गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती 

नमस्कार मित्रांनो ! मराठी मोटिवेशन या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही विविध विषयातील माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचे कार्य करीत असतो.

कधी थोर व्यक्तींचे विचार, कधी सुंदर कविता, कधी सुविचार तर कधी एखाद्या महामानवाचे चरित्र अश्या निरनिराळ्या मार्गांनी प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. 

मित्रांनो आजही आम्ही अशीच प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहोत. गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट च्या माध्यमातून आज आपण भारतीय क्रांतिकारी चळवळीतील एका बेडर वीरपुरुषाची, चंद्रशेखर आझाद यांची माहिती घेणार आहोत. 

 

गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती 

 

 

मी आझाद आहे!

 

१९२१ चा काळ होता. सगळीकडे गांधीजींच्या नेतृत्वात असहकार आंदोलन पूर्ण देशभर सक्रिय झालेले होते.सर्व देश जणू आंदोलनाच्या रंगात रंगून गेला होता. सगळीकडे अवज्ञेचे वारे वाहत होते. मोर्चे,सभांना जणू ऊत आला होता. 

या काळात असाच एक मोर्चा बनारस मध्ये निघाला.लोकं घोषणा देत होते. ‘‘इन्कलाब जिंदाबाद !’’ ‘‘भारत माता कि जय ! ”  “वंदे मातरम !” घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून उठला होता. 

या मोर्चाला पाहून एक १५-१६ वर्षाचा मुलगा मोहित झाला . मंत्रमुग्ध होऊन भारावलेल्या अवस्थेत तो मोर्चात शिरला आणि “वंदे मातरम !” च्या घोषणा देऊ लागला. त्याची आरोळी लोकांचा उत्साह वाढवीत होती. काही क्षणातच तो मोर्चाच्या अग्रस्थानी जाऊन पोचला.

त्याचा आक्रमकपणा पोलिसांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पोलिसांनी त्याला दटावले पण तो अधिकच आक्रमक होऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आणि न्यायाधीशांसमोर हजर केले.

न्यायमूर्तींनी त्या मुलाला विचारले “तुझे नाव काय?” मुलाने उत्तर दिले “आझाद “. न्यायमूर्तींनी पुढचा प्रश्न केला “ तुझ्या वडिलांचे नाव काय?” त्या मुलाने निडरपणे उत्तर दिले “स्वतंत्रता”.न्यायमूर्तींना त्याची तिरकस उत्तरे कळली. त्यांनी त्या लहानश्या मुलाला १५ दिवसांचा कारावास सुनावला. 

१५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा होऊनही तो मुलगा त्या इंग्रज न्यायाधीशाची खिल्ली उडवत म्हणाला की  “ मला अगोदरच माहीत होते की तुम्ही मला यापेक्षा जास्त शिक्षा करूच शकत नाही!” त्याच्या या विधानाने कचेरीत सर्वदूर हशा पिकला . 

त्यामुळे संतापून न्यायाधीशाने त्या मुलाला चाबकाचे १५ फटके मारण्याची शिक्षा सुनावली. वयाच्या हिशेबात चाबकाचे १५ फटके म्हणजे खूप जबर शिक्षा होती. मात्र त्या मुलाने ती हसत हसत सहन केली. प्रत्येक फटक्यासोबत तो आरोळी ठोकायचा “भारत माता की जय!” “वंदे  मातरम !”

त्यावेळी तिथल्या  सगळ्याच इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते कि हा मुलगा पुढे आपल्याला खूप त्राही त्राही करून सोडणार आहे. आणि झालेही तसेच. इंग्रजांना पुढील काळात जंग जंग पछाडून टाकणाऱ्या त्या मुलाचे नाव होते चंद्रशेखर आझाद ! मित्रांनो आज आपण गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती  या पोस्ट च्या माध्यमातूम भारत मातेच्या त्याच वीरपुत्राची, चन्द्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत. 

 

जन्म आणि बालपण  

 

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी एका ब्राह्मण  कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते. चंद्रशेखर आझाद यांचे वडील पंडित सीताराम तिवारी हे गरीब सरयूपारी ब्राह्मण होते.त्यांच्या आईचे नाव होते जागरानी देवी.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म त्या काळातील उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बदारका या लहानश्या गावी झाला. आता हे गाव मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात येते. 

चंद्रशेखर आझाद यांचे वडील वनविभागात नोकरीवर होते. ते अतिशय शिस्तप्रिय व स्वाभिमानी ब्राह्मण होते. ते प्रामाणिक आणि काटकसरी होते. त्यांच्या या गुणांचा चंद्रशेखर आझाद यांच्यावर बराच प्रभाव पडला. 

 

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.    

 

असं म्हटल्या जातं की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे मोठेपणी मुलगा काय करणार आहे त्याची प्रचिती त्याच्या लहानपणाच्या वागणुकीतूनच दिसून येते.चन्द्रशेखर आझाद काही याला अपवाद नव्हते. चंद्रशेखर आझाद यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय त्यांच्या पालकांना लहानपणी बऱ्याच प्रसंगांतून आला. 

चंद्रशेखर आझाद यांना धाडसी खेळ जास्त आवडत असत. खेळण्यातील तोफेला त्यांनी तर गावठी दारुगोळा लावून खरोखरची टॉयफाच बनवली होती. ते नेहमी जोखमीने भरलेले खेळ खेळात. त्यामुळे त्यांना बऱ्याच जखमा होत. त्या जखमांबद्दल आई रागावली कि ते म्हणत “ आई जखमांचे व्रण हे वीरांचे आभूषण असतात.”

चंद्रशेखर आझादांच्या धाडसीपनाने तर एकदा कहरच केला होता.गावाकडे घुमणाऱ्या फेरीवाल्याकडून त्यांनी मुंबई शहराविषयी फार ऐकले होते. त्या भव्य शहराचे वर्णन ऐकून चंद्रशेखर आझादांना मुंबई विषयी भलतीच ओढ निर्माण झाली. 

एके दिवशी चंद्रशेखर आझादांनी फेरीवाल्यासोबत गावातून पळ काढला. आणि थेट मुंबई गाठली. मुंबई पाहिल्यावर त्यांना अगदी भारावल्यासारखे वाटू लागले.पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तेथे काही काळ रंगाऱ्याचे  काम केले मात्र लवकरच मुंबईच्या यांत्रिक जीवनाचा वीट येऊन ते परत बनारसला आले. 

याच प्रकारचा त्यांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग आहे. चंद्रशेखर आझाद यांचे मन शाळेत रमत नव्हते. म्हणून त्यांच्या वडीलानी त्याच्यासाठी वैयक्तिक शिक्षकाची नेमणूक केली होती. हे शिक्षक फारच शिस्तप्रिय होते. थोड्या थोड्या गोष्टीसाठी ते चंद्रशेखर यांना शिक्षा करीत. छड्या देत.

एक दिवस मात्र भलतेच घडले. शिकवता शिकवता गुरुजींनी काहीतरी चूक केली. ती लगेच चंद्रशेखर आझादांनी त्यांच्या लक्षात आणून दिलीच पण सोबतच त्यांनी गुरुजींनाहि शिक्षा व्हावी या हेतूने छडी चा शोधही चालू केला. चंद्रशेखर आझाद छडी का शोधताय ?याची जेव्हा त्या गुरुजींना भनक लागली, तेव्हा त्यांनी जी धूम ठोकली ती ते परत कधीच शिकवणीसाठी आले नाहीत. .   

  

बनारस चे वास्तव्य व उच्च  शिक्षण 

 

मुंबई वरून आल्यावर त्यांनी बनारसमध्ये उच्च शिक्षण घ्यावयास सुरुवात केली.या काळात श्रीमंत अध्यापक आणि इतर मंडळी गरीब मुलांना अन्न,वस्त्र, निवारा इत्यादी गोष्टीची सोय करून देत असत. चंद्रशेखर आझाद यांच्या राहण्या-खाण्याचा प्रश्न त्यामुळे आपोआप मार्गी लागला. 

चंद्रशेखर आझाद एका धार्मिक संस्थेच्या आश्रयाने शिकू लागले. त्यांनी आपले एकाग्र मन संस्कृत वर केंद्रित केले. ‘लघुकौमुदिनी’ आणि ‘अमरकोश’ यांसारखे ग्रंथ त्यांनी कंठस्थ केले.त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचे वारे चहू दिशांना वाहत होते. अभ्यासासोबत स्वातंत्र्याचे विचारही आझादांच्या मनात घर करू लागले होते. 

 

 

Also  Read 

 

स्वातंत्र्य लढ्यात उडी  

 

मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत. चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यलढ्यात कसे उतरले? आणि त्यांनी पुढची वाटचाल कशी केली याबाबत आता आपण पुढे पाहूया. 

चंद्रशेखर आझाद मुळातच स्वतंत्र विचारांचे,स्वाभिमानी होते. त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांची मुजोरी आणि भारतीयांनी त्यांची केलेली जी हुजुरी अगदी बालपणापासूनच खटकत होती. इंग्रज अधिकाऱ्यांना सॅल्यूट करावा लागतो म्हणून तर त्यांनी आर्थिक चणचण असतांनासुद्धा तहसील कचेरीत मिळालेली नोकरी सोडून दिली होती. 

बनारस मधील वास्तव्यात अभ्यासासोबतच स्वातंत्र्याच्या विचारांनी त्यांच्या मनात घर केले होते. त्या काळात चंद्रशेखर आझाद अनेक वाचनालयांना भेटी देत. तेथे त्यांनी भरपूर वर्तमानपत्रे वाचून काढली. 

असहकार आंदोलनाचे वादळ संपूर्ण भारतात घोंगावू लागले होते. बनारस मधेही हे वादळ पोहोचलंच होते. चंद्रशेखर आझादांनी महाविद्यालयाच्या परिसरात क्रांतिकारकांचा पहिला वाहिला ‘धरणा’ पाहिला. त्या दृश्यांची चंद्रशेखर आझाद यांच्या मनात अशी भुरळ घातली की  त्यांची सारी स्वप्ने आता स्वातंत्र्यलढ्याच्या भोवती फेर घेऊ लागली. 

अश्याच एका मोर्चाच्या वेळी सुरुवातीला वर्णन केलं आहे तो प्रसंग घडला.चाबकाचे १५ फटाके खाऊनही चंद्रशेखर आझादांच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूसही नव्हता. अंगावरून रक्त ओघळत होते पण चेहऱ्यावर वेदनाही नव्हत्या. 

शिक्षा पूर्ण झाल्यावर आजाद न्यायाधीशांना उद्देशून म्हणाले की  “हि पहिली आणि शेवटचीच वेळ समजा की मला तुम्ही अटक करू शकले. यानंतर मी जिवंत असेपर्यंत तुम्ही मला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत. आता मी आझाद आहे आणि आजन्म आझादच राहणार.” 

आझाद यांच्या सुटकेनंतर बनारस मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यावर लोकांनी पुष्प मालांचा एवढा वर्षाव केला की  त्यांचा चेहरा जेमतेम दिसत होता. व्यासपीठावरून  पंधरा वर्षांच्या चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून भाषण केले. 

त्यांचे भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध राहिले. भाषणाअंती त्यांनी आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. “मी आझाद आहे आणि आजन्म आझाद रहाणार.” दुसऱ्या दिवशी वर्तमान पात्रांनी आझादांच्या कामांची दखल घेतली. त्यांच्या धाडसाची भरभरून स्तुती केली. ‘मर्यादा’ नावाच्या मासिकाने “बालवीर आझाद “ नावाने मोठा लेख छापून आणला. 

 

क्रांतिकारक संघटनेत दाखल  

 

पुढे चंद्रशेखर आझाद यांनी काशी विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र त्यांचा त्या मागचा प्रमुख हेतू त्यांच्या मतांशी सहमत असणाऱ्या लोकांना एकत्र करून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हाच होता. याच  गांधीजींनी चोरी चौरा प्रकरणामुळे असहकार आंदोलन स्थगित केले. त्यांचा हा निर्णय क्रांतीची धार बोथट करणारा होता. त्यामुळे मग आझादांनी क्रांतिकारी संघटनांचा शोध सुरु केला. 

योगायोगाने याच काळात सचिंद्रनाथ सन्याल, सुरेशचंद्र भट्टाचार्य इत्यादींनी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचे नाव होते ‘हिंदुस्थान रिपब्लिक असॊसिएशन’. या संघटनेची एक लिखित घटना आणि नियमावली सुद्धा तयार करण्यात आली होती. 

चंद्रशेखर आझादांनी या संघटनेत एक साधारण सदस्य म्हणून नाव नोंदवले. त्यांच्या नेतृत्व गुणांनी त्यांनी बघता बघता संघटनेच्या पुढाऱ्याची धुरा सांभाळली. येथेच त्यांचा रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला इत्यादी सोबत परिचय झाला. 

आझादांच्या ओजस्वी वाणीने प्रभावित लोकांनी संघटनेत येण्यासाठी रीघ लावली. मात्र आझाद त्यांची योग्य परीक्षा घेऊनच त्यांना प्रवेश देत. चंद्रशेखर आझादांना देशद्रोही लोकांविरुद्ध प्रचंड चीड होती. अश्या लोकांना संघटनेत शिरू द्यायचे नाही याबद्दल त्यांचा कटाक्ष होता. 

 

 

आदर्शांचा संघर्ष 

 

सुरुवातीला चंद्रशेखर आझाद गांधीवादी होते. मात्र हळू हळू त्यांच्या विचारांत परिवर्तन होत गेले. त्यांच्या हिंसावादी क्रांतिकार्याकडे वळण्याला बरीच कारणे  होती. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे रामकृष्ण खत्री हे गृहस्थ होत. 

चंद्रशेखर आझादांची भेट रामकृष्ण खत्रींशी झाली तेव्हा ते फार आजारी होते. उठून बसण्याचेही त्राण त्यांच्या त्यांच्या शरीरात नव्हते. तेव्हा आझादांनी त्यांची सेवा करण्याचे ठरवले. त्यांच्या सेवेच्या या काळातच चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांत आमूलाग्र बदल घडून आला. रामकृष्ण खत्री हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते . आणि त्यांचे ते विचार बऱ्याच वाद विवादानंतर चंद्रशेखर आझादांना पटले. 

रामकृष्ण खत्री यांच्या भेटीनंतर मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या मनात आपण कुठल्या मार्गाने जावे याबद्दल कुठलाही किंतु परंतु राहिला नाही. क्रांतिमार्ग हाच त्यांचा जीवनमार्ग बनला.आणि संगिनी(बंदूक) त्यांची जीवनसंगिनी बनली. 

 

काकोरीची लूट    

 

१९२५ च्या दरम्यान चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सवंगड्यांना माहिती मिळाली होती की  जर्मनी वरून एक मालवाहू जहाज अनेक शस्त्रास्त्रे घेऊन भारतात दाखल होणार आहे. सशस्त्र क्रांतीसाठी लागणारी शस्त्रे या जहाजावरुन खरेदी करण्याच्या निर्णयावर त्यांच्या संघटनेचे शिक्कामोर्तब झाले. मात्र प्रश्न होता तो पैशाचा. शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी कुठून उभारायचा? 

हे शस्त्र सशस्त्र क्रांतीसाठी उपयोगी पडणार होते. आणि जहाज कलकत्याला येण्याअगोदर पैसे जमवने गरजेचे होते. त्यासाठी मोठा दरोडा घालण्याशिवाय संघटनेकडे कुठलाही उपाय नव्हता. म्हणून मग सर्वांनी बहुमताने ठरवले की ट्रेन ने  लखनौ ला पोचवल्या जात असलेला खजाना लुटायचा. 

योजना बनवण्यात आली. ७ ऑगस्ट १९२५ ला शहाजहांपूर  ते लखनऊ  जाणाऱ्या डाऊन ट्रेन मध्ये क्रांतिकारक चढले. ट्रेन काकोरीला पोहोचण्याआधी त्यांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. गार्डच्या डब्यातील तिजोरीतील पैसे आपल्या ताब्यात घेतले. आणि अंधाराचा फायदा घेत गोळीबार करत ते जंगलात पसार झाले. महत्वाचे म्हणजे या दरम्यान कुठल्याही प्रवाशाला काहीही त्रास दिल्या गेला नाही. .

कुठल्याही प्रवाशाला धक्का सुद्धा लागला नाही यावरून हे कृत्य क्रांतिकारकांनीच केले याची इंग्रजांना खात्री झाली. वर्तमान पात्रांनी या घटनेला अमाप प्रसिद्धी दिली. इंग्रज साम्राज्याचे मात्र धाबे दणाणले. या प्रकरणात पुढे ४० संशयितांना अटक झाली. 

या ४० जणांमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी,रोशन सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हे सारे सापडले ते काही फितुरांमुळे. कटातील जवळ जवळ सगळे सापडले पण आझाद मात्र कुणाच्या हाती आले नाही. ते जंगलांत लपत, वेष बदलत पुन्हा एकदा तयारीला लागले होते. 

आझाद वेषांतर करण्यात पटाईत होते. कधी ते साधू बनत तर कधी कामगार  तर कधी त्यांचं रूप भलतच काही असायचं. अश्फाकउल्ला खान यांना ज्यावेळी फाशीची शिक्षा झाली आणि त्यांचे पार्थिव ज्यावेळी दफन करण्यात येत होते त्यावेळी चंद्रशेखर आझाद तेथे एका इंग्रजांच्या वेशात पोहोचले होते. आजू बाजू पोलिसांचा पूर्ण गराडा असतांनासुद्धा त्यांना कोणी ओळखू शकले नव्हते. 

 

भेट-दोन वादळांची आणि  हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी   

 

मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत. शहिद-ए-आजम भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांची भेट कशी झाली हे आता आपण पाहणार आहोत. 

भारतीय क्रांतिकारी चळवळ ही  चंद्रशेखर आझाद आणि भगत  सिंग या दोन व्यक्तींशिवाय अर्धवट होऊन जाते. म्हणूनच य दोघान्ची वादळी भेट कशी झाली ते पाहणे येथे अगत्याचे ठरते. 

काकोरी कटानंतर चंद्रशेखर आझादांनी लपत छपत पुन्हा एकदा तयारीला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा माणसे जमवीत असतांना ते कानपुर मध्ये आले. कानपूरमध्ये काही विद्यार्थी ‘प्रताप’ नावाच्या भारतीय विचारसरणीच्या वर्तमान पत्राची छपाई करीत असत. 

भगत सिंग ‘प्रताप’ मध्ये ‘बळवंत’ या टोपण नावाने लिखाण करीत असत. चंद्रशेखर आझादांची आणि भगत सिंग यांची पहिली भेट येथेच झाली. दोघांनीही एकमेकांबद्दल फार ऐकलेले होते मात्र भेट झाली नव्हती त्यानंतर दोघेही घनिष्ट मित्र झाले. क्रांतीला नवीन धार मिळाली.  

दोघांच्या भेटीनंतर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाचं संघटन उभं करण्यात आलं. या संघटनेत बरेच नामवंत क्रांतिकारक होते. या संघटनेने बॉम्ब व इतर हत्यार बनवण्याचे कारखाने सुरु केले. निकटचे साथीदार शाहिद होत होते तरी त्यांचा लढा सुरूच होता. आणि तेच क्रांतीचे  तत्वज्ञान होते की  ‘ श्वास थांबला तरी चालेल चळवळ थांबायला नको.’

 

 

Also  Read 

 

सँडर्स वध  

 

१९२७ ला सायमन कमिशन भारतात आले. भारताच्या प्रशासकीय भवितव्याचा निर्णय या कमिशनकडे होणार होता. मात्र त्यात एकही भारतीय नसल्याने भारतात ठिकठिकाणी त्याचा विरोध केला जात होता. जागो जागी निषेध मोर्चे निघाले होते. 

अश्याच एका निषेध मोर्चाचे नेतृत्व लाला लजपत राय करीत होते. “सायमन परत जा” “सायमन गो बॅक” च्या घोषणांनी आसमंत गर्जून उठला होता. त्यावेळी पोलिसांनी अचानक लाठीमार सुरु केला. त्यात लालजींना मार बसला. छातीवर झालेल्या प्रहारांनी लालाजींचा जीव गेला. 

लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचे HSRA  च्या कार्यकर्त्यांनी ठरवले. त्यांनी लालाजींच्या मृत्यूला जबाबदार इंग्रज अधिकारी स्कॉट ला यमसदनी घडण्याची योजना आखली.मात्र ऐनवेळेवर थोडी गल्लत झाली आणि स्कॉट ऐवजी सँडर्स हा अधिकारी मारला गेला. मुळात सँडर्स सुद्धा जबाबदार होताच. 

सँडर्स च्या वधाची बातमी हा हा म्हणता भारतभर पोहचली. लालाजींच्या मृत्यूने दुखावलेली जनता सुखावली. क्रांतिकाऱ्यांच्या मनातील आग आता धुमसून पेटायला लागली. इंग्रज सत्ता तर मुळातून हादरली. सँडर्स वधानंतर सगळे क्रांतिकारी वेषांतर करून लाहोर सोडून निघून आले. 

 

बहिऱ्या सत्तेच्या कानाखाली आवाज  

 

१९२९ मध्ये इंग्रजांनी लोक सुरक्षा विधेयक आणि व्यावसायिक विवाद विधेयक या नावाचे दोन विधेयक केंद्रीय कायदेमंडळात आणण्याचे ठरविले होते. या विधेयकांमुळे भारतीयांचे नुकसानच होणार होते. क्रांतिकारकांचा तर त्याला विरोध होताच. मग काय? निषेधासाठी योजना आखण्यात आली. 

दिल्लीत तातडीने संघटनेची शाखा उघडण्यात आली. भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर असेम्ब्ली मध्ये बॉम्ब स्फोट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आझाद यांनी स्वतः असेम्ब्लीची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले कि स्फोट करून पळणे सहज शक्य आहे. 

आझादांनी स्फोट करून पळण्यासाठी एका कार ची सोय केली होती. पण पळून न जाता आपला संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्यावर जो खटला चालविला जाईल त्याचा प्रभावी वापर करावा अशी भगत सिंग यांची योजना होती. आणि त्यानुसार मग पुढे क्रिया करण्यात आली. 

ठरल्याप्रमाणे, कोणालाही इजा न होऊ देता बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग यांनी असेम्ब्ली मध्ये बॉम्ब स्फोट घडवला.पळून न जाता विविध पत्रके फेकत “इन्कलाब जिंदाबाद” चे नारे लावत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी खटल्यांच्या माध्यमातून जे क्रांतीचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवले त्यालाच ‘फिलोसोफी ऑफ बॉम्ब’ म्हणतात. 

 

चंद्रशेखर आझाद यांचा शेवटचा संघर्ष 

 

मित्रांनो  गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आतापर्यंत आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती, त्यांचा जीवनप्रवास पाहत आहोत. आता वेळ आली आहे ती त्यांच्या जीवनातील शेवटच्या लढ्याबद्दल ऐकण्याची. 

चंद्रशेखर आझाद इंग्रजांना बऱ्याच खटल्यात हवे होते. त्यासाठी त्यांनी आझादांना सहज ओळखू शकतील अश्या कितीतरी गुप्तहेरांची नेमणूक करून ठेवली होते. या गुप्त हेरांत आपलीच माणसे होती. ते म्हणतात ना धोक्याचे एक वैशिष्ट्य आहे की  धोका देणारा नेहमी जवळचा व्यक्तीच असतो. आणि इथेही तेच झाले. 

सगळे सोबती जरी सापडले असले तरी आझाद अजूनही आझादच होते. आणि जोपर्यंत आझाद बाहेर होते तोपर्यंत ते चळवळ थांबू देणार नव्हतेच. त्यामुळे तुरुंगातील भगतसिंग, सुखदेव यांसारखे क्रांतिकारी आत चळवळी बाबत निश्चिन्त होते. 

चंद्रशेखर आझाद काही गुपचूप बसणाऱ्यांपैकी नव्हते. कार्याची पुढची योजना आखण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आझादांनी आल्फ्रेड पार्क मध्ये आपल्या साथीदारांसोबत भेट ठरवली. दिनांक २७ फेब्रुवारी १९३१ चा दिवस उजाडला. आझाद, यशपाल आणि सुरेंद्र पांडे हे तिघे आल्फ्रेड पार्क मध्ये एकत्र जमले. 

थोड्या वेळातच तिथे सुखदेवराज सायकलने येऊन पोहोचले. त्यांची तिथे पुढील वाटचालीबाबत मंत्रना झाली. त्यानंतर सुरेंद्र आणि यशपाल हे काही महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारात निघून गेले.आझाद आणि सुखदेवराज एका झाडाखाली बसून चर्चा करीत बसले होते. 

तेवढ्यात चंद्रशेखर आझाद यांना वीरभद्र तिवारी आल्फ्रेड पार्कच्या बाजूला घुटमळताना दिसला.वीरभद्र तिवारी हा फितूर झाला आहे हे आझादांना ठाऊक होते. आझाद सावध होण्याआधीच पोलिसांची एक गोळी त्यांची मांडी भेदून गेली होती.पूर्ण बगीचा पोलिसांनी वेढला होता. 

आझाद आणि सुखदेवराज यांनी एका झाडाला आडोसा करून पोलिसांचा प्रतिकार सुरु केला. आझादांनी पहिल्याच गोळीत इंग्रज अधिकाऱ्याच्या गाडीचे टायर वेधले. पोलिसांकडून गोळ्यांचा सडा पडत होता. त्यातच एक गोळी आझाद यांच्या दंडाला तर दुसरी फुफ्फुसाला लागली. आझाद पार जखमी झाले. 

एवढा आघात होऊनही आझाद स्थिर होते. त्याचा जराही तोल गेला नाही. त्यांनी सुखदेवराज यांना तेथून निघून जाण्यास सांगितले आणि एकाकी लढाई सुरु ठेवली. चंद्रशेखर आझाद यांच्या एका गोळीने इंग्रज अधिकारी  नॉट बाबर च्या मनगटाचा हिशेब घेतला. एक गोळी दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याचा जबडा फाडून गेली. 

आझाद यांच्या नेमबाजीला इंग्रज एवढे घाबरले की  त्यांनी माघार घेतली आणि भारतीय सैनिकांना पुढे केले. आझाद निवडून फक्त इंग्रजांवरच गोळ्या झाडात होते.  एवढ्या घोर संकटात असतांना सुद्धा आझाद भारतीय पोलिसांना सांगत होते “भारतीय सैनिकांनो माझ्या मार्गातून तुम्ही दूर व्हा! माझ्या गोळ्या इंग्रजांची आहेत. मला तुम्हावर गोळ्या झाडायला भाग पाडू नका.”

बराच वेळ हि धुमश्चक्री चालू होती. शेवटी आझादांच्या जवळ एकच गोळी शिल्लक राहिली होती . आझाद तोंडातल्या तोंडात बडबडले “ मी आझाद आहे. आणि आझादच राहणार.” पिस्तुलाची नाळ त्यांनी कानशिलावर लावली आणि चाप ओढला. त्यांनी ‘आझाद’ राहण्याचा त्यांचा शब्द पाळला. एक वादळ मोठा तांडव करून शेवटी निद्रिस्त झालं. 

आझादांचे निष्प्राण शरीर बगिच्यात स्थिरावले होते. आत्मा कधीच निघून गेला होता. पण “आझाद”  नावाचं भय अजुनही जिवंत होतं . पोलिसांना त्यांच्या पार्थिवाला हात लावण्याची हिम्मत होईना. त्यांनी आझाद मृत झाल्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या निर्जीव शरीरावर वारंवार गोळ्या झाडल्या. एकदा खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाची विल्हेवाट लावली. 

 

आझाद जिवंत आहेत  

 

आझादांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांचा श्वास थांबला पण लाखो भारतीय स्वातंत्र्याचा विचार करू लागले. शहरांमध्ये हडताल पुकारला गेला. देशभर शोककळा पसरली. आल्फ्रेड पार्कमध्ये लोकांची झुंबड होऊ लागली. आझादांच्या रक्ताने माखलेली तिथली माती लोक कपाळी  लावण्यासाठी वेडावून गेले होते. 

झाडावर असलेल्या गोळीबाराच्या खुणांना स्पर्श करून लोक आझाद यांना  श्रद्धांजली वाहत होते.आल्फ्रेड पार्कमध्ये लोकांची रीघ लागली होती. आल्फ्रेड पार्क तर जणू काय तीर्थक्षेत्रच बनले होते. इंग्रजांना आता तर ‘आझाद’ नावाची इतकी धास्ती भरली होती की  अचानक जर कोणी ‘आझाद आले’ म्हटले तर ज्यांनी स्वतः त्यांचे पार्थिवाची विल्हेवाट लावली होती ते सुद्धा दचकून सावध पवित्र घेत. 

इंग्रजांना चंद्रशेखर आझाद यांची किती भीती होती? तर ज्या झाडाखाली त्यांनी जीव सोडला त्या झाडाची लोक जेव्हा पूजा करतांना इंग्रजांना दिसले तर कदाचित या झाडाकडे पाहत कुणी दुसरा आझाद अवतरेल या भीतीने त्यांनी ते झाड मुळासकट कापून काढले होते. 

आणि त्यांची ती भीती योग्यसुद्धा होती. कारण आझादांच्या नावानेच तर आझादीचे कित्येक वीर तयार झालेत. आजही स्वतंत्र विचार करणाऱ्या लोकांत आझाद जिवंत आहेत! अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांच्या मनांत आझाद जिवंत आहेत ! देशासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असणाऱ्यांत आझाद जिवंत आहेत!  तुमच्या माझ्या मनात आझाद जिवंत आहेत!

 

समारोप    

 

मित्रांनो  गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आज  आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहिली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा अभ्यास केला. त्यांचे व इतर क्रांतिकारी मित्रांचे धोरण थोडक्यात जाणून घेतले.आता वेळ आली आहे  समारोपाची. 

मित्रांनो आजची गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती ही पोस्ट चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी लिहिलेल्या विविध पुस्तकांतून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विश्वसनीय स्रोतांतून घेतलेल्या माहितीतून साकारलेली आहे. 

गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती ही  पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मध्ये तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. सोबतच चंद्रशेखर आझाद यांची माहिती जर तुमच्याकडे असेल तर ही  पोस्ट अधिक उपयुक्त बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा ही  विनंती. 

 धन्यवाद !

जय हिंद! जय महाराष्ट्र !

Leave a Comment