महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? व त्यांचे जीवनचरित्र। First CM of Maharashtra

नमस्कार  मंडळी, मराठी motivation या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजही खास तुमच्यासाठी मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी माहितीने भरलेली पोस्ट घेऊन आलो आहोत. आशा करतो कि पोस्ट तुम्हाला आवडेल. 

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राने भल्या मोठ्या राजकीय महानाट्याचे दर्शन घेतले. शिवसेनेतील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेतून बाहेर उडी घेतली.

ते सगळे गुवाहाटीला जाऊन बसले. तिथे त्यांची भाजपच्या वरिष्ठांशी काही चर्चा झाली. मग या बाहेर पडलेल्या आमदारांची आणि भाजप ची युती होऊन आपल्या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. 

हा जो घटनाक्रम झाला हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण या घटनेत मुख्यमंत्र्यांचे पद, या पदाचे महत्व आणि त्यासाठी राजकारणात कोण काय खेळ खेळेल या सगळ्याची प्रचिती आपल्या नव्या पिढीला आली. सध्या विकासासाठी राजकारण चालतं;पण त्यात नेमका विकास कुणाचा?जनतेचा की  नेत्यांचा ? हा प्रश्न मात्र नेहमी कायम राहतो. 

सोबतच मुख्यमंत्री पदासाठी एवढी उलथापालथ होत असतांना आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आज महाराष्ट्राची जी प्रगती आहे,त्यामध्ये त्यांचे योगदान काय आहे?नेमके कसे होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री? या पदासाठी त्यांनाही काही अशीच उलथापालथ करावी लागली होती काय? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. 

या साऱ्या प्रश्नांची, मुख्यत्वे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण ही पोस्ट घेऊन आलो आहोत. या पोस्ट मध्ये आपण यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये त्यांचे वयक्तिक जीवन,त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य, त्यांचे लेखन इत्यादी माहिती आपण घेणार आहोत. 

 

Also, Read

 

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री-यशवंतराव चव्हाण

 

 

बालपण आणि शिक्षण 

 

यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ ला झाला .महराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान.पूर्वी देवराष्ट्रे  साताऱरा सातारा जिल्ह्यात येत असे. आता मात्र ते सांगली मध्ये येते. 

यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठाबाई होते. यशवंतराव चव्हाण यांचे वडील बळवंतराव हे एक मराठा शेतकरी होते.बळवंतराव आणि विठाबाई यांच्या मायेमध्ये यशवंतरावांचे बालपण  अगदी सुखात जात होते. मात्र हे  सुखाचे दिवस यशवंतराव चव्हाण यांच्या वाट्याला फार काही आले नाही. त्यांच्या बालपणातच त्यांचे वडील बळवंतराव मरण पावले. 

बालपणीच वडील नावाचे छत्र हरपले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचे पालन पोषण त्यांच्या आईनेच केले. आपल्या एकट्या आईला परिस्थितीशी दोन हात करताना बघत यशवंतराव लहानाचे मोठे झाले.

त्यांनी कठीणातील कठीण परिस्थिती जवळून अनुभवली.एखादा त्यांच्या वयात त्याच ठिकाणी असता तर मार्ग चुकला असता. प्रवाहात वाहत गेला असता. मात्र यशवंतराव चव्हाण यांनी तसे होऊ दिले नाही. 

समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या नाकावर टिच्चून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्याना खूप अगोदरच कळून आले होते.स्वावलंबन आणि देशभक्तीचे धडे त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. परिणामी त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची फार ओढ होती. 

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत यशवंतराव चव्हाण एक शाळकरी विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते.परिणामी त्यांच्यावर फाईन पण बसवण्यात आला होता. १९३२ च्या चळवळीदरम्यानही त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांना शिक्षा झाली होती.

महत्वाचे म्हणजे १९३२ च्या चळवळीत साताऱ्यात झेंडा फडकावण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 

या चळवळीच्या काळातच त्यांना अनेक मित्र मिळाले. त्यांची ओळख तयार झाली. या वेळी त्यांना असेही काही मित्र मिळाले ज्यांनी अगदी शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. त्यामध्ये स्वामी रामानंद भारती, धुळाप्पा भाऊराव नवले गौरीहर सिहासने, इत्यादी जणांचा समावेश होतो. 

१९३४ मध्ये टिळक उच्च विद्यालय कराड येथून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून १९३८ ला बी. ए. ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्याच्या कायदा विद्यालयात प्रवेश घेतला. 

१९४१ ला त्यांनी एल.एल.बी. ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कराड येथे एक फौजदारी वकील म्हणून काम सुरू केले. १९४२ ला त्यांचा विवाह वेणूताई यांच्याशी झाला. कॉलेजच्या दिवसांमध्ये यशवंतराव बऱ्याच सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होते. या काळात त्यांची काँग्रेसच्या बऱ्याच कार्यकर्त्यांशी जवळीक होती. 

 

 

राजकीय कार्य 

 

राजकीय वर्तुळात त्याकाळात यशवंतराव चव्हाण एक भक्कम व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्धी पावले होते. त्यांनी महाराष्ट्र पातळी तसेच केंद्रीय पातळीवरही कार्य केले. त्यांचे कार्य आपण राज्यपातळी आणि केंद्रीय पातळी असे दोन टप्प्यांमध्ये पाहुयात. राज्यपातळीवरील कार्याने महाराष्ट्राची भविष्याची दिशा ठरवली तर केंद्रीय पातळीवरील कार्याने देशाच्या विकासात कसा हातभार लावला ते आपण पाहुयात. 

 

 

राज्यपातळीवरील कार्य 

 

१९४० यशवंतराव चव्हाण यांची सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या १९४२ च्या अधिवेशनामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता. याच अधिवेशनात ‘चाले जाव’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. परिणामी यशवंतराव काही काळ भूमिगत झाले होते. 

मात्र इंग्रजांना त्यांना पकडण्यात यश आले. आणि त्यांना जवळ जवळ २ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १९४४ ला त्त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमांत स्वतःला झोकून दिले. 

१९४६ ला यशवंतराव चव्हाण यांची मुंबई प्रांताच्या  विधिमंडळामध्ये निवड झाली. दक्षिण सातारा मतदारसंघातून ते निवडून आले होते. याच वर्षी त्यांची मुंबई प्रांताच्या गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणूनही निवड करण्यात आली होती.

मुंबई प्रांतात जेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार आले त्यावेळीही त्यांची नागरी पुरवठा, सामाजिक न्याय आणि वन या खात्यांचे मंत्री म्हणून निवड झाली होती. 

१९५३ ला महाराष्ट्राच्या सर्व भागांचा सारखाच सर्वांगीण विकास व्हावा या उद्देश्याने पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र यांतील नेत्यांमध्ये एक करार झाला.त्या कराराला नागपूर करार म्हणतात. या करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्येही यशवंतराव चव्हाण यांचा समावेश होता. बहुधा हा करार घडवून आणण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. 

१९५६ ला सध्याचा महाराष्ट्र आणि गुजरात अश्या दोन राज्यांनी मिळून एक द्विभाषिक राज्याची निर्मिती करण्यात आली होती. या द्विभाषिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीसुद्धा यशवंतराव चव्हाणांचा होते.

पुढे मुंबई सह मराठी भाषिक प्रदेश मिळून १९६० ला आजच्या महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली तेव्हाही यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री बनले. 

१९५० च्या दशकात मुंबई सह महाराष्ट्राच्या मागणीने जोर धरला होता. त्यासाठी समविचारी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. मात्र यशवंतराव चव्हाण यांनी कधीच या समितीत सहभाग घेतला नाही. उलट त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना महाराष्ट्रात बोलाविले. 

त्यांनी आपल्या कुशल वादविवादाने आणि संभाषण कौशल्याने नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची पूर्तता होण्याची आवश्यकता दाखवून दिली. परिणामी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झाली आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे शिल्पकार असेही संबोधले जाते.

 

Also Read 

 

 

केंद्रीय पातळीवरील कार्य 

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कार्य करत असतांनाच यशवंतराव चव्हाण यांनी १९५७-१९६० या कालावधीतच अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सुद्धा सेवा दिली.मुख्यमंत्री म्हणून कार्य करतांना त्यांनी उद्योग आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांचा समान विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. सहकार क्षेत्राला प्रोत्साहन आणि समानतेसाठी सिलिंग कायदा या दोन्ही गोष्टी त्यांच्याच कार्यकाळातील आहेत. 

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कार्य तर केलेच सोबतच त्यांनी केंद्र सरकारमध्ये सुद्धा महत्वाची खाती सांभाळली. १९६२ ला भारत -चीन युद्धामुळे तत्कालीन रक्षामंत्री कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला. युद्धाच्या परिस्थितीमध्ये पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांची रक्षामंत्री या पदावर नियुक्ती केली.   

यशवंतराव चव्हाण यांनी ही  युद्धोत्तर गंभीर परिस्थिती योग्यरीत्या हाताळली.नंतर त्यांनी भारतीय सेनेच्या सक्षमीकरणासाठी बरेच महत्वाचे निर्णय घेतले.

चीन सोबतच्या वाटाघाटींदरम्यानही पंडित नेहरूंसोबत त्यांचा सहभाग होताच.पुढे पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान बनले असतानासुद्धा यशवंतराव रक्षामंत्र्यांच्या पदावर होते. १९६५ चे भारत-पाक युद्ध झाले तेव्हाही यशवंतराव चव्हाण रक्षामंत्री होते. 

पुढे लाल बहादूर शास्त्री यांचे अकाली निधन झाले आणि इंदिरा गांधी प्रधानमंत्र्यांच्या पदावर विराजमान झाल्या. यावेळी १९६६ मध्ये  इंदिरा गांधींनी यशवंतराव चव्हाण यांना गृहमंत्र्यांच्या पदावर नियुक्त केले. गृहमंत्र्यांच्या पदावर नियुक्त होण्याअगोदर यशवंतराव चव्हाण १९६२ ला नाशिक मतदारसंघातून बिनविरोध संसदेवर निवडून आले होते. 

१९६९ ला काँग्रेसचे विभाजन झाले. मूळ काँग्रेसणी इंदिरा गांधी यांची काँग्रेस अश्या दोन भागांत काँग्रेस विघटित झाली. यावेळी मात्र यशवंतराव चव्हाण थोडे टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. त्याचे झाले असे कि त्यांनी आधी इंदिरा गांधींना विरोध केला होता.  मात्र मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी पुढे इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला. 

त्यांच्या इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्याचा परिणाम असा झाला की  इंदिरा गांधींनी जून१९७० मध्ये त्यांना भारताचे वित्तमंत्री म्हणून  नियुक्त केले. त्यांचा भारताचे वित्तमंत्री म्हणून प्रवास मात्र थोडा निराशाजनक ठरला.

कारण त्यांच्या कार्यकाळात १९६६ नंतर पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या सावटात सापडली. यावेळी १९७२ ला खऱ्या स्थूल देसशांतर्गत उत्पादनांमध्ये ०.५५% ची घट झाली होती. 

१९७४ ला त्यांची परराष्ट्र मंत्री या पदावर निवड करण्यात आली. पुढच्याच वर्षी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. या काळात बऱ्याच नेत्यांनी  इंदिरा गांधींना विरोध केला आणि त्यांचा रोष ओढवून घेतला. मात्र यशवंतराव चव्हाण सरकार मध्ये स्थिर राहिले. 

१९७७ ला झालेल्या निवडणुकांमध्ये खुद्द इंदिरा गांधी निवडून येऊ शकल्या नाही. परिणामी संसदेत काँग्रेसचे नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्याकाळचा काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने स्वाभाविकपणे यशवंतराव चव्हाण यांची विरोधी पक्ष नेते या पदावर वर्णी लागली. 

१९७८ ला इंदिरा गांधीच्या कोंग्रेसचे विभाजन झाले. इंदिरा काँग्रेस आणि म्हैसूरचे काँग्रेस नेते देवराज उर्स अश्या दोन नेत्यांच्या नेतृत्वात दोन गट झाले. काँग्रेस उर्स च्या बाजूने भाग घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी इंदिरा गांधी यांचा रोष ओढवून घेतला. पुढे काँग्रेस उर्स चे नाव राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस करण्यात आले. 

इंदिरा गांधी यांच्यापासून दूर गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी चौधरी चरणसिंग यांच्या सरकारमध्ये १९७९ ला अल्पावधी साठी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान या पदावर कार्य केले. इंदिरा गांधींना विरोध केल्याने यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला जणू उतरती कळा लागली. 

१९८० च्या निवडणुकांत पुन्हा इंदिरा काँग्रेस ने बाजी मारली. काँग्रेस उर्स च्या बाजूने निवडणुकीत विजय प्राप्त करणाऱ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण एकमेव व्यक्ती होते. शेवटी इंदिरा काँग्रेस ने त्यांना सहा महिन्याची मुभा देऊन पुन्हा आपल्या गटात समाविष्ठ करून घेतले. १९८२ ला त्यांची शेवटी आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.    

 

मृत्यू 

 

१९८२ ला  आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असतांना यशवंतराव चव्हाण दिल्लीला होते. दिल्लीत असतांना २५ नोव्हेंबर १९८४ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. 

 

 कराड या ठिकाणावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. कराड हे ठिकाण कृष्ण आणि कोयना या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. कृष्णा -कोयनेचा हा संगम तेव्हा पासून प्रीतिसंगम म्हणून ओळखला जातो.    

 

 

यशवंतराव चव्हाण यांचे काळातील महत्वाच्या योजना 

 

महाराष्ट्राच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणारे बरेच निर्णय यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने घेतले. आज जी महाराष्ट्राची प्रगती आपल्या नजरेत भरते तिच्या पाठीशी बऱ्याच अंशी यशवंतराव आणि त्यांच्या सरकारचे प्रयत्न आहेत. हे महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे-

महाराष्ट्रात पंचायत राज या व्यवस्थेची सुरुवात  यशवंतराव चव्हाण यांच्याच काळात झाली.आपल्या महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निवडण्यात आली होती. या मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद असे तीन स्तर ठरवण्यात आले होते. 

महाराष्ट्रामध्ये पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ करून आर्थिक विकासाला गती देण्यात आली. 

यशवंतरावांनी मूलभूत सोइ आणि सुविधा पुरवण्यासंबंधी कोटेकोर लक्ष दिले. बंधारे निर्मती मध्ये त्यांनी कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार केला. सोबतच कोयना आणि उजनी यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे कार्यही करण्यात आले. 

यशवंतराव चव्हाण यांच्या काळातच महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची मोठी भरभराट झाली. महाराष्ट्रात याच काळात सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या १८ साखर कारखान्यांची स्थापना करण्यात आली. 

कोल्हापूर विद्यापीठ (आजचे शिवाजी विद्यापीठ ) आणि मराठवाडा विद्यापीठ (आजचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांची स्थापना.सोबतच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेबाबतही संकल्पनात्मक सहभाग होता. 

मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना करण्यातही यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सरकारचा पुढाकार होता. 

नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचाही निर्णय त्यांचाच होता. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी देण्याची प्रथाही महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनीच सुरु केली. 

 

Also Read 

अग्निपंख पुस्तक सारांश 

 

 

यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य 

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्वांना परिचित असणारे यशवंतराव चव्हाण हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते उत्तम वक्ते, हाडाचे शेतकरी, दूरदृष्टीने युक्त, एक उत्तम राजकारणी,यशस्वी वकील, एक समाजसुधारक अश्या कितीतरी भूमिका एकाचवेळी पार पाडत होते.. 

या सगळ्या भूमिकांसोबतच त्यांनी आणखी एक महत्वाची भूमिका पार पाडली. ती म्हणजे एक वाचक आणि लेखक असण्याची. यशवंतराव चव्हाण आपल्या धकाधकीच्या दिनक्रमातून वाचनासाठी नित्य नेमाने वेळ काढत. सोबतच त्यांनी लिखाणही बऱ्यापैकी कारून ठेवले आहे. 

यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य आणि साहित्यिकांशी आपले नाते नेहमीच जुळवून ठेवले. तत्कालीन बरेच दिग्गज लेखक, कवी आणि प्रकाशक त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये येत होते. माणसाच्या चारित्र्याची ओळख त्याच्या संगतीवरून ठरते असे म्हणतात. यशवंतराव चव्हाण सुद्धा अंतर्मनातुन एक साहित्यिकच होते. 

 त्यांनी मराठी विश्वकोशाचे संकलन सुरु केले होते. मराठी अस्मितेसाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी मराठीमध्ये विश्वकोश निर्मिती करणे कसे दुरोगामी परिणाम करू शकते याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी त्यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे ही  कामगिरी सोपवली. 

यशवंतराव चव्हाण अतिशय  परिस्थितीतून वर आले. एका शेतकऱ्याचा मुलगा ते भारता सारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचे उपपंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, रक्षा मंत्री, अश्या अतिशय महत्वाच्या पदावर कार्य करणारा निस्सीम देशभक्त असा त्यांचा जो प्रवास आहे हा नक्कीच थक्क करणारा आहे. 

आपला जीवनप्रवास आपल्या देशबांधवांना कुठेतरी मार्गदर्शक ठरू शकेल, निदान आपण जिथे चुकलो त्या चुका त्यांच्या हातून होऊ नयेत यासाठीच यशवंतराव चव्हाण यांनी आत्मचरित्र लिहण्याचा निर्णय घेतला. हे आत्मचरित्र ते तीन खंडांत लिहिणार होते. 

त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग कृष्णाकाठ म्हणून प्रकाशित झाला. या पहिल्या भागामध्ये त्यांनी आपल्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल सांगितले आहे. यात त्यांचे साताऱ्यातील जीवन वर्णन केले गेले आहे. त्यांचे राहण्याचे ठिकाण कृष्ण नदीच्या काठावर वसलेले असल्याने त्यांनी या भागाला कृष्णाकाठ असे नाव दिले.

जेव्हा यशवंतराव चव्हाण द्विभाषी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बनले त्याकाळातील त्यांच्या जीवनप्रवासाविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात लिहिले. या भागाला त्यांनी सागरतीर असे नाव दिले. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची या भागात चर्चा आढळते. 

पुढील काळात १९६२ ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना अचानक रक्षा मंत्री म्हणून पदभार सोपविला. त्यांच्या भारताचे रक्षामंत्री या पदावर विराजमान होण्यापासून ते पुढील राजकीय वाटचाल या भागात वर्णन केलेली आहे.

हा भाग दिल्लीच्या आसपास व्यतीत होतो. म्हणजेच यमुनेच्या काठावर त्यांच्या जीवनाचा हा काळ गेला. म्हणून त्यांनी या भागाला यमुनाकाठ असे नाव दिले. 

या आत्मचरित्र व्यतिरिक्त त्यांनी आपले नवे मुंबई राज्य (१९५७), ऋणानुबंध (१९७५), भूमिका (१९७९), विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर -स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर हिंदुस्तानच्या प्रश्नांची चर्चा इत्यादी इतरही ग्रंथांचे लेखन केले.त्यांची साहित्यसंपदा अगदी विपूल नसली तरी  त्यांच्या लेखनात एका अस्सल साहित्यिकाची चुणूक दिसून येते. 

 

 

समारोप 

 

मंडळी आजच्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -यशवंतराव चव्हाण या  पोस्ट मध्ये आज आपण यशवंतराव चव्हाण यांची माहिती पाहिली. त्यांचे खडतर जीवन, त्यांच्या समोर असणारी संकटे. या संकटांचा धैर्याने त्यांनी केलेला सामना इत्यादी बाबी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -यशवंतराव चव्हाण या पोस्ट मध्ये पहिल्या. 

मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -यशवंतराव चव्हाण ही  पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मध्ये तुम्हाला काही सुधारणा कराव्याश्या वाटतात का?आणखी कोणती माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये लिहिता आली असती असे तुम्हाला वाटते? ते सारे आम्हाला नक्की कळवा. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -यशवंतराव चव्हाण ही  पोस्ट  माहितीपूर्ण आणि मनोरंजक बनवण्यासाठी तुमचे सहकार्यही आवश्यक आहे. तेव्हा तुमचे मोलाचे मत कळवायला विसरू नका. 

धन्यवाद !

 

Also Read 

1 thought on “महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? व त्यांचे जीवनचरित्र। First CM of Maharashtra”

Leave a Comment