ययाती कादंबरी वाचायची आहे ?। Yayati Novel Pdf download

ययाती  कादंबरी वाचायची आहे ?

 

मित्रांनो काय तुम्हाला ययाती कादंबरी वाचायची आहे? जर तुमचं उत्तर होकारार्थी असेल तर आजची हि पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे. आज ययाती कादंबरी डाउनलोड करण्यासाठीची लिंक आम्ही ययाती कादंबरी वाचायची आहे  या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पण त्यापूर्वी आपण ययाती कादंबरी विषयी  थोडे जाणून घेऊयात. 

ययाती कादंबरी ही  मराठी साहित्याला लाभलेले  एक अनमोल रत्न आहे.  मराठी साहित्य जगतातले महारथी वि.स.खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ययाती कादंबरी अवतरली आहे. १९५९ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती निघाली. तेव्हापासून आजपर्यंत कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. सोबतच कन्नड,मलयाळम यासारख्या भारतीय भाषांबरोबरच विविध परदेशी भाषांमध्येही ययाती कादंबरी चे भाषांतर झालेले आहे. 

ययाती कादंबरी ही  बरीच गौरवान्वित झालेली कादंबरी आहे. या कादंबरीला १९६० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९७४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरीनेच मिळवला होता. शिवाय १९६०चा राज्यशासनाच्या पुरस्कारही ययाती कादंबरी साठी वि.स.खांडेकर यांना देण्यात आला होता. 

ययाती कादंबरी ही  पौराणिक कादंबरी आहे. याचा अर्थ असा नव्हे कि पुराणकाळाप्रमाणे या कादंबरीचा आपल्या जीवनाशी काही एक संबंध  नाही. संदर्भ जरी पुराणकाळाचा असला तरी ययाती कादंबरी आजच्या भौतिकवादाने भारावलेल्या मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करते. 

ययाती कादंबरी वाचायची आहे  या पोस्ट मध्ये आता आपण ययाती कादंबरी वि. स.खांडेकर यांना ज्या मूळ पुराण कथेवरून सुचली ती कथा पाहणार आहोत. 

 

 

 

ययाती कादंबरी -पार्श्वभूमी- पुराण काय म्हणतं ?  

 

महाभारतातील आदिपर्वात ययातोपाख्यान म्हणून एक उपाख्यान आहे. या उपाख्यानातील ययाती राजाच्या जीवनकथेवर ययाती कादंबरी आधारलेली आहे. मूळ कथानकाला उपलब्ध इतर साहित्यांच्या निष्कर्षांची जोड देऊन वि.स.खांडेकर यांनी ययातीची नवनिर्मिती साधली आहे. 

मूळ उपाख्यानामध्ये महाराज ययाती हे हस्तिनापूरचे युवराज आहेत. त्यांचे वडील महाराज नहूश  यांना ऋषींनी श्राप  दिला आहे. नहूश महाराज कित्येक वर्षे साप बनून जगतात. त्यांची पुन्हा भेट आपल्याला महाभारताच्या काळात होते जेव्हा ते युधिष्ठिराला भेटतात तेव्हा. 

नहूश महाराजांनंतर ययाती हस्तिनापूरचा राजा बनतो. त्याचा विवाह दैत्यांचे गुरु, पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या देवयानी हिच्याशी होतो. आणि येथेच देवयानी सोबत शर्मिष्ठेचे आगमन होते. शर्मिष्ठा हि दैत्यराज वृषपर्वा यांची कन्या असते. 

राजाची कन्या जरी असली तरी वडिलांच्या शब्दासाठी शर्मिष्ठा देवयानी ची दासी म्हणून जाते. आणि तेथे गेल्यानंतर ती ययाती महाराजांकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना करते. महाराजही तिच्या सौंदर्याला बघून वाहावत जातात. 

बरीच वर्षे निघून जातात पण देवयानीला या दरम्यान ययाती आणि शर्मिष्ठा यांच्या नात्याविषयी काहीही भनक नसते. याच काळात देवयानीला दोन तर शर्मिष्ठाला तीन मुले होतात. 

आता जेव्हा देवयानीला कळते कि शर्मिष्ठेला तीन पुत्रांची प्राप्ती हि महाराज ययातीपासूनच झालेली आहे. तेव्हा ती ययातीची तक्रार तिच्या वडिलांकडे करते कि ‘शर्मिष्ठेला तीन आणि मला दोनच मुले झालीत. याचा अर्थ महाराजांचे माझ्यापेक्षा जास्त शर्मिष्ठेवर प्रेम आहे.’

मुलीचे दुःख पाहून शुक्राचार्य चिडतात व ययातीला वृद्धत्वाचा शाप देतात.पण नंतर ययाती त्यांची क्षमा मागतो तर ते त्या शापावर उ:शाप देतात कि ययाती त्याचे वार्धक्य त्याच्या कोणत्याही मुलाच्या तारुण्यासोबत अदलाबदली करू शकेल. 

तेव्हा ययाती महाराज आपल्या पाचही पुत्रांना बोलावतात आणि या अदलाबदली विषयी विचारतात. तर पाचपैकी सर्वात लहान असणारा पुरुच फक्त या अदलाबदालीला तयार होतो. ययाती महाराज वयाची हि अदलाबदली करून संपूर्ण साम्राज्याचा धनी म्हणून पुरुची निवड करतात. 

मूळ पुराणानुसार ययाती हजारो वर्ष यौवन उपभोगतो. मात्र नंतर त्याला या सुखोपभोगाचा वीट येतो. शेवटी पुरुला त्याचे यौवन परत करून ययाती वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करतो.   

तर मित्रांनो अशी होती पुराणातील ययातिची मूळ कथा. आता आपण ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्टमध्ये ययाती कादंबरी मधील विविध पात्रांचा परिचय करून घेऊयात.

 

ययाती कांदबरी PDF File 

Download 

 

 

 

ययाती कादंबरी – पात्र परिचय 

 

वि.स. खांडेकरांनी आपली लेखणीच्या जादूने ययातीच्या कथेचा पार चेहरा- मोहराच बदलून टाकला आहे. ययाती कादंबरी मध्ये आपल्याला वेगवेगळे पात्र पाहायला मिळतात. त्यापैकी काही मूळ कथेतून घेतले आहेत. तर काही पात्रांची निर्मिती ही  वि.स. खांडेकरांच्या सर्जनशीलतेची उत्तम उदाहरण आहे. ययाती कादंबरीतील पात्रांचा परिचय आपण अगोदर करून घेऊयात. 

नहुष महाराज  – हस्तिनापुराचे सम्राट. ययातीचे वडील. त्यांनी इंद्राचाही पराभव केला होता.

अशोकसुंदरी  –   ययातीची आई. 

यती            – ययातीचा मोठा भाऊ. पळून जाऊन एक संन्याशाचं जीवन जगतो. 

ययाती        – कादंबरीचा नायक. हस्तिनापूरचा युवराज आणि नंतर सम्राट. 

देवयानी     –  असुर पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या. ययातिची पत्नी. 

शुक्राचार्य   – असुरांचे पुरोहित. विविध विद्यांनी युक्त असे ऋषी. 

वृषपर्वा     –  असुरांचा राजा. 

शर्मिष्ठा     – असुर राजा वृषपर्वा याची कन्या. देवयानीच्या बालपणाची मैत्रीण. नंतरच्या काळात

                     देवयानीची दासी. 

अंगिरस –   एक महान ऋषी. त्यांच्या आशीर्वादानेच यती आणि ययाती दोघेही झाले. 

कच     – अंगिरस ऋषींचा शिष्य. सोबतच शुक्राचार्यांचाही शिष्य. देवयानीच पाहिलं प्रेम. ययातिचा मित्र. 

माधव    – ययातीचा सारथी आणि मित्र. 

कलिका – ययातीच्या बालपणी स्वतःचे दूध पाजणारी. अशोकसुंदरीच्या मर्जीतली दासी. 

अलका  –  कलिकेची  मुलगी. ययातिची बालपणीची मैत्रीण. तसेच काही काळ दासी. 

मुकुलिका – एक दासी. 

यदु         – ययाती आणि  देवयानी यांचा पुत्र. 

पुरु        – शर्मिष्ठा आणि ययाती यांचा पुत्र. ययातीसोबत वयाची अदलाबद्ल करायला तयार होणारा. 

मंदार –   एक साधू म्हणून वावरणारा धूर्त माणूस. 

 

 

 

ययाती कादंबरी – रचना 

 

ययाती कादंबरी ही  चार भागांत विभाजित केली गेली आहे. ययातीच्या जीवनातील चार वेगवेगळ्या अवस्थांशी आपण त्यांची सांगड घालू शकतो. या चार भांगांमध्ये ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा यांची निवेदने येतात, प्रत्येक भागात ही पात्रे आपल्याशी बोलतात. त्यांची बाजू मांडतात. त्यांचं दुःख किती मोठं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 

प्रत्येक भागात ययातीच्या जीवनाचा विशिष्ठ काल वर्णन केला गेला आहे. या प्रत्येक भागाची आपण थोडक्यात माहिती पाहुयात. 

 

भाग एक – 

 

या संपूर्ण भागात एकटा ययातिच आपल्याशी बोलतो. या भागात ययातीचे बालपण आहे. त्याचा तारुण्यातील प्रवेश आहे.ययातीने केलेल्या अश्वमेघ यज्ञाचे वर्णन याच भागात आहे. याच भागात ययाती आणि यती यांची रानात भेट होते. अंगिरस ऋषींच्या आश्रमात येथेच त्याला एक जिवाभावाचा मित्र म्हणून कच लाभतो.याच भागात केसांत सोनेरी रंगाची छटा असणारी अलका ययातीच्या आयुष्यात येते आणि निघूनही जाते. याच भगत नहुष  महाराजांचा मृत्यू आणि मुकुलिका प्रकरणही आहे. 

 

 

भाग दोन– 

 

दुसरा भाग आपल्याला अगोदर थेट घेऊन जातो ते असुर राजा वृषपर्वा याच्या राज्यात. या भागात आपल्याला  देवयानी आणि कच यांचं नातं बघायला मिळतं.देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यातील स्पर्धा पहायला मिळते. ययाती आणि देवयानीची भेट आणि त्यांचा विवाह पाहायला मिळतो.  ययाती आणि शर्मिष्ठा यांचं नातं तयार होण्यापासून ते देवयानीला सगळं कळण्यापर्यंत याच भागात आहे. याच भागात शर्मिष्ठा देवयानीच्या तावडीतून सुटून पुरुला घेऊन हस्तिनापुरापासून दूर जान्यात यशस्वी होते. 

 

 

भाग तीन

या भागात हस्तिनापुरातून निघाल्यावर शर्मिष्ठा आणि पुरुचे जीवन कसे चालते? त्यांना यती कसा मदत करतो? याचे वर्णन आहे. जवळ जवळ अठरा वर्षांचा काळ या भागात थोडक्यात सांगितला आहे. 

 

 

भाग चार

 

या भागात दस्युन्चा उठाव आहे. हा उठाव शमवण्यासाठी यदु जातो. मात्र तिथे त्याला हार खावी लागते. त्याला बंदी बनवल्या जातं . त्याचवेळी पुरु आपल्या काही निवडक मित्रांसोबत येऊन यदु ची सुटका करून घेऊन येतो. या भागात गत अठरा वर्षात ययातीने केलेल्या सर्व पापांचा लेखाजोखा आहे. यातच शेवटी उपभोगी वृत्तीचा वीट येऊन ययाती आपल्या दोन्ही पत्नींसोबत वानप्रस्थ होताना बघायला मिळतो. 

 

 

मित्रांनो ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आताच आपण ययाती कादंबरी कशी रचलेली आहे ते पाहिले. या कादंबरीच्या प्रत्येक भागात काय आहे याचीसुद्धा अगदी थोडक्यात चर्चा केली. आता आपल्या ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीचा मूळ कथापट कसा आहे ते पुढे पाहू.

 

Also Read 

 

 

 

 ययाती कादंबरी -कथापट 

 

पुराणातील कथेप्रमाणेच हि कथा हस्तिनापूरच्या राज्याच्या आजू बाजू फिरते. कथा सुरु होते ती ययातीच्या राजपुत्र असण्याच्या अवस्थेपासून. लहानपणापासूनच. या कथेत नहूश महाराजांना श्राप आहे कि त्यांच्या कुळातील कोणताही पुरुष कधीच सुखी राहू शकणार नाही. 

नहुष  महाराज आणि देवी अशोकसुंदरी याना कोणतेही अपत्य नव्हते म्हणून ते अंगिरस ऋषींकडे जातात. अंगिरस ऋषींच्या आशीर्वादाने त्यांना दोन पुत्र प्राप्त होतात. त्यातला मोठा म्हणजे यती.यतीला बालपणापासूनच ऋषीमुनी आणि वैराग्याची ओढ असते. आणि या ओढीसाठीच तो एक दिवस घरातून पळून जातो आणि सन्यस्त जीवन सुरु करतो. 

यती निघून गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी ययातिचा जन्म होतो. मात्र ययातीसुद्धा आपल्या भावाच्या मार्गाने जाऊ नये यासाठी त्याला उपभोगांत रमण्याजोगे वातावरण तयार केले जाते. ययाती आपल्या पूर्वजांप्रमाणे पराक्रमी आहे. तो राज्यातील एका उत्सवात भाग घेतो. या उत्सवात तो घोड्यावरून पडतो. काही दिवस बेशुद्ध  राहतो. 

बेशुद्धावस्थेत त्याची सेवा करायला येते ती अलका. अलका हि कलिकेची  मुलगी आहे. कलिका  ती दासी आहे जिने ययातीला स्वतःचे दूध पाजले आहे. पाहायला जाता  ती त्याची दूधभगिनी. पण त्याच्या पुरुषसुलभ मनाला तिच्या सौन्दर्याची भुरळ पडते. 

आपण जात आहोत तो मार्ग चुकीचा आहे असे त्याची सद्विवेकबुद्धी त्याला समजावून सांगते. मात्र विवेकावर भावनेचा विजय होतो आणि एका प्रसंगी नकळत ययाती अलकेचे चुंबन घेतो.मात्र त्यानंतर त्यापुढे गोष्ट जात नाही. प्रकृती बरी झाल्यानंतर ययाती अश्वमेघ यज्ञासाठी बाहेर पडतो. 

अश्वमेघ यज्ञासाठी बाहेर असतांनाच एक अरण्यात त्याची भेट त्याच्या मोठ्या भावाशी म्हणजेच यतीशी होते. तो तेथे त्याला परत चलण्यासाठी विनवतो पण यती ऐकत नाही.त्यानंतर ययाती अंगिरस ऋषींच्या आश्रमात जातो. तेथे त्याची भेट होते कच या पात्रासोबत.

कच हा ध्येय्याने भरलेला, मानवतावादी दृष्टिकोनाचा, खरी सौन्दर्यदृष्टी लाभलेला एक ऋषिकुमार आहे. त्या आश्रमात ययाती आणि कच  यांची छान मैत्री जमते.कच  ययातीला नेहमी उपभोगापेक्षा आपले जीवन इतरांना उपयुक्त होईल असे वागण्यातच कशी भलाई आणि खरे सुख आहे हे सांगत असतो. 

इकडे मध्येच नहुष  महाराजांची तब्येत बिघडल्याने ययाती अंगिरस ऋषींच्या आश्रमातून परत येतो. वडिलांची स्थिती आणि मृत्यूचे भय यांनी घाबरलेला ययाती या वेळी मुकुलिका नामक दासीचा दास होतो. मात्र तो येथे लगेच स्वतःला सावरतो. पुन्हा तो मुकुलिकेच्या वाटेने जात नाही. 

अश्वमेघ यज्ञावरून परत आल्यावर ययाती पुन्हा आपल्या भावाला परत आणायच्या हेतूने प्रवासावर निघतो. मात्र यावेळी  त्याची भेट होत नाही. तो गुहा सोडून केव्हाच  निघून गेलेला असतो. मात्र परतत असतांना वाटेत त्याला अलका मिळते. 

ययाती अश्वमेघ यज्ञात व्यस्त असतांना अलकाचे लग्न एका शेतकऱ्यांसोबत झालेले असते. त्याला जुगाराचा मोठा नाद असतो. तो जुगारात अलकाला हरतो. तेव्हा अलका तेथून आपला जीव वाचवून कशीतरी बाहेर पडते आणि लपत छपत पळत असतांना तिची भेट ययाती सोबत होते. यावेळी ययाती तिला बहिणीचा दर्जा देऊन सोबत राज्यात घेऊन येतो. 

मात्र मंदार नावाचा अमात्यांचा प्रतिनिधी महाराणीच्या कान  भरतो आणि महाराणी अलकाला कैद करून विष देऊन मारून टाकण्याचा आदेश देते. आणि त्यांच्या आदेशाची अम्मलबजावणीसुद्धा तंतोतंत केली जाते.          

 दरम्यानच्या काळात देव आणि असुरांच्या युद्धात असुर वरचढ ठरत असतात कारण शुक्राचार्यांनी मिळालेली संजीवनी विद्या असते. मग देवांसाठी हि विद्या मिळवायची जबाबदारी कच स्वीकारतो. तो शुक्राचार्या कडे गेला असता तेथे देवयानीला त्याच्यावर प्रेम होते. कचही तिच्या प्रेमात पडतो. मात्र त्याचे प्रेम हे वासनेचा कुठलाही लवलेश नसणारे निरपेक्ष प्रेम असते. 

आपला उद्देश्य काहीही असला तरी शुक्राचार्य आपले गुरु आहेत आणि आता देवयानी आपली गुरुभगिनी.याची जाणीव कच  पुरेपूर बागळून असतो. त्यामुळे तो आपली पायरी कधीच सोडत नाही. त्याचे सत्य सगळ्यांना कळल्यावर त्याला ठारही केलं जातं . मात्र देवयानीच्या विनवनीखातर शुक्राचार्य त्याला पुन्हा जीवित करतात. 

इकडे देवयानीचा प्रेम प्रस्ताव कच नाकारतो. त्यामुळे ती क्रुद्ध झालेली असते.अशातच वनात विहाराला गेले असतांना तिचे आणि आणि शर्मिष्ठेचे भांडण होते.त्या भांडणात देवयानी चुकून विहरीत पडते.शर्मिष्ठा आपल्या मैत्रीणीं बरोबर  तेथून निघून जाते. त्याचवेळी शिकारीसाठी दूरपर्यंत आलेला आणि पाण्यासाठी तहानलेला ययाती तेथे येतो. देवयानीला विहिरीतून बाहेर काढतो. 

ययाती आपल्या सौन्दर्यावर मुग्ध झाला आहे हे देवयानी ओळखते आणि लग्नाची गळ घालते. ययातीला तर मान्य असतेच. मग त्यांचं लग्न मोठ्या थाटात उरकलं जात. ययाती सोबत येतांना  देवयानी शर्मिष्ठेला दासी म्हणून घेऊन येते. (विहरीत ढकलल्याचं प्रायश्चित्त म्हणून दासी.) शर्मिष्ठा त्यांच्या सोबत येते खरी पण शर्मिष्ठेपासून दूर राहायला शुक्राचार्यांनी ययातीला आधीच ठणकावून सांगितलेले असते. 

देवयानीच्या स्वभावामुळे आणि एकटं पडल्याच्या भावनेने ययाती पुन्हा एकदा सगळी वचणे तोडतो.इकडे देवयानीला पुत्र होतो तेव्हाच दुसरीकडे शर्मिष्ठेच्या पोटातही मूल असत.भरपूर वेळेपर्यंत देवयानीला यांचं प्रकरण कळत नाही. जेव्हा तिला कळतं  तेव्हा ती शर्मिष्ठेच्या मुलासकट तिचा काटा काढावा या उद्देदेश्याने शर्मिष्ठेला तिच्या बाळासकट बंदी बनवते. 

ययातीला हे जेव्हा कळते. तेव्हा तो त्याचा मित्र माधव याच्या साहाय्याने शर्मिष्ठेची सुटका करून तिला सुखरूप राज्यातून दूर पोचवून येतो. तिकडे शर्मिष्ठेला यती भेटतो. तो त्यांची राहण्याची, खाण्याची योग्य व्यवस्था लावून देतो. 

मध्यंतरी मग अठरा वर्षांचा काळ निघून जातो. या अठरा वर्षात महाराज ययाती निव्वळ उपभोगात मग्न आहेत. राज्यात दस्युची बंडाळी होते तर तेव्हा त्यांचा मोठा मुलगा यदु ती मोडायला जातो मात्र त्याला दस्यु बंदी बनवतात. इकडे शर्मिष्ठेचा पुरु पण मोठा झाला आहे. तो पण पराक्रमी आहे. त्याला आपण कोण आहोत याची जाणीव आहे. आपल्या वडिलांच्या राज्यावर संकट असतांना, आपला भाऊ बंदी असतांना आपण गप्प बसून न राहता शत्रूंना भिडणे हेच आपलं कर्तव्य आहे हे तो पुरते जाणतो. 

पुरु दस्युच्या राज्यातून यदु ला सोडवूनआणतो. सोबतच बंडाळी पूर्ण नमवून येतो. हस्तिनापुरात यदु आणि पुरु येत असतांनाच इकडे शुक्राचार्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्याने तेसुद्धा आपल्या मुलीचा संसार पाहायला येतात. मात्र ययाती त्यांना पूर्ण आसक्तीत डुंबलेला आढळतो तेव्हा ते त्याला अकालवृध्दत्वाचा शाप देतात. 

लगेच ययाती जक्ख म्हातारा होतो. तेव्हा तो शुक्राचार्याना विनवणी करतो. त्यांची क्षमा याचना करतो. त्यावेळी शुक्राचार्य त्याला उ:शाप देतात. तो हे म्हातारपण त्याच्या मुलाच्या यौवनासोबत बदलून घेऊ शकेल. मात्र जर मुलाचे यौवन पुन्हा परत करायचे झले तर त्यावेळी ययातीचा मृत्यू होईल. 

ययाती अगोदर यदुकडे यौवनाची मागणी करतो. पण यदु तयार होत नाही. त्याचवेळी सोबत असलेला पुरु तो या गोष्टीसाठी तयार असल्याचे सांगतो. ययातीला ठाऊक नसते कि हा आपलाच मुलगा आहे. तर पुरु तेही सांगतो कि तो शर्मिष्ठेचा मुलगा आहे. मात्र ययातीला त्या क्षणी फक्त सुख उपभोगाचे असते. त्याला शर्मिष्ठा कळत नाही न आपल्या मुलाचे काय होईल ते कळत. तो पुरु सोबत त्यांची अवस्था बदलतो.

 मात्र काही काळाने तेथे शर्मिष्ठा येऊन पोचते. पुरुला जक्ख म्हातारा पाहून ती फार दुःखी होते. तिला तसे पाहून ययातीचे  मन द्रवते. त्याला पश्चाताप होतो. तो पुरुचे यौवन परत करण्याचा मंत्र म्हणत असतानाच त्याला घेरी येते आणि बेशुद्ध होतो. 

 नंतर जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो त्याच्या मूळरूपात असतो. पुरुही त्याच्या योग्य वयात असतो. त्याच्या समोर कच उभा राहतो. शुक्राचार्यांच्या शापापासून कचाने दोन्ही पिता पुत्रांना मुक्त केलेले असते. नंतर ययाती पुरु कडे राज्य सोपऊन उपभोगीवृत्तीचा त्याग करून आपल्या दोन्ही पत्नीसमवेत वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करतो.  

 

 

 

ययाती कादंबरी – प्रमुख पात्रांची वैशिष्ट्ये 

 

ययाती कादंबरी मध्ये प्रत्येक पात्राचा स्वतःचा असा वेगळा एक स्वभाव वैशिष्ट्यांचा संच आहे. एकदा का जर है पात्रांचे मूळ स्वभाव आपण योग्य रित्या जाणून घेऊ शकलो तर ययाती कादंबरी आपल्याला सहजगत्या कळेल. येथे आपण प्रमुख अश्या काही पात्रांच्या स्वभावाबद्दल जाणून घेउ. 

 

 

अशोकसुंदरी/ महाराणी 

 

ययातीची आई, नहुष महाराजांची पत्नी, महाराणी आणि एक स्त्री या सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करतांना कुठलाही त्याग करायला तयारी असणारी ही स्त्री आहे. एका पत्नीला हवा असणारा मानाचा दर्जा न देणारा, इंद्राणीच्या नादी लागलेला पती सांभाळणं, महाराणीच्या पदालाही सांभाळणं आणि आई म्हणून असणारी जबाबदारी सांभाळणं हि खर तर तिच्यासाठी तारेवरची कसरत आहे. 

मोठ्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ होणारी जशी ती मृदू हृदयाची आहे तशीच राज्याची, घराण्याची अब्रू राखण्यासाठी ती अलकाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे  न पाहणारी कठोर हृदयाची आहे. नहुष  महाराज जिवंत असे पर्यंत दबून राहणारी ती ययाती गादीवर बसल्यावर त्याच्यावर तिचा अधिकार सांगायला कमी करीत नाही. आजच्या घर-घरातील आईचे ती प्रतिनिधित्व करते. 

 

 

 

ययाती 

 

वर वर पाहता ययाती आपल्याला एक भान नसलेला सुखासाठी वेडा  झालेला व्यक्ती वाटतो. पण वि.स.खांडेकरांचा ययाती अगदी मुळापासून तसा  आहे का? नाही. तो देखणा आहे. युवराज आहे. पण तरीही जर तो मुळात लंपट असता तर त्याच्यामागे भरपूर प्रकरने जुडली असती. पण तसे काही ययाती कादंबरी आपल्याला सांगत नाही. 

अलकाला ‘मला तुझेच रूप बघायचे आहे ‘ हे सांगतांना कचरणारा, एका दृष्टीने ती त्याची दुधबहीन लागते याचा विचार करणारा ययाती एका ठिकाणी वाहवत जातो खरा:पण तीच अलका जेव्हा त्याला पुन्हा भेटते आणि त्याला माहित असते कि हि विवाहित आहे त्यावेळी तिला बहीण मानून अतिशय मानाने, मायेने,वासनेचा लवलेशही न  ठेवता तिला सोबत ठेवणारा ययाती हा नक्कीच निव्वळ उपभोगासाठी हपापलेला नसावा. 

मुकुलिकेला नकार देऊन पुन्हा राज्यात न दिसण्यासाठी सांगणारा ययाती एका हिशेबाने संयमाने भरलेला वाटतो. बरे यौवन काळात एक पराक्रमी युवराज असूनही अलका आणि मुकुलिका यांना सोडलं तर त्याच्या वर दुसरा कोणताही डाग नाही. मात्र हाच ययाती जेव्हा मंदार आणि मुकुलिकेच्या फासात अडकतो, जेव्हा त्याला दारूचं व्यसन जडत त्यावेळी मात्र तो अनिर्बंध वागू लागतो. 

या कथेतला ययाती हा त्या संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो जो फक्त आणि फक्त उपभोगाच्या मागे लागला आहे. 

 

 

 

यती  

 

ययाती कादंबरी आपली भेट दोन प्रकारच्या यती सोबत करून देते.पहिला प्रकार आहे संन्यास घेऊन अगदी स्त्रीद्वेष्टा झालेला यती. आणि दुसरा प्रकार म्हणजे नंतरच्या काळात शर्मिष्ठेला मदत करणारा संन्यासाचा खरा अर्थ सापडलेला यती. 

 पहिल्या यतीने  समाजापासून, लोभापासून बाह्य बंधने तर तोडलेली असतात मात्र त्याचा त्याच्या मनावर ताबा नसतो आणि म्हणूनच तो वैतागून सगळा स्त्री वर्ग कसा चुकीचा आहे आणि त्याला कसा नष्ट करावा याच भानगडीत व्यस्त होतो. गोष्ट इथपर्यंत जाऊन पोचते कि त्याच्या भीतीने आजूबाजूच्या गावातील स्त्रिया घरांचे दारे लावून बसतात की याला दिसलो तर हा आपलं एखाद्या जनावरात रूपांतर करेल.  

 

 

 

देवयानी 

 

पित्याप्रमाणे शीघ्रकोपी. पित्याच्या विद्येचा आणि स्वतःच्या सौन्दर्याचा अपार गर्व असणारी. स्वतःची गोष्ट खरी करण्याचा नेहमी अट्टाहास करणारी स्त्री म्हणून जरी देवयानी आपल्या समोर असली तरी ती आणखी एका वैशिष्ट्याने युक्त आहे. 

देवयानी प्रेमभंग झालेल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते. प्रेमात भंग झालेला माणूस कसा वागेल आणि संसारात काय चुका करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवयानी होय. कच तीचे  प्रेम स्वीकारत नाही म्हणून त्याच्या पेक्षा श्रेष्ठ नवरा मिळावा आणि आपण किती आनंदी आहोत हे कचाला दाखवता यावे म्हणून ययातिशी लग्न करणारी देवयानी आपल्या समाजातही पदोपदी पाहायला मिळते. कधी स्त्री रूपाने तर कधी पुरुषरूपानं. 

ययाती आणि कच यांची सतत तुलना करणारी देवयानी ज्यावेळी मूल्यांच्या बाबत कचाला श्रेष्ठ पाहते. तेव्हा आपण हारल्याचा तिला येणारा अनुभव तिच्या गर्वाला आव्हान करतो. आणि त्यामुळे ती वैतागून स्वतःच्या संसाराचा खेळ खंडोबा करते. 

याचा अर्थ देवयानी पूर्णतः चुकीची आहे असा नाही.  मद्य न पिण्याची साधी मागणी ययाती पूर्ण करू शकत नाही आणि तेच पुढे त्यांच्यातील वादाच मुख्य कारण बनतं. मुळात स्वतः मर्यादेत राहून आपल्या पतीकडून काही अपेक्षा ठेवणं हा काही दोष होत नाही. उलट स्वतःत सुधार करून ययातीने तिची समज घालायची तर तो तिलाच पर्याय शोधू लागतो हा त्याचा गुन्हा म्हणावा लागेल. पण ययाती कादंबरी मात्र देवयानीला एक खलनायक म्हणूनच सिद्ध करायचा प्रयत्न करते. 

 

 

 

शर्मिष्ठा 

 

साध्या  अंशुकासाठी होणारं  भांडण आणि त्या भांडणांमुळं संपूर्ण जीवन भर भोगावा लागणारा वनवास या साऱ्यांचा विचार केला तर शर्मिष्ठेचं जीवन खूपच कष्टप्रद आहे. राजमहालात राहणारी शर्मिष्ठा, अशोकवनात कुटीत राहणारी शर्मिष्ठा, तर लहान तान्ह बाळ घेऊन मंदिरांचा आडोसा घेत, लोकांच्या नजरा  चुकवत दर दर फिरणारी शर्मिष्ठा. असं शर्मिष्ठेचं कुठलही रूप घेतलं तरी ती उत्तमच भरते. 

ती मैत्रीण म्हणून साथ देण्याचाही प्रयत्न करते पण देवयानीचा स्वभाव त्या लायकीचा नसतो. ती एक प्रेयसी म्हणूनही उत्तम आहे. म्हणूनच तर ययातीला ती प्रिय आहे. तिच्या निरपेक्ष प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेमाखातर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत पुरुच योग्य पालन-पोषण करते. 

ती पुरुला तो ययातिचा पुत्र असल्याचे सांगते पण देवयानी आपला काटा काढायच्या मार्गावर होती आणि ती तिथून पळून येऊन जीव वाचवत इकडे अरण्यात राहत असल्याचे सांगत नाही. त्याच्या मनात देवयानी विषयी कपात न पेरता ती त्याला त्या दोघींचा स्वभाव न पटल्याने ती दूर आल्याचे सांगते. 

हि शर्मिष्ठा त्या वर्गाचे नेतृत्व करते जो प्रेमासाठी सगळ सहन करायला तयार आहे. जो कुठल्याही परिस्थितीत चांगुलपणा सोडत नाही. आणि कमालीचा सोशिक आहे. 

 

 

 

कच 

 

ययाती कादंबरीचा नायक जरी ययाती वाटत असला तरी मुळात खरा नायक तर कच आहे. तो सर्व गुणांनी संपन्न आहे. त्याच्याकडे विद्या आहे, प्रेम आहे, करुणा  आहे, धाडस आहे, ध्येय्याकरिता जीव द्यायलाही मागे न पाहणारी विजिगिषु वृत्ती आहे. मुळात कच या पात्राच्या माध्यमातून वि.स.खांडेकर यांनी आपल्यासमोर एक आदर्श व्यक्ती उभा केला आहे. 

 एक मित्र म्हणून.  एक प्रियकर म्हणून.  एक शिष्य म्हणून.  एक मानव म्हणून.  कुठल्याही साच्यात बसवला तरी कच परिपूर्णच आहे. हा आदर्शवादी वर्गाचं  प्रतिनिधित्व करतो जो खरंच त्यांच्या आदर्शांवर चालतो. नुसतं बोलत बसत नाही तर हा करून दाखवणारा व्यक्ती आहे. 

युद्ध कुठलाही असुदे ते वाईटच. असं समजणारा आणि ते रोखण्यासाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणारा कचययाती कादंबरी वाचणाऱ्या कुणाच्याही मनात जागा पक्की करूनच जातो.   

 

 

मित्रांनो ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण नुकतीच काही प्रमुख पात्रांची वैशिष्ट्ये पाहिलीत. ययाती कादंबरी मध्ये प्रत्येकच पात्र वैशिष्ट्याने पूर्ण आहे मात्र आपण येथे प्रमुख पात्रांबद्दलच बोलत आहोत. ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आता पुढे ययाती कादंबरी मधून आपण काय शिकावे याविषयी चर्चा करूया. 

 

 

 

ययाती कादंबरी काय शिकवते?

 

मानवी जीवन हे उपभोग आणि त्याग या दोघांच्याही समतोलावर आधारलेले आहे. उपभोगाचा हव्यास आपल्याला ययातीप्रमाणे पतनाकडे घेऊन जाईल.तर  त्यागाचा अतिरेक आपल्याला यतीप्रमाणे वेडगळ बनवून सोडेल. म्हणून आपण मध्यम मार्ग स्वीकारायला हवा. 

आपल्या जीवनात सगळ्या भावनांना विशिष्ट महत्व आहे. त्यांना ते मिळायलाही हवं. मग ती भावना प्रेमाची असो कि द्वेषाची. मात्र त्यात कुठल्याही भावनेचा अतिरेक नको व्हायला. 

हे सगळे विकार, वासना,भावना हे जीवनरूपी भोजन रुचकर बनवणाऱ्या मसाल्यांप्रमाणे आहे.जीवनात ते सगळेच हवेत. एकाचीही कमतरता जेवणात उणीव निर्माण करू शकते,आणि एखादाही जास्त झाला तर जेवणाची चवही बिघडू शकते. तेव्हा सगळं कस प्रमाणात असायला हवं. 

 

 

 

ययाती कादंबरीतील आवडलेली काही शब्दशिल्पे 

 

या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.

 

प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.

 

जग माणसाच्या  दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो.मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुरातन देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! रणांगण आहे.

 

दैव हे मोठं क्रूर मांजर आहे.माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.

 

या जगात सुख लुटण्याचा काळ एकाच असतो— ते मिळत असते तेव्हा….!

 

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाप्रमाणे ते असते! ते असे असावेच लागते….

 

या जगात जो तो आपापल्याकरिता जगतो हेच खरे. वृक्षवेलींची मुले कशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात… याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, तर कधी मैत्री…. पण खरोखरच हे “आत्मप्रेम” असते.

 

आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.

 

निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते. असलं  प्रेम केवळ मनुष्य करू शकतो.

 

 

 

 

समारोप 

 

मित्रांनो आजच्या ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण ययाती कादंबरीवर थोडी चर्चा केली. या पोस्टमध्ये आपण ययाती कादंबरीमधील विविध पात्रे, कथानक, पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी पाहिल्यात. या कादंबरीमधील विविध पात्रांचे स्वभावही आपण थोडक्यात पाहिलेत. 

तर मित्रांनो तुम्हाला आजची ययाती कादंबरी वाचायची आहे ही पोस्ट कशी वाटली? या पोस्ट च्या माध्यमातून मी व्यक्त केलेल्या मतांना तुम्ही सहमत आहात का? तुमचे उत्तर नक्की कळवा. सोबतच ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये जर काही सुधारणा तुमच्या लक्षात येत असतील तर त्याबद्दलही आम्हाला कळवा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या सूचनांचा अंमल होईल याची दक्षता घेऊ. 

आणि हो पोस्ट आवडल्यास शेअर  करायला विसरू नका. 

                                                                                                             धन्यवाद.  

4 thoughts on “ययाती कादंबरी वाचायची आहे ?। Yayati Novel Pdf download”

Leave a Comment