मित्रांनो मराठी Motivation वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही मनोरंजक, प्रेरणादायी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो. मित्रांनो आजही आम्ही नेहमीप्रमाणे मनोरंजक माहिती घेऊन आलो आहोत.
शांता शेळके यांच्या कविता
एखाद्या दिवशी भल्या पहाटे ‘ गजानना श्री गणराया’ चा मंगल ध्वनी कणी पडला की तो दिवस कसा मंगलमय होऊन जातो. मन कुठलीही स्थितीत असुद्या ‘वल्हव रे नाखवा ‘ ऐकलं की कसं आनंदानं भरून जातं. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? ‘ म्हणत आपण कुठल्याही संकटाला भिडायला तयार होतो.
मराठी चित्रपटांतील गाणी असोत की कविता असोत किंवा कुठला अनुवाद असूद्यात या साऱ्यांच्या माध्यमातुन मराठी मनावर राज्य करण्याचं काम शांता शेळके यांनी केलं आहे. आज आपण शांता शेळके यांच्या कविता या पोस्ट च्या माध्यमातून शांता शेळके यांच्या कविता पाहणार आहोत. पण त्यापूर्वी शांता शेळके यांच्या कविता या पोस्टमध्ये आपण शांता शेळके यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात.
शांता शेळके यांच्याविषयी माहिती
शांता शेळके यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांचा जन्म १२ ओक्टोम्बर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. त्यांचे बालपण खेड, मंचर या परिसरात व्यतीत झाले. शांताबाई शेळके यांचे आजोबा ( वडिलांचे वडील) हे शाळामास्तर होते. तर शांताबाईचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते.
शांता बाईच्या वडिलांची नियमित बदली होत राहत असे. त्यामुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावांतही त्यांना वास्तव्य करावे लागले. त्यांच्या वडिलांना त्या ‘दादा’ आणि आईला ‘वहीनी’ म्हणत असत. एकूण पाच भावंडात शांताबाई सगळ्यात मोठ्या होत्या.
शांता शेळके यांच्या आईला म्हणजेच अंबिका बाईला चित्रकलेची, वाचनाची आवड होती. त्या अतिशय मृदू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या या वृत्तीचा कळत नकळत शांता शेळके यांच्यावर संस्कार होत होता. लहानपणी आजोळी गेल्यावर शांताबाई विविध श्लोक, पारंपरिक गीते,ओव्या इत्यादीमध्ये आजीसोबत रममाण होत. त्यामुळे अगदी लहान वयातच कवितेची आवड, वाचनाची आवड त्यांच्या मनात रुजत गेली.
१९३० मध्ये शांताबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे चवथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्याला त्यांच्या काकाकडे आले. त्यांचे पुढील शिक्षण पुण्याच्या हुजुरपागेतील शाळेत झाले. १९३८ मध्ये शांता शेळके मॅट्रिक झाल्या. पुढे पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. ची पदवी घेतली.
कॉलेजच्या दिवसांतच साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकांसाठी त्यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखाला त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या लिखाणाला हुरूप आला. हळू हळू त्या कविता, लेख, कथा लिहू लागल्या. बी. ए. झाल्याबरोबरच त्यांचा ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ नावाचा कथासंग्रहही निघाला. १९४४ ला संस्कृत विषय घेऊन शांता शेळके एम. ए. झाल्या. या विषयात त्यांनी तात्यासाहेब केळकर सुवर्ण पदक जिंकले होते.
एम. ए. झाल्यावर त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत ‘समीक्षक’ मासिक, ‘नवयुग’ साप्ताहिक आणि ‘मराठा’ या दैनिकात बराच काळ काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथेच मिळाली. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रुईया आणि दयानंद सरस्वती महाविद्यालयात त्यांनी बरीच वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
शांता शेळके यांनी अनेक वर्ष नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डवर काम केले. १९९६ साली आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. शांता शेळके यांचे २००२ मध्ये निधन झाले.
शांता शेळके यांची साहित्यसंपदा
शांता शेळके यांच्या कविता या पोस्टमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण थोडक्यात शांता शेळके यांच्या साहित्य विश्वात एक फेरफटका मारून येवूयात. त्यांनी विविध प्रकारांत साहित्य निर्मिती केली आहे. ती पुढीलप्रमाणे
काव्यसंग्रह –
वर्षा(१९४७), रुपसी(१९५६), तोच चंद्रमा(१९७३), गोंदण(१९७५), अनोळख(१९८६), कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती(१९८६), जन्मजान्हवी(१९९०), चित्रगीते(१९९५), पूर्वसंध्या(१९९६),इत्यर्थ(१९९८) इत्यादी.
कथासंग्रह
मुक्त(१९४४), गुलमोहोर(१९४९), प्रेमिक(१९५६), काचकमळ(१९६९), सवाष्ण(१९७४), अनुबंध(१९८०), बासरी(१९८२), कविता करणारा कावळा(१९८७), सागरिका(१९९०).
कादंबरी
विझली ज्योत(१९४६), नरराक्षस(१९४८), पुनर्जन्म(१९५९), धर्म, ओढ , स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर इत्यादी.
ललित लेखन
शांता शेळके यांच्या ललित लेखनात शब्दांच्या दुनियेत, आनंदाचे झाड, धुडपाटी, पावसा आधीच पाऊस, एकपानी, वाडिलधारी माणसं, संस्मरणें, मदारंगी, सांगावेसे वाटले म्हणून इत्यादी पुस्तके समाविष्ठ होतात.
अनुवादित साहित्य
मूळ लेखनाबरोबरच शांता शेळके यांनी बरेच ग्रंथ अनुवादितही केले आहेत. यामध्ये तालपुष्कर, औट घटकेचा राजा, चौघीजणी, गाठ पडली ठका ठका, गवती समुद्र, आंधळी, गाजलेले विदेशी चित्रपट, पाण्यावरल्या पाकळ्या, मेघदूत इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो.
शांता शेळके यांच्या कविता या पोस्टमध्ये आपण आतापर्यंत शांत शेळके यांच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. आता आपण शांत शेळके यांच्या कविता पाहुयात.
Also Read
शांता शेळके यांच्या कविता
मित्रांनो काव्य क्षेत्रात कवयित्री म्हणून शांता शेळके यांनी भरपूर रचना केल्या आहेत. त्यांच्या संपूर्ण कविता येथे देणे फारसे सोयीस्कर ठरणार नाही. म्हणूनच त्यांच्या काही प्रसिद्ध आणि आम्हाला आवडलेल्या कविताच आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला आवडलेल्या शांता शेळके यांच्या कविता पुढीलप्रमाणे –
साद पावसाची
साद पावसाची आली, शहारली माती
भुई सवे आभाळाची, जुळे आज प्रीती
उठावले घन घन घोर, नील कंठ झाले मोर
पिसार्यात लाखो डोळे, गगन न्याहाळीती
निळामधे हीरक जडती, तसे शुभ्र बगळे उडती
कोसळती धारा धारा, दिशा धुंद होती
चिंब चिंब जांभुळ रानी, मेघ मंद्र घुमती गाणी
मुके भाव हृदया मधले, शब्द रूप होती
तृप्त शांत झाली धरणी, मधुस्म्रिते हिरव्या कुरणी
पुसट चुंबना सम ओल्या सरी येती जाती
गगन धरा झाली एक, मुक्त प्रीतिचा अभिषेक
एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती
पैठणी
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास
धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली
वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले
कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा
हे एक झाड आहे
हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे जाणिवओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि
मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल
कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन
ओलेत्या पानात
ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची ओढ जागे पावसाची
डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले
स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले
हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले
शूर आम्ही सरदार कविता
शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती! ।।धृ ।।
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती!’
शब्द
तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी
अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वतःला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे
तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ
मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?
चांदणी
सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी
भवतालाचे बघते कौतुक!
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टीची सुता लाडकी
चमकते क्षितिजावरती
ऋतु हिरवा
ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…
असेन मी, नसेन मी
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे
स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे
पाऊस
पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली
एकच हुंदका
कसे न तेव्हा कळले काही
की तो होता आवच सारा
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !
नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्यांचा
डौल तेवढा होता वरती !
अभाव होता भावशुन्य तो
आत कुणीही नव्हते जागे
नसत्यावरती असत्याचे ते
विणले होते झगमग धागे !
भयाण होते आत रितेपण
आणि अहेतुक होते हेतू,
झिरपत होती अहंभावना
शब्दांशब्दांमधुन परंतु !
मिरवणूक ती वाजतगाजत
गेली जेव्हा दारावरूनी
बघत राहिले, एक हुंदका
असेल कोठे यात इमानी ?
काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे
समारोप
मित्रांनो शांता शेळके यांच्या कविता या पोस्टमध्ये आपण आतापर्यंत शांता शेळके यांच्या कविता, त्यांचे इतर साहित्य आणि त्यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली.
शांता शेळके यांच्या कविता ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मधील कुठली कविता तुम्हाला जास्त आवडली? त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.
सोबतच शांता शेळके यांच्या कविता या पोस्ट मध्ये काही सुधारणा सुचत असतील तर त्यासुद्धा आम्हाला कळवा. सदर पोस्ट अधिक माहितीपूर्ण आणि वाचनीय होण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे.
धन्यवाद.
खुपचं छान संकलन. आभारी आहे
KHUPACH CHAN MAHITI AHE THANKU
शांता बाईंची शाळा ही कविता सुद्धा कृपया upload करा….. ब्लॉग खूपच छान!!!
Wow I like this poem and this
Information thanks