शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? । How to invest in share market

जय महाराष्ट्र मंडळी.आता काही दिवसांपूर्वीच शेअर मार्केट मधील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर सोशल मीडिया वर त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक प्रसंगरूपी कथा वायरल झाल्या. 

या कथांमध्ये त्यांच्या मुलाखती आणि वयक्तिक जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टी होत्या. त्यात त्यांची स्लीपर आणि चुरगळलेल्या शर्टमध्ये प्रधानमंत्री मोदी यांची घेतलेली भेट तर विशेष गाजली. या साऱ्यात  त्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक मला खूप महत्वाची गोष्ट वाटली.

अगदी पाच हजार रुपयांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यांनी हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलेलं जेव्हा मी वाचलं तेव्हा मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ? या प्रश्नाकडे वळलो. मग या विषयाला धरून मी बरीच शोधाशोध केली. वाचन सुरु केलं. बरेच ब्लॉग्स वाचले आणि मिळेल ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांना मला जी काही माहिती मिळाली ती आज शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? । how to invest in share market  या पोस्ट मध्ये आपणापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मंडळी जाणून घेऊयात की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

 

 

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? । how to invest in share market

 

मंडळी शेअर मार्केटमद्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घ्या अगोदर आपण थोडक्यात शेअर मार्केट या क्षेत्राविषयी माहिती घेऊयात. शेअर मार्केट म्हणजे काय? इथे नेमके व्यवहार काय होतात? हे मार्केट काम कस करते?शेअर मार्केट चा उगम कसा झाला ? इत्यादी अनेक प्रश्न आपल्या मनात असतील.

तुमच्या मनातील या साऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही एक वेगळी पोस्ट शेअर मार्केट म्हणजे काय? शेरात मार्केटबद्दल सर्व काही या शीर्षकाखाली बनवणार आहोच. पण तत्पूर्वी येथे आपण अगदी थोडक्यात शेअर मार्केट बद्दल माहिती घेऊयात.

 

 

 

शेअर मार्केट म्हणजे काय?

 

मंडळी अर्थशास्त्रात कुठल्याही उत्पादनाचे घटक हे प्रमुख चार विभागात विभाजित केले जातात. श्रम, भूमी, उद्योजकता आणि भांडवल. श्रम, भूमी, आणि उद्योजकता या गोष्टी थोड्या मेहनतीने प्राप्त होऊन जातात. पण ज्यावेळी मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचे असते तेव्हा भांडवल निर्मिती हा एक यक्ष प्रश्न बनून उभा राहतो.

उद्योगांना स्वतःच्या विस्तारासाठी जी भांडवलाची गरज निर्माण होते ती गरज भागवण्याचे साधन म्हणजे शेअर मार्केट होय. मुळात शेअर मार्केटचा प्रमुख उद्देश्यच भांडवलाची पूर्तता करणे हा आहे.

मग या उद्योगांसाठी हे भांडवल असच फुकटात उभं राहत का? नाही. त्यासाठी उद्योजक आपल्या कंपनीतील काही हक्क किंवा आश्वासने लोकांना देतात. आणि त्याबदल्यात ते उद्योगासाठी लागणारा पैसा उभारतात. या प्रकारे उद्योगांना पैसे पुरविणारे ठिकाण म्हणजे शेअर मार्केट असे आपण म्हणू शकतो.

शेअर मार्केटचे व्यवहार समजून घेण्यासाठी आपण पुढील उदाहरण लक्षात घेऊ शकतो. समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून एखादा व्यवसाय सुरु करत आहात. त्या व्यवसायामध्ये तुम्ही पाच मित्र आहात असे गृहीत धरू. आता तुम्ही पाचहीजण मिळून व्यवसायासाठी लागणारा पैसा उभारता.

मात्र प्रत्येकजण सारखाच पैसा देऊ शकेल असे नाही. एखाद्याची सोय नसते. तर त्यालाही सोबत घेऊन चालता यावं म्हणून आपण त्याला थोडी सूट देणार. इथे जर या कमी पैसे देणाऱ्या मित्राला आपण व्यवसायाच्या नफ्यात सारखाच हिस्सा दिला तर तो जास्त पैसे लावणाऱ्या मित्रासाठी अन्याय होईल.

म्हणून मग आपण नियम बनवतो कि जेवढी गुंतवणूक प्रमाणात नफा. म्हणजे आता जास्त पैसे लावणारा जास्त नफा घेईल. तर कमी लावणाऱ्याला कमी नफा मिळेल. शेअर मार्केट मध्येही असच घडत. ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतो त्यावेळी आपण त्या कंपनीच्या मालकीत भागीदार झालेलो असतो.

आता समजा तुमचा व्यवसाय सुरळीत चालला नाही. त्यात तोटा आला. यावेळी मात्र नुकसान साऱ्यांचेच होईल; पण तेही गुंतवणुकीच्या प्रमाणातच. ज्याची गुंतवणूक जास्त त्याला नुकसानसुद्धा जास्त होईल.

शेअर मार्केट मध्ये हेच होत असते. कंपनी आपल्या भांडवलनिर्मितीसाठी सुरुवातीला शेअर म्हणजे भागीदारी विकते. तिला IPO ( Initial Public Offerings ) असे म्हणतात. एकदा कंपनी शेअर मार्केट मध्ये उतरली आणि तिचे ipo ची विक्री झाली की  तिच्या शेअर्स ची किंमत ही  मागणी पुरवठ्याच्या तत्वाने ठरते.

समजा सद्या पेट्रोल ची टंचाई निर्माण झाली तर यावेळी इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी सहजच वाढेल. मग अश्या गाड्या बनवणाऱ्या कंपनीचा नफाही वाढेल. हा नफा लोकांना त्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी उद्युक्त करेल. परिणामी शेअर्स ची मागणी वाढेल व लोक ते शेअर्स चालू किमतीपेक्षा जास्त ने विकत घ्यायला तयार होतील.

याच्याच उलट जेव्हा मागणी कमी होईल तेव्हा ज्यांच्याकडे शेअर्स आहेत ते कमी किंमतीलाही शेअर्स विकायला तयार होतील. परिणामी शेअर्सची किंमत आणखी कमी होईल.

हे झाले शेअर मार्केट बद्दल थोडक्यात आता आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी या आपल्या मूळ प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना पुढील बाबी ध्यानात घेणे फार गरजेचे आहे.

 

 

 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार 

 

मंडळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी हे पाहण्याअगोदर आपण अगदी थोडक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार पाहुयात. ढोबळमानाने शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारांनी आपण गुंतवणूक करू शकतो.हे दोन प्रकार म्हणजे डायरेक्ट   इन्व्हेस्टमेंट आणि इंडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट.

डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण स्वतः सगळे व्यवहार पाहत असतो. कंपनीची माहिती, तिच्या विकासाचा दर, शेअर ची सद्यस्थिती, शेअर वधारणे किंवा कमी होतील याची माहिती व अंदाज, शेअर ची निवड अश्या कितीतरी गोष्टी या पद्धती मध्ये आपण स्वतः करीत असतो. इंट्राडे ट्रेडिंग करणारे लोक यामध्ये येतात.

दुसरी पद्धत म्हणजे इंडाइरेक्ट इन्व्हेस्टमेंट. या प्रकारात तुम्हाला कुठल्याही गोष्टीच टेन्शन घेण्याची गरज नसते. आपल्याला फक्त पैसे पुरवायचे असतात. बाकी साऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. फक्त आपल्याला त्यांना प्रत्येक व्यवहारावर काही रक्कम द्यावी लागते.

वरील प्रकार हे मध्यस्थ नुसार ठरवले गेले होते. आपल्या व्यवहाराच्या वेळेनुसारही शेअर मार्केटमधले व्यवहार किंवा गुंतवणूक दोन प्रकारांत विभागता येते. पहिला प्रकार म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये खरेदी -विक्रीचा संपूर्ण व्यवहार एकाच दिवशी केला जातो.

तर यातला दुसरा प्रकार म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंग. डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये शेअर होल्डर आपले शेअर्स काही विशिष्ट कालावधीसाठी धरून ठेवतो. आणि ज्यावेळी त्यांना चांगली किंमत मिळू लागते त्यावेळी तो ते विकतो. यातल्या पहिल्या व्यवहारासाठी म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग साठी आपल्याला आपले डिमॅट अकॉउंट असणाऱ्या कंपनीला काही फी द्यावी लागते.

 

 

 

शेअर मार्केटमधे गुंतवणूक कशी करावी?

 

मंडळी आतापर्यंत आपण शेअर मार्केट, त्यातले व्यवहार, गुंतवणुकीच्या पद्धती इत्यादीबाबत थोडक्यात माहिती घेतली. आता आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी त्याबाबत थोडी सखोल चर्चा करणार आहोत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.

 

 

 

डिमॅट अकाउंट – शेअर मार्केटचा प्रवेशद्वार 

 

डिमॅट अकाउंट म्हणजेच शेअर मार्केटसाठी एक प्रकारे प्रवेशद्वारच होय. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते. शेअर मार्केटमधील सगळे खरेदी -विक्रीचे व्यवहार हे डिमॅट अकाऊंटच्या माध्यमातूनच होतात.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी पूर्वी फार खटाटोप करावा लागायचा. आता मात्र सगळं ऑनलाईन झालं असल्या कारणाने तुम्ही अगदी दहा -पंधरा मिनिटांत तुमचे डिमॅट अकाउंट तयार करू शकता. आज झेरोधा, शेअर खान, एन्जल ब्रोकिंग, ग्रो यांसारख्या कंपन्याच्या माध्यमातून आपण डिमॅट अकाउंट तयार करू शकतो.

डिमॅट अकाउंट उघडून देणाऱ्या या कंपन्या काही विशिष्ठ रक्कम आपल्या प्रत्येक व्यवहारावर ब्रोकरेज म्हणून आकारत असतात.तेव्हा यांचा ब्रोकरेज रेट पाहूनच आपण त्या कंपनीमध्ये डिमॅट अकाउंट उघडावे. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.

 • आधारकार्ड
 • पॅन कार्ड
 • बँक अकाउंट

वरील महत्वाची कागदपत्रांसोबतच कंपनीच्या नियमानुसार इतरही काही कागदपत्रे मागवली जाऊ शकतात.

 

 

 

बाजाराची ओळख असुद्या 

 

शेअर मार्केटमध्ये आपले भविष्य घडवायचे असेल तर बाजाराची चांगली ओळख असणे फार महत्वाचे आहे. बाजारात मागणी -पुरवठा कसे काम करतात? वस्तूंच्या किमती केव्हा वाढतात? या किंमती केव्हा कमी होतात? चलनवाढ, मंदी इत्यादींचा बाजारावरील परिणाम काय असतो? अशी बारीकसारीक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते.

बरेचजण शेअर मार्केटला पैसे कमावण्याचा शॉर्टकट मार्ग समजतात. इतरांच्या झटपट श्रीमंत होण्याच्या भाकडकथा ऐकून स्वतःचे नुकसान करून बसतात. आणि अश्या लोकांमुळे मग या शेअर मार्केटकडे पाहण्याचा इतर लोकांचाही दृष्टीकोन बदलतो. आपल्याला शेअर मार्केट म्हणजे जुगार वाटू लागतो.

पण मुळात वस्तुस्थिती वेगळी आहे. जर योग्य अभ्यास असेल तर आपण शेअर मार्केट मधून कमी वेळातही बऱ्यापैकी कमाई करू शकतो.मात्र येथे अभ्यासाची अट लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही बातम्या, फायनान्स शी संबंधित नियतकालिके, सरकारची धोरणे इत्यादी बाबींकडे लक्ष ठेवू शकता.

 

 

 

संयम हेच मुख्य सूत्र  

 

मंडळी बरेचजण झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शेअर मार्केट मध्ये घाईगडबडीने गुंतवणूक करतात.मंडळी जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात जेवढे महत्व संयम पाळण्याला आहे तेवढे खचितच दुसऱ्या कोणत्याही गुणाला असेल. शेअर मार्केटमध्येही संयमी वृत्तीला फार महत्व आहे.

शेअर्स बद्दल कुठलाही निर्णय घेतांना त्याबद्द्दल चारही बाजूंनी विचार करूनच घ्यावा. म्हणजे एखादा शेअर विकत घेत आहोत तेव्हा त्याची आजपर्यंतची सर्वाधिक किंमत किती होती? मग त्या किमतीला तो सहारे किती कालावधीसाठी होता? हि किंमत खऱ्या मागणी पुरवठ्यावर आधारित होती कि काही तात्कालिक कारणे त्यामागे होती?

याप्रकारची माहिती आपल्याला भविष्यात येणाऱ्या जोखमीपासून वाचवते. म्हणून शेअर मार्केटमध्ये उतावीळपणा न करता संयमाने गुंतवणूक करावी लागते.

 

Also Read

 

 

लंबी रेस का घोडा बनिये 

 

मंडळी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना त्याला तात्काळ उत्पन्नाचे साधन न बनवता भविष्याची सुरक्षिततेची एक सोय म्हणून शेअर मार्केट मधील गुंतवणुकीकडे पहिले तर ते जास्त सोयीस्कर ठरेल. म्हणजे जर तुम्ही भविष्यातील १०-१५ वर्षांच्या हिशेबाने आज गुंतवणूक केलीत तर ती जास्त फायद्याची ठरेल.

हे समजून घेण्यासाठी आपण पुढील आलेख पाहू शकतो.

market-trend-nifty50

वर दिलेला आलेख हा भारतातील महत्वाच्या ५० कंपनीच्या २०१० ते २०२० या दहा वर्षतिल कामगिरीचा आलेख आहे. आता जर आपण कोणत्याही सलग दोन वर्षांचा कालखंड लक्षात घेतला तर आपल्यला जाणवेल की या कालखंडात बरेच चढ-उतार आहेत. या कालखंडांमध्ये नफा -तोटा होण्याचे प्रमाण थोडेबहुत सारखेच आहे.

पण जर आपण पूर्ण १० वर्षांचा कालावधी पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि या लांब पल्ल्याच्या व्यवहारात आपल्याला फायदाच झाला असता. कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची जोखीम या व्यवहारात आढळत नाही. शिवाय १२०-१४० टक्के पर्यंत रिटर्न्स फक्त सहारे मार्केटमध्येच मिळू शकले असते.

 

 

 

तुमची निवड – तुमचे भविष्य ठरवते 

 

मंडळी जीवनाचे कुठलेही क्षेत्र असूद्या, तुमची निवडच तुमचे भविष्य ठरवते. आज व्यायाम न करण्याची केलेली निवड भविष्यात आजारी जीवन प्रदान करते. आज अभ्यास न करण्याची केलेली निवड उद्या तुमचे भविष्य नक्कीच अज्ञानात घेऊन जाते. शेअर मार्केट्मध्येही तसेच आहे.

तुम्ही शेअर कसे निवडता यावर तुमच्या शेअर मार्केटमधील पुढील वाटचालीची दिशा ठरते. योग्य शेअर निवडता येणे ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी फार महत्वाची बाब आहे. शेअर निवडण्याअगोदर कंपनीची पूर्ण माहिती आणि भविष्यातील शक्याशक्यता या साऱ्यांचा विचार करणे गरजेचे आहे.

सोबतच नेहमी लक्षात असुद्या कि एकाच ठिकाणी जर एखादी गोष्ट जास्त प्रमाणात साठवली तर ती खराब होते हा निसर्गाचा नियमच आहे. त्याच प्रमाणे शेअर मार्केट मधील आपली गुंतवणूक कधीच एकाच कंपनीमध्ये पूर्णतः करू नका. आपल्या शेअर्सला थोडे विकेंद्रित असुद्या.

जर तुम्ही १००० रुपये गुंतवत असाल तर ते एकाच ठिकाणी न गुंतवता १० वेवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवा. रक्कम जेवढी वाढवाल त्याच प्रमाणात शेअर्सचे विभक्तीकरण असुद्या. त्यामुळे तुमची जोखीम कमी होईल. एक कंपनी जर नुकसानीत जात असेल तर त्याच वेळी दुसरी कंपनी तुमचे नुकसान भरून काढण्यात मदत करेल.

 

 

 

थिंक बिग बट स्टार्ट स्मॉल  

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना आपल्याला जर जोखीम आणखी कमी करायची असेल तर ध्येय मोठे ठेवून सुरुवात मात्र अगदी लहान गुंतवणुकीपासून करायला हवी. बरेच जण अगदी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करून जास्त लवकर पैसे कमावण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेतात.

मुळात सुरुवातीच्या काळात आपण अगदी छोटीशी गुंतवणूक करून तिची पडताळणी करीत राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपले ज्ञान या क्षेत्रात कुठपर्यंत आहे याची जाणीव होते. आपण निर्णय घेतांना कुठे चुकलो याची शहानिशा करीत असतांना मग आपल्या निर्णयांत परिपक्वता येते.

म्हणून सुरुवातीला थोडी गुंतवणूक करावी. त्या गुंतवणुकीवर आपण शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करून वेगवेगळे प्रयोग करून पाहावे. त्यातून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य अशी पद्धत विकसित करता येईल. काही काळ अश्याप्रकारे अनुभव मिळवल्यानंतरच पुढे गुंतवणूक वाढवावी.

 

 

 

समारोप  

 

मंडळी आज आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ? या पोस्ट मध्ये शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मध्ये व्यवहार कसे चालतात? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? इत्यादी प्रश्नांची थोडक्यात चर्चा केली. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ते सुद्धा पहिले.

मंडळी मुळात मी शेअर मार्केट या क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. त्यामुळे या विषयावर तुम्हाला ज्ञानाचे बाळकडू पाजण्याचा  मला काही अधिकार आहे असेही मला वाटत नाही. पण जेव्हा एखादी नवी गोष्ट मी शिकत असतो त्यावेळी ती इतरांना समजवून सांगता आली पाहिजे हा माझा प्रयत्न असतो.

माझ्या या प्रयत्नात आजच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ? या पोस्ट मध्ये मी यशस्वी झालो का ते तुम्ही मला सांगायचे आहे. सोबतच काही गोष्टींचा योग्य अर्थ लावण्यात मी जर कुठे चुकलो असेल तर त्याबाबतही मला तुम्ही मार्गदर्शन करावे ही विनंती.

धन्यवाद!

4 thoughts on “शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? । How to invest in share market”

 1. योग्य माहीती दिली …सर आपले खुप खुप आभार…

  Reply
 2. सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली आहे.
  खुप साऱ्या प्रश्नांची उत्तरे भेटली मला

  Reply

Leave a Comment