Table of Contents
बालकवींच्या निसर्ग कविता
नमस्कार मित्रांनो ! मराठी मोटिवेशन या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या महत्वाच्या विषयांवरील माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो. आजही अश्याच एका सुंदर विषयावर आपण चर्चा करणार आहोत.
मित्रांनो आज आपण बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टच्या माध्यमातून बालकवी त्रम्ब्यक बापूजी ठोंबरे यांच्या काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत. बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्ट मध्ये आपण त्यांच्या निसर्गाशी संबंधित काही महत्वाच्या कविता पाहू. पण त्या अगोदर बालकवी यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
बालकवी यांच्याविषयी थोडक्यात
मी स्वछंदी, पुरता छंदी,
धारी मी न कुणास
परी मोहिनी विविध रूपिणी
सृष्टीचा मी दास
‘मी’ या कवितेतील बालकवींच्या वर उल्लेखित ओळी आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरच काही सांगून जातात. बालकवी म्हणतात की ते या जगात कुठल्याच गोष्टीला बांधील नाहीत. मात्र विविध रूपांनी नटलेल्या सृष्टीचा, निसर्गाचा ते दास आहेत.
निसर्गसृष्टीविषयी त्यांची असणारी हि ओढ त्यांनी आजन्म जपली. त्यांच्या विविध कवितांमधून आपल्याला निसर्गाचे काव्यमय वर्णन ऐकायला मिळते.मी सृष्टीचा दास आहे असे फक्त बोलून ना दाखवता त्यांच्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी जगून दाखवले.
अश्या या निसर्गवेड्या ‘निसर्गकवी’ चे जीवन आज आपण बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टच्या माध्यमातून थोडे उलगडून पाहणार आहोत.
जन्म आणि कुटुंब
बालकवी यांचे पूर्ण नाव त्रंबक बापूजी ठोमरे होते. मुळात त्यांचे आडनाव ‘ठोंबरे’ असे होते. मात्र त्यांनी ते उच्चरासाठी सोपे व्हावे म्हणून ‘ठोमरे’ असे करून घेतले. बालकवी यांचा जन्म महाराष्ट्राच्या खानदेश विभागातील धरणगाव येथे १३ ऑगस्ट १८९० या दिवशी झाला.म्हणजेच आजच्या जळगाव मध्ये झाला.
ठोमरे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे. बालकवी हे पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे. त्यांची मोठी बहीण मनुताई (जिजी) आणि भाऊ अमृत. त्यांच्याहून धाकटी बहीण कोकिला, धाकटा भाऊ भास्कर.
त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीवर होते. त्यांच्या वडिलांची बदली वारंवार एका गावातून दुसरीकडे होत असे. त्यामुळे कुटुंबालाही सतत गावे बदलावी लागत असे.
बालपण आणि काव्यसंस्कार
बालकवी यांच्या आई गोदुताई यांना मराठी वाचता येत असे. घराची कामे उरकून त्या पोथ्या वाचत असत. बालकवींची आजी,गोदुताईंची आई दळताना भक्तीपर ओव्या स्वत: रचून म्हणत असे.बालकवी आजीच्या जवळच असायचे त्यामुळे त्यांच्यावर नकळत काव्यसंस्कार घडत होते.
बालकवी यांच्या मोठ्या बहिणीने-जिजीनेही ‘पांडवप्रताप’, ‘रामविजय’, ‘भक्तलीलामृत’ हौसेने वाचून काढले होते. जिजीचे शिक्षक पती प्रल्हादपंत भावे यांनी तिला ‘नवनीत’ वाचण्यास दिले. ते तिला इतके आवडले, की तिने त्याची पारायणे केली.
बालकवी यांनीही जिजीबरोबर नवनीत वाचले. मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ वाचले. बालकवींनी जिजीबरोबर भेंड्या लावण्यासाठी कविता पाठ केल्या. त्यांना आद्य अक्षराच्या कविता न आठवल्यास ते स्वत: ऐनवेळी कविता रचून म्हणत.
बालकवींना लहानपणी विटीदांडू, आट्यापाट्या यासारख्या खेळांची आवड नव्हती.वडिलांची सतत होणारी बदलीमुळे त्यांचे जिवलग असे फारसे मित्र जुळले नाही. त्यामुळे आलेला एकटेपणा ते निसर्गाच्या सहवासात दूर करीत. कधी एकटे तर कधी काही मित्रांबरोबर दूर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यास जाणे त्यांना आवडे.
ते रात्री दिवे लागल्यावर बोटांच्या सावल्यांमधून कुत्रा, घोडा, उंट, मनुष्य असे आकार भिंतीवर उमटवत. त्यांचे शिक्षण एरंडोल, धुळे, बडोदा, अहमदनगर, पुणे येथे झाले. पण ते मॅट्रिक झाले नाहीत.
त्या काळात स्वतंत्रचळवळीने नुकताच जोर धरला होता. त्या काळात वंगभंग चळवळ, स्वदेशी, स्वातंत्र्य हे शब्द चोहीकडे उसळत होते. बालकवीही त्या देशभक्तीने भारलेले होते. त्यांनी ‘रावसाहेबी’ ही कविता पोकळ साहेबी करणाऱ्यांवर लिहिली होती. त्यांनी त्याच वयात ‘चहा’, ‘कपबशी’ अशाही, साहेबी संस्कृतीवर टिप्पणी करणाऱ्या काही कविता रचल्या होत्या.
जिजींनी त्यांच्या आठवणींत बालकवींनी राजमाता जिजाईवर आणि पन्हाळगडावर कविता रचल्याचेही सांगितले आहे. बालकवींचा भाऊ अमृतराव जहाल राजकारणात काही काळ उतरला होता. त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता; त्याचा बालकवींनाही त्रास झाला.
वनवासी कवी यांना त्र्यंबक (बालकवी) आवडला. ते कीर्तनकार होते. ते त्याला घेऊन उज्जैन-देवासकडे निघाले. पण त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्र्यंबक अवघ्या दोन महिन्यांत वडिलांकडे परतला. पण त्र्यंबकमधील कवी त्या प्रतिकूल परिस्थितीतही जागा राहिला.
यानंतर एरंडोलमधून प्रकाशित होणाऱ्या ‘दशकाल वर्तमान’ या साप्ताहिकामध्ये ‘मुलांस उपदेश’ ही बालकवींची कविता पहिल्यांदा छापून आली. आणि इथूनच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा ‘बालकवी’कडे प्रवास सुरू झाला.
अशी मिळाली ‘बालकवी’ म्हणून उपाधी
जळगाव येथे ‘काव्यरत्नावली’ या मासिकाचे संपादक नाना फडणीस उर्फ नारायण नरसिंह फडणीस यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील पहिले कविसंमेलन १९०७ ला जळगाव येथे झाले. या कविसंमेलनात वी. मो. महाजनी, चन्द्रशेखर, माधवानुज, तर्खडकर, ना. वा. टिळक असे दिग्गज २३ कवी उपस्थित होते.
अध्यक्षपदी कवी कर्नल डॉ. कीर्तिकर होते. रेव्हरंड टिळक यांचे ‘चित्रकाव्य’ या विषयावरील भाषण संपता संपता त्रंबक बापूजी ठोमरे उभे राहिले व त्यांनी स्वत:च्या कविता म्हणण्यास सुरुवात केली.
‘अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती। कविवर्यांनो मदिय बोबडे बोल धरा परि चित्तीं॥’
अशी आपल्या कवितेची सुरुवात करून पुढे त्यांनी त्यांची कविता सादर केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे सातारा वर्षांचे होते. या सम्मेलनात केवळ सतराव्या वर्षी बालकवींनी स्वरचित कविता हजारो श्रोत्यांपुढे सादर केली. या कवितेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
त्याच्या कविता ऐकताना सभा तल्लीन झाली. सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. संमेलनाध्यक्ष कर्नल का. र. कीर्तीकर यांनाही बालकवींच्या प्रतिभेने स्तीमित केले. त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘वा! बालकवी वा!…’ अशी दाद दिली.
नाना फडणवीस यांनी त्याच ठिकाणी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी जाहीर केली व कर्नल कीर्तीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे ‘बालकवी’ म्हणून परिचित झाले.
बालकवींचा जीवन प्रवास
त्यांच्या वडिलांचे निधन नंतर वर्षभरातच झाले. घरची सर्व जबाबदारी बालकवींवर पडली. त्यांनी अहमदनगर, पुणे महाबळेश्वर येथे शिक्षकाची नोकरी केली, शिकवण्या केल्या. पण त्याबरोबर त्यांचे काव्यलेखन सतत बहरत गेले.
बालकवींच्या कविता आरंभी ‘आत्मज आपण भरतभूमिचे असुनि काय बा केले।’, ‘ठोकोनी दंडा पिटोनी मांड्या, जपान पुढती येई।’ अशा प्रकारच्या वृत्तबद्ध, काहीश्या कृत्रिम होत्या . पुढे मृदुशब्दी, प्रवाही होत गेली. त्यांना निसर्ग-कवितेत स्वत:चा सूर सापडला.
त्यांचा चाहता मित्र-परिवार खूप वाढत गेला. त्यांमध्ये गुरूतुल्य ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे कुटुंब होते; गोविंदाग्रज यांच्यासारखे (रा ग. गडकरी) गाजत असलेले नाटककार-कवीही होते.
असे असले तरी बालकवींच्या कौटुंबिक जीवनात मात्र सतत कलह होता. त्यांचे बंधू अमृतराव आणि त्यांची पत्नी यांचे वागणे दिवसेंदिवस अधिक बेजबाबदार होत गेले. बालकवी यांची आई, अमृतराव व त्यांची पत्नी या सर्वानी मिळून बालकवींचे मन पत्नी पार्वतीबाईंबद्दल कलुषित केले.
त्यामुळे बालकवी घराबाहेर हसूनखेळून सगळ्यात मिसळत. मात्र त्यांनी पत्नीला घरात नीट वागवले नाही; वेळप्रसंगी मारहाण ही केली. अमृतरावांचे आणि बालकवींचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. ते मन शांत होण्यासाठी कविमित्र सोनाळकर यांना भेटण्यास जावे, म्हणून भादली स्टेशनकडे चालत निघाले. ते गाडी पकडण्यासाठी रूळांमधून चालत-पळत जात असताना, मालगाडीखाली सापडून तीस वर्षांचेही नसतांना त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या अश्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूने मराठी काव्यसृष्टीचे झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे.
बालकवी यांच्या पद्यरचना लोकांपर्यंत पोचल्या, पण त्यांनी काही गद्य लेखनही केलेले होते. त्यांचा ‘आधुनिक मराठी कविता : तिचे स्वरूप’ हा लेख 23 जानेवारी 1912 च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाला होता. बालकवींनी मिस डब्ल्यू. एम. हेन यांनी संग्रहित केलेल्या इंग्रजी गोष्टींच्या आधारे सोळा गोष्टी लिहिल्या होत्या. त्या छोट्या बोधकथेच्या वळणाच्या गोष्टी होत्या. ‘बाँबे ट्रॅफर’ आणि ‘बुक सोसायटी’ने त्या ‘सृष्ट चमत्कार’ या नावाने प्रसिद्ध केल्या होत्या.
Also Read
बालकवींच्या निसर्ग कविता
चला तर मित्रांनो आता बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्ट मध्ये आपण बालकवींच्या निसर्ग कविता पाहुयात. स्वतःचे जीवन कितीही कष्टप्रद असले तरी आपल्या कवितांच्या माध्यमातून, निसर्गाच्या वर्णनातून बालकवींनी आपल्यासाठी उत्साही, आनंददायी काव्य निर्माण केले आहे.
बालकवींच्या निसर्ग कविता दुःखाने, निराशेने त्रस्त झालेल्या मनावर फुंकर घालायचे काम करतात. मनाला सुखावतात. जगण्याची एक नवी उर्मी प्रदान करतात. बालकवींच्या निसर्ग कविता पैकी काही प्रसिद्ध कविता पुढे देत आहोत. नक्कीच त्या तुम्हाला आवडतील.
वनमुकुंद
निंब जांब जांभळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी ।
जणुं काय ती येई धांवुनि । असेंच वाटे पहा साजणी ।
पुढें पाहिलीं खैरीं झाडें । तशीच मोठी मेंदी वाढे ।
जाइजुई ती फार वाढली । गुंफा मोठी बहुतचि झाली ।
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली । तिला ऐकुनि वृत्ति निमाली ।
काय कथूं त्या सुस्वर नादा । पुढें पाहिलें रम्य मुकुंदा ।
गोपांनीं तो वेष्टित झाला । गळीं फुलांचा हार शोभला ।
कटिं पीतांबर सुंदर दिसला । गोप खेळती नाना लीला ।
कितिक खेळती आटयापाटया । कितिक खेळती दांडु विटया ।
अशा करिति ते नाना लीला । देवहि भक्ताआधिन झाला ।
वाटतें जावें, तत्कमलमुखा पाहावें ॥
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे
गीत – बालकवी
औदुंबर
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
– बालकवी
श्रावण मासी हर्ष मानसी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे
देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
– बालकवी
फुलराणी
हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी !
आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ?
या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावून,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर –
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी –
“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !”
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता –
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती!
तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे !
गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला !
निर्झरास
गिरिशिखरे, वनमालाही
कड्यावरुनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती,
जा हळुहळु वळसे घेत
पाचूंची हिरवी राने
वसंतमंडप-वनराई
श्रमलासी खेळुनि खेळ
ही पुढचि पिवळी शेते
झोप कोठुनी तुला तरी,
बालझरा तू बालगुणी
दरीदरी घुमवित येई!
खेळ लतावलयी फुगड्या
फिर गरगर अंगाभवती;
लपत-छपत हिरवाळीत;
झुलव गडे, झुळझुळ गाने!
आंब्याची पुढती येई.
नीज सुखे क्षणभर बाळ!
सळसळती गाती गीते;
हासं लाडक्या! नाच करी.
बाल्यचि रे! भारिसी भुवनी.
गाणाऱ्या पक्ष्यास
समय रात्रीचा कोण हा भयाण!
बळे गर्जे हे त्यांत घोर रान.
अशा समयी छबुकड्या पाखरा तू,
गात अससी; बा काय तुझा हेतू?
गिरी वरती उंच उंच हा गेला,
तमे केले विक्राळ किती याला.
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती.
दीर्घ करिती हे घूक शब्द काही;
क्रूर नादे त्या रान भरुनि जाई.
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे.
तुझ्या गानाचे मोल नसे येथे,
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते;
जगे अपुल्या कानास दिली टाळी,
वृथा मानवी हाव अशा वेळी.
तुझे गाणे हे शांत करी आता,
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता.
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट,
असे त्यांचा या समयि थाटमाट.
पुढे येईल उदयास अंशुमाली,
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली.
हरिणबाळे फिरतील सभोवार,
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर.
तुझे भ्राते दिसतील एक ठायी,
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही.
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे,
मधुर नादे वन भरुनि टाक सारे.
आणखी वाचा
समारोप
मित्रांनो बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टाच्या मध्ये आपण बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे(ठोंबरे) यांच्याविषयी माहिती घेतली. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवनप्रवास यांचा ओझरता आढावा घेतला. आणि त्यांच्या काही प्रसिद्ध निसर्गकवितांचा आस्वाद घेतला.
मित्रांनो बालकवींच्या निसर्ग कविता हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? बालकवींच्या निसर्ग कविताया पोस्ट मधील कुठली कविता तुम्हाला जास्त आवडली? याबद्दल आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.
सोबतच बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील, काही कविता तुमच्याकडे उपलब्ध असतील आणि इतरांपर्यंत त्या पोचवायची तुमची उच्च असेल तर contact us या पेज द्वारे तुम्ही त्या आम्हाला ई-मेल करू शकता.
बालकवींच्या निसर्ग कविता हि पोस्ट अधिक वाचनीय बनवण्यासाठी तुमचा सल्ला महत्वाचा आहे. तेव्हा आम्हाला काही मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा ठेवतो.
धन्यवाद.
अतिउच्च कोटीची ही पोस्ट आहे. जर बालकवींचे कवितासंग्रह मिळण्याचे ठिकाण कळाले तर कृपा होईल.
धन्यवाद