शहीद भगतसिंग यांची माहिती ।Bhagatsingh information in marathi

मित्रांनो, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध ज्यावेळी अपयशी ठरले आणि इंग्रजांनी मुघल सम्राट बहादुरशहा जफर यांना कैद केले. त्यावेळी एक उर्दूचा जाणकार  इंग्रज अधिकारी  बहादुरशहा जफर याना म्हणाला की  

 

                दम दमे मे दम नही खैर मांगो जान की 

                ऐ जाफर ठंडी हुई शमशीर हिंदुस्तान की 

 

यावर बहादुरशहा जफर संतापून उठला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देताना म्हणाला की 

 

           गाजियो मी बु रहेगी जब तलक ईमान की 

                तख्ते लंदन तक  चलेगी तेग हिंदुस्तान की

 

आणि मित्रांनो घडलेही तसेच.क्रांतीची तलवार पुढील काळात अविरत चालत राहिली आणि लंडनच्या सिंहासनाला तिची धडकी भरतच राहिली. क्रांतीच्या ज्या असंख्य ज्वाळांनी हिंदुस्थानचा आसमंत झाकला गेला त्यांपैकी एक धगधगता तेजगोल म्हणजे अमर शहीद भगतसिंग. 

मित्रांनो आज मराठी motivation या आपल्या ब्लॉग वर आपण शहीद भगतसिंग यांची माहिती घेणार आहोत. आज अमर शहीद भगतसिंग यांची माहिती। Bhagatsingh information in marathi या पोस्ट च्या माध्यमातून आपण शहीद भगतसिंग यांचे जीवन,कार्य, आणि त्यांच्या विचारांबद्दल चर्चा करणार आहोत. 

 

 

 अमर शहीद भगतसिंग यांची माहिती 

 

मित्रांनो शहीद भगतसिंग  हे नाव घेतले कि बरेच जणांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहातं. त्या चित्रात एक युवक असतो जो देशासाठी ब्रिटिशांना ठार करतो, विधिमंडळात बॉम्ब फेकतो आणि शेवटी देशासाठी हसत हसत फासावर चढतो. मित्रांनो हे आपल्या मनातील चित्र खरेच परिपूर्ण आहे का? नाही. 

 

अवघे  तेवीस -चोवीस वर्षाचे जरी आयुष्य लाभले असले तरी त्या आयुष्याची, कार्याची व्याप्ती मात्र इतकी आहे की जर आपल्याला भगतसिंग यांना खरंच समजून घयायचे असेल तर आपले जीवन अपुरे पडेल.

 

आता आपल्याला प्रश्न पडेल की  एवढं काय आहे शहीद भगतसिंग यांच्या जीवनात. तेच आज आपण अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. 

 

   

जन्म आणि बालपण

 

भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील लायलपूर जिल्ह्यात असणाऱ्या बंगा या गावी झाला. आता हे गाव पाकिस्तानात येते. त्यांचे वडिलांचे नाव  किसनसिंग संधू होते. आणि आई विद्यावतीदेवी होती.

१९०७ मध्ये वंगभंग आंदोलनाने जोम धरला होता. बंगालच्या फाळणीच्या विरोधातील या आंदोलनाची व्याप्ती संपूर्ण भारतभर पसरलेली होती. या आंदोलनात भगतसिंग यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. मुळात भगतसिंग यांचे संपूर्ण कुटुंबच क्रांतिकारी विचारसरणीचे होते. 

आपल्या बोलण्या, वागण्यावर, स्वभावावर आपल्या कुटुंबाचा, परिसराचा परिणाम होत असतो. शेतकऱ्याच्या मुलाला जसे शेतीचे कामे नकळतच आत्मसात होतात. त्याचप्रकारे क्रांतिकारकांच्या कुटुंबात भगतसिंग यांच्यासारखा क्रांतिकारक घडणे साहजिकच होते. 

भगतसिंग यांचे कुटुंब शेतकरी तर होतेच परंतु आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी सहकुटुंब इंग्रजी सत्तेविरुद्ध संघर्ष करीत होते.भगतसिंग यांचे कुटुंब आर्यसमाजी होते. त्यांचे चुलते अजितसिंग लाला लजपतराय चे सहकारी होते. त्यांना अटक करून इंग्रजांनी मंडालेच्या तुरुंगात ठेवले होते. 

भगतसिंग यांचे दुसरे चुलते स्वर्णसिंग यांचीही जामिनावर सुटका झालेली होते. वडील किशनसिंग यांनाही नेपाळमध्ये अटक झालेली होती. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी ते सारे नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले होते. त्यामुळे आता हे जन्मलेले बाळ भविष्यात कसे निघेल याचीच सर्व गावभर चर्चा होत होती. 

आधी सांगितल्याप्रमाणे भगतसिंग यांचे कुटुंब आर्यसमाजी होते. आर्य समाजाचे उपासक वेद मानतात पण वर्ण व्यवस्था मनात नाहीत. त्यामुळे भगतसिंग यांचा धार्मिक विधी करत असतांनाच त्यांच्या आजोबांनी भगतसिंग यांना देशासाठी आणि समाजासाठी अर्पण करीत असल्याची घोषणा केली होती. 

 

बाल क्रांतिकारक भगतसिंग  

 

भगतसिंग यांच्यात दडलेला क्रांतिकारक अगदी बालपणापासूनच जागृत अवस्थेत होता. लहानपणी ‘ मूठभर इंग्रजांचे आपल्यावर राज्य कसे काय ?” असा प्रश्न भगतसिंग यांनी त्यांच्या आईला विचारला असता विद्यावतीदेवी यांनी आपल्याकडे शस्त्रास्त्रे नसल्याचे कारण दिले होते.

ज्याप्रमाणे एका बी पासून वृक्ष लागून पुढे अनेक बीया मिळतात त्याचप्रमाणे शस्त्रांचेही असावे असे भगतसिंग यांच्या बालमनाला वाटून त्यांनी बंदुकीचे झाड लावण्यासाठी चक्क बंदूक जमिनीत पेरली होती. जेणेकरून त्या बंदुकीच्या झाडाला पुढे अनेक बंदुका लागतील आणि ती शस्त्रे मग इंग्रजांविरुद्ध वापरून आपण आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करू शकू असा त्यांचा त्यावेळी विचार होता. 

आपले चौथीपर्यंतचे शिक्षण बंगा या गावी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी भगतसिंग लाहोरला आले. तेथे त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक स्कुल या राष्ट्रीय विचारांच्या शाळेत प्रवेश घेतला. याच काळात १३ एप्रिल १९१९ ला अमृतसर येथे जनरल डायरने जालियनवाला बागमध्ये हत्याकांड घडवून आणला. अनेक निरपराध लोकांना गोळ्या मारून ठार मारले. 

जालियनवाला बाग हत्याकांड घडला तेव्हा भगतसिंग सातवीत होते. वय वर्षे बारा. त्यांना जेव्हा ती बातमी कळली तेव्हा ते घटनेच्या दुसऱ्याच दिवशी लाहोर ते अमृतसर हे २४ किमी चे अंतर पायी चालत गेले. तेथे त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली आणि तेथील रक्तमिश्रित माती बाटलीत भरून घरी घेऊन आले. 

दुसऱ्या एखाद्या बारा वर्षाच्या मुलाने असे काही केले असते तर त्याच्या घरच्यांनी त्यालाच आरडा ओरडा केला असता. पण भगतसिंग बाटलीत माती घेऊन आले ते याहून विद्यावतीदेवींनी त्याचे कौतुक केले. ती बाटली देव्हाऱ्यात ठेवली. आणि आपल्या मुलाची कर्तबगारी शेजारी,नातेवाईकांना मोठ्या गर्वाने सांगितली. 

  वयाच्या १३ व्या वर्षीच भगतसिंग यांनी आपल्या गावातील समवयस्क मित्रांची संघटना स्थापन करून गावात इंग्रजी सत्तेविरुद्ध कार्याला सुरुवात केली होती.याच काळात महात्मा गांधी यांनी १९२० ला असहकार चळवळ घोषित केली. त्यावेळी घरच्यांची परवानगी घेऊन भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इयत्ता नववीत असतांनाच शाळा सोडली. 

 

गांधी विचारांपासून दूर आणि पुन्हा शिक्षण सुरु 

 

भगतसिंग यांच्यावर लहानपणी लेनिन आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा, कार्याचा प्रभाव होता. गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी नववीत असतानाच शाळा सोडली होती. गांधीजींच्या असहकार चळवळीस भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

जनतेने न्यायालये, कार्यालये, इंग्रजांच्या शाळेवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. चळवळ अगदी जोमात होती. जनतेचा उत्साह जोरावर होता. मात्र अशातच चौरी चौरा येथे आंदोलकांनी हिंसा केल्याची घटना घडली. आणि गांधीजींनी चळवळ थांबवली. 

गांधीजींनी चळवळ थांबवून त्यांच्या कार्यकर्त्यांना रचनात्मक कार्यक्रम दिला. मात्र बऱ्याच लोकांना गांधीजींचा हा निर्णय आवडला नाही. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात असणाऱ्यांतच भगतसिंग सुद्धा होते. त्यांच्या मते इतक्या व्यापक चळवळीला निव्वळ अहिंसेच्या नावाखाली स्थगित करने कधीही योग्य नव्हते. 

महात्मा गांधींनी चळवळ मागे घेतल्यापासून भगतसिंग त्यांच्या विचारांपासून दूर होऊ लागले. त्यांनी शाळा सोडली होती. पण आता शिक्षणाकडे पुन्हा वळणे होते. भगतसिंग यांच्या आजोबांनी भगतसिंग याना मॅट्रिक पास नसतांना सरळ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का ? याची शहानिशा केली. एक परीक्षा पास करून सरळ कॉलेजात प्रवेश मिळवता येईल हे कळल्यावर भगतसिंग यांनी ती परीक्षा पास केली आणि लाला लजपतराय यांच्या नॅशनल कॉलेज मध्ये पुढील शिक्षण सुरु केले. 

 

मित्रांनो अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi या पोस्ट मध्ये आपण आतापर्यंत भगतसिंग यांचे बालपण आणि त्यात त्यांच्यामधल्या क्रांतिकाऱ्याची झलक पहिली. क्रांतिकारी संघटनेशी त्यांचा संबंध आणि त्यांचे क्रांतीतील योगदान हे आपण अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi या पोस्ट मध्ये पुढे पाहणार आहोत. 

 

Also Read 

 

 

 क्रांतिकारी संघटनांशी संबंध आणि भटकंती 

 

महात्मा गांधींच्या चळवळीपासून दूर गेल्यानंतर महाविद्यालयीन जीवनात क्रांतिकारकांची जीवनचरित्र वाचून सशस्त्र क्रांतीचे भगतसिंग यांना आकर्षण वाटू लागले. अश्या संघटनेचा शोध घेत असतांना त्यांची भेट सचिंद्रनाथ सन्याल यांच्याशी झाली. 

भगतसिंग यांनी सचिंद्रनाथ संन्याल यांना त्यांच्या संघटनेत सामावून घेण्याची विनंती केली. तेव्हा सचिंद्रनाथांनी त्यांना घर सोडण्याची आणि अविवाहित राहण्याची अट घालून त्यांच्या संघटनेत समाविष्ट करून घेतले. या काळात कॉलेज,वाचन व उरलेल्या वेळात क्रांतिकारी संघटनेचे काम भगतसिंग यांनी सुरु केले. 

कॉलेजात असतांना भगतसिंगांची आजी आजारी पडली. तेव्हा ते सचिंद्रनाथांची परवानगी घेऊन तिला भेटायला घरी गेले. घरी आल्यावर भगतसिंग आजीची सेवा करू लागले आणि आजीची तब्येत सुधारायला लागली.तेव्हा आजीने भगतसिंगांच्या लग्नाचा आग्रह धरला. त्यावर विवाह न करता देशसेवा, समाजसेवा करण्याचा त्यांचा निर्णय कुटुंबीयांसमोर घोषित करून भगतसिंग १९२३ ला वयाच्या सोळाव्या वर्षी घर व कॉलेज सोडून कानपुर ला निघून गेले. 

कानपूरला त्यांचा अनेक विचारवंत क्रांतिकारकांशी संबंध आला. त्यांच्याशी चर्चा,वाद-विवाद, संवादातून भगतसिंग घडत असतांना साम्यवादी विचारसरणीकडे वळले. याच काळात त्यांनी गणेश शंकर ‘विद्यार्थी’ यांच्या ‘प्रताप’ या वृत्तपत्रातून ‘बळवंतसिंग’ या नावाने लिखाण केले. 

एक शीख बंगालमध्ये कसा? याचस इंग्रजांना संशय येऊ नये म्हणून गणेश शंकर विद्यार्थी यांनी त्यांच्या ओळखीने अलिगढ जिल्ह्यातील खैर तालुक्यातील शादीपूर गावात नॅशनल स्कुलचे  मुख्याध्यापक केले. शादी न करण्याचा निर्णय घेतलेले भगतसिंग शादीपूर मध्ये ज्ञानदान आणि क्रांतिचळवळ यांत मग्न झाले. 

इकडे त्यांनी घर सोडल्यापासूनच त्यांच्या आजीची तब्येत बिघडत गेली. शेवटी तर तिने ‘ मला भगतसिंगला बघायचे आहे असा हट्टच धरला. भगतसिंग कुठे आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते म्हणून त्यांच्या वडिलांनी ‘वंदे मातरम’ या वृत्तपत्रात ‘ आम्ही तुला लग्नाचा आग्रह करणार नाही. तू परत ये.’ अश्या आशयाची जाहिरात देऊन आजीची परिस्थिती सांगून घरी परत येण्याचे आवाहन केले. परिणामी भगतसिंग  पुन्हा परत आपल्या गावी बंगा ला आले. 

 

 

‘बंगा ‘ मधील कार्य -अकाली चळवळ 

 

 भगतसिंग मुळातच चळवळी वृत्तीचे होते. ते कुठेही राहिले असते तर शांत बसले नसते. गावात आल्यानंतरही त्यांनी आपला वसा कायम ठेवला. पंजाब प्रांतात त्या काळात दोन गट पडले होते. गुरुद्वारांचा ताबा महंतांकडे होता आणि ते त्या पैशाचा दुरुपयोग करीत होते त्याला अकाली दलाचा विरोध होता. 

गुरुद्वाराचा पैसा हा समाजाचा पैसा आहे. आणि त्याचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा अशी अकाली दलाची मागणी होती. त्यामुळे त्यातून महंत विरुद्ध अकाली दल अशी परिस्थिती निर्माण झाली. यात पोलिसांनी महंतांची बाजू घेतली त्यामुळे अकाली दलाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरु झाला. 

अकाली दलाने आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दलाचे जत्थे गावोगाव पाठवणे सुरु केले. असाच एक जत्था बंगा मध्ये येणार होता. भगतसिंग आणि त्यांचे कुटुंब अकाली दलाच्या बाजूने होते. तर त्यांचे चुलत चुलते महंतांच्या बाजूने होते. गावात येणाऱ्या जत्थ्याची संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी भगतसिंगांच्या वडिलांनी उचलली होती. 

मात्र ऐनवेळी किशनसिंग यांना इन्शुरन्सच्या कामानिमित्त मुंबईला जावे लागले. त्यामुळे ती सर्व जबाबदारी भगतसिंग यांच्यावर येऊन पडली होती. भगतसिंग यांच्या चुलत चुलत्याने तर गावात दहशत निर्माण केली होती. कोणीही जत्थ्याचे स्वागत करणार नाही अशी त्याने गाव वाल्यांना धमकी देऊन ठेवली होती. सर्व गाव घाबरले पण भगतसिंग यांनी आपल्या मित्रपरिवाराला घेऊन रातोरात सगळी सोय करुन जत्थ्याचे जोरदार स्वागत केले. 

हे स्वागत पाहून एक दिवस थांबणारा जत्था गावात चांगला तीन दिवस मुक्कामी थांबला. त्यामुळे त्यांच्या चुलत चुलत्याने पोलिसात भगतसिंग विरुद्द खोट्यानाट्या फिर्यादी दाखल केल्या. भगतसिंग यांचे वय १८ वर्षे पण नसताना पोलिसांनी त्यांच्या नावे पकड वारंट काढले. त्यामुळे त्यांनी पुन्हा गाव सोडले. 

 

 

नौजवान भारत सभा आणि पुढील वाटचाल

 

भगतसिंग यांनी वयाच्या १८ व्य वर्षी तरुणांना संघटित करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी १९२६ ला ‘नौजवान भारत सभा’ नावाची संघटना स्थाप केली. हि संघटना स्थापन करण्यात सुखदेव, भगवतीचरण आणि यशपाल यांनी मदत केली. या सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून रामकिसन (नंतर पंजाबचे मुख्यमंत्री बनले) तर जनरल सेक्रेटरी म्हणून भगतसिंग यांची निवड करण्यात आली. 

भारतातील शेतकरी, मजुरांचे स्वतंत्र गणराज्य उभे करणे, तरुणात देशभक्ती रुजवणे, अनिष्ठ रूढी परंपरा दूर करणे, भारतात धर्मनिरपेक्षता -समाजवाद रुजविने इत्यादी या सभेची उद्दिष्ट्ये होती. याच सभेने भारतात सर्वप्रथम ‘ संपूर्ण स्वातंत्र्याची’ घोषणा केली. इंग्रजांनी ज्यांना फाशी दिली होती ते गदर चे तरुण संस्थापक क्रांतिकारी कर्तारसिंग सराभा यांना नौजवान भारत सभा आदर्श मानत असे. 

नौजवान भारत सभा कर्तारसिंग यांचा शहीद दिन’ बलिदान दिन’ म्हणून साजरा करीत असे.शहीद कर्तारसिंग यांच्या प्रतिमेला त्या काळात वंदन करतांना दुर्गभाभी आणि सुशीला देवी यांनी आपली बोटे चिरून कर्तारसिंगच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावला होता. याची त्याकाळात समाजात बरीच चर्चा झाली होती. 

नौजवान भारत सभा त्याकाळात गावागावात पोचली होती. या सभेचा जाहीरनामा, कार्यक्रम वाचून त्यावेळेचे रशियाचे पंतप्रधान कॉम्रेड स्टालिन यांनी भगतसिंग यांना रशियाभेटीचे निमंत्रण दिले होते. वयाच्या १८ व्य वर्षी एखाद्याला एका देशाच्या पंतप्रधानांनी भेटीचे निमंत्रण द्यावे म्हणजे भगतसिंग किती ग्रेट असतील याचा आपण विचारही करू शकत नाही. 

 

 

अटक, जामीन आणि अज्ञातवास  

 

चंद्रशेखर आझाद यांच्या ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीने काकोरी ला जाणारी ट्रेन घेऊन जात असलेला सरकारी खजिना लुटला होता. त्याच अनुषंगाने कोर्टात खटला चालत होता. हा खटला ‘काकोरी कट  खटला’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे प्रकरण चांगले दीड वर्ष चालले. भगतसिंग या खटल्याच्या वेळी नेहमी कोर्टात हजार राहत. त्यामुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर बसली होती. पोलिसांनी तर काकोरी कटात त्यांना ओढण्याचा प्रयत्नही केला. पण कुठलाही पुरावा नसल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. 

पुढे १९२४ ते १९२९ या काळात भारतभर हिंदू मुस्लिम धार्मिक दंगली झाल्या. त्याच काळात अमृतसर येथील दसरा  महोत्सवात १९२६ साली बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाशीही भगतसिंग यांचा काहीएक संबंध नसतांना पोलिसांनी १९२७ ला त्यांना अटक केली. भगतसिंग यांच्या वडिलांनी चांगला वकील नेमून भगतसिंग यांची जमानत घेतली.

  जामिनावर सोडतांना त्यांना अट  घालण्यात आली होती कि ते कुठल्याही क्रांतिकार्याशी संबंध ठेवणार नाही. त्यांनी तसे केले असता जामीन देणाऱ्यांना त्रास होईल हे उघडच होते. त्यामुळे भगतसिंग यांच्या वडिलांनी त्यांना लाहोरजवळील खसरिया गावात दुधाचा व्यवसाय उभारून दिला.

पण भगतसिंगांच्या आत्म्याला क्रांतिकार्याशिवाय स्वस्थता येणार तरी कशी? त्यांनी जामिनातून मुक्ती करण्यासाठी कोर्टाची वारंवार विनंती केली. आणि ज्यावेळी त्यांची जामिनातून मुक्तता झाली त्यावेळी त्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून लगेच भूमिगत होऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. 

 

 

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन 

 

डिसेंबर १९२७ ला काकोरी कटातील क्रांतिकाऱ्यांना फाशी देण्यात आली. इकडे १९२८ ला भगतसिंग यांची कोर्टाने जामिनातून मुक्तता केली. भगतसिंग भूमिगत झाले आणि देशात विविध ठिकाणच्या वृत्तपत्रांतून वेगवेगळ्या टोपण नावाने त्यांनी लेख लिहूनत्यांनी समाज जागृती केली. 

काकोरी कटातील क्रांतीकारकांना फाशी दिल्यावर चंद्रशेखर आजाद आणि भगतसिंग यांना एकत्र काम करण्याची गरज वाटू लागली. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ८व ९ सप्टेंबर १९२८ रोजी नौजवान भारत सभा आणि हिंदुस्थान रिपब्लिक असो. या दोन्ही संघटनांचे नेते खंडहरा गावात एकत्र जमले. 

तेथे त्या सर्वांनी आपल्या दोन्ही संघटना एकत्र करून एकच नवी संघटना निर्माण करण्याचा निर्णय घेतला. नवीन संघटनेचे नाव ‘ हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन ठेवण्यात आले,या बैठकीला चंद्रशेखर आझाद हजर नसले तरी बैठकीतील निर्णयाला त्यांची अगोदरच मान्यता होती. 

या संघटनेचे सेनापती म्हणून चंद्रशेखर आझाद यांना  निवडण्यात आले तर सर्व प्रांतांशी समन्वय साधण्याची जबाबदारी भगतसिंग यांच्यावर सोपवण्यात आली. या संघटनेची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती-

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर गोऱ्यांच्या जागी काळे भांडवलदार, प्रस्थापित न येता शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी यावेत. 
  • स्वातंत्र्य मिळविणे आद्यकर्तव्य पण स्वातंत्र्य कशासाठी? कोणासाठी?या विषयावर जनजागृती करणे इत्यादी हेतू समोर ठेवून ही  क्रांतिकारी संघटना स्थापन झाली.   

 

 

Also Read 

 

 

लालाजींच्या हत्येचा बदला 

भारतातील प्रशासनाचे भवितव्य ठरवण्यासंबंधी सुधारणा सुचवण्यासाठी इंग्रज सरकारने एक कमिशन नेमले होते. त्याचे अध्यक्ष ‘सर जॉन सायमन’ होते. भारतीयांच्या भवितव्याबाबत योजना सुचवणाऱ्या या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नसल्याने भारतात जागोजागी त्याच्या विरोधात निदर्शने केली जात होती. 

लाहोरमध्ये सायमन कमिशन विरोधी मोर्चाचे नेतृत्व लाला लाजपतराय करीत होते. त्यावेळी पोलीस सुपरिंटेंडेंट स्कॉट स्वतः बंदोबस्ताला होता. लालाजींविषयी तसा आकस त्याच्या मनात होताच. स्कॉट ने लोकांवर लाठीहल्ल्याचा आदेश दिला. या लाठीहल्ला करणाऱ्या तुकडीचा प्रमुख सँडर्स होता. 

लालाजी सर्वांत समोर असल्याने त्यांना जबर मार बसला. त्यांच्या मस्तकावर, छातीवर लाठ्यांचे जे प्रहार झाले त्यांमुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले, परंतु यश आले नाही. शेवटी या लाठीहल्ल्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींच्या मृत्यू झाला. 

लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असो. च्या कार्यकर्त्यांनी ठरवले. भगतसिंग, राजगुरू आणि आझाद यांनी लालाजींच्या हत्येला जबाबात असणाऱ्या स्कॉट ला ठार करून लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचे आणि सोबतच त्याद्वारे इंग्रजांच्या मनात दहशत बसवण्याचे ठरवले. 

बरोबर एक महिनानंतर म्हणजे १७ डिसेंबर १९२८ ला संपूर्ण योजनेनीशी भगतसिंग आणि त्यांचे सहकारी तयार होते. भगतसिंग आणि राजगुरू स्कॉट वर हल्ला करणार होते तर आझाद त्यांच्या मदतीसाठी बाजूला उभे होते. मात्र ऐनवेळी स्कॉट ऐवजी सँडर्स मोटरसायकलवर तेथे आला. 

सँडर्स ला ठार करणे हा काही त्यांचा उद्देश्य नव्हता पण जर तसे नसते केले तर योजना पूर्ण फसली असती आणि तसे पाहता तोही लालाजींच्या मृत्यूला जबाबदार होताच. म्हणून मग भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॅंडर्सवर गोळ्या झाडल्या. 

सँडर्सच्या मागे छगनलाल म्हणून एक पोलीस अधिकारी होता. तो खून-खून म्हणत यांच्या मागे लागला तेव्हा चंद्रशेखर आझादांनी त्याला जखमी केले आणि तिघेही तेथून निसटले. इकडे सॅंडर्सच्या वाढणे इंग्रज हादरले असतांना दुसऱ्याच दिवशी त्याच्या खुनाची जबाबदारी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असो. च्या वतीने स्वीकारनारे पत्रक भगतसिंग यांनी काढले. 

पत्रकावरून इंग्रज कसून या तरुण क्रांतिकाऱ्यांचा  शोध घेऊ लागले होते. पण तोपर्यंत इकडे वेष बदलून भगतसिंग आणि इतर सारे कलकत्त्याला पोहचले होते. आज आपण भगतसिंग यांचा जो कोटसूटमधला, डोक्यावर हॅट  असणारा फोटो पाहतो तो याच वेषांतराच्या वेळेचा आहे. 

 

   

बहिऱ्यांसाठी धमाका 

 

 भारतीय कायदेमंडळात दोन अन्यायकारक कायदे पारित होणार होते. एक होता ‘ सार्वजनिक सुरक्षा कायदा ‘ ज्याद्वारे कोणालाही संशयावरून अटक करता येणार होती. आणि दुसरा कायदा होता ‘ औद्योगिक कलह कायदा’ ज्याद्वारे कोणत्याही कामगारांना संप, निदर्शने करता येणार नव्हती. 

जनतेचा, नेत्यांचा, पत्रकारांचा विरोध असूनही हे कायदे पारित करून घेण्याची सरकारची योजना होती. या कायद्यांविरुद्ध काहीतरी करावे असे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असो. च्या कार्यकर्त्यांनी ठरवले. तेव्हा कायदेमंडळात कुणालाही हानी न होता बॉम्ब फेकण्याचे ठरले. 

मूळ योजनेमध्ये कायदेमंडळात बॉम्ब आणि पत्रके फेकून तिथून निसटणे समाविष्ठ होते. आझादांनी बॉम्ब फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची पूर्ण तजवीजही केली होती. मात्र भगतसिंग यांनी तसे पळूण जाण्यापेक्षा कोर्टात चालणाऱ्या खटल्यांद्वारे आपली बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून घेण्याची योजना मांडली. ती सर्वांना पटली. आणि त्यानुसारच कार्य झाले. 

आणि तो दिवस उजाडला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त कायदेमंडळात जाऊन बसले होते. कुणालाही इजा न होता बॉम्ब फेकला असता केवळ आवाज होईल अशी जागाही भगतसिंग यांनी हेरून ठेवली.आणि ज्यावेळी अर्थमंत्री जॉर्ज शुस्टर  बिलाची सूचना देण्यासाठी उभा राहिला त्याचवेळी भगतसिंग यांनी सभागृहाच्या रिकाम्या जागेत बॉम्ब फेकला. 

बॉम्बचा मोठा आवाज झाला. सगाडीकडे धुरच धुर होता. त्या धुरामध्येहि स्पष्ट्पणे दोन क्रांतिकारी चमकत होते. ‘इन्कलाब जिंदाबाद‘च्या घोषणा देत. होते. पत्रके भिरकावत होते.सुरुवातीला विधिमंडळातील पोलीस बाहेर पळून गेले होते. नंतर ते भीत भीत आत आले. पण कोणाचीही या दोघांना सामोरे जाण्याची व अटक करण्याची  हिम्मत होत नव्हती. 

शेवटी भगतसिंग यांनी आपले पिस्तूल खाली टाकले आणि दोघेही स्वतः पोलिसांच्या हवाली झाले. दुसऱ्या दिवशी जगभर या बातमीने धुमाकूळ घातला.यांच्यासाठी भले भले वकील उभे ठाकले. पण भगतसिंग यांनी आपण वकील देणार नसून स्वतःची बाजू स्वतः मांडणार असल्याचे स्पष्ट केले. 

विधिमंडळात बॉम्ब फेकल्याच्या खटल्याची सुनावणी दिल्लीच्या तुरुंगातच ८ जून १९९ रोजी सुरु झाली. सेशन जज समोर वकील न देता भगतसिंग यांनी आपली बाजू मांडली . ‘ कुणालाही इजा न पोचवता बहिऱ्या सरकारला आपले गाऱ्हाणे ऐकू जावे यासाठी हा बॉम्ब स्फोट घडवून आणल्याचे ‘ स्पष्ट केले.जज ने आपला निकाल १२ जून १९२९ ला जाहीर केला. या निकालानुसार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

शिक्षा ऐकून  भगतसिंग यांना आनंदच झाला. मात्र ते एवढ्यावरच थांबणारे नव्हते. त्यांनी सदर प्रकरण जनतेसमोर जावे म्हणून हायकोर्टात अपील केला. तेथेही त्यांनी आपली बाजू कशी उचित आहे ते स्पष्ट केले. भगतसिंग यांचे निवेदन ऐकून हायकोर्टाचे न्यायाधीश एफ. फोर्ड यांनी निकालात शेरेवजा टिपणी लिहिली की , 

“भगतसिंग हे एक इमानदार क्रांतिकारक आहेत. पण त्यांच्या गुन्ह्याची तरफदारी मी करू शकत नाही.” 

 

 

 

पुस्तकासाठी अन्नत्याग 

 

हायकोर्टात अपील केले तेव्हा भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना तुरुंगातील राजकीय बंद्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. त्यांना विविध मार्गांनी त्रास दिल्या जात होता. तासन तास उभे ठेवणे, रात्र रात्र झोपू न देणे, मानसिक संतुलन बिघडावे असे सर्व प्रयत्न चालू होते. हे सर्व ते हसत हसत सहन करीत होते. 

मात्र त्यांना पुस्तक वाचण्यावर बंदी आणल्यावर त्यांनी अन्नत्यागाची घोषणा केली. १५ जून १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी अन्नत्याग सुरु केला.इतर कैद्यांनाही ३० जून १९२९ रोजी या अन्नत्यागाला ‘भगतसिंग दिन’ पळून पाठिंबा दिला. 

याचदरम्यान लाहोर कात खटल्याच्या कामानिमित्त भगतसिंग यांना लाहोर कोर्टात आणले गेले. १० जुलै १९२९ रोजी सर्व क्रांतिकारकांची लाहोर कोर्टात भेट झाली. सर्वांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणांनी कोर्टाचा परिसर दणाणून सोडला. या काळात भगतसिंग यांचा अन्नत्याग सुरु होता. त्यामुळे त्यांना स्ट्रेचरवर कोर्टात आणलेले होते. 

क्रांतिकारकांनी अन्नत्याग सोडावा म्हणून बरेच प्रयत्न चालले होते. पण त्या प्रयत्नांना क्रांतिकारकांच्या मनोबलाने थोडीही दाद दिली नाही. अन्नत्यागाच्या ६३ व्य दिवशी जतींद्र दास यांचा बोर्स्टल तुरुंगात मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीला लाखोंचा समुदाय गोळा झाला. ते पाहून इंग्रज हादरले. शेवटी ५ ओक्टोम्बर १९२९ रोजी उपोषणाच्या ११४ व्या दिवशी सरकारने क्रांतिकारकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. 

पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ११४ दिवसांचे उपोषण करणे हे जगातील एकमेव घटना होय. भगतसिंग यांना पुस्तके वाचायची परवानगी मिळताच त्यांनी प्रचंड वाचन करायला सुरुवात केली. १९२९ ते १९३१ या दोन वर्षांत त्यांनी प्रचंड वाचन आणि लेखन केले. कोणीही भेटायला येतांना काही खायला आणण्यापेक्षा पुस्तके आणावीत हा त्यांचा आग्रह असे. 

 

 

अखेरची झुंज    

 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक झटत आले होते. मात्र यावेळी त्यांची झुंज ही त्यांच्या स्वतःशीच होती. एक तर फाशी किंवा जन्मठेप मिळणार हे तर त्यांना ठाऊक होतेच. तेव्हा ते तर रोअजच मरणाला धाडसं समोर जात होते. मात्र तशातही इंग्रज अधिकारी नित्यनेमाने त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करीत होते. 

क्रांतिकारक न्यायालयाचा वापर  करून जनजागृती करीत आहेत हे जेव्हा इंग्रज सरकारच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लाहोर खटल्यासाठी एका विशेष ट्रिब्युनल ची निर्मिती केली. या ट्रिब्युनल ला अनेक अधिकार देण्यात आले. ज्यात यांच्या निर्णयावर पुढे अपील करता न येणे, फाशीची शिक्षा सुनावणे इत्यादी अधिकारांचा समावेश होता.

या विशेष ट्रिब्युनल ने आपला निकाल स्वतः जाहीर न करता एक विशेष दूत कारागृहात पाठवून त्यांच्याद्वारे त्यांनी ७ओक्टोम्बर १९३० रोजी निकाल जाहीर केला. या निकालानुसार सँडर्स च्या वधाबद्दल सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा घोषित झाली. त्यांच्या इतर सहकाऱ्यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. 

फाशीच्या शिक्षेची वार्ता लोकांत पोचताच भारतभर सर्वत्र असंतोष पसरला. सर्वत्र सभा, मिरवणूका, मोर्चे निघाले. या क्रांतिकारकांवर विशेषांक निघाले. लाहोर ला इंग्रजी सत्तेविरुद्ध फार मोठी सभा झाली. भगतसिंगांच्या वडिलांनी व्हाइसरायला बचकवासाठी वेळ मिळावा म्हणून विनंती अर्ज केला होता ही  बाब भगतसिंगांना आवडली नव्हती. त्याबद्दल त्यांनी पत्राद्वारे नाराजी व्यक्तही केली होती. 

भगतसिंग आणि त्यांचे सहकारी कारागृहात असतांना इकडे चंद्रशेखर आझाद बाहेर होते. २७ फेब्रुवारी १९३१ ला झालेल्या आल्फ्रेड पार्कमधील धुमश्चक्रीत त्यांना हौतात्म्य आले. एक एक सोबती असा सुटत असतांना, आपले मरण समोर दिसत असतांना मनोधेर्य टिकवून ठेवणे हे खरच मोठे कठीण काम होते. 

 

दयेचा अर्ज  

 

 फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे दयेचा अर्ज. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांनीही त्यावेळी गव्हर्नरला एक अर्ज लिहिला होता. मात्र हा अर्ज जगावेगळा होता. यात जीवांची भिख मागितली नव्हती. 

या अर्जात त्यांनी म्हटले होते की  “ आमच्यावर इंग्लंडचे सम्राट पंचम जॉर्ज यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा आरोप आहे. म्हणजेच आम्ही युद्धकैदी आहोत. युद्धकैद्यांना गोळ्या घालून मारले जाते. तेव्हा आम्हाला फाशी न देता गोळ्या घालून मारले जावे. त्यासाठी कृपा करून आपण आम्हाला मृत्युदंड देण्यासाठी सैनिकांची तुकडी पाठवण्याचा आदेश आपल्या सैन्य विभागाला द्यावा.”

अर्जाचा विषय आणि भाषा बघता साहजिकच तो फेटाळला जाणार हे निश्चित होते. मात्र जाता जाता आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा हे तरुण क्रांतिकारी या पत्राद्वारे लावून गेले. 

 

 

शेवटचा क्षण 

 

भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना कोर्टाच्या आदेशानुसार २४ मार्च १९३१ ला फाशी दिली जाणार होती. गुप्तहेरखात्याच्या माहितीनुसार फाशीच्या दिवशी जेलबाहेर प्रचंड गर्दी होणार हे इंग्रजांना ठाऊक होते. फाशी नंतर क्रांतिकारकांची न भूतो न भविष्यती अशी प्रचंड अंत्ययात्रा निघणार आहे याची त्यांना जाणीव होती. 

फाशीच्या दिवशी आणीबाणीचा प्रसंग निर्माण होऊ शकतो याची कल्पना इंग्रजांना होती. आणि त्याची त्यांनी धास्तीच घेतली होती. लोकदबावामुळे गोंधळ होऊन हे क्रांतिकारी कदाचित त्यात फरारही  होऊ शकतात असे त्यांना वाटत होते. आणि तसे झाले तर त्यांच्या जुलमी साम्राज्याला ते कधीच परवडणारे नव्हते. 

परिस्थिती लक्षात घेता इंग्रजांनी या तिघांनाही एक दिवस अगोदरच फाशी देण्याचे ठरवले. त्यानुसार २३ मार्चला सायंकाळी त्यांना ७ वाजून ३३ मिनिटांनी फाशी देण्यात आली. फाशी देण्यासाठी न्यायला ज्यावेळी पोलीस भगतसिंग यांच्याकडे आला तेव्हा ते ‘लेनिन’ बद्दल वाचत होते. 

पोलिसाने वेळ झाल्याचे सांगताच कुठलाही ब्र न काढता, त्यांनी फक्त दोन मिनिटांचा अवधी मागितला. ते म्हणाले की “  थोडा वेळ द्याल का? हि शेवटची दोन पाने बाकी आहेत. एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकाऱ्याला भेटतो आहे.”  

 

 

 

समारोप  

 

मित्रांनो अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi या पोस्ट मध्ये आपण भगतसिंग यांची माहिती घेतली. त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात समजून घेतला. त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटनांवर या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. 

 

मित्रांनो मी काही स्वतः इतिहास संशोधक नाही. मात्र अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi ही पोस्ट अगदी विश्वसनीय स्रोतांतून माहिती घेऊन लिहिली आहे. ही  पोस्ट लिहीत असतांना मला दोन पुस्तकांचा खूप उपयोग झाला. प्रदीप सोळुंके लिखित वीर भगतसिंग आणि खुद्द भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे?’ या दोन पुस्तकांतून मी सदर  माहिती संकलित केली आहे. 

 

मित्रांनो अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathiया पोस्ट मध्ये आपण फक्त भगतसिंग यांच्याविषयी वस्तुनिष्ठ अशी माहिती पाहिलीत. भगतसिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू, त्यांचे विचार, त्यांचे वाचनवेड  याविषयी एक सविस्तर पोस्ट नंतर लिहिणार आहे. कारण येथे ती माहिती देणे हे शब्दमर्यादेला दारुण होणार नाही. 

 

तर मंडळी तुम्हाला अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathiही  पोस्ट कशी वाटली? ते आम्हला नक्की कळवा. सोबतच या पोस्ट मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्याही कळवा.

 

अमर शहीद भगतसिंग यांची माहिती।Bhagatsingh information in marathi ही  पोस्ट अधिक माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरावी यासाठी तुमचेही सहकार्य आवश्यक आहे. तुमाचीकडे असणारी माहिती आम्हाला संदर्भासहित कंमेंटमध्ये कळवा. आम्ही ती पोस्टमध्ये नक्की समाविष्ठ करू. 

धन्यवाद !

Leave a Comment