पहिला मराठी चित्रपट – राजा हरिश्चंद्र

नमस्कार मित्रांनो! मराठी मोटिवेशन या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत प्रेरणादायी विचार, जगाबद्दलची माहिती आणि बऱ्याच मनोरंजनात्मक स्वरूपाच्या आणि सोबतच तेवढीच आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या गोष्टी शेअर करीत असतो. आजही आम्ही अशीच एक मजेशीर पोस्ट घेऊन आलो आहोत.

मंडळी काही दिवसांपूर्वी के जी एफ नावाचा एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात रॉकी भाई ने जी धम्माल केली आहे ती तर सर्वांनाच ठाऊक आहे. केजीएफ चा चाहता नसेल असा व्यक्ती निराळाच म्हणावा लागेल. या चित्रपटाने तर कमाईच्या उच्चांकामध्ये अगदी मानाचे स्थान पटकावले आहे.

इकडे हिंदी चित्रपटसृष्टीही भूल भुलय्याच्या तालावर कार्तिक आर्यनसोबत फेर धरत आहे. मराठी मध्येही आज उंच्च कोटीचे चित्रपट निर्माण होत आहेत. दिगपाल लांजेकर द्वारा दिग्दर्शित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट तर आपल्याला शिवकालीन इतिहासाचे जणू दर्शनच घडवत आहेत.

आज मनोरंजनाच्या जगतात मोठी उलथापालथं सुरु आहे.जवळ जवळ दर दोन दिवसाला कुठला ना कुठला चित्रपट सुरु होतच असतो. मात्र हे सगळं होत असतांना बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की पहिला चित्रपट कोणता असावा? त्यातही मराठी माणूस म्हटलं तर आपल्या मनात येईल कि पहिला मराठी चित्रपट कोणता? हा पहिला मराठी चित्रपट कोणी काढला ? तो कसा बनवला गेला असेल?

मित्रांनो आज या साऱ्या कुतुहुलाने भरलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही पहिला मराठी चित्रपट या पोस्ट च्या माध्यमातून करणार आहोत. पहिला मराठी चित्रपट तयार करण्याची कथा हि केवळ मनोरंजनात्मक नसून मराठी अस्मिता आणि गौरवाची आठवणही आहे. आणि एका मराठी माणसाच्या धडपडीची साक्ष देणारी प्रेरणादायी गाथासुद्धा आहे.

 

आणखी वाचा

 

 

पहिला मराठी चित्रपट

मंडळी जेव्हा प्रश्न चित्रपटांचा आहे तर  आपल्याला चित्रपटांचा इतिहास माहिती असणे गरजेचे ठरते. म्हणून आपण आधी थोडक्यात चित्रपट निर्मिती कशी सुरु झाल? चित्रपटांची संकल्पना कशी विकसीत ? इत्यादी बाबींचीही माहिती घेऊयात.

 

चित्रपटाचा इतिहास

 

पहिला मराठी चित्रपट कोणता ? या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर आपल्याला चित्रपटांचा इतिहास थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा जागतिक पातळीवर चित्रपटांची सुरुवात कशी झाली याची माहिती आपण आधी घेऊयात.

चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम असणारे एक बहुजन माध्यम आहे. चित्रपट हे लोकरंजन आणि लोकशिक्षनाचे प्रभावी साधन आहे. पडद्यावरील प्रतिमांच्या हालचालींतून जीवनाचे दर्शन घडवणारी ही कला मुळात छ्णिछायाचित्रण तांत्रिक कौशल्यांचे अपत्य आहे.

चित्रपटांची सुरुवात आपण चित्रकथी सारख्या पारंपरिक मनोरंजन प्रकारांत पाहू शकतो. चित्रकथी म्हणजे चित्रांच्या माध्यमातून एखादी गोष्ट किंवा जीवन उलगडून दाखवणे. मात्र त्यात चित्रे स्थिर, स्तब्ध असतात. हीच स्तब्ध आणि स्थिर चित्रे चालती बोलती झाली आणि जीवनाचे दर्शन घडवू लागली की या चित्रांचा पट मग आपला चित्रपट बनतो.

छायाचित्रणातील हलत्या चालत्या वस्तूंचे छायाचित्रण क्रमश करण्याचे तंत्रज्ञान सापडले आणि पुढे चित्रपटाच्या तंत्रज्ञानाला गती मिळाली. १८२४ मध्ये पीटर मार्क रोझे या संशोधकाने ‘हलत्या चालत्या वस्तूंचे दृश्यसातत्य’ या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केला. याच तत्वाचा आधार घेऊन चित्रपटाच्या संकल्पनेचा विस्तार झाला.

या विस्तारात मग कालानुरूप बदल नवनवीन कल्पनांची भर त्यात पडत गेली. नवे नवे प्रयोग होत गेले.मारे च्या १८८२ च्या सेकंदाला ६० फोटो काढणाऱ्या गन पासून पुढे हळू हळू तंत्रज्ञानाचा प्रवास आजच्या आधुनिक कॅमेऱ्यांपर्यंत पोचला तस तशी चित्रपटनिर्मितीची गती वाढत गेली.

आधी चालती चित्रे आली.त्यातून सुरुवातीचे छोटे मोठे चित्रपट तयार झाले. पण हे सुरुवातीच्या काळातील चित्रपट मूक होते. कुठल्याही ध्वनीची त्यांना साथ नव्हती. पुढे ध्वनी मुद्रकाचा शोध लागला. मग चित्रांसोबत ध्वनीची सांगड घालून चित्रपट तयार होऊ लागले.

आपण माहिती घेत असलेला पहिला मराठी चित्रपट-राजा हरिशचंद्र हा सुद्धा एक मूकपट होता.या चित्रपटाची पूर्ण माहिती घेण्याअगोदर आपण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक ज्यांना म्हटले जाते त्या थोर माणसाबद्दल- दादासाहेब फाळके यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

 

 

dadasaheb-falke

 

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक- दादासाहेब फाळके

 

आज चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भारताचे मोलाचे स्थान आहे. जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश म्ह्णून भारताची ओळख आहे.भारताला मुळात या सृष्टीची खरी ओळख  करून दिली ती म्हणजे दादासाहेब फाळके या मराठी माणसाने!

दादासाहेब फाळके यांचे मूळ नाव म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० ला झाला. नाशिक जवळ असणारे त्र्यंबकेश्वर हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील गोविंदराव हे संस्कृतमध्ये पंडित होते. ते मंदिरात पुजाऱ्याचे काम करीत. त्यामुळे संस्कृत साहित्याचे संस्कार दादासाहेबांवर अगदी बालपणीच झाले.

पुढे गोविंदराव यांची मुंबईच्या विल्सन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा दादासाहेबांचे संपूर्ण कुटुंब मुंबईला आले. मुंबईमध्येच दादासाहेबांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. चित्रकलेकडे असणारी त्यांची ओढ पाहून त्यांना जे जे स्कुल ऑफ आर्टस् ला ऍडमिशन घेतले.

जे जे स्कुल ऑफ आर्टस् सोबतच दादासाहेब फाळके यांनी बडोद्याच्या कलाभवनातील ऑइल पेंटिंग आणि वॉटर कलर पेंटिंग चा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्याचबरोबर वास्तुकला, मॉडेलळींग, छायाचित्रने अश्या अनेक गोष्टी ते स्वतःच्या कुतूहलातून शिकले.

१८९२ ला अहमदाबाद येथे एक प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात दादासाहेब फाळके यांनी नाट्यगृहाची एक प्रतिकृती मांडली होती. या प्रतिकृतीसाठी त्यांना सुवर्णपदक मिळाले. आणि खास बक्षीस म्हणून एक कॅमेरा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा छायाचित्रांचा छंद वाढीस लागला.

उपजीविकेसाठी त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय निवडला. गोध्रा या ठिकाणी एक फोटोस्टुडीओ त्यांनी थाटात उभा केला. मात्र तत्कालीन समाजासाठी हे सगळं अगदी नवं होतं . समाजातील अंध समजुतींपायी त्यांचा हा व्यवसाय फार काळ काही चालला नाही.

पुढे त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यामुळे त्यांचे मन गोध्रात काही रमेना. म्हणून मग ते बडोद्यात परत पोचले. आणि तेथे त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला. सोबतच ते नाटक कंपन्यांचे पडदे रंगवू लागले. त्यातून त्यांचा रंगभूमीशी जवळून परिचय झाला. त्यांनी शेक्सपिअरच्या काही नाटकांतून कामही केले. आणि नेपथ्य, दिग्दर्शन, लेखन, अभिनय अश्या रंगभूमीशी निगडित काही कला त्यांनी आत्मसात केल्या.

याच सुमारास बडोद्यात आलेल्या एका जर्मन जादूगाराकडून त्यांनी जादूचे प्रयोगही शिकून घेतले. मग काय ? आपली आडनावाचे स्पेल्लिंग उलटे करून डॉ.केल्फा बनून ते जादूचे प्रयोग करू लागले. कळत नकळत चित्रपटसृष्टीच्या जादूगाराची आपल्या कल्पकतेने काळाला अचंबित करण्यासाठी पूर्वतयारी सुरु होती.

१९०२ ला दादासाहेब फाळके यांचा दुसरा विवाह सरस्वतीबाई यांच्याशी झाला.किर्लोस्कर नाटक कंपनीचे मालक भाऊसाहेब कोल्हटकर हे त्यांचे मामा होते. त्यांच्या आणि रा. गो. भांडारकर यांच्या सल्ल्याने आणि मदतीने दादासाहेब सरकारच्या पुरातत्व विभागात छायाचित्रकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करू लागले.

या नोकरीच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण भारतभर चांगलाच प्रवास झाला. भारतातील वास्तुशिल्पे, लेणी, निसर्गवैविध्य इत्यादींचा त्यांनी चांगलाच अभ्यास करून घेतला. मात्र दरम्यानच्या काळात लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. या फाळणीच्या विरोधात भारतात वंग भंग आंदोलन सुरु झाले. अनेकांनी सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्यात दादासाहेब सुद्धा होते.

पुढे त्यांनी रा. गो. भंडारकरांच्याच मदतीने लोणावळा येथे फाळके एनग्रेव्हिन्ग अँड प्रिंटिंग वर्क्स हा छापखाना सुरु केला. या व्यवसायात त्यांची भरभराट होऊ लागली. आमचा व्याप वाढायला लागला तेव्हा त्यांनी छापखाना लोणावळ्याहून मुंबईत दादरला आणला.

छपाई चे तंत्रज्ञान अद्ययावत करण्याच्या उद्देशाने त्यांनी मुंबईतील एक धनाढ्य व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर भागीदारी केली आणि आता फाळके प्रिंटिंग वर्क्स चे नाव बदलून लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स असे करण्यात आले. याच दरम्यान दादासाहेब फाळके रंगीत छपाईचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी जर्मनीला जाऊन आले.
पुढे मावजी आणि दादासाहेब यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दादासाहेब लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स मधून बाहेर पडले.

लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स मधून बाहेर पडल्यानंतर आता पुढे काय करायचे ? हा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा होता. या विचारात असतांनाच ते सहजच फिरायला गेले होते. तेथे त्यांनी ‘ लाईफ ऑफ ख्राईस्ट’ हा चित्रपट पहिला. तो पाहून त्यांच्या मनात आले की आपणही असेच काही का बनवू नये? आणि मग चित्रपट बनवण्याच्या वेडाने त्यांना झपाटून टाकले.

चित्रपट बनवण्यासाठी लागणारे सगळे कौशल्य दादासाहेब फाळके यांनी अगोदरच आत्मसात केले होते. आता वेळ होती ती म्हणजे त्या कौशल्यांना कार्यी लावण्याची. दादासाहेबांनी आपल्या बुद्धीचा कस लावून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर उपाय शोधले. ते करत असतांना त्यांची प्रयोगशील वृत्ती फार उपयोगी आली.

 

Also Read

 

पहिला मराठी चित्रपट – राजा हरिश्चंद्र

 

राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी चित्रपट तर होताच सोबतच तो पहिला भारतीय चित्रपट सुद्धा होता. हा एक मूक चित्रपट होता. म्हणजेच या चित्रपटामध्ये ध्वनी नव्हता. फक्त चित्र दिसायचे. एक प्रकारे चार्ली चॅप्लिन च्या चित्रपटाप्रमाणे कुठलाही डायलॉग नसणारा तो चित्रपट होता.

राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी चित्रपट ३ मे १९१३ ला प्रदर्शित करण्यात आला.या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीही दादासाहेब फाळके यांनी केले. भारतीय पुराणांतील राजा हरिश्चंद्र याच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता.

राजा हरिश्चंद्र या चित्रपटामध्ये दादासाहेब फाळके यांच्यासोबत दत्तात्रय दामोदर डबके, अण्णा साळुंके, भालचंद्र फाळके, गजानन वासुदेव साने,इत्यादींनी काम केले. या चित्रपटात दत्तात्रय दामोदर डबके हे राजा हरिश्चंद्राच्या मुख्य भूमिकेत होते.अण्णा साळुंके यांनी हरिश्चंद्राच्या पत्नीची, तारामतीची भूमिका निभावली. भालचंद्र फाळके रोहितश्व बनले होते. तर गजानन वासुदेव साने यांनी विश्वामित्राची भूमिका केली.

एकुणात ४० मिनिटांच्या या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीचे कार्य त्रंबक ब .तेलंग यांनी सांभाळले. मुळात जरी हा एक मुका चित्रपट असला तरी मध्ये मध्ये एक निवेदक थोडे माहितीपर निवेदन देत असे. हे निवेदन हिंदी,इंग्रजी आणि मराठी अश्या तीनही भाषांत दिले जाई .

या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये सगळ्याच भूमिका पुरुषांनीच केल्या आहेत. स्त्रीची भूमिकासुद्धा! स्त्री म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंतच महत्व असणारा विषय. अशी संकुचित विचारसरनी असणाऱ्या त्या काळात स्त्री कलाकार भेटणे फार कठीण होते. तेव्हा राजा हरिश्चंद्र मध्ये स्त्रियांच्या भूमिका या पुरुषांनीच हाताळल्या.

 

समारोप

 

मित्रांनो आज आपण पहिला मराठी चित्रपट- राजा हरिश्चंद्र या पोस्ट मध्ये आपल्या मराठी मातीतील पहिल्या चित्रपटाविषयी माहिती घेतलीत. सोबतच हा पहिला मराठी चित्रपट बनवणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या जीवनाचाही थोडक्यात परिचय करून घेतला.

मित्रांनो तुम्हाला पहिला मराठी चित्रपट- राजा हरिश्चंद्र हि पोस्ट कशी वाटली? या पोस्ट मध्ये तुम्हाला कुठल्या सुधारणा सुचतात? पहिला मराठी चित्रपट या विषयाशी निगडित आणखी कुठली माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

हि पोस्ट अधिक मनोरंजनात्मक आणि माहितीपर बनवण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे. तेव्हा पहिला मराठी चित्रपट- राजा हरिश्चंद्र या पोस्ट मध्ये ज्या काही सूधारना तुम्हाला सुचत असतील त्या आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a Comment