही अँटिडिप्रेसंट औषधी  या प्रकारात उपयुक्त ठरतात. 

 

 

५) वेडगड (psychotic) नैराश्य   

या प्रकारच्या नैराश्याचे रुग्ण मुख्य नैराश्याच्या लक्षणांसोबतच काही वेडेपणाचे लक्षणेही प्रदर्शित करतात. यात वेगवेगळे भ्रम  (hallucinations ) होतात. रुग्णाला अश्या गोष्टी दिसतात किंवा ऐकू येतात ज्या मुळात त्या परिस्थितीत अस्तित्वातच नसतात. रुग्ण चुकीच्या श्रद्धा पाळतात. त्यांना नेहमीच इतर लोक आपल्याला इजा करतील याची भीती तयार होते. 

या प्रकारच्या नैराश्यामध्ये अँटी डिप्रेसंट आणि अँटी सायकॉटिक औषध उपयोगी ठरते. शिवाय सोबतच ECT  पद्धती सुद्धा कामी येते. 

 

 

६)प्रसूती काळातील नैराश्य    

बऱ्याच महिलांना प्रसूती पूर्व, प्रसूती दरम्यन आणि प्रसूती नंतर अश्या तीनही अवस्थांमध्ये नैराश्याला सामोरे जावे लागू शकते.

प्रसूतीच्या काळात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. या बदलांना तात्काळ स्वीकारणे प्रत्येकाचं महिलेच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत असेलच असे नाही.

ज्या मानसिक व शारीरिकरित्या  या बदलांसाठी तयार नसतात त्यांना मग नैराश्यातून जावे लागते. मात्र काही औषधोपचार आणि थोडा जीवनपद्धतीत बदल याप्रकारच्या नैराश्यातून वाचवू शकतो.

शिवाय या प्रकारचे नैराश्य थोडे अल्पकालीन प्रकारात येते त्यामुळे वेळ जाईल तसा  याचा परिणाम आपोआपच कमी होतो. 

 वर उल्लेखलेल्या प्रमुख प्रकारांसोबतच मासिक पळी दरम्यान येणारे नैराश्य, असंबद्ध नैराश्य,  क्षणिक नैराश्य, उपचार रोधक नैराश्य असे नैराश्याचे विविध उपप्रकार आहेत.

नैराश्याच्या प्रकारांची हि चर्चा इथेच थांबवून आपण  नैराश्य दूर कसे करावे? या आपल्या प्रमुख प्रश्नाकडे वळूया. 

 

 

 

नैराश्य दूर करण्याचे उपाय 

 

 नैराश्य दूर करण्याचे विविध उपाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सर्व उपायांचे आपण ढोबळमानाने दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो. 

१) अवैद्यकीय उपचार 

२) वैद्यकीय उपचार 

 

 

 

१)अवैद्यकीय उपाय  

हे उपचार प्रामुख्याने मानसिक तणाव कमी करण्यासही संबंधित आहेत. जीवनशैलीतील परिवर्तनातून यामध्ये नैराश्यविरोधात लढा उभारला जातो. हे उपाय  प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आहेत. 

नैराश्याचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे. आणि मन निरोगी ठेवण्यासाठी आपले शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. कारण निरोगी शरीरातच निरोगीय मन वास करते.

त्याकरिता आपल्याला काही आरोग्यदायी सेवाही अंगी बाणवाव्या  लागतील. या सवयी पुढीलप्रमाणे.

 

 

सकाळी लवकर उठणे   

आता  आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल कि नैराश्य दूर करणे किंवा नैराश्याला प्रतिबंध करण्यासाठी सकाळी उठण्याचा काय संबंध? आहे ना?  पण खूप मोठा संबंध आहे .

येथे लक्षात घेणे गरजेचे आहे कि नैराश्य शिव एक मानसिक स्थिती आहे जिचे परिणाम शारीरिक क्रियांमधून व्यक्त होतात.

शरीर आणि मनाचा खूप घनिष्ट संबंध असतो. शारीरिक क्रिया मनावर परिणाम करतात तर मानसिक क्रिया शरीरावर. मग  नैराश्यामध्ये ज्यावेळी मन आजारी असते त्यावेळी आपण शरीराला योग्य त्या सवयी लावून या विकारावर नियंत्रण तयार करू शकतो. 

आता सकाळी लवकर उठायचे म्हणजे नेमकं केव्हा? असाही प्रश्न आपल्या मनात आला असेल. तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे केव्हाही चांगले. सूर्योदयापूर्वी कमीत कमी अर्धा पाऊण तास अगोदर उठणे हे उत्तम असते.

 

 

व्यायाम 

सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर आपली दैनंदिन कर्मे आटोपल्यानंतर रोज व्यायाम करायला हवा. आता व्यायामामध्ये आपापल्या हिशेबाने आपण काहीही करू शकता.

आपण योगासने करू शकता, वेटलिफ्टिंग करू शकता, काही स्ट्रेटचिंगचे  व्यायाम आहेत ते करू शकता. किंवा धावायला जाऊ शकता. आपण यातील कुठलाही एक किंवा सगळेच व्यायाम प्रकार थोड्या  थोड्या वेळासाठी करू शकता. 

सकाळी धावणे किंवा तेज चालणे हे शरीर आणि मनासाठी अतिशय लाभदायक ठरते. आणि जर धावण्यासाठी आपण वृक्षांच्या सानिध्यातील ठिकाण निवडले तर ते अतिउत्तम.

कारण सकाळची कोवळी ऊन आपल्या शरीरात ड  जीवनसत्व तयार करण्यास मदत तर करतेच सोबतच या उन्हामध्ये झाडांचा प्रकाश संस्लेशनाचा  दर हा सर्वाधीक असतो. त्यामुळे यावेळी आपल्या शरीराला वृक्षांच्या सानिध्यात मुबलक ऑक्सिजन उपलब्ध होते. जे आपल्या अंतर्गत कार्याकरिता फार उपयुक्त असते. 

 

 

  वाचन 

जगातल्या सगळ्याच यशस्वी लोकांमध्ये एक सवय सामायिक असल्याचे पाहायला मिळते. ती सवय म्हणजे वाचन होय. वाचनाचे भरपूर फायदे आहेत.

आपण ज्ञानवर्धन करण्यासोबतच मनोरंजनासाठीही वाचन करू शकतो. शिवाय जगात क्वचितच अशी समस्या असेल जिच्याविषयी कोणी काहीही लिहिलेलं नाही. म्हणून आपल्या समस्यांचे समाधानही आपण वाचनातून मिळवू शकतो. 

 नैराश्यापासून दूर  जाण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या कथा कादंबऱ्या आपल्याला बऱ्याच उपयुक्त ठरतात . या प्रकारची पुस्तके आपल्याला त्यांच्या कथानक मध्ये खिळवून ठेवतात.

त्यावेळी आपल्याला जगाचा आणि आपल्या समस्यांचा विसर पडतो. आणि आपण काही काळासाठी का असेना आपल्या चिंतांपासून दूर जातो. हा अल्पकालीन विराम सुद्धा नैराश्यात फार उपयुक्त ठरतो कारण तो नैराश्याची नित्यता भंग करून त्याचा प्रभाव कमी करत असतो. 

महान लोकांची चरित्रे आणि स्व- सहाय्यता प्रकारात येणारी पुस्तके आपल्याला आपल्या समस्यांशी लढण्यासाठी अनुभव आणि उपाय या दोहोंची देणगी देत असतात.

चरित्रांतून आपल्याला समजते कि वाईट वेळ, समस्या या सगळ्यांच्याच वाटेत  असतात आणि जे लोक त्यांचा सामना करतात तेच लोक महान ठरतात.

आणि या समस्यांचा सामना करण्याचे उपाय आपल्याला स्व-सहाय्यता गटातील पुस्तकांमधून  मिळतात. 

पुढे प्रत्येकाने जीवनात एकदातरी वाचावी अश्या पुस्तकांची काही नावे सुचवीत आहोत… 

 

भगवद्गीता 

थिंक अँड ग्रो रिच ———– नेपोलिअन हिल 

द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग——– डेविड श्वार्ट्झ 

पॉवर ऑफ युअर सुबकॉनशिअस माईंड —– जोसेफ मर्फी 

ट्यूसडेज विथ मोरी ——मित्रच अल्बोन 

सेपिअन्स —– यूअल नोआह होरारी 

द मॉंक  व्हू सोल्ड हिज फरारी —– रॉबिन शर्मा 

मुसाफिर ——– अच्युत गोडबोले 

डेल कार्नेगी यांची  सगळी पुस्तके 

या यादीत आणखी बरीच पुस्तके जोडता येतील. तुम्हाला वाटतात अशी पुस्तके आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आम्ही त्यांना वरील यादीत समाविष्ट करू जेणेकरून सर्वांचाच फायदा होईल. 

 

 

 

छंद    

नैराश्य-दूर-कसे-करावे-?नैराश्य दूर कसे करावे ?
नैराश्य दूर कसे करावे ?

 

प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा छंद असतोच. कुणाला गायला आवडत तर कुणाला नाचायला आवडत तर कुणाला चित्र काढायला आवडतं. छंद माणसाला नैराश्याच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यात खूप मदत करतात.

छंद म्हणून एखादा खेळ खेळणे हे सगळ्यात उपयुक्त  ठरते. मैदानी खेळांमुळे शरीराचा व्यायामही होतो आणि मनाला विरंगुळाही प्राप्त होतो.

मैदानी खेळांमध्ये सांघिक खेळ खेळणे फारच हितावह आहे कारण ते माणसामध्ये सांघिक भावनेचा उदय करून नैराश्यामुळे निर्माण होणाऱ्या एकटेपणाच्या भावनेवर मात करण्यात सहाय्यक ठरतात. 

 

 

सहल 

नकारात्मक विचारांपासून दूर जायला सहलीला जाणे उपयुक्त ठरल्याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतील. बऱ्याच प्रयोगानंतर असे लक्षात आले आहे कि प्रवासात माणसाच्या डोक्यात नवे विचार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.

शिवाय ज्यावेळी आपण काही काळासाठी का असेना बाहेर सहलीला जातो त्यावेळी सभोवतालची परिस्थिती बदलल्याने त्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्यासाठी मानवी मेंदूला ताण पडतो आणि या दरम्यान तो आधीच्या विचारांना बाजूला ठेवून नवीन विचारांना जन्म देतो.  सहलीत येणारे सुखद अनुभव आपल्याला नव्याने सुरुवात करण्यासाठी ऊर्जा देतात. 

 

 

 

मित्र  

नैराश्य-दूर-कसे-करावे-?
नैराश्य दूर कसे करावे ?

 

असं म्हणतात कि ज्याला मित्र एकही मित्र नाही मुळात तो मानव नाही. आपल्या  संगतीचे महत्व वेळोवेळी थोर मोठ्यांनी अधोरेखित केलेले आहे. जगात रक्ताच्या नात्यानंतर  सगळ्यात जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मैत्री.

जीवनात काही मिळवा अथवा नका मिळवू पण दोन तीन निस्वार्थ, खरे मित्र मिळवायलाच  हवेत.  मन मोकळं करण्यासाठी हक्काची जागा म्हणजे मित्र असतात.

आपण  जीवनात  कितीही व्यस्त असाल तरी आपल्या मित्रांसोबत संवाद साधण्यासाठी वेळ काढा. त्यांना भेटून या. त्यांच्यासोबत कुठे बाहेर फिरा. 

खर तर आजच्या जगात आपली दुखरी बाजू दाखवणं हे धाडसाचं काम आहे.तसे केल्यास लोक आपल्याला कमजोर समजतात. पण दुःख आठवू आठवू बोथट केलं कि त्याची धार कमी होते.

कोणासोबत तरी त्यावर चर्चा केली कि आपल्याला त्याचे नव नवे आयाम दिसू लागतात आणि ते पूर्वीप्रमाणे त्रासदायक न ठरता सुसह्य होते. आणि असे दुःख सांगण्यासाठी मित्रांशिवाय दुसरी विश्वासाची आगा नाही. म्हणून मित्रांशी नित्य संवाद साधत राहा. 

 

 

 

 

२)वैद्यकीय उपाय  

 

वैद्यकीय उपचारांमध्ये औषधोपचार आणि  मानसोपचार या दोघांचाही समावेश होतो. औषधोपचारांमध्ये सेरोटोनिन विकर वाढवण्याशी संबंधित उषाधांचा समावेश होतो.

सेरोटोनीन हे विकर मनस्थिती, भूक, झोप आणि उन्मनीयता या साऱ्यांवर नियंत्रण ठेवायचे काम करते. त्याच्या प्रमाणात बिघाड झाल्यास नैराश्याची लक्षणे दिसतात. किंवा नैराश्य आल्यास सेरोटोनीन च्या प्रमाणात बिघाड होतो.

म्हणून डॉक्टर आपल्याला सेरोटोनिन चे प्रमाण संतुलित करणारी औषधे देतात. यांत वेगवेगळे अँटिडिप्रेसंट समाविष्ठ आहेत. 

मानसोपचार मध्ये मानसशास्त्रात तज्ज्ञ व्यक्तीशी बोलून आपण आपल्या समस्यांना समोर जाण्याचे योग्य मार्ग शोधातो. स्टो. या उपचारांना “संवाद उपचार” (talk  therapy) असेही म्हणतात.

कारण यात फक्त परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलल्या जातो. (आपण याला श्री कृष्णाने युद्ध करण्यासाठी अर्जुनाला संवादातून कसे प्रभावित केले त्या प्रसंगाशी जोडून पाहू शकतो. म्हणजे कृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनासाठी मानसोपचार तज्ञाचेही कार्य करीत होता.)

 

 

 

समारोप 

तर मंडळी नैराश्य कसे दूर करावे ? या पोस्ट मधून आपण नैराश्य म्हणजे काय? त्याचे परिणाम काय असतात? नैराश्याचे लक्षण कोणते आहेत? नैराश्य येण्याची करणे कोणती आहेत ? आणि  नैराश्य दूर करण्याचे उपाय कोणते? या साऱ्यांविषयी माहिती घेतलीत.

मित्रांनो नैराश्य दूर कसे करावे ? हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट शी संबंधित तुमची प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि काही सुधारणा असतील तर त्या नक्कीच सुचवा आम्ही त्या तातळीने  अमलात आणू. धन्यवाद !  

4 thoughts on “नैराश्य दूर कसे करावे ? नैराश्याचे प्रकार आणि उपाय.”

 1. गेले काही वर्षे मला अशीच लक्षणे जाणवत होती आत्ताही जाणवत आहेत. मात्र नक्की होते काय हे समजत न्हवते. पण आज हा लेख वाचून माझे मन खूप हलके झाले. मी नैराश्यात आहे आणि त्यामुळे असे सर्व होत आहे. याची जाणीव झाली. आता यावर योग्य उपचार करून मी माझे आयुष्य पुन्हा नव्याने नव्या उमेदीने जगू शकतो ही खात्री मनात निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत जे काही झाले ते सर्व माझा आयुष्यातील वाईट वेळेचा भाग होता असे समजून मे इथून पुढील आयुष्य सकारात्मकतेने घडवेन. एक युवक म्हणून युवा पिढी साठी काहीतरी चांगले कार्य करेन. तसेच मे आत्तापर्यंत नैराश्यातून जे काही अनुभवले या वाईट काळात माझी अवस्था काय होती आणि यातून बाहेर पडण्यासाठी मी काय केले व इतरांनी अशा वाईट काळात काय करावे स्वतःचे मनोबल कसे वाढवावे. याविषयी जास्तीत जास्त लोकांना मार्गदर्शन करेन. मी आपला खूप खूप आभारी आहे. या लेखामुळे काही क्षणातच माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे.

  नाव – विशाल सुनिल बेंद्रे.
  गाव – मेढा , तालुका – जावली , जिल्हा – सातारा.

  Reply
 2. गेले काही महिने मला अशी लक्षणे आहेत पण लेख वाचुन‌ मन‌ हलकं झालं मी ठरवलं की मी आता नैराश्य तुन‌ निघुन‌ चांगले‌ जिवन‌ जगण्याचा प्रयत्न करीन लेख वाचुन मला कळलं ‌

  Reply

Leave a Comment