बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (2022)

 

 

           मित्रांनो, आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट च्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही प्रसिद्ध कवितांचा आस्वाद घेणार आहोत. मंडळी, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बघण्याअगोदर आपण त्यांच्याविषयी थोडे जाणून घेऊयात. 

 

 

 

Table of Contents

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी माहिती :-

 

बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी खानदेशातील  असोदे या गावामध्ये झाला. असोदे हे गाव जळगाव पासून ५-६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.आणि आईचे नाव भिमाई होते. 

बहिणाबाईंना एकूण सहा भावंडे होती. त्यात तीन बहिणी-तुळसा , अहिल्या आणि सीता. आणि तीन भाऊ – घना, घमा आणि गणा. 

१८८०  काळ म्हणजेच भारतातील ब्रिटिश राजवटीचा कालखंड होय. या काळात भारतीय सुधारकांची दुहेरी लढाई नुकतीच सुरु झालेली. एकीकडे सामाजिक सुधारणेसाठी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा सुरु होता. तर दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी टकराव उडत होते. 

अश्या या संघर्षाच्या काळात बहिणाबाईंचा जन्म झळ. तोही एका शेतकरी कुटुंबामध्ये. तत्कालीन रीतीप्रमाणे बहिणाबाईंचे वडील उखाजी महाजन त्यांनी आपल्या मुलीचा -बहिणाबाईंचा विवाह जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी करून दिला. विवाहाच्या वेळी बहिणाबाईंचे वय फक्त १३ वर्षे होते. 

बहिणाबाईंचा संसार हा आधी एकत्र कुटुंब पद्धतीतीलच होता. मात्र काही घरगुती कलहामुळे त्यांचे कुटुंब विभक्त झाले. नव्या ठिकाणी नव्याने संसार उभा करण्याला यश येत असतांनाच नथुजी यांचे १९१० च्या काळात निधन झाले. त्यावेळी बहिणाबाईंच्या पदरी तीन लेकरे आणि थोडी जमीन या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. 

कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बहिणाबाईंनी शेतीचा आसरा घेतला. विविध परंपरांनी बुरसटलेल्या तत्कालीन समाजात एक विधवा म्ह्णून जगतांना बहिणाबाईंना कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला असेल याचा तर आपण विचार न केलेलाच बरा. 

शेतातील आणि दैनंदिनची कामे करत असतांना मन रमवण्यासाठी प्रत्येकच काळात गीतांनी स्त्रियांना मोठा आधार दिला आहे. जात्यावरच्या ओव्या या त्याच प्रकारातील.बहीणाबाईंनीसुद्धा  या गीतांचाच आधार घेतला. त्यांच्या बहुतेक रचना ह्या अश्याच कुठले न कुठले काम करतांना त्यांच्या मुखावर अवतीर्ण झालेल्या आहेत. 

स्त्री जीवनाशी हिंदोळे घेणारे वेगवेगळे विषय हेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता यामध्ये पुन्हा पुन्हा आढळतांना आपल्याला दिसतील. सासर, माहेर, संसार, शेती, व्यक्तिचित्रे अश्याच विषयांना बहिणाबाईंनी हात घातलेला आहे. 

कुठे कुठे त्यांची कविता उपरोधाने भारलेली जाणवते तर कुठे उपदेशाच्या कडू काढ्याने भारलेली. मुळात बहिणाबाई पूर्णतः निरक्षर.पण त्यांच्या कवितांची उंची हि मोठं मोठ्या पंडितांना चाट पाडणारी आहे.  त्यांच्या रचना ह्या त्यांचे पुत्र सोपानदेव आणि पुतण्या यांनी लिहून ठेवल्यामुळे आज आपल्यापर्यंत पोचत आहेत. 

खरे पाहता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आज आपल्याला वाचायला मिळाल्या नसत्या जर त्यांचे पुत्र आणि पुतण्या यांनी त्या लिहून ठेवल्या नसत्या. त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाची कथाही फार मजेशीर आहे. 

महाराष्ट्राला एक कवी म्हणून माहिती असलेले सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई यांचे पुत्र. बहिणाबाईंनी ३ डिसेंबर १९५१ ला जगाचा निरोप घेतला. त्यानंतर घराची आवरासावर करत असतांना सोपानदेव यांना एक वही सापडली. याच वहीमध्ये लहानपणी त्यांनी त्यांच्या आईने गुणगुणलेली गाणी लिहून ठेवलेली होती. 

ती वही मिळाल्यानंतर आईची आठवण म्हणून त्या कविता प्रकाशित करण्याच्या हेतूने सोपानदेव यांनीं आचार्य अत्रे यांची भेट घेतली. या कविता प्रकाशित करू कि करू नये असे विचारतांनाच त्यातील एक दोन कविता त्यांनी आचार्य अत्रेंना वाचायला दिल्या.

 कविता वाचून झाल्यावर अत्रेंच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले “हे तर शुद्ध बावनकशी सोने आहे.हे महाराष्ट्रापासून लपवण्याचा आपल्याला काही हक्क नाही.” शेवटी १९५२ ला सुचित्रा प्रकाशनाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रकाशित केल्या.

सिंधुताई सपकाळ यांचं एक विधान आहे. मनाला फार चटका लावून जाणारं -” हा महाराष्ट्र आहे बाळांनो. येथे मोठं होण्यासाठी मरावं लागतं.” नेमकं तंतोतंत बहीणबाई चादरी यांच्या प्रकरणाला लागू पडतं  हे विधान.जीवनभर दारिद्राशी दोन हात करीत झुंजणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आज मराठी पाठ्यक्रमाचा भाग आहेत. 

मराठी चित्रपटांत गाणी प्रसिद्ध होण्यापासून ते आज महाराष्ट्रात एका  विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाह्यक्रमाचा भागच बनवला आहे.  माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत. हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.   

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता

 

 

 

अरे संसार संसार 

 

अरे संसार संसार 

जसा तावा चुल्यावर

आधी हाताले चटके 

तवा  मियते भाकर 

 

करा संसार संसार 

खोटा कधीं म्हणूं नहीं 

राउळाच्या कयसाले 

लोटा कधीं  म्हणूं  नहीं 

 

अरे संसार संसार 

नही  रडनं कुढनं 

येडया, गयांतला हार 

म्हणूं नको रे लोढणं 

 

अरे संसार संसार 

खीरा येलावरचा तोड 

एक तोंडा मधी कडू 

बाकी अवघा लागे गोड 

 

अरे संसार संसार 

म्हणू नको रे भीलावा 

त्याले गोड भीमफूल 

मढी गोंडंब्याचा ठेवा 

 

 देशा  संसार संसार 

शेंग  वरतण  कांटे 

अरे, वरतून कांटे 

मधीं  चिक्ने  सागरगोटे 

 

ऐका  संसार संसार 

दोन्ही जीवाचा इचार 

देतो दुःखाले  होकार 

अन सुखाले नकार 

 

देखा संसार संसार 

दोन्ही जीवाचा सुधार 

कधी नगद उधार 

सुखादुखाचा बेपार 

 

अरे संसार संसार 

असा मोठा जादूगार 

माझ्या जीवाचा मंतर 

त्याच्या वरती मदार 

 

असा संसार संसार 

आधी देवाचा ईसार 

माझ्या दैवाचा जोजार 

मंग जीवाचा आधार !

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितामन 

 

मन वढाय वढाय 

उभ्या पिकांतलं  ढोर 

किती हांकला हांकला 

फिरी येतं  पिकांवर 

 

मन मोकाट मोकाट 

त्याले ठायीं  ठायीं  वाटा 

जश्या वाऱ्यानं चालल्या 

पान्या वरल्यारे लाटा 

 

मन लहरी लहरी 

त्याले हातीं  धरे कोण? 

उंडारलं उंडारलं 

जसं  वारा  वाहादन 

 

मन जह्यरी जह्यरी 

याचं  न्यारं ते तंतर  

आरे इचू, साप बरा 

त्याले उतारे मंतर !

 

मन पांखरूं पांखरूं 

त्याची काय सांगूं  मात 

आता होतं  भुईवर 

गेलं गेलं आभायान्त 

 

मन चप्पय चप्पय 

त्याले नहीं  जरा धीर 

तठे  व्हयीसनी ईज 

आलं आलं धर्तीवर 

 

मन एवढं एवढं 

जसा खाकसचा दाना 

मन केवढं केवढं 

त्यांत आभाया  मायेना 

 

देवा, कास देलं  मन 

आसं नहीं  दुनियांत !

आसा कसा रे यवगी 

काय तुझी करामत !

 

देवा, आसं  कसं  रे मन 

आसं कसं  रे घडलं?

कुठे जागेपणी तुले 

आसं  सपन पडलं !

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता लपे करमाची  रेखा 

 

लपे कारमाची  रेखा 

माझ्या कुकवाच्या खाली 

पुशीसनी गेलं कुकू 

रेखा उघडी पडली 

 

देवा तुझ्याबी घरचा

झरा धनाचा आटला 

घन  रेखाच्या चऱ्यानं 

तयहात रे फाटला 

 

बापा, नको मारूं  थापा 

असो खऱ्या असो खोट्या 

नहीं  नशीब नशीब 

तयहाताच्या रेघोट्या 

 

अरे, नशीब नशीब 

लागे  चक्कर पायाले 

नशिबाचे नऊ गिऱ्हे  

ते बी फिरत राह्यले 

 

राहो दोन लाल सुखी 

हेच देवाले मांगन 

त्यांत आलं रे नशीब 

काय सांगे पंचांगन 

 

नको नको रे जोतिषा  

नको हात माझा पाहू 

माझं दैव मले कये

माझ्या दारी नको येऊं !

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविताकशाला काय म्हणूं  नहीं ?

 

बिना कपाशीनं उले 

त्याले बोन्ड म्हणूं नहीं 

हरी नामाईना बोले 

त्याले तोंड म्हणूं नहीं 

 

नही वाऱ्यानं हाललं 

त्याले पान  म्हणूं  नहीं 

नाही ऐके  हरिनाम 

त्याले कान  म्हणूं  नहीं 

 

पाटा  येहेरींवाचून

त्याले मया म्हणूं नहीं 

नहीं  देवाचं दर्सन 

त्याले डोया म्हणूं  नहीं 

 

निजवते भुक्या पोटीं 

तिले रात म्हणूं नहीं 

आंखडला दानासाठी 

त्याले हात म्हणूं  नहीं 

 

ज्याच्या मधीं  नहीं  पानी 

त्याले हाय म्हणूं  नहीं 

धांवा ऐकून अडला 

त्याले पाय म्हणूं  नहीं 

 

येहेरींतून ये रीती 

तिले मोट म्हणूं  नहीं 

केली सोताची भरती 

त्याले पोट म्हणूं नहीं 

 

नहीं वळखला  कान्हा 

तिले गाय म्हणूं  नहीं 

जीले  नहीं फुटे पान्हा 

तिले माय म्हणूं  नहीं

 

अरे, वाटच्या  दोरीले 

कधी साप म्हणूं  नहीं

इके पोटच्या  पोरीले 

त्याले बाप म्हणूं  नहीं 

 

दुधावर आली बुरी 

तिले साय म्हणूं  नहीं 

जिची माया गेली सरी 

तिले माय म्हणूं  नहीं 

 

इमानाले इसरला 

त्याले नेक म्हणूं  नहीं 

जल्मदात्याले भोवला 

त्याले लेक म्हणूं  नहीं 

 

ज्याच्यामधीं नहीं भाव 

त्याले भक्ती म्हणूं  नहीं 

त्याच्यामधी नहीं चेव 

त्याले शक्ती म्हणूं  नहीं   

 

 

मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्टच्या माध्यमातून आपण बहिणाबाईंच्या काही उत्कृष्ट रचना बघत आहोत.या पोस्ट मध्ये आपण पुढे पाहुयात माणसाला निस्वार्थीपणे जगण्याचा संदेश देणारी कविता. या कवितेत बहिणाबाईंनी दिलेले दाखले अतिशय साधे आहेत मात्र त्यांचा इतका डोळस वापर आजपर्यंत कोणी केला असेल असं वाटत नाही. 

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता हिरीताच देणं घेणं 

 

नको लागूं  जीवा, सदा मतलबापाठी

हिरिताचं देणं घेणं नही पोटासाठी 

 

उभे शेतामधीं पिकं 

ऊन वारा खात खात 

तरसती ‘कव्हां जाऊं 

देवा, भुकेल्या पोटांत’

पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी 

नको लागूं  जीवा, सदा मतलबापाठी 

 

पाहिसनी  रे लोकाचे 

यवहार खोटे नाटे 

तव्हां बोरी बाभईच्या 

आले आंगावर  कांटे 

राखोईच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी 

नको लागूं  जीवा, आतां  मतलबापाठी 

 

किती भरला कणगा 

भरल्यानं  होतो रिता 

हिरिताच  देणं घेणं 

नाही डाडोराकरिता

गेली देही निंघीसनी  नांव रे शेवटी 

नको लागूं  जीवा, सदा मतलबापाठी 

 

 

मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये आता आपण पाहणार आहोत बहिणाबाई चौधरी यांची ‘देव अजब गारोडी’ हि कविता. य कवितेत बहिणाबाई यांनी पिकाची संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते मांडलेले आहे. त्यांच्या शेतातील कापणी, मळणी या क्रियांविषयीही वेगळ्या कविता आहेतच. मात्र आपण येथे त्यांच्या ‘देव अजब गारोडी’ हि कविता बघणार आहोत. 

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितादेव अजब गारोडी 

 

धरत्रीच्या कुशीमधीं 

बियबियानं निजलीं 

वऱ्हे  पसरली माटी 

जशी शाल पांघरली 

 

बीय टरारे भुईत 

सर्वे कोंब आले वऱ्हे 

गह्यरलं  शेत जसं 

अंगावरती शहरे 

 

ऊन वाऱ्याशी खेयतां 

एका एका कोंबांतून 

पर्गटले दोन पानं 

जसे हात जोडीसन 

 

टाया वजावती पानं 

दंग  देवाच्या भजनीं 

जसे करती कारोन्या 

होऊ दे रे आबादानी 

 

दिसामासा  व्हये वाढ 

रोप झाली आतां  मोठी 

आला पिकले बहार  

झाली शेतामधीं दाटी 

 

कसे वाऱ्यानं डोलती 

दाणे आले गाडी गाडी 

दैव गेलं  रे उघडी 

देव अजब गारोडी !

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता वाटच्या  वाटसरा 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता -वाटच्या वाटसरा

 

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी!

 

नशिबीं दगड गोटे 

काट्याकुट्याचा धनी 

पायाले लागे  ठेचां  

आलं डोयाले पानी 

वरून तपे ऊन 

अंग झालं रे लाही 

चालला आढवानी  

फोड आले रे पायीं 

जानच  पडीन  रे 

तुले लोकांच्या साठीं 

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी 

 

दिवस ढयला रे

पाय उचल झट 

असो नसो रे तठी 

तुझ्या लाभाची गोट 

उतार चढनीच्या  

दोन्ही सुखदुःखांत 

रमव तुझा जीव 

धीर धर मनांत 

उघडूं  नको आता 

तुझ्या झांकल्या मुठीं 

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी 

 

 ‘माझेच भाऊबंद 

धायीसनी  येतीन !’

नको धरूं  रे आशा 

धर  एवढं ध्यान 

तुझ्या पायाने जाणं 

तुझा तूलेच जीव

लावनी  पार आता 

तुझी तूलेच  नाव 

मतलबाचे  धनी 

सर्वी माया रे खोटी 

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी!

 

वाऱ्याचं  वाहादन 

आलं आलं रे मोठं 

त्यांच्यात झुकिसनी 

चुकुं  नको रे वाट 

दोन्ही बाजूनं दऱ्या  

धर झुडूप हाती 

सोडू नको रे धीर 

येवो संकट किती 

येऊदे परिचिती 

काय तुझ्या ललाटीं 

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी! 

 

मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता  या पोस्टमधील  ‘वाटच्या  वाटसरा’ हि बहिणाबाईंची माणसाला उपदेश करणारी कविता आहे. या कवितेत बहिणाबाई सांगतात कि जीवनाची हि जी वाट आहे ती फार अवघड आहे. तरीसुद्धा इतरांसाठी आपल्याला चालतच राहावे लागणार आहे.  

नशिबाने जरी तुझ्या पुढ्यात दगड धोंडेच टाकले असतील.  जरी संसारातील दुःखाच्या उन्हाने तुझे अंग लाही लाही झाले असले तरीही. स्वतःला एकटंच जीवनयुद्ध लढावे लागणार हे सतत ध्यानात ठेऊन तुला सतत योग्य मार्गाने पुढेच आणि पुढेच मार्गक्रमण करीत राहायचे आहे. 

 

Also  Read 

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता-मानूस 

 

मानूस मानूस 

मतलबी रे मानसा 

तुले फार हाव 

तुझी हाकाकेल आशा 

 

मानसा  मानसा  

तुझी नियत बेकार 

तुझ्याहून बरें  

गोठ्यांतलं जनावर 

 

भरला डाडोर 

भूलीसनी  जातो सूद 

खाईसनी चारा  

गायम्हैस देते दूध 

 

मतलबासाठी 

मान  मानूस  डोलये 

इमानाच्यासाठी 

कुत्रं  शेंपूट हालये 

 

मानसा  मानसा 

कधी व्हशीन माणूस 

लोभासाठी झाला 

मानसाचा रे कानूस    

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता -खोपा 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता -

 

अरे खोप्यामंधी खोपा 

सुगडीणीचा  चांगला 

पाहा  पिलासाठी तिनं 

झोका झाडाले टांगला 

 

पिल्लं निजती खोप्यात 

जसा झुलता बंगला 

तिचा पिल्लांमधीं  जीव 

जीव झाडाला टांगला 

 

खोपा इनला इनला 

जसा गिलट्याचा कोसा 

पाखराची कारागिरी 

जरा बघ रे मानसा  

 

तिची उलीशीच चोच 

तेच दात तेच ओठ 

तुले दिले रे देवानं 

दोन हात दहा बोटं 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता-धरत्रिले  दंडवत   

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता -धरत्रीले दंडवत

 

काया काया शेतामंधी 

घाम जिरव जिरव

तव्हां  उगलं  उगलं 

कायामधून हिरवं !

 

येता पिकाले बहार  

शेताशेतांत हिर्वय 

कसं  पिकलं  रे सोनं 

हिर्व्यामधून पिवयं

 

अशी धरत्रीची  माया 

अरे, तिले नाही सीमा 

दुनियाचे  सर्वे पोटं 

तिच्यामंधी झाले जमा 

 

शेतामंधी भाऊराया 

आला पीक गोंजारत 

हात जोडीसन केला 

धरत्रीले दंडवत 

 

शेतामंधी भाऊराया 

खाले  वाकला वाकला 

त्यानं आपल्या कपायी 

टिया  माटीचा लावला 

 

अशी भाग्यवंत माय 

भाऊरायाची जमीन 

वाडवडिलांचं देवा

राखी ठेव रे वतन ! 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता-माझी मुक्ताई 

 

माझी मुक्ताई मुक्ताई

दहा वर्साच लेकरू

चान्गदेव योगियान

तिले मानला रे गुरू

 

देख ग्यानियाच्या राजा,

आदिमाया पान्हावली

सर्व्याआधी रे मुक्ताई

पान्हा पियीसनी गेली..

 

अरे सन्याशाची पोर

कोन बोलती हिनई

टाकीदेयेल पोरान्च

कधी तोन्ड पाहू नही..

 

अरे अस माझ तोन्ड

कस दावू मी लोकाले?

ताटी लावी ग्यानदेव

घरामधी रे दडले !

 

उबगले ग्यानदेव

घडे असन्गाशी सन्ग,

कयवयली मुक्ताई

बोले ताटीचे अभन्ग..

 

घेता हिरीदाचा ठाव

ऐका ताटीचे अभन्ग

एका एका अभन्गात

उभा केला पान्डुरन्ग..

 

गह्यरले ग्यानदेव

डोये गेले भरीसन

असा भाग्यवन्त भाऊ,

त्याची मुक्ताई बहीन…

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता-घरोट (जातं )

 

देवा, घरोट घरोट

तुझ्या मनांतली गोट

सर्व्या दुनियेचं पोट

घरीं कर्माचा मरोट

 

अरे, घरोट घरोट

वानी बाम्हनाचं जातं,

कसा घरघर वाजे

त्याले म्हनवा घरोट

 

अरे, जोडतां तोडलं

त्याले नातं  म्हनू नहीं

ज्याच्यांतून येतं पीठ

त्याले जातं म्हनूं नहीं

 

कसा घरोट घरोट

माझा वाजे घरघर

घरघरींतून माले

माले ऐकूं येतो सूर

 

त्यांत आहे घरघर येड्या,

आपल्या घराची

अरे, आहे घरघर

त्यांत भर्ल्या आभायाची

 

आतां घरोटा घरोटा

दयन मांडलं नीट

अरे, घंट्या भरामधीं

कर त्याचं आतां पीठ

 

चाल घरोटा घरोटा

तुझी चाले घरघर

तुझ्या घरघरींतून

पीठ गये भरभर

 

जशी तुझी रे घरोटा

पाऊ फिरे गरगर

तसं दुधावानी पीठ

पडतं रे भूईवर

 

अरे, घरोटा घरोटा

तुझ्या माकनीची आस

माझ्या एका हातीं खुटा

दुज्या हातीं देते घांस

 

अरे, घरोटा घरोटा

घांस माझा जवारीचा

तुले सनासुदी गहूं

कधीं देते बाजरीचा

 

माझा घरोट घरोट

दोन दाढा दोन व्होट

दाने खाये मूठ मूठ

त्याच्यातून गये पीठ

 

अरे, घरोटा घरोटा

माझे दुखतां रे हात

तसं संसाराचं गानं

माझं बसते मी गात

 

अरे, घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पीठी

तसं तसं माझं गानं

पोटातून येतं व्होटीं

 

दाने दयतां दयतां

जशी घामानं मी भिजे

तुझी घरोटा घरोटा

तशी पाऊ तुझी झिजे

 

झिजिसनी झिजीसनी

झाला संगमरवरी

बापा, तुले टाकलाये

टकारीन आली दारीं !

 

 

 

माहेर by बहिणाबाई चौधरी

 

 

बापाजीच्या हायलींत

येती शेट शेतकरी

दारी खेटराची रास

घरीं भरली कचेरी

 

गांवामधी दबदबा

बाप महाजन माझा

त्याचा कांटेतोल न्याव

जसा गांवमधीं राजा

 

माय भीमाई माऊली

जशी आंब्याची साऊली

आम्हाईले केलं गार

सोता उन्हांत तावली

 

तुझे भाऊ देवा घरीं

नहीं मायबाप तुले

तुले कशाचं माहेर

लागे कुलूप दाराले

 

भाऊ ‘घमा’ गाये घाम

‘गना’ भगत गनांत

‘धना’ माझा लिखनार

गेला शिक्याले धुयांत

 

आम्ही बहीनी ‘आह्यला’ 

‘सीता, तुयसा, बहीना’

देल्या आशीलाचे घरीं

सगेसाई मोतीदाना

 

लागे पायाले चटके

रस्ता तापीसनी लाल

माझ्या माहेरची वाट

माले वाटे मखमल

 

जीव व्हती लाही लाही

चैत्र वैसागाचं ऊन

पाय पडतां ‘लौकींत’

शीन जातो निंघीसन

 

तापीवानी नही थडी

जरी वाहे थोडी थोडी

पानी ‘लौकी’चं नित्तय

त्याले अम्रीताची गोडी

 

माहेरून ये निरोप

सांगे कानामंधि वारा

माझ्या माहेराच्या खेपा

‘लौकी’ नदीले विचारा !

 

 

 

 

अरे रडता रडता

 

अरे रडता रडता

डोळे भरले भरले

आसू सरले सरले

आता हुंदके उरले

 

आसू सरले सरले

माझा मलेच इसावा

असा आसवा बिगर

रडू नको माझ्या जीवा

 

सांग सांग धरती माता

अशी कशी जादू झाली

झाड़ गेलं निंधीसनी

माघं सावली उराली

 

देव गेले देवा घरी

आठी ठेयीसनी ठेवा

डोळ्या पुढे दोन लाल

रडू नको माझ्या जीवा

 

रडू नको माझ्या जीवा

तुले रड्याचीरे सवं

आसू हसावं रे जरा

त्यात संसाराची चव

 

कुकू पुसलं पुसलं

आता उरलं गोंधन

तेच देइल देइल

नशिबले आवतन

 

जरी फुटल्या बांगड्या

मनगटी करतूत

तुटे मंगयसुतर

उरे गयाची शपत

 

नका नका आया बाया

नका करू माझी कीव

झालं माझं समाधान

आता माझा मले जिव!

 

 

 

उगवले नारायण 

 

उगवले नारायण, उगवले गगनांत

प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

 

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर

सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

 

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस

डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

 

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी

वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

 

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं

सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

 

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत

सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

 

 

Also  Read 

 

 

 

समारोप 

 

मित्रांनो आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये बहिणाबाईंच्या काही प्रसिद्ध कवितांचा आस्वाद घेतलात. जीवनाची दशा कशीही असली तरी त्याला एक सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य बहिणाबाईंच्या कवितेत आहे. माझ्या या मताशी आपणही सहमत असाल अशी आशा बाळगतो. 

 

मित्रांनो आजच्या बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये तुम्हाला कुठली कविता सर्वत जास्त आवडली? जर जवळच्या एखाद्या व्यक्तीला यांमधील एखादी कविता सुचवायची असेल तर तुम्ही कोणती कविता सुचवाल?

सोबतच तुम्हाला आणखी कोणाचे विचार जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा. 

 

मंडळी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये काही त्रुटी आढळ्यास आम्हाला तात्काळ कंमेंट मध्ये कळवा. शिवाय जर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर contact us  मेनू वापरून आम्हाला मेलद्वारे कळवा. तुमचा मोलाचा सल्ला बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट ला अधिकाधिक वाचनीय बनवण्यासाठी आवश्यक आहे. 

                                                                                                                                             धन्यवाद!

3 thoughts on “बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (2022)”

 1. नमस्कार मी जय, अतिशय सुंदर प्रकारे तूम्ही हा ब्लॉग पूर्ण केला व निवडक सुंदर कवितांचा संग्रह आम्हाला दिला.
  खूप धनयवाद!
  मला “अरे रडता रडता” ही कविता अतिशय आवडली, खूप छान…….

  Reply
 2. अतिशय सुंदर…👌👌👌🙏 उपयुक्त माहिती..

  Reply
 3. खूप सुंदर blog आहे, मन अतिशय भरून येते.. मन वढाय वढाय ही कविता खूप आवडली… मनापासून आभार

  Reply

Leave a Comment